Search This Blog

Thursday 31 August 2023

रोजगार मेळाव्यातून 95 महिला उमेदवारांची निवड

रोजगार मेळाव्यातून 95 महिला उमेदवारांची निवड

चंद्रपूर, दि. 31 : जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, मॉडल करिअर सेंटर व सरदार पटेल महाविद्यालय, चंद्रपूर यांच्या संयुक्त विद्यमाने सरदार पटेल महाविद्यालयात महिलांसाठी पंडित दिनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.

या रोजगार मेळाव्यात जय महाराष्ट्र प्लेसमेंट सर्व्हिसेस चंद्रपूर, व्हि-1 क्लिक सोलुशन, स्वातंत्र्य फायनान्स बल्लारपूर, एस.बी.आय. लाइफ इन्शुरन्स, एल.आय.सी. वरोरा, एलिव्हेट फायनान्स लिमि., व्हि.व्हि.आर. फायनान्स आदी कंपन्या सहभागी होत्या. या रोजगार मेळाव्यात 379 महिला उमेदवारांची उपस्थिती होती, त्यापैकी 95 महिला उमेदवारांची प्राथमिक निवड करण्यात आली.

याप्रसंगी पोलिस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी, सुधा पोटदुखे, सरदार पटेल महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. प्रमोद काटकर, जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहायक आयुक्त भैय्याजी येरमे, अॅड. प्रिया पाटील आदींची उपस्थिती होती.

पोलिस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी म्हणाले, कौशल्याचा वापर रोजगार व स्वयंरोजगार मिळवण्यासाठी करावा, उमेदवारांनी नवउद्योजक बनावे तसेच या ठिकाणी आलेल्या उद्योजकांनी जास्तीत-जास्त उमेदवारांना रोजगाराची संधी द्यावी. यासोबतच महिला उमेदवारांनी या रोजगार मेळाव्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन केले.  अॅड. प्रिया पाटील म्हणाल्या, स्त्रियांनी चुल व मूल या संकल्पनेत गुंतून न राहता उच्च शिक्षण घेऊन स्वावलंबी बनावे, रोजगार मेळाव्यातून संधीचा लाभ घ्यावा व महिला उद्योजक म्हणून नावारुपास यावे.

रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहाय्यक आयुक्त भैय्याजी येरमे म्हणाले, या रोजगार मेळाव्यात विविध कंपन्या सहभागी झाल्या आहेत. या माध्यमातून उमेदवारांना रोजगाराची संधी चालून आली आहे. या संधीचा लाभ घ्यावा तसेच उमेदवारांनी आपल्या कौशल्याचा वापर रोजगार मिळवण्यासाठी करावा व नोकरीसाठी बाहेर जाण्याची मानसिकता ठेवावी असेही ते म्हणाले. कार्यक्रमाचे संचालन प्राध्यापिका कविता रायपूरकर तर आभार मुकेश मुजंनकर यांनी मानले.

००००००

Wednesday 30 August 2023

जिल्हाधिका-यांकडून सामान्य रुग्णालयातील आरोग्य व्यवस्थेची पाहणी






 

जिल्हाधिका-यांकडून सामान्य रुग्णालयातील आरोग्य व्यवस्थेची पाहणी

चंद्रपूर दि. 30 : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे परिचारिकेच्या झालेल्या मृत्युप्रकरणाची जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी गंभीर दखल घेऊन प्रशासनाला चौकशीचे आदेश दिले आहे. तसेच सामान्य रुग्णालयातील उणिवा, त्रृटी आदी बाबींमध्ये जिल्हाधिका-यांनी विशेष लक्ष देण्याच्या सुचना केल्या होत्या. त्या अनुषंगाने जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. यांनी बुधवारी (दि.30) जिल्हा सामान्य रुग्णालयातील आरोग्य व्यवस्थेची पाहणी केली.

यावेळी जिल्हाधिकारी श्री. गौडा म्हणाले, रुग्णालयात मिळणा-या आरोग्य सेवेबद्दल नागरिकांच्या तक्रारीसाठी लावण्यात आलेली तक्रारपेटी सुस्थितीत असणे आवश्यक आहे व त्याची नागरिकांना माहिती असावी. जिल्हा रुग्णालयातील औषध पुरवठा, साहित्य, उपकरणे, रिक्त जागा आदी बाबीं प्रत्येक महिन्याला शासनाला कळवाव्यात. तसेच त्याची एक प्रत जिल्हा प्रशासनाला उपलब्ध करून द्यावी. अतिदक्षता कक्ष चांगल्या स्थितीत असावा. देखभाल व दुरुस्ती करीता देण्यात आलेल्या निधीमध्ये अतिदक्षता कक्ष, संरक्षण भिंत, प्रवेशद्वार, पाण्याची टाकी याव्यतिरिक्त इतर बाबींचा समावेश करायचा असल्यास त्वरीत कळवावे.

रुग्णालयात कोणत्या डॉक्टर्सची ड्यूटी आहे, ते कधी येतात, त्यांच्या येण्या-जाण्याच्या वेळा कोणत्या आहेत, याबाबत रुग्णालय प्रशासनाने अतिशय गांभिर्याने लक्ष द्यावे. यात कोणताही हलगर्जीपणा खपवून घेतला जाणार नाही. रुग्णाशी निगडीत असलेल्या व अत्यावश्यक बाबी जसे औषध पुरवठा, उपकरणे यांची मागणी त्वरीत करा. रुग्णालयातील सर्व विभाग प्रमुखांची बैठक घेऊन त्या-त्या विभागात कशाची आवश्यकता आहे, प्रथम प्राधान्य कोणते, त्याचे बजेट किती याबाबत अहवाल मागवून घ्या. रुग्णालयातील स्टाफ किती वाजता येतो, वेळेवर उपस्थित नसलेल्यांची नोंद घेणे, स्वाक्षरीची पडताळणी करण्यासाठी हस्ताक्षर तज्ञांकडे पाठविणे, बायोमेट्रीक मशीन असल्यास उपस्थितांची नोंद घेणे, अशा सुचनाही त्यांनी केल्या.

