Search This Blog

Wednesday 13 July 2022

पूर परिस्थितीच्या काळात आवश्यक सतर्कता बाळगा

 

पूर परिस्थितीच्या काळात आवश्यक सतर्कता बाळगा

Ø  जिल्हा प्रशासनाचा नागरिकांना सावधानतेचा इशारा

चंद्रपूर, दि. 13 जुलै : चंद्रपूर जिल्ह्यातून वाहणाऱ्या वैनगंगा नदीवरील गोसेखुर्द धरणाच्या पाणलोट क्षेत्रात होत असलेल्या सततच्या पर्जन्यमानामुळे गोसेखुर्द धरणातील पाण्याची आवक मोठ्या प्रमाणात वाढली आहे. जलसंधारण विभागाकडून प्राप्त माहितीद्वारे, गोसेखुर्द धरणातून 13 जुलै 2022 रोजी रात्री सुमारे 12 हजार क्युसेक विसर्ग वैनगंगा नदी पात्रामध्ये सोडण्यात येणार आहे. त्यामुळे नदी पातळीमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ होऊन ब्रह्मपुरी, मूल, सावली, पोंभुर्णा व गोंडपिपरी तालुक्यातील नदीलगतच्या गावांमध्ये पूर परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. करिता नदीलगतच्या गावकऱ्यांनी काळजी घ्यावी, असा सतर्कतेचा इशारा जिल्हा प्रशासनाने दिला आहे.

नागरिकांनी घ्यावयाची काळजी

भारतीय हवामान खाते, जिल्हा प्रशासन तसेच विविध माध्यमातून प्राप्त होणाऱ्या हवामान अंदाज व धरणाबाबत स्थिती व पाण्याचा विसर्ग यावर कटाक्ष ठेवून सतर्क रहावे. कोणत्याही परिस्थितीत पुराच्या पाण्यात प्रवेश करू नये. नदीपात्राच्या कडेला अथवा धोक्याच्या ठिकाणी वास्तव्यास असल्यास तात्काळ सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित व्हावे. मुसळधार पावसात आवश्यकता नसल्यास घराबाहेर पडू नका. जुन्या मोडकळीस आलेल्या घरात / इमारतीत आश्रय घेऊ नका. पुलावरून नदी नाल्याचे पाणी वाहत असल्यास पूल ओलांडू नका. अफवांवर विश्वास ठेवू नका, तसेच अफवा पसरू नका. धोकादायक ठिकाणी अथवा दरड कोसळणाऱ्या ठिकाणी थांबू नका.

घडलेल्या घटनेची आपत्तीची माहिती तात्काळ जिल्हा तसेच तालुका नियंत्रण कक्षाला द्यावी. यासाठी चंद्रपूर जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, जिल्हाधिकारी कार्यालय चंद्रपूरच्या 07172 - 251597 या क्रमांकावर नियंत्रण कक्षात संपर्क करावा, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष अजय गुल्हाने आणि निवासी उपजिल्हाधिकारी विशालकुमार  मेश्राम यांनी केले आहे.

00000

No comments:

Post a Comment