‘विशेष मिशन इंद्रधनुष 5.0’ लसीकरण मोहिमेचा लाभ घ्या
चंद्रपूर, दि. 02 : बालकामधील मृत्यू व आजाराचे प्रमाण कमी करण्यासाठी लसीकरण हे एक प्रभावी साधन आहे. नुकतेच देशात झालेल्या सर्वेक्षणात असे आढळून आले की, अर्धवट लसिकरण झालेले तसेच लसिकरण न झालेली बालके ही पूर्ण लसिकरण झालेल्या बालकांपेक्षा लवकर आजारी पडतात किंवा मृत्यू पावतात. केंद्र शासनाने डिसेंबर 2023 पर्यंत गोवर-रुबेला आजाराचे दूरीकरण करण्याचे ध्येय निश्चित केले आहे. यासाठी केंद्र व राज्य शासनाने माहे ऑगस्ट 2023 पासून 3 टप्प्यांमध्ये सर्व जिल्हे व महानगरपालिकामध्ये ‘विशेष मिशन इंद्रधनुष 5.0’ मोहिम राबविण्यात येत आहे. या मोहिमेत लसीकरणापासून पूर्णपणे वंचित राहिलेले किंवा अर्धवट लसीकरण झालेल्या सर्व बालक व गरोदर माता यांचा शोध घेऊन त्यांना लसीकरण करण्यात येणार आहे.
या मोहिमेदरम्यान जिल्हयातील सर्व ग्रामीण, शहरी व मनपा क्षेत्रातील आशा स्वयंसेविका व ज्या भागात आशा नाही तेथे अंगणवाडी मतदनीस घरोघरी सर्वेक्षण करणार आहेत. यात गरोदर माता तसेच 0 ते 5 वर्षांच्या बालकांची यादी तयार करून लसीकरणापासून वंचित राहिलेल्या गरोदर मातेचे व बालकांचे नियमित लसीकरण करण्यात येणार आहे. या लसीकरण सत्रासोबतच मिशन इंद्रधनुष 5.0 अंतर्गत विशेष लसीकरण सत्राचे आयोजन करण्यात येणार आहे. सदर मोहिम माहे ऑगस्ट सप्टेंबर व ऑक्टोबर 2023 पर्यंत 3 टप्प्यांमध्ये राबविण्यात येत आहे.
या मोहिमेदरम्यान ग्रामीण व शहरी भागातील प्रत्येक बालकाला लसीकरण करून मोहिमेची 100 टक्के उद्दिष्ट पुर्तीचे नियोजन करण्यात येणार आहे. माहे डिसेंबर 2023 पर्यंत गोवर-रूबेला आजाराचे दूरीकरण करण्याचे जिल्हयाचे ध्येय आहे. शासनाने बालकांचे लसीकरण नियमीत वेळेत व्हावे, याकरीता आशाच्या सहकार्याने लसीकरणासाठी पूर्व नोंदणीकरीता U-WIN ॲप तयार केले आहे. सदर ॲपचा वापर करुन आपल्या बालकांची नोंदणी करुन घ्यावी. नागरीकांनी विशेष मिशन इंद्रधनुष 5.0 लसीकरण मोहिमेचा लाभ घेण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनामार्फत करण्यात येत आहे.
०००००
No comments:
Post a Comment