जिल्हाधिकारी पुढे म्हणाले, रुग्णालयात औषधी पुरवठा व मागणी, उपकरणे, सर्जिकल साहित्य याचा गत तीन वर्षाचा रेकॉर्ड, त्यासाठी आलेला निधी याबाबत अहवाल सादर करावा. येथे उपलब्ध असलेले सीसीटीव्ही सर्व चालू स्थितीत असणे आवश्यक आहे. आणखी सीसीटीव्ही लागत असल्यास तसा प्रस्ताव सादर करा. डॉक्टरांची येण्या-जाण्याची वेळ नोंद होण्यासाठी रुग्णालयाच्या प्रवेशद्वारावर सीसीटीव्ही त्वरित लावा. त्याचा ॲक्सेस उपविभागीय अधिकारी यांना आय.पी.द्वारे द्यावा. इतर विभागापेक्षा नवजात बालक कक्ष, बालरोग विभाग, तेथील आयसीयू हे चांगल्या प्रकारे सुरू असले तरी बालकांची अदलाबदल, बाळ चोरीचे प्रकार घडणार नाही, यासाठी दक्ष रहा. रुग्णालयात रुग्णासोबत कमीतकमी नातेवाईक आत येण्यासाठी सुरक्षा रक्षकांकडून नियोजन करा, असेही निर्देश त्यांनी दिले.

यावेळी जिल्हाधिका-यांनी टेलिमेडीसीन विभाग, अपघात विभाग, अतिदक्षता विभाग, लहान मुलांसाठी असलेला अतिदक्षता विभाग, ड्रेसिंग रूम, डिलिव्हरी रुम, डायलिसिस युनीट, थॅलेसमिया रुम व बाहृयरुग्ण विभाग आदींची पाहणी केली. याप्रसंगी सहाय्यक जिल्हाधिकारी मुरुगानंथम एम, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. मिलींद फुलपाटील, बालरोग्य तज्ञ डॉ. मिलींद कांबळे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. महादेव चिंचोळे, डॉ. प्रशांत उईके, डॉ. मंगेश गुलवाडे, आयएमए चंद्रपूरच्या सचिव डॉ. कल्पना गुलवाडे, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. हेमचंद कन्नाके, वैद्यकीय अधिक्षक डॉ. निवृत्ती जिवणे आदी उपस्थित होते.

०००००

गणेशोत्सव स्पर्धेत जास्तीत जास्त मंडळांनी 15 सप्टेंबरपर्यंत सहभाग नोंदवावा

 

गणेशोत्सव स्पर्धेत जास्तीत जास्त मंडळांनी 15 सप्टेंबरपर्यंत सहभाग नोंदवावा

Ø सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांचे आवाहन

मुंबई / चंद्रपूरदि. 30 : राज्य शासनाने, 19 सप्टेंबर 2023 पासून सुरू होणाऱ्या गणेशोत्सवात राज्यातील उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना पुरस्कार देण्याचा निर्णय घेतला आहे. या स्पर्धेत जास्तीत जास्त मंडळांनी 15 सप्टेंबर 2023 पर्यंत आपला सहभाग नोंदवावाअसे आवाहन सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले आहे.

या स्पर्धेसाठी मुंबईमुंबई उपनगरपुणेठाणे या जिल्ह्यांतून प्रत्येकी 3 व अन्य जिल्ह्यांतून प्रत्येकी एक या प्रमाणे उत्कृष्ट 44 गणेशोत्सव मंडळांची निवड करण्यात येईल. या 44 गणेशोत्सव मंडळांमधून राज्यातील पहिल्या क्रमांकाच्या उत्कृष्ट गणेशोत्सव मंडळास पाच लाख रुपयांचेद्वितीय क्रमांकास अडीच लाख रुपयांचेतर तृतीय क्रमांकास एक लाख रुपयांचे पारितोषिक व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात येईल. उर्वरित 41 गणेशोत्सव मंडळांना राज्य शासनाकडून प्रत्येकी 25 हजार रुपयांचे पारितोषिक व प्रमाणपत्र देण्यात येईल.

उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव स्पर्धेचे वेळापत्रक :

उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव स्पर्धेत सहभागी होण्यासाठी गणेश मंडळांना 15 सप्टेंबर 2023 पर्यंत स्पर्धेत अर्ज करता येईल. mahotsav.plda.@gmail.com या ई - मेलवर गणेशमंडळांनी अर्ज करावा. पु. ल. देशपांडे कला अकादमी तर्फे ई-मेलवर प्राप्त अर्ज संबंधित जिल्हाधिकारी कार्यालयाला 18 सप्टेंबरपर्यंत परीक्षणासाठी उपलब्ध करून देण्यात येईल. 19 ते 28 सप्टेंबर दरम्यान जिल्हास्तरीय समितीचे सदस्य स्पर्धेत सहभागी गणेशोत्सव मंडळांचे प्रत्यक्ष भेटी देऊन परीक्षण करतील. व्हिडिओग्राफी आणि कागदपत्रे तपासून अभिप्रायासह गुणांकन करतील. जिल्हास्तरीय समिती जिल्ह्यातून एका उत्कृष्ट गणेश मंडळाची शिफारस 1 ऑक्टोबरपर्यंत पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीला करेल. राज्यस्तरीय समिती राज्यातील उत्कृष्ट 3 गणेश मंडळाची शिफारस अकादमीला करेल. त्यानुसार कला अकादमी विजेत्या मंडळांची घोषणा करेल व 12 ऑक्टोबरला विजेत्या गणेश मंडळांना पुरस्कार प्रदान करण्यात येईल. 

राज्य शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावरील पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागाच्या 4 जुलै 2023 रोजीच्या शासन निर्णयात स्पर्धेचा तपशीलस्पर्धा निवडीचे निकष नमूद केले आहेत. तसेच अर्जही उपलब्ध करून देण्यात आला आहे. अर्जाच्या या नमुन्यानुसार सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी पु. ल. देशपांडेमहाराष्ट्र कला अकादमीमुंबई यांच्या mahotsav.plda@gmail.com या ई- मेल 15 सप्टेंबर 2023 पर्यंत अर्ज करावा. या स्पर्धेत जास्तीत जास्त मंडळांनी सहभाग नोंदवावाअसेही आवाहन सांस्कृतिक कार्य मंत्री श्री. मुनगंटीवार यांनी केले आहे.

०००००

नवीन पिढीला व्यसनांपासून दूर ठेवणे गरजेचे - अपर जिल्हाधिकारी देशपांडे


नवीन पिढीला व्यसनांपासून दूर ठेवणे गरजेचे -         अपर जिल्हाधिकारी देशपांडे

Ø जिल्हास्तरीय अंमली पदार्थ विरोधी कार्यकारी समितीचा आढावा

चंद्रपूर दि. 30 : मुलांच्या सर्वांगीण विकासाचे ध्येयसमोर ठेवून ज्ञान, माहिती व कौशल्यासह त्यांचा विकास करण्याची जबाबदारी शिक्षकासह आपल्या प्रत्येकाची आहे. नवीन पिढीला व्यसनांपासून दूर ठेवणे गरजेचे आहे. याकरीता शाळा व महाविद्यालयीन परिसर तंबाखूमुक्त करावा, यासाठी पोलीस व शिक्षण विभागाचा समन्वय आवश्यक असल्याचे अपर जिल्हाधिकारी श्रीकांत देशपांडे म्हणाले. तसेच जिल्ह्यात अंमली पदार्थ विरोधी मोहिम अधिक व्यापक करण्याच्या सुचना बैठकीत दिल्या.

