Search This Blog

Sunday, 31 July 2022

आजादी का अमृत महोत्सवातंर्गत मूल मध्ये ऊर्जा विभागाचा जागर

 

आजादी का अमृत महोत्सवातंर्गत मूल मध्ये ऊर्जा विभागाचा जागर

Ø  ऊर्जा क्षेत्रातील क्रांती आणि 2047 पर्यंतचे ध्येय निश्चित

चंद्रपूर, दि. 31 जुलै : आजादी का अमृत महोत्सवाचे औचित्य साधुन "उज्वल भारत, उज्वल भविष्य - पॉवर @2047" याअभियानांतर्गत महावितरण चंद्रपूर मंडळाद्वारे ऊर्जा क्षेत्रातील क्रांती आणि 2047 पर्यंतचे ध्येय हा कार्यक्रम मूल येथील कन्नमवर सभागृहात पार पडला.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आमदार किशोर जोरगेवार तर प्रमुख अतिथी म्हणून माजी जि. प. अध्यक्ष संध्या गुरनुले, भद्रावती येथील पावरग्रीडचे मुख्य महाव्यवस्थापक अरींधम सेनसर्मा, महावितरणच्या अधीक्षक अभियंता संध्या चिवंडे, महापारेषणचे कार्यकारी अभियंता हरीचंद्र बालपांडे, प्र.कार्यकारी अभियंता सुहास पडोळे उपस्थित होते.

कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री. जोरगेवार म्हणाले, रोटी, कपडा और मकान या तीन प्राथमिक गरजांशिवाय आता वीज ही चवथी प्राथमिक गरज निर्माण झाली आहे. विजेशिवाय जगणे कठीण आहे. चंद्रपूर जिल्ह्यात सहा लाख वीज ग्राहक असून सर्व ग्राहकांना वीजपुरवठा करणे कठीण काम असून महावितरण जिल्ह्यात चांगले काम करत आहे.

प्रास्ताविकातून श्रीमती चिवंडे यांनी वीज ही विकासाची जननी असून वीज यंत्रणेच्या विकासाठी आपण कटीबध्द आहोत. जिल्ह्यात वीज योजनेचे विस्तारीकरण, बळकटीकरण , भुमिगतीकरण सुरू आहे. चंद्रपूर मंडळात गेल्या आठ वर्षात ३५ नवीन उपकेंद्रांची निर्मिती करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. तसेच केंद्र व राज्य शासनाच्या ऊर्जा विभागाच्या विविध योजना जसे एकात्मिक ऊर्जा विकास कार्यक्रम, गतिमान विद्युत विकास कार्यक्रम, कुसुम योजना, मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना, उच्चदाब वीज वितरण प्रणाली योजना, नवीन कृषी ऊर्जा धोरण, डॉ.बाबासाहेब आंबेडकर जीवन प्रकाश योजना, ग्रामस्वराज्य अभियान, दीनदयाल उपाध्याय ग्रामीण विद्युतीकरण योजना, छतावरील सौर निर्मिती प्रकल्प आदी योजनांची माहिती दिली.

यावेळी केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजनांच्या लाभार्थ्यांची निवड करून त्यांना सन्मान चिन्ह व प्रशस्तीपत्र देवून सत्कार करण्यात आला. यात, डॉ. बाबासाहेब आंबेडकर जीवनप्रकाश योजनेचे लाभार्थी श्री. रामटेके, प्रवीण गेडाम, जीवन सोयाम, देवानंद देवगडे, जिल्हा विकास नियोजन समिती योजनेतून दिपक रामटेके, भारत कुंभारे, सौर वीज जोडणी अंतर्गत सुरेश मडावी, उच्चदाब वीज वितरण प्रणाली अंतर्गत भावना देवगडे, सौभाग्य योजना अंतर्गत वैष्णवी सिडाम यांचा लाभार्थ्यांचा समावेश होता.

आदिवासी बालविकास शाळेच्या विद्यार्थ्यांनी आदिवासी लोकनृत्य सादर केले. तसेच अभिनय सूत्रम अभिनय ग्रुप यांनी ऊर्जा संवर्धन व ऊर्जा क्रांती या विषयावर पथनाट्य सादर केले.

तत्पुर्वी कार्यक्रमाची सुरवात राष्ट्रसंत तुकडोजी महाराज व मा. सा. कन्नमवार यांच्या प्रतिमेस माल्यार्पण करून तसेच दीप प्रज्वलाने झाली. कार्यक्रमाचे संचालन सुशील सहारे यांनी तर आभार उपकार्यकारी अभियंता श्रीनिवास कुर्रा यांनी मानले. यावेळी प्र. कार्यकारी अभियंता विजय राठोड, वरिष्ठ व्यवस्थापक राकेश बोरीवर, उपकार्यकारी अभियंता चंदन चौरसिया, सहाय्यक अभियंता अमित बिरमवार आदी उपस्थित होते.

00000


No comments:

Post a Comment