Search This Blog

Wednesday, 30 August 2023

उत्कृष्ट कार्य करणाऱ्या माजी सैनिक, पत्नी व पाल्यांना मिळणार विशेष गौरव पुरस्कार

 

उत्कृष्ट कार्य करणाऱ्या माजी सैनिक, पत्नी व पाल्यांना मिळणार विशेष गौरव पुरस्कार

Ø पुरस्कारासाठी 15 सप्टेंबरपर्यंत प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन

चंद्रपूर,दि. 30 : सन 2022-23 या वर्षासाठी ऑक्टोबर 2023 मध्ये विशेष गौरव पुरस्कार समितीची बैठक आयोजित करण्यात येणार आहे. तसेच या बैठकीमध्ये सैनिक कल्याण विभागामार्फत प्राप्त प्रकरणांची छाननी करून विशेष गौरव पुरस्कार मंजूर करण्यात येणार आहे.

नागपूर मंडळाच्या इयत्ता 10वी व 12वीच्या परीक्षेमध्ये 90 टक्केपेक्षा जास्त गुण मिळवून उत्तीर्ण होणाऱ्या पहिल्या पाच माजी सैनिक/विधवा यांच्या पाल्यांना एकरकमी रु. 10 हजार विशेष गौरव पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. केंद्रीय शिक्षण बोर्ड, नवी दिल्ली येथून उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांच्या ग्रेडशीट निष्पादन प्रमाणपत्रांमध्ये प्राप्त गुण व टक्केवारी दर्शविण्यात येत नाही, तरी सदर प्रकरणांसोबत संबंधित विद्यालयाचे गुणपत्रक टक्केवारीसह जोडण्यात यावे.

पदवी किंवा पदव्युत्तर परीक्षेत विद्यापीठात सर्वप्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झालेले माजी सैनिक,पत्नी व पाल्यांना एकरकमी रु. 10 हजार विशेष गौरव पुरस्कार देण्यात येईल. आयआयटी, आयआयएम व एम्स अशा नामवंत संस्थांमध्ये प्रवेश मिळालेल्या माजी सैनिक, विधवा यांच्या पाल्यांना रु. 25 हजार विशेष गौरव पुरस्कार देण्यात येईल. तसेच राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय पातळीवर खेळातील पुरस्कार प्राप्त खेळाडू, साहित्य संगीत, गायन, वादन, नृत्य आदी क्षेत्रातील पुरस्कार विजेते, यशस्वी उद्योजकांचा पुरस्कार मिळविणारे, संगणक क्षेत्रात अतिउत्कृष्ट कामगिरी करणारे, पूर/जळीत/दरोडा/अपघात इतर नैसर्गिक आपत्तीमध्ये बहुमूल्य कामगिरी तसेच देश व राज्याची प्रतिष्ठा वाढवतील अशा स्वरूपाचे लक्षणीय काम करणारे माजी सैनिक,पत्नी व पाल्य आदींना अशा कार्याबद्दल त्यांच्या सन्मानार्थ राष्ट्रीय स्तरासाठी रु. 10 हजार व आंतरराष्ट्रीय स्तरासाठी रु. 25 हजाराचा पुरस्कार जिल्हा सैनिक कल्याण विभाग, पुणे यांच्यामार्फत प्रदान करण्यात येणार आहे. 

तरी, चंद्रपूर जिल्ह्यातील सर्व संबंधित माजी सैनिक, विधवा यांनी विशेष गौरव पुरस्कार निवडीसाठीचे प्रस्ताव जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, चंद्रपूर येथे दि. 15 सप्टेंबर 2023 पर्यंत सादर करावे, त्यानंतर प्राप्त अर्जांचा विचार केला जाणार नाही. याची सर्व संबंधितांनी नोंद घ्यावी, असे जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी यांनी कळविले आहे.

००००००

No comments:

Post a Comment