जिल्हाधिकारी कार्यालयातील वीस कलमी सभागृह येथे जिल्हास्तरीय अंमली पदार्थ विरोधी कार्यकारी समितीच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी, मध्य चांदा वनविभागाचे वनसंरक्षक शेख तौसिक शेख हैदर, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक महेश कोंडावार, राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधिक्षक संजय पाटील, गुप्तचर विभागाचे उपकेंद्रीय अधिकारी वैभव सिंह, केंद्रीय वस्तू व सेवा कर विभागाचे अधिक्षक विजयकुमार नायर, अन्न व औषध प्रशासन विभागाचे सहायक आयुक्त श्री. बाघमारे, शिक्षणाधिकारी (माध्य.) कल्पना चव्हाण, डाक निरीक्षक एस. जी. दिवटे, डॉ. बंडू रामटेके आदींची प्रामुख्याने उपस्थिती होती.

अपर जिल्हाधिकारी श्री. देशपांडे म्हणाले, शिक्षकांच्या व्यसनांबाबत शिक्षण विभागाने तपासणी करावी. शाळांचा परिसर तंबाखूमुक्त करावा. यासाठी शिक्षणाधिकाऱ्यांनी सर्व मुख्याध्यापकांना सुचित करावे. कृषी विभागाने जिल्ह्यात खसखस व गांजा पिकांची अवैध लागवड होणार नाही, याची दक्षता घ्यावी. कुरीअर व पार्सलच्या माध्यमातून अंमली पदार्थाची मागणी व पुरवठा होऊ नये यासाठी डाक विभागाने पार्सलची नियमित तपासणी करावी व दैनंदिन पार्सलचे स्कॅनिंग होत आहे का? याची खात्री करावी. त्यासोबतच पोलीस विभागाने अंमली पदार्थाच्या तस्करीला आळा घालण्यासाठी धाडसत्र मोहीम राबवावी.

जिल्ह्यातील तसेच ग्रामीण भागातील दवाखाने, ग्रामीण रुग्णालये आदींचा परिसर तंबाखुमूक्त करण्याच्या सुचना अपर जिल्हाधिकारी श्री. देशपांडे यांनी दिल्या. यावेळी त्यांनी पोलीस विभागामार्फत अंमली पदार्थासदंर्भात करण्यात आलेल्या कार्यवाहीची माहिती जाणून घेतली.

००००००

पक्षकारास केंद्रबिंदू ठेवून काम करा -प्रमुख जिल्हा न्यायाधीश समृध्दी भिष्म


पक्षकारास केंद्रबिंदू ठेवून काम करा -प्रमुख जिल्हा न्यायाधीश समृध्दी भिष्म

चंद्रपूर दि. 30 : लोक अभिरक्षक कार्यालय हे समाजातील वंचित, पिडीत व गरजु पक्षकारांना वेळेवर न्याय मिळवून देण्यासाठी सुरू करण्यात आले आहे. त्यामुळे लोक अभिरक्षक कार्यालयाकडील पक्षकाराचे न्यायालयीन काम पाहत असतांना पक्षकारास केंद्रबिंदू ठेवून काम करा, अशी सुचना चंद्रपूर जिल्हा न्यायालयाच्या प्रमुख जिल्हा न्यायाधीश तथा जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या अध्यक्षा समृध्दी भिष्म यांनी दिल्या.

 लोक अभिरक्षक कार्यालयाच्य कामकाजासंबंधी प्रमुख जिल्हा न्यायाधीशांच्या कक्षात आयोजित करण्यात आलेल्या मासिक आढावा बैठकीत त्या बोलत होत्या. यावेळी जिल्हा विधी  सेवा प्राधिकरणाचे  सचिव तथा दिवाणी न्यायाधीश सुमित जोशी, मुख्य लोक अभिरक्षक अॅड. विनोद बोरसे, उपमुख्य लोक अभिरक्षक अॅड. वाय.सी.गणविर यांच्यासह, अॅड. एस.एस.मोहरकर, अॅड. ए.एम.फलके, अॅड. ए.जी.पवार आदी सहाय्यक लोक अभिरक्षकांची उपस्थिती होती.

लोक अभिरक्षक कार्यालयाच्या अधिवक्त्यांना मार्गदर्शन करतांना श्रीमती भिष्म म्हणाल्या, लोक अभिरक्षकांनी न्यायालयातील प्रकरणांमध्ये वेळेवर हजर राहणे आवश्यक असुन प्रत्येक प्रकरणाचा वैयक्तिक तपशील अद्ययावत ठेवावा. कार्यालयाकडे येणारी प्रकरणे समप्रमाणात वाटप करावीत. पोलीस ठाणे व कारागृहातील भेटीच्या वेळा अगोदरच निश्चित करून संबंधितांना  कळवाव्यात.  तसेच सुट्टीच्या दिवसांचा रिमांडचा कार्यभार सुध्दा अगोदरच निश्चित करून संबंधितांना कळविण्यात यावा, अशा सूचना उपस्थितांना दिल्या.

बैठकीत लोकअभिरक्षक कार्यालयाचे अधिवक्त्यांनी माहे-जुलै महिन्यात विविध प्रकरणात हजर झाल्याबाबतचा व त्या प्रकरणांचा सद्यस्थिती दर्शविणारा अहवाल दाखल केला. आभार जिल्हा विधी  सेवा प्राधिकरणाचे  सचिव तथा दिवाणी न्यायाधीश सुमित जोशी यांनी मानले.

००००००

उत्कृष्ट कार्य करणाऱ्या माजी सैनिक, पत्नी व पाल्यांना मिळणार विशेष गौरव पुरस्कार

 

उत्कृष्ट कार्य करणाऱ्या माजी सैनिक, पत्नी व पाल्यांना मिळणार विशेष गौरव पुरस्कार

Ø पुरस्कारासाठी 15 सप्टेंबरपर्यंत प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन

चंद्रपूर,दि. 30 : सन 2022-23 या वर्षासाठी ऑक्टोबर 2023 मध्ये विशेष गौरव पुरस्कार समितीची बैठक आयोजित करण्यात येणार आहे. तसेच या बैठकीमध्ये सैनिक कल्याण विभागामार्फत प्राप्त प्रकरणांची छाननी करून विशेष गौरव पुरस्कार मंजूर करण्यात येणार आहे.

