शाळाबाह्य मुलांचा गांभिर्याने शोध घेऊन त्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणा - अतिरिक्त जिल्हाधिकारी वरखेडकर
Ø मिशन ‘झिरो ड्रॉप आऊट’ अभियानचा आढावा
चंद्रपूर, दि. 11 जुलै : शाळाबाह्य, अनियमित व स्थलांतरीत मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात दाखल करण्यासाठी राज्य शासनाच्यावतीने मिशन ‘झिरो ड्रॉप आऊट’ अभियान 5 ते 20 जुलै 2022 या कालावधीत राबविण्यात येत आहे. या अंतर्गत चंद्रपूर जिल्ह्यातील जी मुले शाळाबाह्य असतील त्यांचा गांभिर्याने शोध घेऊन या मुलांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी शिक्षण विभागाने योग्य नियोजन करावे, अशा सुचना अतिरिक्त जिल्हाधिकारी विद्युत वरखेडकर यांनी दिल्या.
जिल्हाधिकारी कार्यालयात मिशन ‘झिरो ड्रॉप आऊट’ अभियानाचा आढावा घेतांना त्या बोलत होत्या. यावेळी शिक्षणाधिकारी (माध्य.) कल्पना चव्हाण, बाल संरक्षण अधिकारी अजय साखरकर, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य धनंजय चाफले, गटशिक्षणाधिकारी विशाल देशमुख आदी उपस्थित होते.
बालकांच्या मोफत आणि सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार कायद्यांतर्गत 6 ते 14 वयोगटातील प्रत्येक बालकास दर्जेदार शिक्षण मिळणे, हा बालकांचा हक्क आहे, असे सांगून अतिरिक्त जिल्हाधिकारी विद्युत वरखेडकर म्हणाल्या, जिल्ह्यात शहरालगतच्या धाब्यावर, वीट भट्टीवर, तसेच विविध बांधकाम प्रकल्प, वेगवेगळ्या आस्थापनांवर बालमजुर असण्याची शक्यता नाकारता येत नाही. अशा बालकांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी शिक्षण विभागाने अन्न व औषध प्रशासन आणि पोलिस विभागाचे सहकार्य घ्यावे. कामगार कल्याण कार्यालयातून बांधकाम मजुरांचा डाटा गोळा करून बांधकाम प्रकल्पावर भेटी द्याव्यात.
ज्यांची शाळेत नोंदणी आहे, पण काही कारणास्तव स्थलांतर झाले आहे,अशा बालकांचासुध्दा शोध घेणे आवश्यक आहे. मिशन ‘झिरो ड्राप आऊट’ हे केवळ शिक्षण विभागाचे अभियान न राहता यात स्थानिक नागरिकांनी सहभाग घेतला तर मुले शिक्षणापासून वंचित राहणार नाही. त्यामुळे नागरिकांनीसुध्दा या अभियानाला सहकार्य करावे. शाळाबाह्य मुले आढळली तर जवळच्या शाळेतील मुख्याध्यापकांना त्याबाबत माहिती द्यावी, असे आवाहन अपर जिल्हाधिका-यांनी केले.
बालकांना शाळाबाह्य होण्यापासून रोखण्यासाठी मिशन ‘झिेरो ड्रॉप आऊट’ 5 ते 20 जुलै या कालावधीत राबविण्यात येत आहे. यात शिक्षण विभागासोबतच महसूल, ग्रामविकास, नगरविकास, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य, महिला व बालविकास, कामगार विभाग, आदिवासी विकास, अल्पसंख्यांक विकास विभाग, सार्वजनिक आरोग्य, गृह विभाग आदींच्या सहभागाने हे मिशन राबविण्यात आहे.
बैठकीला वाहतूक शाखेचे अनिल आळंदे, अधिव्याख्याता विनोद लवांडे, सामाजिक संघटनेचे हर्षवर्धन डांगे, समग्र शिक्षा अभियानचे जिल्हा समन्वयक सुर्यकांत भडके, महिला व बालविकास विभागाच्या कांचन वरठी आदी उपस्थित होते.
००००००
No comments:
Post a Comment