Search This Blog

Wednesday 18 October 2017

टाटा ट्रस्‍टच्‍या सहकार्याने चंद्रपूरात उभे राहणार कॅन्‍सर हॉस्‍पीटल - सुधीर मुनगंटीवार


मुल, पोंभुर्णा, बल्‍लारपुर, जिवती, गोंडपिपरी आणि नागभिड या तालुक्‍यांमध्‍ये
राबविणार सधन शेतकरी प्रकल्‍प

चंद्रपूर, दि.18 ऑक्टोंबर- चंद्रपूर-गडचिरोली या जिल्‍हयांसाठी 100 बेडसचे कॅन्‍सर हॉस्‍पीटल चंद्रपूरात उभारण्‍यात येणार असून वित्‍तमंत्री तथा चंद्रपूर जिल्‍हयाचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्‍या पुढाकाराने टाटा ट्रस्‍टच्‍या सहकार्याने हे कॅन्‍सर हॉस्‍पीटल पुढील वर्षी जनतेच्‍या सेवेत रुजु होणार आहे. दि. 17 ऑक्‍टोंबर रोजी सहयांद्री अतिथीगृह मुंबई येथे झालेल्‍या बैठकीत हा निर्णय घेण्‍यात आला. या बैठकीला वित्‍तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्‍यासह चंद्रपूरचे जिल्‍हाधिकारी आशुतोष सलिल, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय अधिष्‍ठाता डॉ. एस. एस. मोरे, जिल्‍हा अधिक्षक कृषी अधिकारी डॉ.हसनाबादे, जिल्‍हा खनिकर्म अधिकारी डॉ. गजानन कांबळे, टाटा ट्रस्‍टच्‍या कॅन्‍सर विभागाचे ऋषभ कनोडीया, लक्ष्‍मण सेतुरामन, गणेश निलम, अनमोल रेले आदींची उपस्थिती होती.  
या बैठकीत चंद्रपूर येथे कॅन्‍सर हॉस्‍पीटल उभारण्‍याबाबत विस्‍तृत चर्चा झाली. चंद्रपूर आणि गडचिरोली या दोन जिल्‍हयात कॅन्‍सर रुग्‍णांचे वाढते प्रमाण लक्षात घेता. चंद्रपूर येथे कॅन्‍सर हॉस्‍पीटल उभारण्‍याची आवश्‍यकता वित्‍तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी प्रतिपादीत केली. टाटा ट्रस्‍ट, चंद्रपूर जिल्‍हा खनिज विकास प्रतिष्‍ठान यांच्‍या संयुक्‍त विद्यमाने रुग्‍णालय उभारण्‍यात येणार आहे. रुग्‍णालयाची इमारत जिल्‍हा प्रशासनातर्फे तर यंत्र सामुग्री, मार्गदर्शन आणि तज्ञ याबाबतची जवाबदारी टाटा ट्रस्‍ट तर्फे घेतली जात आहे. अशा पध्‍दतीचे कॅन्‍सर हॉस्‍पीटल आसाम राज्‍यात टाटा ट्रस्‍टतर्फे उभारण्‍यात आले आहे.
या कॅन्‍सर हॉस्‍पीटलसाठी चंद्रपूर जिल्‍हा प्रशासन, टाटा ट्रस्‍ट व संचालक वैद्यकीय शिक्षण यांच्‍यात सामज्‍यस कराराचा नमुना तयार करण्‍याची कार्यवाही सुरु करण्‍यात आली आहे. इमारत बांधकाम आणि पायाभुत सुविधा राज्‍य सरकार तर्फे करण्‍यात येणार आहे. चंद्रपूर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात एक वर्षीय पदवीका अभ्‍यासक्रमाच्‍या माध्‍यमातून डॉक्‍टर्सना  कॅन्‍सर उपचारा संदर्भात प्रशिक्षण देण्‍यात येणार आहे. टाटा मेमोरियल हॉस्‍पीटल मार्गदर्शक म्‍हणून काम करणार आहे. वित्‍तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्‍या पुढाकाराने चंद्रपूरात येत्‍या वर्षभरात हे कॅन्‍सर हॉस्‍पीटल उभे राहणार असून त्‍या माध्‍यमातून कॅन्‍सर रुग्‍णांना उपचाराची मोठी सोय उपलब्‍ध होणार आहे.
सधन शेतकरी प्रकल्‍प
चंद्रपूर जिल्‍हयातील मुल, पोंभुर्णा, बल्‍लारपूर, जिवती, गोंडपिपरी आणि नागभिड या तालुक्‍यांमध्‍ये टाटा ट्रस्‍टाच्या सहकार्याने सधन शेतकरी प्रकल्‍प राबविण्‍यात येणार असून टाटा ट्रस्‍टची चमू या तालुक्‍यांमध्‍ये सुक्ष्‍म नियोजनाचे तसेच माहीती संकलनाचे काम करणार आहे. शेतक-यांचे पीक उत्‍पन्‍न वाढावे, कुकूट पालन, शेळी पालन, डेअरी क्‍लस्‍टर, फलोत्‍पादन, सुक्ष्‍म सिंचन या सुविधा उपलब्‍ध करुन देत शेतक-यांचे उत्‍पन्‍न वाढवून त्‍यांचे जीवनमान उंचावण्‍याचा प्रयत्‍न या सधन शेतकरी प्रकल्‍पाच्‍या माध्‍यमातून करण्‍यात येणार आहे.
      0000

