बल्लारपूर तालुक्यातील नुकसानग्रस्त शेतीची जिल्हाधिका-यांकडून पाहणी
चंद्रपूर, दि. 22 जुलै : गत दोन आठवड्यापासून जिल्ह्यात सुरू असलेल्या पावसामुळे अनेक तालुक्यांना जबर फटका बसला. बल्लारपूर तालुक्यातसुध्दा मोठ्या प्रमाणावर शेतमालाची तसेच नागरिकांच्या मालमत्तेची हानी झाली. या नुकसानीची प्रत्यक्ष पाहणी करण्यासाठी जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी बल्लारपूर तालुक्यातील दुधोली, बामणी, दलेली या गावांना भेटी दिल्या.
यावेळी उपविभागीय अधिकारी दीप्ती सुर्यवंशी - पाटील, तहसीलदार संजय राईंचवार, न.प. मुख्याधिकारी विजय देवळीकर, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणचे अभियंता श्री. वाढई, सार्वजनिक बांधकाम विभागाचे शाखा अभियंता वैभव जोशी, तालुका कृषी अधिकारी श्रीधर चव्हाण आदी उपस्थित होते.
जिल्हाधिका-यांनी वर्धा नदीच्या पुलाची पाहणी केल्यानंतर नगर परिषद क्षेत्रातील गणपती वॉर्ड येथील पूरग्रस्त भागाची पाहणी केली. तसेच तालुक्याच्या सर्व प्रमुख अधिका-यांची उपविभागीय कार्यालयात बैठक घेऊन पुरामुळे झालेल्या शेतमालाच्या व घराच्या नुकसानीचा आढावा घेतला. नुकसानीचे तात्काळ पंचनामे करावे. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणने रस्त्यावर पडलेले खड्डे त्वरीत बुजवावे, अशा सूचना जिल्हाधिका-यांनी दिल्या.
बल्लारपूर तालुक्यात लागवडीखाली एकूण 60886 हेक्टर क्षेत्र असून पुरामुळे बाधित क्षेत्र 1564 हेक्टर आहे. पुराचा फटका तालुक्यातील 1327 शेतक-यांना बसला आहे. आतापर्यंत नुकसानग्रस्त 202 घरांचे तसेच काही शेतमालाचे पंचनामे करण्यात आले आहे. मात्र अजुनही काही क्षेत्रात पुराचे पाणी असल्यामुळे दोन-दिवसांत संपूर्ण पंचनामे करण्यात येतील, अशी माहिती तहसीलदार राईंचवार यांनी दिली.
यावेळी बामणीचे सरपंच सुभाष ताजणे, मंडळ अधिकारी शंकर खोब्रागडे, तलाठी शंकर खरूले, कृषीसेवक राहुल अहिरराव आदी उपस्थित होते.
००००००००
No comments:
Post a Comment