पूरग्रस्तांना जास्तीत जास्त मदत करण्याला सर्वोच्च प्राधान्य - सुधीर मुनगंटीवार
Ø संवेदनशीलपणे पंचनामे करण्याचे प्रशासनाला निर्देश
चंद्रपूर, दि. 15 जुलै : संपूर्ण महाराष्ट्रासह चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यातही पावसाच्या संततधारेमुळे पूर परिस्थिती अतिशय बिकट झाली. या पुराचा सर्वाधिक फटका गरीब कुटुंबाना बसला असून अनेकांच्या घरात पाणी घुसले. परिणामी त्यांना सुरक्षित स्थळी स्थलांतरीत व्हावे लागले. पावसाच्या पाण्याबरोबर नागरिकांच्या डोळ्यातही अश्रु आहेत. त्यामुळे या संकटाच्या काळात जिल्ह्यातील पूरग्रस्त नागरिकांना जास्तीत जास्त मदत मिळवून देण्याला आपले सर्वोच्च प्राधान्य आहे. याबाबत जिल्हा प्रशासनाला सूचना केल्याचे विधीमंडळ लोकलेखा समितीचे अध्यक्ष तथा आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले.
जिल्हाधिकारी कार्यालयात पूर परिस्थतीचा आढावा घेतांना मुंबईवरून दूरदृश्य प्रणालीद्वारे ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी अजय गुल्हाने, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. मिताली सेठी, पोलिस अधिक्षक अरविंद साळवे, अतिरिक्त जिल्हाधिकारी विद्युत वरखेडकर, निवासी उपजिल्हाधिकारी विशालकुमार मेश्राम, अधीक्षक अभियंता (सा.बा.वि.) संध्या साखरवाडे, संध्या चिवंडे (विद्युत कंपनी), मनपा आयुक्त राजेश मोहिते, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. निवृत्ती राठोड, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. राजकुमार गहलोत आदी उपस्थित होते.
या पूर परिस्थितीत नागरिकांच्या घरांचे, शेतीचे तसेच पायाभूत सुविधांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे, असे सांगून श्री. मुनगंटीवार म्हणाले, हा संकटाचा काळ आहे. काही नागरिकांची घरे अंशत: पडली असली तरी पूर ओसरल्यानंतर मातीची घरे काही दिवसांनी पडू शकतात. त्यामुळे कोणताही भेदभाव न करता नागरिकांचे अश्रू पुसण्यासाठी संवेदनशीलपणे पंचनामे करा. जेणेकरून त्यांना जास्तीत जास्त मदत करता येईल. शहरातील वस्त्यांमधून पाणी ओसरल्यानंतर साथरोग पसरण्याची शक्यता असते. त्यामुळे महानगर पालिका तसेच स्थानिक पालिकेने आपापल्या भागात साफसफाई अभियानासोबतच ब्लिचिंग पावडरची फवारणी, मच्छर निर्मूलनाकरिता स्प्रेइंग, परिसरातील विहिरींमध्ये ब्लिचिंग पावडर, पोटॅशियम परमँगनेट, तुरटी फवारणे आदी उपाययोजना कराव्यात. तसेच आरोग्य विभागाने डासाच्या उत्पत्तीपासून होणारे मलेरिया, डेंग्यू आदी रोगांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी फिरते आरोग्य पथके कार्यान्वित करावी.
ज्या नागरिकांना आपली घरे सोडून इतरत्र आसारा घ्यावा लागला आहे, अशा नागरिकांची जेवणाची चांगली व्यवस्था, पिण्याचे स्वच्छ पाणी, आदी बाबी प्रशासनासोबत स्थानिक पदाधिका-यांनीसुध्दा उपलब्ध करून द्याव्यात. आपापल्या घरी परत गेल्यावर लगेच त्यांचा संसार सुरू होऊ शकत नाही, अशावेळी त्यांना जीवनावश्यक कीटचा पुरवठा करावा. ज्यांची घरे पडली आहेत किंवा पडण्याच्या अवस्थेत आहेत, त्यांना कुठे जायचे याबाबत माहिती नसते. त्यामुळे अशा लोकांसाठी टोल फ्री क्रमांक प्रसारीत करावा. कोणत्याही परिस्थतीत नियंत्रण कक्षाचे संपर्क क्रमांक बंद असता कामा नये. या संकटाच्या काळात कोणत्याही व्यक्तीच्या मनात एकटा असल्याची भावना निर्माण होऊ देऊ नका. प्रशासनासोबतच लोकप्रतिनिधी आणि स्थानिक पदाधिका-यांनी लोकांच्या मदतीला धावून जावे, असे आवाहन त्यांनी केले.
पंचनामे करतांना तहसीलदार, पटवारी, तलाठी यांनी संकुचितपणा न करता दिलदारपणे वागावे. नागरिकांना मदत मिळवून देऊ, अशी भावना कामामध्ये दिसणे आवश्यक आहे. अंशत: घर पडले असले तरी त्यांना जास्तीत जास्त आर्थिक मदत मिळवून देण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री तसेच उपमुख्यमंत्र्यांकडे पाठपुरावा केला जाईल. शासन निर्णयात बदल करावयाचा असल्यास तो प्राधान्याने करू, अशी ग्वाही श्री. मुनगंटीवार यांनी दिली.
पायाभुत सुविधांच्या झालेल्या नुकसानीबाबत ते म्हणाले, वीज, रस्ते, विद्युत खांब, ट्रान्सफार्मर, ग्रामीण भागातील रस्ते, राष्ट्रीय व राज्य मार्गावरील पुल, ग्रामीण भागातील छोटे पुल व रपटे, बंधा-यांची पुनर्बांधणी आदींचे जे नुकसान झाले आहेत, त्याबाबत तातडीने माहिती गोळा करून अहवाल सादर करावा. जेणेकरून शासनाकडे निधीची मागणी केली जाईल. तसेच ज्या गावांचे पुनर्वसन करायचे आहे, त्याचीही माहिती द्यावी, अशाही सुचना त्यांनी दिल्या.
यावेळी त्यांनी सर्व तहसीलदारांकडून आपापल्या भागातील पूर परिस्थिती, तसेच तालुका प्रशासनाने काय उपाययोजना केल्या याबाबत माहिती जाणून घेतली. जिल्हा प्रशासनाच्या उपाययोजनेबाबत जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी माहिती दिली. बैठकीला सर्व विभागाचे विभागप्रमुख यांच्यासह दूरदृष्य प्रणालीद्वारे जिल्हा व तालुक्यातील पदाधिकारी, लोकप्रतिनिधी उपस्थित होते.
००००००
No comments:
Post a Comment