शेती, शेतकरी व गावाच्या विकासाबाबत राज्य व केंद्र शासन जागरुक --- केद्रीय गृह राज्यमंत्री हंसराज अहीर



चंद्रपूरमध्ये 31 शेतक-यांना महाकर्जमाफीचे प्रातिनिधीक प्रमाणपत्र वाटप

चंद्रपूर, दि.18 ऑक्टोंबर- केवळ आश्वासने देऊन बोळवण करणारे हे सरकार नसून शेती, शेतकरी व गावाच्या विकासाबाबत अतिशय जागरुकतेने काम करणारे हे सरकार आहे. राज्यातील देवेंद्र फडणवीस सरकारने जलयुक्त शिवार सारखी अभिनव योजना आणि महाकर्जमाफीचा निर्णय घेऊन शेतक-यांच्या केवळ आजच्या भल्याचाच विचार केला नाही, तर भविष्याचा देखील विचार केला आहे. शाश्वत विकासावर या सरकारचा भर असून याचे दृष्यपरिणाम लवकरच दिसून येतील, असे प्रतिपादन केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांनी आज येथे केले.
आज चंद्रपूर जिल्हाधिकारी कार्यालयात बचत साफल्य भवन सभागृहात छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना कार्यक्रमामध्ये जिल्हयातील 31 शेतकरी दाम्पत्यांना कर्जमाफी प्रमाणपत्र व दिवाळी निमित्त भेट वस्तू देऊन सन्मान करण्यात आला. ऐनदिवाळीमध्ये राज्य शासनाने जाहिर केल्याप्रमाणे शेतक-यांना कर्जमाफी दिली जात असल्याचा आनंद आहे. यासाठी राज्यातील देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातील सरकारचे अभिनंदन करतो, अशा शब्दात शेतक-यांची सेवा करण्याची संधी मिळाल्याबद्दल त्यांनी कृतज्ञता व्यक्त केली. यावेळी व्यासपीठावर आमदार ॲड.संजय धोटे, आमदार किर्तीकुमार भांगडिया, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष देवराव भोंगळे, जिल्हाधिकारी आशुतोष सलिल, मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र पापळकर, अपर जिल्हाधिकारी सचिन कलंत्रे, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष मनोहर पाऊणकर, जिल्हा उपनिबंधक आर.डी.कौसडीकर, खुशाल बोंडे आदी उपस्थित होते.
यावेळी अहीर यांनी केंद्रातील प्रधानमंत्री नरेंद्र मोदी व राज्यातील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातील दोनही सरकार शेती, शेतकरी व गावाच्या विकासाबद्दल अतिशय आग्रही आहे. राज्य शासनाच्या जलयुक्त शिवार या योजनेचे कौतुक करतांना त्यांनी या योजनेमुळे गावागावात पाण्याची साठवण होत असून पाणी पातळी वाढण्यात मदत झाली आहे. महाकर्जमाफी सारखी घोषणा असो की शेतक-यांच्या बांधावर थेट खते पोहचविण्याची योजना असो, शेतकरी कायम विकासाचा केंद्र बिंदू राहिला आहे. आतापर्यंत कोणत्याही शासनाने महाराष्ट्रामध्ये किटकनाशकाच्या प्रादूर्भावाने अपघात