नागपूर मंडळाच्या इयत्ता 10वी व 12वीच्या परीक्षेमध्ये 90 टक्केपेक्षा जास्त गुण मिळवून उत्तीर्ण होणाऱ्या पहिल्या पाच माजी सैनिक/विधवा यांच्या पाल्यांना एकरकमी रु. 10 हजार विशेष गौरव पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. केंद्रीय शिक्षण बोर्ड, नवी दिल्ली येथून उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांच्या ग्रेडशीट निष्पादन प्रमाणपत्रांमध्ये प्राप्त गुण व टक्केवारी दर्शविण्यात येत नाही, तरी सदर प्रकरणांसोबत संबंधित विद्यालयाचे गुणपत्रक टक्केवारीसह जोडण्यात यावे.

पदवी किंवा पदव्युत्तर परीक्षेत विद्यापीठात सर्वप्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झालेले माजी सैनिक,पत्नी व पाल्यांना एकरकमी रु. 10 हजार विशेष गौरव पुरस्कार देण्यात येईल. आयआयटी, आयआयएम व एम्स अशा नामवंत संस्थांमध्ये प्रवेश मिळालेल्या माजी सैनिक, विधवा यांच्या पाल्यांना रु. 25 हजार विशेष गौरव पुरस्कार देण्यात येईल. तसेच राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय पातळीवर खेळातील पुरस्कार प्राप्त खेळाडू, साहित्य संगीत, गायन, वादन, नृत्य आदी क्षेत्रातील पुरस्कार विजेते, यशस्वी उद्योजकांचा पुरस्कार मिळविणारे, संगणक क्षेत्रात अतिउत्कृष्ट कामगिरी करणारे, पूर/जळीत/दरोडा/अपघात इतर नैसर्गिक आपत्तीमध्ये बहुमूल्य कामगिरी तसेच देश व राज्याची प्रतिष्ठा वाढवतील अशा स्वरूपाचे लक्षणीय काम करणारे माजी सैनिक,पत्नी व पाल्य आदींना अशा कार्याबद्दल त्यांच्या सन्मानार्थ राष्ट्रीय स्तरासाठी रु. 10 हजार व आंतरराष्ट्रीय स्तरासाठी रु. 25 हजाराचा पुरस्कार जिल्हा सैनिक कल्याण विभाग, पुणे यांच्यामार्फत प्रदान करण्यात येणार आहे. 

तरी, चंद्रपूर जिल्ह्यातील सर्व संबंधित माजी सैनिक, विधवा यांनी विशेष गौरव पुरस्कार निवडीसाठीचे प्रस्ताव जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, चंद्रपूर येथे दि. 15 सप्टेंबर 2023 पर्यंत सादर करावे, त्यानंतर प्राप्त अर्जांचा विचार केला जाणार नाही. याची सर्व संबंधितांनी नोंद घ्यावी, असे जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी यांनी कळविले आहे.

००००००

मूकबधिर निवासी विद्यालयातील विद्यार्थ्यांना राख्या बांधून रक्षाबंधनाचा कार्यक्रम

 

मूकबधिर निवासी विद्यालयातील विद्यार्थ्यांना राख्या बांधून रक्षाबंधनाचा कार्यक्रम

Ø चंद्रपूर भारत स्काऊट गाईड व जिल्हा कार्यालयाचा उपक्रम

चंद्रपूर, दि.30 : भारत स्काउट्स आणि गाईड्स जिल्हा कार्यालयाच्या वतीने मूकबधिर निवासी विद्यालय, चंद्रपूर येथे रक्षाबंधन कार्यक्रम साजरा करण्यात आला.  या कार्यक्रमाप्रसंगी शिक्षणाधिकारी (प्राथ.) तथा जिल्हा मुख्य आयुक्त स्काऊट गाईड राजकुमार हिवरे, शिक्षणाधिकारी (माध्य.) तथा जिल्हा आयुक्त (गाईड) कल्पना चव्हाण यांच्यासह जिल्हा संघटक चंद्रकांत भगत, गाईड कॅप्टन रंजना किन्नाके, निशा दडमल, मूकबधिर निवासी विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री. बलकी, श्री. कावळे, श्री. कानकाटे व मिथुन किन्नाके आदींची उपस्थिती होती.

कार्यक्रमात जिल्हा संघटन आयुक्त(स्काऊट) चंद्रकांत भगत व रंजना किन्नाके यांनी रक्षाबंधनाचे महत्त्व तसेच कब बुलबुल व स्काऊट गाईड चळवळीच्या माध्यमातून विविध सण-समारंभ साजरे केले जातात, याबाबत शालेय विद्यार्थ्यांना माहिती दिली. या कार्यक्रमात भवानजीभाई चव्हाण हायस्कूल येथील गाईडने सहभाग घेतला. यावेळी उपस्थित गाईडने मूकबधिर निवासी विद्यालयातील विद्यार्थ्यांना राख्या बांधून रक्षाबंधनाच्या कार्यक्रम साजरा केला.

००००००

Tuesday 29 August 2023

अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांच्या स्वयंसहाय्यता बचत गटांना मिनी ट्रॅक्टर व त्याच्या उपसाधनांचा होणार पुरवठा

 

अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांच्या स्वयंसहाय्यता बचत गटांना मिनी ट्रॅक्टर व त्याच्या उपसाधनांचा होणार पुरवठा

चंद्रपूर, दि. 29 : सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या 8 मार्च 2017 च्या शासन निर्णयान्वये, अनुसुचित जाती व नवबौद्ध घटकांच्या स्वयंसहाय्यता बचत गटांना मिनी ट्रॅक्टर व त्याची उपसाधने पुरविणे या योजनेत आमुलाग्र बदल करण्यात आला आहे. या योजनेंतर्गत ज्या लाभार्थी बचतगटाला देण्यात येणारे अर्थसहाय्य वस्तु स्वरुपात न देता मंजूर अर्थसहाय्य हे रुपये 3.15 लाख बचतगटाच्या आधार संलग्न बँक खात्यात जमा करण्यात येणार आहे.

