कर्मचाऱ्यांनी मोजणी साहित्यांचे उत्तम प्रशिक्षण घेऊन नागरिकांना दर्जेदार सेवा द्यावी
Ø भुमी अभिलेख संचालक एन.सुधांशु यांनी घेतला कामकाजाचा आढावा
चंद्रपूर,दि. 08 : भूमी अभिलेख विभाग हा महाराष्ट्र शासनाचा एक महत्त्वपूर्ण विभाग आहे. विभाग आधुनिकतेच्या वाटेवर आहे. नवनवीन मोजणी साहित्य विभागात पुरविले जात आहे. पूर्वी प्लेन टेबलने मोजणी व्हायची, आता रोव्हरद्वारे मोजणी करीत असून त्याद्वारे जीपीएस कॉर्डीनेटसह मोजणीचे काम केले जात आहे. नवनियुक्त कर्मचाऱ्यांनी मोजणी साहित्यांचे उत्तम प्रशिक्षण घ्यावे आणि नागरिकांना न्यायोचित आणि दर्जेदार सेवा प्रदान करावी, असे प्रतिपादन राज्याचे प्रमुख जमाबंदी आयुक्त तथा भूमी अभिलेख विभागाचे संचालक एन. सुधांशु यांनी केले.
महसूल सप्ताहाचे औचित्य साधून एन. सुधांशु यांनी दि. 6 व 7 ऑगस्ट 2023 रोजी चंद्रपूर जिल्हयास भेट देऊन कामकाजाचा आढावा घेतला. भूमि अभिलेख विभागात नवनियुक्त कर्मचारी रुजू झाले आहेत. चंद्रपूर, गडचिरोली व वर्धा येथील नवनियुक्त कर्मचाऱ्यांचे संयुक्त प्रशिक्षण रामबाग वन वसाहत मैदान येथे आयोजित करण्यात आले होते. या नवनियुक्त प्रशिक्षणार्थींनासुध्दा त्यांनी संबोधित केले.
दौऱ्यादरम्यान मौजा टेमुर्डा ता. वरोरा तसेच मौजा आरगड ता. चंद्रपूर येथे त्यांचे हस्ते नागरिकांना स्वामित्व योजनेअंतर्गत ड्रोनसर्व्हे झालेल्या मिळकतींचे सनद वाटप करण्यात आले. त्यांनी उपअधीक्षक, भूमि अभिलेख भद्रावती आणि मूल कार्यालयास भेट देऊन लोकाभिमुख प्रशासन चालविण्याबाबत मार्गदर्शन केले.
यावेळी भूमी अभिलेख विभागाचे नागपूर विभागीय प्रमुख विष्णू शिंदे आणि चंद्रपूरचे जिल्हा अधिक्षक भुमी अभिलेख प्रमोद घाडगे उपस्थित होते.
पारंपारिक व्यवस्थेस छेद देऊन स्वामित्व गावठाण योजना अंतर्गत ड्रोन सर्व्हे करून जनतेस मिळकत पत्रिका उपलब्ध करून देणे, अत्याधुनिक रोव्हर मशीनच्या सहाय्याने मोजणी कामकाज करणे, दस्तनोंदणी झाल्यानंतर ऑनलाईन पद्धतीने फेरफार घेणे अशा विविध उपक्रमांतर्गत लोकाभिमुख प्रशासन चालविण्याचे काम विभागामार्फत होत आहे.
००००००
No comments:
Post a Comment