घडलेल्या, जीव गमवाव्या लागलेल्या शेतक-यांना मदत केली नाही. राज्यात आपण या दु:खात शेतक-यांच्या पाठीशी राहिलो व पहिल्यांदाच कोणत्या शासनाने यासाठी मदत केली. थेट 2 लाखाची मदत मुख्यमंत्र्यांनी जाहीर केली आहे. राज्य व केंद्र शासनाच्या विविध योजना कार्यान्वित असून त्यातून शेतक-यांचे 2022 पर्यंत उत्पन्न दुप्पट करण्याचा केंद्र सरकारचा संकल्प आहे. शेतक-यांना वीजपुरवठा असो, बियाणे असो, खतपुरवठा असो हे सरकार प्रयत्नशील असून सिंचनाचा बॅकलॉग भरुन काढण्यासाठी केंद्र शासनाने मोठया प्रमाणात सिंचन प्रकल्पांसाठी निधी मंजूर केला आहे.  यामध्ये चंद्रपूर जिल्हयातील डोंगरगावच्या प्रकल्पाचा सुध्दा समावेश आहे. यावेळी आमदार संजय धोटे यांनी संबोधित केले. ते म्हणाले राज्य शासनातर्फे या महाकर्जमाफीचे पूर्णपणे अंमलबजावणी होईल. प्रत्येक लाभार्थी शेतक-यांला यातून कर्जमाफी मिळेल. शेतक-यांना दिलासा देणारी ही मोहीम असून त्याचा लाभ शेतक-यांनी घ्यावा. जिल्हाधिकारी आशुतोष सलिल यांनी देखील यावेळी शेतक-यांशी संवाद साधला. मुख्यमंत्री महोदयांनी दिवाळी पूर्वी महाकर्जमाफीची घोषणा केली होती. ती प्रत्यक्षात उतरली असून जिल्हा प्रशासनातर्फे सर्व लाभार्थी शेतक-यांना लवकरच याबाबत लाभ मिळेल, असे त्यांनी स्पष्ट केले.  
जिल्हयातील ज्या शेतक-यांना प्रातिनिधीक स्वरुपात कर्जमाफीचे प्रमाणपत्र वितरीत करण्यात आले, त्या शेतक-यांची तालुकानिहाय नावे पुढीलप्रमाणे आहेत. ब्रम्हपूरी तालुका- अशोक मोहुर्ले, कोरपना-अशोक मंगाम, राजूरा- राजया बेडकमवार, गोंडपिरी-अनिल चौधरी, भाऊजी ठुसे, भद्रावती-गणपती साव, प्रविण गेडाम, गजानन घोटकर, बल्लारपूर- पुंजाराम सोयाम, पोंभूर्णा- भाऊजी मडावी, सुनिल लोणारे, दिलीप दिवसे, सावली-राजु मुप्पावार, शामराव मोहुर्ले, चिमूर-वासुदेव दोडके, विलास वाघाडे, मुल-रामप्रसाद गेडाम, सखाराम सिडाम, बोडकू मडावी, वरोरा-रविंद्र उरकुडे, अनंता घागी, चंद्रपूर-प्रभाकर पाचभाई, प्रकाश पारपल्लीवार, नागभिड-शांताबाई श्रीरामे, रघुनाथ कन्नाके, मंगेश गुरनुले, सिंदेवाही- आनंदराव लोखंडे व प्रभाकर बोरकर यांचा समावेश आहे. तर अनुपस्थित राहिलेल्या शेतक-यांची नांवे रामदास करंबे, सुधाकर ताजणे, शंकर पवार अशी आहेत.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हाधिकारी आशुतोष सलिल यांनी केले.  संचालन शाम हेडाऊ यांनी तर आभार जिल्हा उपनिबंधक आर.डी.कौसडीकर यांनी मानले. यावेळी जिल्हयातील संपूर्ण तालुक्यामधील शेतकरी मोठया संख्येने उपस्थित होते.
00  