योजनेच्या अटी व शर्ती :

स्वयंसहाय्यता बचत गटातील सदस्य हे महाराष्ट्राचे रहिवासी असावे. स्वयंसहाय्यता बचत गटातील किमान 80 टक्के सदस्य अनु.जाती व नवबौद्ध घटकातील असावेत. बचत गटाचे अध्यक्ष व सचिव अनु.जाती व नवबौद्ध घटकातील असावेत.राष्ट्रीयकृत बँकेत बचतगटाच्या नावे बँक खाते असावे व सदरचे बँक खाते बचत गटाचे अध्यक्ष व सचिव यांच्या आधार क्रमांकाशी संलग्न असावे. स्वयंसहाय्यता बचत गटाने खरेदी केलेला मिनी ट्रॅक्टर व त्याची उपसाधने ही भारत सरकारचे कृषी आणि शेतकरी कल्याण विभाग, सहकार आणि शेतकरी कल्याण यांनी निर्धारीत केल्यानुसार फार्म, मशिनरी, ट्रेनिंग आणि टेस्टींग इन्स्टीट्युट यांनी टेस्ट करुन जाहीर केलेल्या उत्पादकांच्या यादीतील परिणामानुसार असावेत.

पात्र स्वयंसहायता बचत गटांना शासनाने त्या-त्या जिल्ह्यासाठी निश्चित करून दिलेल्या उद्दिष्टांनुसार अर्थसहाय्य मंजूर करून त्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात येईल. योजनेच्या लाभासाठी निवड झालेल्या स्वयंसहायता बचतगटाला त्यांनी खरेदी केलेले मिनी ट्रॅक्टर चालविण्याचे, अधिकृत संस्थांकडून प्रशिक्षण घेणे व त्याचे प्रमाणपत्र सादर करावे लागेल. स्वयंसहायता बचतगटाने खरेदी केलेले मिनी ट्रॅक्टर/ट्रॅक्टर व उपसाधने अर्थसहाय्य घेतल्यानंतर सदर मिनी ट्रॅक्टर व त्याची उपसाधने विकत घेता येणार नाही किंवा गहाण ठेवता येणार नाही. तसे आशयाचे हमीपत्र स्वयंसहायता बचत गटाला द्यावे लागेल. तसेच पुढे प्रत्येक वर्षी 10 वर्षापर्यंत त्याबाबत प्रमाणपत्र मंजुरी देणाऱ्या सक्षम प्राधिकाऱ्याकडे सादर करणे बंधनकारक असेल. ज्या स्वयंसहायता बचत गटांनी पॉवर ट्रीलर किंवा मिनी ट्रॅक्टर योजनेचा लाभ घेतला आहे, त्या बचत गटांना या योजनेचा लाभ घेता येणार नाही.

योजनांच्या लाभासाठी पात्र स्वयंसहायता बचत गटांनी सहाय्यक आयुक्त, समाजकल्याण कार्यालय, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, सामाजिक न्याय भवन, दूध डेअरी रोड, जलनगर वार्ड, चंद्रपूर येथे संपर्क साधून अर्ज सादर करावे, असे समाजकल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त बाबासाहेब देशमुख यांनी कळविले आहे.

00000

4 सप्टेंबर रोजी लोकशाही दिनाचे आयोजन

 


4 सप्टेंबर रोजी लोकशाही दिनाचे आयोजन

चंद्रपूर दि. 29 : सर्वसामान्य जनतेच्या तक्रारी आणि अडचणी यांची न्याय व तत्परतेने शासकीय यंत्रणेकडून सोडवणूक करण्यासाठी एक प्रभावी उपाययोजना म्हणून जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली  लोकशाही  दिनाचे  आयोजन  दर महिन्याच्या पहिल्या सोमवारी करण्यात येते. या लोकशाही  दिनानिमित्त  नागरीक व शेतकरी  जिल्हाधिकारी यांच्याकडे तक्रार अर्ज दाखल करतात.

सोमवार, दि. 4 सप्टेंबर 2023 रोजी दुपारी 1 वाजता जिल्हाधिकारी कार्यालय, चंद्रपूर येथे लोकशाही   दिनाचे  आयोजन  करण्यात आले आहे.  जिल्हास्तरीय  लोकशाही  दिनात तक्रार सादर करतांना विहित नमुन्यातील तक्रार अर्जासोबत तालुका लोकशाही दिनातील टोकन क्रमांकाची प्रत तसेच अर्ज 15 दिवसाआधी 2 प्रतीत सादर करावा. तक्रार व निवेदन वैयक्तिक स्वरुपाची असावी. तद्नंतरच तक्रार अर्ज स्वीकारण्यात येईल, असे तहसिलदार (सामान्य) श्रीधर राजमाने यांनी कळविले आहे.

00000

Monday 28 August 2023

लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंचे व्यक्तिमत्त्व समाजासाठी प्रेरक - ना. सुधीर मुनगंटीवार



 लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंचे व्यक्तिमत्त्व समाजासाठी प्रेरक - ना. सुधीर मुनगंटीवार

अण्‍णाभाऊ साठे यांच्‍या 103 व्‍या जयंतीनिमित्त कार्यक्रम

अण्णाभाऊंना भारतरत्न मिळावे यासाठी पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांना पत्र लिहीणार

चंद्रपूरदि. २८ - लोकशाहीर अण्णाभाऊ साठे केवळ एका विशिष्ट वर्गाला नव्हे तर संपूर्ण मानव जातीला प्रेरणा देणारे व्यक्तिमत्त्व आहे. त्यांच्या विचारांची व कार्यकर्तुत्वाची प्रेरणा घेऊन समाजाने मार्गक्रमण करण्याची गरज आहेअसे प्रतिपादन राज्‍याचे वनेसांस्‍कृतीक कार्यमत्‍स्‍यव्‍यवसाय तथा चंद्रपूर जिल्‍हयाचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले.

मातंग चेतना परिषद विदर्भ प्रदेशाच्‍या वतीने आयोजित लोकशाहीर अण्‍णाभाऊ साठे यांच्‍या १०३ व्‍या जयंतीनिमीत्त १०३ विद्यार्थ्‍यांच्‍या व ज्‍येष्‍ठ नागरिकांच्‍या सत्‍कार सोहळ्यात ना. मुनगंटीवार बोलत होते. यावेळी व्यासपीठावर पुसद येथील प. पू. गजानंदजी माऊलीभागवताचार्य मनिषजी महाराजवामन आमटेगौरव गांजरेयोग नृत्‍य परिवाराचे अध्‍यक्ष गोपाल मुंदडासुरेश घोडकेराजेश आमटेएड. आशिष मुंधडा उपस्थित होते.

