‘विशेष मिशन इंद्रधनुष 5.0’ लसीकरण मोहिमेचे जिल्हास्तरीय उद्घाटन
Ø बाळाला डोज देऊन शुभारंभ
चंद्रपूर, दि. 7 : जि.प.आरोग्य विभाग, सामान्य रुग्णालय व चंद्रपूर महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने आयुष्यमान भारत शहरी प्राथमिक आरोग्य केंद्र 2 रामनगर येथे ‘विशेष मिशन इंद्रधनुष 5.0’ लसीकरण मोहिमेचे जिल्हास्तरीय उद्घघाटन जिल्हाधिकारी विनय गौडा जी. सी., मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक जॉन्सन, महानगरपालिका आयुक्त विपीन पालीवाल यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले. यावेळी गौरी दुमाले या बालिकेस लसीकरणाचा डोज देण्यात आला.
बालकामधील मृत्यू व आजारपणाचे प्रमाण कमी करण्यासाठी लसीकरण हे एक प्रभावी साधन आहे. यासाठी ऑगस्ट, सप्टेंबर आणि ऑक्टोबर 2023 पर्यंत 3 टप्प्यांमध्ये सर्व जिल्हे व महानगरपालिकांमध्ये ‘विशेष मिशन इंद्रधनुष 5.0’ कार्यक्रम राबविण्यात येतआहे. या मोहिमेत लसीकरणापासून पूर्णपणे वंचित राहिलेले किंवा अर्धवट लसीकरण झालेल्या सर्व बालक व गरोदर माता यांचा शोध घेऊन त्यांना लसीकरण करण्यात येणार आहे.
सदर मोहिमेदरम्यान जिल्हयातील सर्व ग्रामीण, शहरी व मनपा क्षेत्रातील आशा कार्यकर्ती व ज्या भागात आशा नाही तेथे अंगणवाडी सेविका घरोघरी सर्वेक्षण करून गरोदर माता व 0 ते 5 वर्षांच्या बालकांची यादी तयार करतील. लसीकरणापासून वंचित राहिलेल्या गरोदर मातेचे व बालकांचे नियमित लसीकरण सत्रासोबतच विशेष लसीकरण सत्राचे आयोजन करून सदर मोहिमेदरम्यान लसीकरण करण्यात येणार आहे.
या मोहिमेच्या प्रथम टप्प्यात चंद्रपूर जिल्हयातील ग्रामीण, शहरी व मनपा क्षेत्रातील एकूण 4967 बालकांना व 1156 गरोदर मातांना लसीकरण करण्याचे उद्दिष्ट आहे. तरी लसीकरण कार्यक्रमाचा लाभ चंद्रपूर जिल्हयातील जनतेने घ्यावा, असे आवाहन जिल्हा प्रशासनातर्फे केले आहे.
यावेळी कार्यक्रमाला जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. महादेव चिंचोळे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.राजकुमार गहलोत, डॉ. प्राची नेहुलकर, मनापाच्या मुख्य वैद्यकीय अधिकरी डॉ.विनीता गर्गेलवार, सहा. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. प्रकाश साठे, डॉ. हेमंत कन्नाके, डॉ. अश्विनी भारत आदी उपस्थित होते.
०००००००
No comments:
Post a Comment