Monday 16 October 2017

बाबासाहेबांच्या सामाजिक न्यायाच्या बळकटी करणासाठीच सत्तेचा वापर : ना.आठवले




चंद्रपूरच्या दीक्षाभूमीसाठी निधीची कमी पडणार नाही
दीक्षाभूमीवर जनसागर

चंद्रपूर दि.16 ऑक्टोंबर- भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या दृष्टीकोनातील सामाजिक न्यायाच्या चौकटीला अधिक बळकट करण्याचा केंद्र शासनाचा प्रयत्न असून त्यासाठीच आम्ही सत्तेत आहोत. त्यामुळे या देशाची प्रगती निश्चित करणा-या संविधानाच्या बांधिलकीवरच कोणत्याही सरकारचे भवितव्य अंवलबून असेल, असे प्रतिपादन केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना.रामदास आठवले यांनी आज येथे केले.  चंद्रपूर येथे जमलेल्या हजोरोच्या जनसमुदायाला त्यांनी यावेळी दीक्षाभूमीच्या विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही, असे आश्वासनही त्यांनी दिले.
केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले चंद्रपूर येथील दीक्षाभूमीवरील धम्मचक्र अनुप्रवर्तन समारंभात विशेष अतिथी म्हणून बोलत होते. या कार्यक्रमाच्या व्यासपीठावर डॉ.बाबासाहेब आंबेडकर मेमोरीयल सोसायटीचे अध्यक्ष अरुण घोटेकर, आमदार नाना शामकुळे, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष देवराव भोंगळे, महापौर अंजली घोटेकर आदी उपस्थित होते.
केंद्रातील सरकारची वाटचाल देखील फुले, शाहू, आंबेडकर या विचारांवरच सुरु असून उपेक्षित समाज घटकांच्या भल्यासाठी मोठया प्रमाणात योजना सुरु आहेत. या देशामध्ये संविधान बदलण्याची कोणाची ताकद नाही. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हे बाबासाहेबांच्या विचारांनी प्रेरीत असणारे व्यक्तीमत्व आहे. त्यांच्यावर गौतमबुध्दांचा प्रभाव आहे. केंद्रातील सरकार बाबासाहेबांच्या विचारांनेच चालावे यासाठीच आपण सत्तेत असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. त्यांनी आपल्या खास शैलीत कविता ऐकवून आपल्या भाषणाला सुरुवात केली. सुरुवातीला त्यांनी नागपूरच्या दीक्षाभूमीनंतर चंद्रपूरच्या दीक्षाभूमीच्या ऐतिहासिक महत्वाला विषद केले. बाबासाहेबांनी त्या काळात हिंदू धर्मातून बौध्द धर्म निर्माण करेपर्यंत हिंदू धर्मातच समता प्रस्थापित करण्यासाठी प्रचंड मेहनत घेतली. या धर्मातील विभागणी, चार्तुवर्ण जो पर्यंत बदल नाही. तो पर्यंत देशाची प्रगती नाही, असे ठाम मत त्यांनी मांडले होते. त्यानंतरच त्यांनी धर्मपरिवर्तनाचा निर्णय घेतला. त्यांचा निर्णय तेव्हा योग्य होता. यावर आता सर्वांचे एकमत झाल्याचेही त्यांनी सांगितले. रिपब्लीकन ऐक्यासंदर्भात त्यांनी आपल्या भूमीकेचा पुनरुच्चार केला. ऐक्यासाठी मी दहा पाऊले मागे यायला तयार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. चंद्रपूरच्या दीक्षाभूमीसाठी निधीची कमी पडणार नाही. या ठिकाणी उत्तम वास्तु निर्माण होईल, असेही त्यांनी सांगितले. या कार्यक्रमाला आमदार नाना शामकुळे, जिल्हा परिषद अध्यक्ष देवराव भोंगळे, महापौर अंजली घोटेकर यांनीही संबोधित केले.