 ‘अण्‍णाभाऊ साठेंनी समाजासाठी अतिशय बिकट परिस्‍थीतीत काम केले. त्‍यांनी समाजाच्‍या व्‍यथावेदना आपल्‍या साहित्‍यात मांडल्‍या. अशा कार्यक्रमांच्‍या माध्‍यमातून अण्‍णाभाऊंच्‍या व्यक्तिमत्वाचे अनेक पैलू समाजासमोर येतात व त्‍यातून समाजाला व नविन पिढीला प्रेरणा मिळते,’ असेही ना. मुनगंटीवार म्‍हणाले.

प्रास्‍ताविकातून वामन आमटे यांनी समाजाच्‍या अडचणी मांडून काही मागण्या केल्या. त्‍यावर ना. मुनगंटीवार यांनी समाजाच्‍या सर्व मागण्‍यांचा सहानूभूतीपूर्वक विचार करण्‍यात येईलअसा विश्वास दिला. लोकशाहीर अण्‍णाभाऊ साठे यांना भारतरत्‍न मिळावेमातंग समाजाच्‍या व्‍यक्‍तीचा मृत्‍यू झाल्‍यास त्‍याला शासकीय मदत मिळावीपंतप्रधान आवास योजनेअंतर्गत घरे मिळावीबॅंड पथकातील कलावंतांना मानधन मिळावे तसेच समाजातील प्रत्‍येक कुटुंबाला पाच एकर शेती वाहण्यास मिळावी व समाजाला जागेसहीत एक समाजभवन मिळावे या मागण्‍यांचा समावेश होता. यावर उत्‍तर देताना ना. मुनगंटीवार म्‍हणालेरमाई आवास योजनेअंतर्गत आपल्‍या समाजाला घरे मिळवून देण्‍यासाठी मी पूर्ण प्रयत्‍न करीन तसेच शेतीऐवजी येणाऱ्या पिढीला स्‍कील डेव्‍हलपमेंटचे ट्रेनींग देवून लहान-लहान उद्योग स्‍थापन करण्‍यासाठी प्रोत्‍साहन द्यावेबॅंड वाजविणा-या कलाकारांना मानधन देण्‍यासंदर्भात योजनेत समावेश आहे कां याची चौकशी करून सर्व गोष्‍टींचा पाठपुरावा करण्‍याचा विश्वास आ. मुनगंटीवार यांनी यावेळी दिला.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे अण्‍णाभाऊंना भारतरत्‍न देण्‍याची मागणी करणार

लोकशाहीर अण्‍णाभाऊ साठे यांना भारतरत्‍न द्यावे यासाठी मीपंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहीणार व त्‍याचा पाठपुरावा करणार असल्‍याचे ना. मुनगंटीवार यांनी याप्रसंगी घोषीत केले. अण्‍णा भाऊ साठेंच्‍या जीवनावर फक्‍त १२ दिवसात टपाल तिकीट प्रकाशित करण्‍यात माझा खारीचा वाटा होतायाचा मला अभिमान व आनंद आहे तसेच अण्‍णाभाऊंना भारतरत्‍न मिळाल्‍यावर त्‍यांच्‍या जीवनाचा व साहित्‍याचा विस्‍तृत अभ्‍यास करण्‍याची संधी नवोदितांना मिळेल असा मला विश्‍वास आहेअसेही ना. मुनगंटीवार म्हणाले.

0000000

पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकारातून ग्रामीण भागातील मुलभुत सुविधांसाठी 5 कोटी मंजूर


पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकारातून ग्रामीण भागातील मुलभुत सुविधांसाठी 5 कोटी मंजूर

चंद्रपूरदि. 28 : गावांचा विकास झाला तरच जिल्ह्याचा सर्वंकष विकास होऊ शकतो. जिल्ह्याच्या विकासासाठी कायम आग्रही असणारे राज्याचे वने, सांस्कृतिक कार्य, मत्स्यव्यवसाय मंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकाराने ग्रामीण भागातील मुलभूत सुविधांसाठी 5 कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहे.

गावांतर्गत मुलभूत सुविधांच्या कामासाठी निधी उपलब्ध करून देण्याबाबत लोकप्रतिनिधीकडून निधी मागणीचे प्रस्ताव शासनाकडे सादर करण्यात येतात. यात जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकारातून ग्रामीण भागात मुलभूत सुविधांसाठी 5 कोटी रुपये मंजूर झाले आहे. याबाबतचा शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे. मूल तालुक्यातील विविध गावांसाठी 3 कोटी 29 लक्ष रुपये, चंद्रपूर तालुक्यातील गावांसाठी 44 लक्ष, सावली तालुक्यासाठी 15 लक्ष, पोंभुर्णा तालुक्यासाठी 82 लक्ष तर बल्लारपूर तालुक्यातील गावांसाठी मुलभुत सुविधा पुरविण्याकरीता 30 लक्ष रुपयांचा समावेश आहे.

सदर निधीमधून विविध गावांत सिमेंट रस्त्याचे बांधकाम, रस्त्याचे खडीकरण, सभागृह बांधकाम, समाजभवन बांधकाम, संरक्षण भिंत व शौचालय बांधकाम, चौकाचे सौंदर्यीकरण, पाणंद रस्त्याचे बांधकाम, स्मशान भुमीकरीता रस्ता तयार करणे, नालीचे बांधकाम, टाकीसह ट्युबवेल बसविणे, शाळा आणि ग्रामपंचायतीच्या भिंती बोलक्या करण्याकरीता रंगरंगोटी करणे, हायमास्ट लाईट बसविणे, बस थांब्याकरीता शेड मंजूर करणे, विद्युतीकरण आदी मुलभूत कामे करण्यात येणार आहे.

गावाच्या विकासासाठी उपलब्ध करून दिलेल्या कोटी रुपये मंजूर निधीसाठी ना.सुधीर मुनगंटीवार यांचे गावकऱ्यांकडून आभार मानले जात आहे.

००००००

जिल्ह्यात गप्पी मासे सोडण्याच्या मोहिमेचा शुभारंभ

 

जिल्ह्यात गप्पी मासे सोडण्याच्या मोहिमेचा शुभारंभ

चंद्रपूरदि.28: जिल्ह्यात डासोत्पती स्थानात गप्पी मासे सोडण्याच्या मोहिमेची सुरुवात करण्यात आली. या मोहिमेचा शुभारंभ मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक जॉन्सन यांच्या हस्ते जिल्हा परिषदेच्या आवारातील कारंज्यात गप्पी मासे सोडून करण्यात आली. याप्रसंगीजिल्हा आरोग्य अधिकारी  डॉ. राजकुमार गहलोतजिल्हा हिवताप अधिकारी डॉ.प्रतीक बोरकर व आरोग्य विभागाचे कर्मचारी उपस्थित होते.  मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. जॉनसन यांनी नागरीकांना साचलेल्या पाण्यात गप्पी मासे सोडण्याचे आवाहन केले.

