Search This Blog

Monday, 25 July 2022

मुद्रांक शुल्क दंड सवलत योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन

 

मुद्रांक शुल्क दंड सवलत योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन

चंद्रपूर, दि. 25 जुलै :  1 एप्रिल 2022 पासून सुरू झालेल्या नोंदणी व मुद्रांक शुल्क दंड सवलत योजनेमधील पहिला टप्पा दि. 31 जुलै 2022 रोजी संपत आहे. थकीत मुद्रांक शुल्क व शास्ती अथवा थकीत शास्ती यासंबंधी पक्षकारांना दि. 31 मार्च 2022पूर्वी नोटीस प्राप्त झालेल्या असतील व त्यांनी अद्याप या योजनेचा लाभ घेतला नसेल तर त्या पक्षकारांनी मुद्रांक शुल्क दंड सवलत योजनेचा लाभ घेण्याकरीता सह जिल्हा निबंधक व मुद्रांक जिल्हाधिकारी कार्यालयाशी संपर्क साधून दंड सवलत योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन राज्याचे नोंदणी महानिरीक्षक व मुद्रांक नियंत्रक श्रावण हार्डीकर यांनी केले आहे.

संबंधित पक्षकारांनी 31 जुलै 2022 रोजीपर्यंत मुद्रांक शुल्क दंड सवलत योजनेचा लाभ घेतल्यास सदर सवलतीच्या पहिल्या टप्प्याचा म्हणजेच थकीत शास्तीवरील 90 टक्के सवलतीचा लाभ मिळेल अन्यथा सदर पक्षकारांना दुसऱ्या टप्प्यातील शर्तीप्रमाणे थकीत शास्तीवर 50 टक्के दंड भरावा लागेल.

असे आहे योजनेचे स्वरूप:

महाराष्ट्र मुद्रांक अधिनियम कलम 31, 32(अ), 33, 33(अ),46 व 53(अ) अन्वये, मुद्रांक शुल्क शास्तीच्या संदर्भात दि. 31 मार्च 2022 रोजी किंवा त्यापूर्वी नोटीस प्राप्त झालेल्या पक्षकारांकरीता सदर माफी योजना कार्यान्वित करण्यात आली आहे. ही योजना दि. 1 एप्रिल ते 30 नोव्हेंबर 2022 पर्यंत 8 महिन्याच्या कालावधीत कार्यान्वित राहणार आहे. सदर माफी योजना ही मुद्रांक शुल्काच्या तुटीच्या भागावर देय शास्तीच्या सवलतीसाठी जाहीर करण्यात आली आहे. 1 एप्रिल ते 31 जुलै 2022 या कालावधीत मुद्रांक शुल्क व दंडाची रक्कम भरल्यास अथवा मुद्रांक शुल्क यापूर्वीच भरले असल्यास, दंडाच्या रकमेत 90 टक्के सूट मिळेल. 1 ऑगस्ट ते 30 नोव्हेंबर 2022 या कालावधीत मुद्रांक शुल्क व दंडाची रक्कम भरल्यास अथवा मुद्रांक शुल्क यापूर्वीच भरले असल्यास दंडाची रक्कम भरल्यास, दंडाच्या रकमेत 50 टक्के सूट मिळेल.

या योजनेबाबत अधिक माहिती नोंदणी व मुद्रांक विभागाच्या www.igrmaharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आली आहे. याबाबत कोणतीही अडचण असल्यास जिल्ह्याचे सह जिल्हा निबंधक व मुद्रांक जिल्हाधिकारी यांच्याकडे, विभागाच्या 8888007777 या कॉलसेंटरवर अथवा complaint@igrmaharashtra.gov.in यावर संपर्क साधावा, असे सह जिल्हा निबंधक तथा मुद्रांक जिल्हाधिकारी एस. एस. भारस्कर यांनी कळविले आहे.

०००००००

No comments:

Post a Comment