व्हिडीओ संदेशाव्दारे पालकमंत्र्यांचा संवाद
या कार्यक्रमाला काही कारणास्तव अनुपस्थित असलेले पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आपल्या संदेशाचा खास व्हिडीओ पाठवत. पुढच्या वर्षी दोन कोटी रुपयांच्या अद्ययावत स्मारकासह मी स्वत: कार्यक्रमाला उपस्थित राहील, असा संदेश पाठवला. त्यांनी दीक्षाभूमी येथील स्मारकासाठी दोन कोटी रुपयांचा निधी देण्याची घोषणा केली होती. या संदर्भात 25 सप्टेंबरला सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग यांच्यामार्फत आदेश निर्गमीत करण्यात आला होता. आपल्या अभिवचनाप्रमाणे चंद्रपूरच्या दीक्षाभूमीसाठी आवश्यक निधी दिला असल्याचे त्यांनी आपल्या व्हीडीओ संदेशात सांगितले.
नागपूर नंतर देशात चंद्रपूर येथे बाबासाहेबांनी धर्मपरिवर्तनाची दीक्षा दिली आहे. त्यामुळे या ठिकाणी नतमस्तक होण्यासाठी देशभरातून दरवर्षी लाखोच्या संख्येने अनुयायी येत असतात. 61 वा धम्मचक्र अनुप्रवर्तन समारंभ 15 व 16 ऑक्टोंबरला दरवर्षी या भूमीत साजरा होतो. यासाठी यावर्षी दोन दिवसांचे भव्य कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. यामध्ये एहिपस्सिको, धम्मध्वजारोहण, धम्मज्योत प्रज्वलन, सामुहीक बुध्द वंदना आदी कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. या कार्यक्रमासाठी अरुणाचल प्रदेश येथील भदन्त डॉ.वन्नासामी, डॉ.बाबासाहेब आंबेडकर मेमोरीयल सोसायटीचे अध्यक्ष अरुण घोटेकर, उपाध्यक्ष मारोतराव खोब्रागडे याशिवाय धम्म समारंभाच्या कार्यक्रमामध्ये जगभरातील वेगवेगळया ठिकाणचे भदन्त सहभागी झाले होते.
दीक्षाभूमीवर या दोन दिवसाच्या काळात पुस्तकांची शेकडो दुकाने लक्षवेधी होती. वैचारीक पुस्तकांसोबत बौध्द धर्मावरील अनेक पुस्तकांचा यामध्ये सहभाग होता. बाबासाहेबांनी लिहलेल्या पुस्तकांसोबतच नामवंत लेखकांनी बाबासाहेबांवर लिहलेल्या पुस्तकांची मोठया प्रमाणात विक्री झाली. माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या चंद्रपूर जिल्हा माहिती कार्यालयाने या ठिकाणी लोकराज्यच्या स्टॉलवर विभागातर्फे विशेषत्वाने प्रकाशित केलेल्या महामानव या अंकाची प्रदर्शनी लावली होती.   

000

शेतक-यांचा महाकर्जमाफी कार्यक्रमात 18 ऑक्टोंबरला प्रातिनिधिक सन्मान राज्यभर प्रत्येक जिल्हयात होणार आयोजन