सदर मोहीम संपूर्ण जिल्हाभर राबविण्यात येत आहे. गप्पी मासे डास अळयांचे भक्षण करतात आणि डासाची घनता कमी करण्यास मदत करतात. जिल्ह्यात पावसाचा जोर कमी झाल्याने ठिक-ठिकाणी पाणी साचले आहे. या साचलेल्या पाण्यातच डासांची मोठ्या प्रमाणात पैदास होते.  डासांच्या जीवनचक्रातील एक तृतीयांश वेळ ते पाण्यात व्यतीत करतात. डास उघड्या पाण्यामध्ये अंडी घालतात. या अंडीचे रूपांतर डासअळीत आणि नंतर कोषामध्ये होते. साधारणत 10 ते 12 दिवस पाण्यात व्यतीत केल्यानंतर प्रौढ  डासाची निर्मिती होते. प्रौढ डास उडायला लागतात. त्यामुळे पाण्यात असतांना यावर नियंत्रण मिळविणे सोपे आहेअसे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. गहलोत यांनी यावेळी सांगितले.

जिल्ह्यातील सर्व आरोग्य संस्थेमध्ये गप्पी मासे उपलब्ध आहेत. डासापासून डेंग्यूमलेरियाहत्तीरोग या किटकजन्य रोगाचा प्रादुर्भाव वाढतो. यामुळे या डासापासून स्वत:चे संरक्षण करण्याकरीता पूर्ण बाह्याचे कपडे घालणेझोपतांना मच्छरदाणीचा वापर करणेडास प्रतिरोधक मच्छर अगरबत्तीकॉईलक्रीमचा वापर करणेघरच्या सभोवताल पाणी साचू न देणेसाठवलेले पाणी आठवड्यात एकदा रिकामे करून कोरडा दिवस पाळणेपाण्याचे टाके झाकून ठेवणे आदी उपाययोजना कराव्यात. त्याचप्रमाणे अंगावर ताप काढू नये. ताप आल्यास नजिकच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात जाऊन उपचार घ्यावाअसे आवाहन जिल्हा हिवताप अधिकारी डॉ. प्रतीक बोरकर यांनी केले.

00000

जिल्हा सामान्य रुग्णालयात 38 व्या नेत्रदान पंधरवाड्याचा शुभारंभ


जिल्हा सामान्य रुग्णालयात 38 व्या नेत्रदान पंधरवाड्याचा शुभारंभ

Ø नागरीकांना नेत्रदानासाठी स्वयंस्फूर्तीने पुढे येण्याचे आवाहन

चंद्रपूरदि.28: जिल्हा सामान्य रुग्णालयचंद्रपूर येथे 38 व्या नेत्रदान पंधरवाड्याचा शुभारंभ करण्यात आला. या कार्यक्रमाप्रसंगी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. महादेव चिंचोळेअति. जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सोनारकरवैद्यकीय अधिकारी डॉ. गायकवाडजिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक डॉ. सरोदेनेत्र शल्य चिकित्सक डॉ. मनोज शेंडेनोडल अधिकारी विवेक मसरामनेत्रचिकित्सा अधिकारी माधुरी कुळसंगे व जिल्ह्यातील सामाजिक संस्थांचे पदाधिकारी मनोविकृती सोशल अधीक्षक श्री. मारशेट्टीवारनर्सिंग स्कूलचे विद्यार्थी-विद्यार्थिनी व रुग्ण उपस्थित होते.

जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. महादेव चिंचोळे म्हणालेईश्वराने मानवी शरीराची रचना दान देण्याकरीता व घेण्याकरीता करण्यात आली आहे. जिवंतपणी रक्तदानकिडनीदान व अवयवदान व मृत्युपश्चात फक्त नेत्रदान करू शकतो. नेत्रदान केल्याने अंध व्यक्तींना दृष्टीप्रदान करू शकतो. या जिल्ह्यात नेत्रदान तयार करण्यास सामाजिक संस्थेला सोबत घेऊन पाठपुरावा करण्याची हमी त्यांनी दिली.

अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सोनारकर म्हणालेनेत्रदानाकरीता समाजात जागृती होणे आवश्यक आहे. ज्या कुटुंबातील व्यक्ति मृत्यु पावतो ते कुटुंब दुःखात असते. अशावेळी समाजातील जागृत नागरीकांनी त्या कुटुंबातील नातेवाईकांसोबत संवाद साधून नेत्रदानाचे महत्त्व पटवून द्यावे व नेत्रदानाला प्रवृत्त करावे.

कार्यक्रमाच्या प्रास्ताविकेत बोलतांना डॉ. मनोज शेंडे म्हणालेबुब्बूळाच्या आजाराने अंध असलेल्या रुग्णांची संख्या वाढत आहे. यावर एकच उपाय म्हणजे मृत व्यक्तीचा निरोगी बुब्बूळाचे प्रत्यारोपण करणे हा होय. दरवर्षी या रुग्णांमध्ये वाढ होत असते. याकरीता जास्तीत-जास्त मरणोत्तर नेत्रदान करून बुब्बूळाची मागणी व पुरवठा यामधील तफावत दूर करणे आवश्यक असल्याचे ते म्हणाले.

भारतामध्ये डोळ्याचे बुब्बूळ आणि ग्रस्तरुग्णांची संख्या सर्वात जास्त आहे. त्यामानाने नेत्रदान करणाऱ्यांची संख्या खूपच कमी आहे. नेत्रदान केल्याने रुग्णाच्या चेहऱ्याला कुठलीही विद्रुपता येत नाही. मरणोत्तर नेत्रदान करावे व दृष्टीहिणाच्या जीवनात प्रकाश निर्माण करून हे जग पुन्हा बघण्याची संधी प्राप्त करून द्यावी. त्यामुळे नागरीकांनी स्वयंस्फूर्तीने नेत्र देण्यासाठी पुढे यावे व अंधाच्या जीवनात प्रकाश निर्माण करावा. नेत्रदान करण्याकरीता जिल्हा सामान्य रुग्णालयचंद्रपूर येथे संपर्क साधावा. तसेच आरोग्य विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी नेत्रदानासाठी सहकार्य करावे,असे आवाहन आरोग्य विभागामार्फत करण्यात आले. कार्यक्रमाचे संचालन नेत्रदान समुपदेशक योगेंद्र इंदुरकर यांनी तर आभार नोडल अधिकारी विवेक मसराम यांनी मानले.

