नोकरीबाबत कोणत्याही खोट्या प्रलोभनाला बळी पडू नका
Ø वन विभागाचे उमेदवारांना आवाहन
Ø केवळ गुणवत्तेच्या आधारावर होणार निवड
चंद्रपूर, दि. 1 : वन विभागातील विविध संवर्गातील रिक्त पदे सरळ सेवेने भरण्याची प्रक्रिया सुरू आहे. याकरिता 8 जून 2023 रोजी जाहिरात प्रसिध्द झालेली असून अर्ज स्विकारण्याची मुदत दिनांक 3 जुलै 2023 रोजी संपृष्टात आलेली आहे. प्रसिध्द जाहिरातीनुसार ऑनलाईन परिक्षा ही राज्यात विविध 129 केंद्रावर 31 जुलै, 2023 पासुन सुरू झालेल्या आहेत. त्यापैकी चंद्रपूर जिल्ह्यातील ऑनलाईन परिक्षा 1. पुजा इन्फोसीस, चंद्रपूर 2. कोटकर इन्फोसीस,चंद्रपूर 3 साई पॉलीटेक्नीक, चंद्रपूर आणि 4. बजाज पॉलीटेक्नीक, चंद्रपूर या चार परिक्षा केंद्रावर सुरू आहे. मात्र काही मध्यस्थांमार्फत किंवा बाह्य हस्तक्षेपद्वारे उमेदवारांना नोकरीचे खोटे प्रलोभन दाखविण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे उमेदवारांनी नोकरीबाबत कोणत्याही खोट्या प्रलोभनाला बळी पडू नये, असे आवाहन वन विभागाने केले आहे.
यासंदर्भात उमेदवारांना खालील प्रमाणे दक्षता घेण्याबाबत सुचना देण्यात येत आहे. उमेदवारांनी प्रामाणिकपणे अभ्यास करूनच परीक्षेस उपस्थित राहावे. कोणत्याही प्रलोभनास /भुलथापांना बळी पडू नये. परिक्षेबाबत कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता विभागामार्फत संकेतस्थळावर दिल्या जाणाऱ्या सुचनांचे पालन करावे. संपूर्ण भरती प्रक्रिया ही पारदर्शकपणे राबविण्यात येत आहे. निवड ही केवळ गुणवत्तेच्या आधारावर होणार आहे. त्यामुळे बाह्य हस्तक्षेपास कोणताही वाव नाही.
मध्यस्थ/ ठग/ वनविभागाशी संबध असल्याचे भासविणाऱ्या व्यक्ती यांच्या गैरमार्गाने नौकरी मिळवून देण्याच्या आश्वासनापासून उमेदवारांनी सावध राहावे. अशा व्यक्तींसोबत कोणताही आर्थिक व्यवहार करू नये. तसेच परिक्षेबाबत काही गैरप्रकार होत असल्याचे आढळून आल्यास अशा व्यक्तीविरुध्द लाचलुचपत प्रतिबंध कार्यालय ( एसीबी ) किंवा जवळचे पोलिस स्टेशनमध्ये तक्रार नोंदवावी.
जे उमेदवार भरती प्रक्रियेवर अवैध मार्गाने प्रभाव पाडण्याचा प्रयत्न करतील, त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात येईल. तसेच त्यांची उमेदवारी कोणत्याही टप्प्यावर रद्द करण्यात येईल. वनविभागाच्या पदभरतीसंदर्भात काही बाहय हस्तक्षेप, उमेदवारांना नौकरी देण्याची आमिषे देणे, अफवा पसरविणे, अपप्रचार करणे अशा प्रकारच्या घटना निदर्शनास आल्यास त्याविरुध्द तात्काळ जवळचे पोलिस स्टेशनमध्ये तक्रार नोंदवावी, असे चंद्रपूर वनवृत्ताचे मुख्य वनसंरक्षक डॉ. जितेंद्र रामगावकर यांनी कळविले आहे.
०००००००
No comments:
Post a Comment