चंद्रपूर, दि.16 ऑक्टोंबर राज्य शासनाने छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना अंतर्गत महाकर्जमाफी दिवाळीपूर्वी शेतक-यांना देण्याच्या आपल्या आश्वासनाची पूर्तता करण्यासाठी युध्द पातळीवर तयारी सुरु केली आहे. 18 ऑक्टोंबरला शेतक-यांचा प्रातिनिधिक सन्मान प्रत्येक जिल्हयाच्या ठिकाणी केला जाणार आहे. कर्जमाफीला पात्र ठरलेल्या शेतक-यांपैकी काहींना प्रातिनिधिक स्वरुपात  प्रमाणपत्र समारंभपूर्वक देण्यात येणार आहे. सहकार मंत्री सुभाष देशमुख यांनी या संदर्भात मुंबईवरुन व्हिडीओ कॉन्फरन्सिंगव्दारे जिल्हा प्रशासनाला ही सूचना केली आहे.  
राज्य शासनाने छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना अंतर्गत 34 हजार कोटीची आतापर्यंतची सर्वात मोठी महाकर्जमाफी राज्यात शेतक-यांना दिली आहे. गेल्या 22 सप्टेंबरपर्यंत अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख होती. त्यानंतर जिल्हा उपनिबंधक यांच्या देखरेखी खाली जिल्हाभरात ऑनलाईन व ऑफलाईन अर्ज दाखल करण्याचे व माहिती गोळा करण्याचे काम सुरु आहे. दिवाळीपूर्वीच कोणत्याही परिस्थितीत कर्जमाफी दिली जाईल, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली होती. त्यामुळे संपूर्ण यंत्रणा कामाला लागली आहे. आज या संदर्भात राज्य शासनाने तातडीने आदेश काढून सर्व जिल्हयांना 18 तारखेला लक्ष्मीपूजनाच्या एक दिवसापूर्वी प्रत्येक जिल्हयामध्ये कर्जमाफी मिळालेल्या शेतक-यापैकी प्रत्येक तालुक्यातील अटी व शर्तीत बसणा-या शेतक-यांना प्रातिनिधिक स्वरुपात प्रमाणपत्र व साडीचोळीची भेट देण्याबाबत निर्देश देण्यात आले आहे. हजारो शेतक-यांपैकी काही शेतक-यांना समारंभपूर्वक हे प्रमाणपत्र दिले जाणार आहे. त्यांची नांवे सहकार विभागाकडून उदया कळविण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा उपनिबंधक आर.डी.कौसडीकर यांनी दिली आहे.
18 तारखेला मुंबईमध्ये महाकर्जमाफीचा मुख्य सोहळा होणार असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शेतक-यांशी संवाद साधणार आहे. या मुख्य सोहळयाला प्रत्येक जिल्हयातून दोन शेतकरी दाम्पत्याला पाचारण केले जाणार असून स्वत: मुख्यमंत्री समारंभपूर्वक प्रमाणपत्र व दिवाळीची भेट देणार आहेत. प्रत्येक जिल्हयामध्ये जिल्हाधिकारी कार्यालयात या कार्यक्रमाचे आयोजन केले जाणार असून मुख्यमंत्र्यांचे मुंबईतील भाषण एकाच वेळी सर्वत्र प्रसारित केले जाणार आहे. आज झालेल्या व्हीडीओ कॉन्फरन्सिंगला जिल्हा उपनिबंधक आर.डी.कौसडीकर, जिल्हा मध्यवर्ती बँकेचे व्यवस्थापक एस.एम.अर्जूनकर, जिल्हा अग्रणी बँकेचे मनोहर शेंडे व सहाय्यक निबंधक स्वप्नील पाटील उपस्थित होते.
000

जिल्हयातील अनुसूचित जाती, अपंग व वरिष्ठ नागरिकांचे प्रलंबित प्रस्ताव तातडीने पाठवा : ना.आठवले