नेत्रदान केलेल्या रुग्णांच्या नातेवाईकांचा व सामाजिक संस्थांच्या पदाधिकाऱ्यांचा गौरव:

कार्यक्रमाप्रसंगी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. महादेव चिंचोळे व अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सोनारकर यांच्या हस्ते नेत्रदान केलेल्या रुग्णांच्या नातेवाईकांना तसेच नेत्रदानाच्या कार्यात योगदान देत असलेल्या सामाजिक संस्थांच्या पदाधिकाऱ्यांना सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले.

00000

अनोळखी मृत व्यक्तीची ओळख पटविण्याचे आवाहन

 अनोळखी मृत व्यक्तीची ओळख पटविण्याचे आवाहन

चंद्रपूरदि.28: महानगरपालिका पार्किंगमध्ये एक अनोळखी पुरुष पडून असल्याची माहिती पोलीसांना मिळाली. सदर इसमास सामान्य रुग्णालयचंद्रपूर येथे नेले असता मृत घोषित करण्यात आले. अनोळखी मृत  पुरुषाच्या नातेवाईकाचा शोध घेतला असता उपयुक्त माहिती मिळून आली नाही. सदर  मृत  इसमाची  ओळख  पटविण्याचे  आवाहन  चंद्रपूरशहर पोलीस स्टेशनमार्फत करण्यात येत आहे.

अनोळखी मृत व्यक्तीचे वर्णन पुढीलप्रमाणे :

वय अंदाजे 50 वर्षरंग काळाकमरेला काळ्या रंगाचा लोअर त्यावर Nike असे लिहिलेलेडाव्या हातावर गौतम बुदधाचे चित्र गोदलेले आहे. या वर्णनावरून सदर मृतक अनोळखी व्यक्तीला कोणी ओळखत असेल तर शहर पोलीस स्टेशनचंद्रपूर येथे संपर्क साधावाअसे कळविण्यात आले आहे.

00000

Saturday 26 August 2023

मेडिकलचा नेत्रचिकित्सा उपचार विभाग सुसज्ज करण्यासाठी सहकार्य करणार





 मेडिकलचा नेत्रचिकित्सा उपचार विभाग सुसज्ज करण्यासाठी सहकार्य करणार

केंद्रीय मंत्री डॉ भारती पवार यांच्याशी केली दूरध्वनीवरून चर्चा

नेत्रदान जागृती पंधरवड्याचा ना. मुनगंटीवार यांच्या हस्ते शुभारंभ

नागपूर/चंद्रपूरदि. 26 :  नेत्रदान हे पवित्र कार्य आहेदेशात अंध व्यक्तींची संख्या आणि दृष्टीदान करणारे व्यक्ती यामध्ये तफावत असून नागरिकांत जागरुकता निर्माण करण्याची आवश्यकता आहे. शासनाकडून आयोजित विशेष अभियानात जनसहभाग वाढावाअशी अपेक्षा व्यक्त करुननागपुरात नेत्रचिकित्सा व उपचार करण्यासाठी अद्ययावत सोयी उपलब्ध व्हाव्यातसुसज्ज नेत्रपेढी उभारावीप्रादेशिक नेत्रचिकित्सा संस्थान व्हावेयासाठी पुढाकार घेईलअसे आश्वासन राज्याचे वनेसांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिले.

शासनाच्या वतीने २५ ऑगस्ट ते ८ सप्टेंबर पर्यंत राबविण्यात येणाऱ्या नेत्रदान जागृती पंधरवड्याचा शुभारंभ शनिवारी नागपुरातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात राज्याचे वनेसांस्कृतिक कार्ये व मत्स्यव्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते झाला. या वेळी ते बोलत होते. मंचावर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ राज गजभिये,  नेत्रचिकित्सा विभागाच्या विभागप्रमुख डॉ. सौ. डॉ मीनल व्यवहारेडॉ. मिलिंद व्यवहारेडॉ. शरद कुचेवारडॉ. ए. एच. मदान आदी मान्यवर उपस्थित होते.

ना. मुनगंटीवार पुढे म्हणाले कीमहाराष्ट्राची उपराजधानी असलेले  नागपूर हे आरोग्य आणि रुग्णसेवेच्या क्षेत्रात देशातील मध्यवर्ती ठिकाण आहे. महाराष्ट्रासह  लगतच्या मध्यप्रदेशछत्तिसगढतेलंगणा राज्यातील रुग्ण मोठ्या प्रमाणात येथे उपचारासाठी येतात. येथील शासकीय वैद्यकीय रुग्णालयात  इतर आजारांशी निगडित हजारो रुग्ण येताततसेच नेत्ररुग्ण देखील मोठ्या प्रमाणात उपचारासाठी येतात. त्यामुळे वैद्यकीय सुविधा अद्ययावत आणि सक्षम असायला हव्या.  शासकीय वैद्यकीय महाविद्यालय नागपूरच्या नेत्र चिकित्सा विभागाला अधिक अद्ययावत करण्याच्या दृष्टीने येथे  प्रादेशिक नेत्रचिकित्सा संस्था आणि सुसज्ज नेत्रपेढी स्थापन करणे आवश्यक आहे. यासाठी जिल्हा नियोजन विकास निधी तसेच सीएसआर च्या माध्यमातून देखील आवश्यक ते सहकार्य मी करायला तयार आहे.

डॉ. मीनल व्यवहारे यांनी प्रास्ताविक करताना अभियानाचे महत्व व उपक्रम विषद केले.  यावेळी विद्यार्थ्यांनी काढलेल्या नेत्रदान जागृती रॅलीला ना. सुधीर मुनगंटीवार यांनी हिरवी झेंडी दाखविली. कार्यक्रमाला विद्यार्थी व नागरिक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

केंद्रीय मंत्री डॉ भारती पवारांना केला तातडीने फोन !

प्रादेशिक नेत्रचिकित्सा संस्था व सुसज्ज नेत्रपेढी नागपुरात  स्थापन करण्याच्या दृष्टीने आपल्या स्तरावरून सहकार्य कराअशी विनंती ना. सुधीर मुनगंटीवार यांनी केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ भारती पवार यांना केली. यासंदर्भात मेडिकलच्या वरिष्ठ विभागप्रमुखांशी चर्चा सुरू असतानाच ना. मुनगंटीवार यांनी डॉ. पवार यांना मोबाईलवरून कॉल केला. डॉ भारती पवार यांनीदेखील लगेच प्रतिसाद देत प्रस्ताव आल्यानंतर कार्यवाही करण्याचे आश्वासन ना. मुनगंटीवार यांना दिले.

00000.