Search This Blog

Wednesday 30 August 2023

पक्षकारास केंद्रबिंदू ठेवून काम करा -प्रमुख जिल्हा न्यायाधीश समृध्दी भिष्म


पक्षकारास केंद्रबिंदू ठेवून काम करा -प्रमुख जिल्हा न्यायाधीश समृध्दी भिष्म

चंद्रपूर दि. 30 : लोक अभिरक्षक कार्यालय हे समाजातील वंचित, पिडीत व गरजु पक्षकारांना वेळेवर न्याय मिळवून देण्यासाठी सुरू करण्यात आले आहे. त्यामुळे लोक अभिरक्षक कार्यालयाकडील पक्षकाराचे न्यायालयीन काम पाहत असतांना पक्षकारास केंद्रबिंदू ठेवून काम करा, अशी सुचना चंद्रपूर जिल्हा न्यायालयाच्या प्रमुख जिल्हा न्यायाधीश तथा जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या अध्यक्षा समृध्दी भिष्म यांनी दिल्या.

 लोक अभिरक्षक कार्यालयाच्य कामकाजासंबंधी प्रमुख जिल्हा न्यायाधीशांच्या कक्षात आयोजित करण्यात आलेल्या मासिक आढावा बैठकीत त्या बोलत होत्या. यावेळी जिल्हा विधी  सेवा प्राधिकरणाचे  सचिव तथा दिवाणी न्यायाधीश सुमित जोशी, मुख्य लोक अभिरक्षक अॅड. विनोद बोरसे, उपमुख्य लोक अभिरक्षक अॅड. वाय.सी.गणविर यांच्यासह, अॅड. एस.एस.मोहरकर, अॅड. ए.एम.फलके, अॅड. ए.जी.पवार आदी सहाय्यक लोक अभिरक्षकांची उपस्थिती होती.

लोक अभिरक्षक कार्यालयाच्या अधिवक्त्यांना मार्गदर्शन करतांना श्रीमती भिष्म म्हणाल्या, लोक अभिरक्षकांनी न्यायालयातील प्रकरणांमध्ये वेळेवर हजर राहणे आवश्यक असुन प्रत्येक प्रकरणाचा वैयक्तिक तपशील अद्ययावत ठेवावा. कार्यालयाकडे येणारी प्रकरणे समप्रमाणात वाटप करावीत. पोलीस ठाणे व कारागृहातील भेटीच्या वेळा अगोदरच निश्चित करून संबंधितांना  कळवाव्यात.  तसेच सुट्टीच्या दिवसांचा रिमांडचा कार्यभार सुध्दा अगोदरच निश्चित करून संबंधितांना कळविण्यात यावा, अशा सूचना उपस्थितांना दिल्या.

बैठकीत लोकअभिरक्षक कार्यालयाचे अधिवक्त्यांनी माहे-जुलै महिन्यात विविध प्रकरणात हजर झाल्याबाबतचा व त्या प्रकरणांचा सद्यस्थिती दर्शविणारा अहवाल दाखल केला. आभार जिल्हा विधी  सेवा प्राधिकरणाचे  सचिव तथा दिवाणी न्यायाधीश सुमित जोशी यांनी मानले.

००००००

No comments:

Post a Comment