चंद्रपूर जिल्हयातील प्रमुख विभागाचा मंत्र्यांनी घेतला आढावा

चंद्रपूर, दि.16 ऑक्टोंबर अनुसूचित जातीसाठी असलेल्या सर्व योजनाच्या सुविधा जिल्हयातील सर्व अनुसूचित जातीच्या नागरिकांना मिळाव्या यासाठी शंभर टक्के अंमलबजावणी जिल्हयात झाली पाहिजे. या शिवाय वरिष्ठ नागरिक व अंपगासाठी असणा-या योजना व सुविधाचे प्रलंबित असलेले प्रस्ताव सामाजिक न्याय विभागाच्या दिल्ली येथील कार्यालयाला पाठवावे, असे निर्देश केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना.रामदास आठवले यांनी आज घेतलेल्या बैठक दिले.
केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना.रामदास आठवले हे धम्मचक्र अनुप्रवर्तन दिनाच्या 61 व्या समारंभाला विशेष अतिथी म्हणून आले होते. यावेळी विश्रामगृह येथे सामाजिक न्याय विभागाशी संबंधित जिल्हा प्रशासन व स्वराज्य संस्थाच्या अधिका-यांची बैठक घेतली. राज्य व केंद्रात महत्वाची खाती सांभाळणारे दोन मंत्री या चंद्रपूर जिल्हयामध्ये असतांना सामाजिक न्याय विभागाच्या कोणत्याही योजना प्रलंबित किंवा अपूर्ण राहता कामा नये. यासाठी योजनांचे प्रस्ताव तातडीने तयार करुन आपल्या विभागातर्फे सामाजिक न्याय विभागाकडे पाठवावे असे आवाहनही त्यांनी केले.
सकाळी 11 वाजता ही बैठक विश्रामगृह येथे आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला अतिरीक्त जिल्हाधिकारी सचिन कलंत्रे, महावितरणचे मुख्य अभियंता दिलीप घुगल, उपमुख्य कार्यकारी अधिकारी संजय बोदेले, समाज कल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त प्रसाद कुळकर्णी, पोलीस निरीक्षक नरेंद्र कोसुरकर, ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पचे उपसंचालक गजेंद्र नरवणे, महानगरपालिका उपायुक्त विजय देवळीकर, जिल्हा परिषद समाज कल्याण अधिकारी पुष्पा आत्राम व जिल्हा परिषद सभापती ब्रिजभुषण पाझारे उपस्थित होते.
यावेळी त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा परिषद व समाज कल्याण विभागामध्ये असलेल्या अनुसूचित जातीच्या पदाचा आढावा घेऊन समाधन व्यक्त केले. काही ठिकाणी जागा उपलब्ध आहेत त्या भरण्याचा प्रस्ताव सादर करण्यात यावा असे त्यांनी निर्देश दिले. वनविभाग व व्याघ्र प्रकल्पातील कर्मचा-यांची त्यांनी सहानुभूतीपूर्वक चौकशी केली. त्यांच्या वेतनश्रेणी भत्ता व दूर्गम भागात काम करीत असलेल्या सवलतीवर त्यांनी अधिका-यांची मते जाणून घेतली. या भागातील सर्व अनुसूचित जातीच्या नागरिकांना एलपीजी गॅस व निवासी व्यवस्था उपलब्ध करुन देण्यात यावे, अशा सूचनाही त्यांनी केल्या.
जिल्हयातील मागासवर्गीयांच्या शिष्यवृत्ती बाबतही चौक केली. केंद्राकडे प्रलंबित असणारी शिष्यवृत्तीची रक्कम आपण राज्य शासनास उपलब्ध करुन दिल्याचे यश आल्याचे त्यांनी सांगितले. आधार कार्ड लिंग करण्याच्या काही समस्यावरही त्यांनी चर्चा केली.
रमाई घरकुल योजना, मागासवर्गीय वसतीगृहे, दलित वस्ती सुधारणा योजना, अपंग व्यक्तीला असणा-या योजना, वरिष्ठ नागरिकांना मिळणा-या माधनाच्या रक्कमा याबाबतही त्यांनी माहिती जाणून घेतली. जिल्हयामध्ये आंतरजातीय विवाहात वाढ होत असल्याबाबत त्यांनी समाधान व्यक्त केले. जिल्हयातील औद्योगिक संस्थामध्ये काम करणा-या अस्थाई कर्मचा-यांचे पगार देखील स्थायी कर्मचा-याप्रमाणे ठरलेले वेतन नियमानुसार घेतले जावेत, असे आवाहन त्यांनी यावेळी केले. जिल्हयातील अशा संस्थांच्या वरिष्ठ अधिका-यांशी त्यांनी यावेळी चर्चा केली.
000

Friday 13 October 2017

चंद्रपूर सैनिक शाळेचे काम वेगाने पूर्ण करावे सुधीर मुनगंटीवार यांचे आदेश



मुंबई, दि. १२ : चंद्रपूर सैनिक शाळेत २०१९ ला पहिली बॅच प्रवेश घेऊ शकेल या पद्धतीने शाळेचे  काम वेगाने पूर्ण करावेअसे आदेश काल चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री तथा वित्त व नियोजन मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिले.
सह्याद्री अतिथीगृहात यासंबंधी झालेल्या बैठकीत ते बोलत होते चंद्रपूरची सैनिक शाळा ही भारतातील उत्तम सैनिक शाळा व्हावी यासाठी तिथे करण्यात येणारे काम आणि राबविण्यात येणाऱ्या संकल्पना उत्कृष्ट आणि दर्जेदार असाव्यात अशा सूचना देऊन श्री. मुनगंटीवार म्हणाले,  या शाळेसाठी १२३ एकर जागा उपलब्ध करून देण्यात आली आहे. या जागेचा शाळेच्या इमारतीसाठी उपयोग करून घेतांना तो कल्पकतेने तसेच सर्व आवश्यक गरजांचा विचार करून केला जावा. शाळेची इमारतप्रशासकीय इमारतविद्यार्थ्यांचे वसतिगृहेविद्यार्थ्यांसाठी क्रीडा सभागृहमैदानेस्वीमिंग टँकत्यांची भोजनाची व्यवस्था,  शैक्षणिक तसेच इतर कर्मचारी वर्गाची राहण्याची व्यवस्थापरेड ग्राऊंडहॉर्स रायडिंगची जागाघोड्यांच्या पागावाहनतळ,  या सगळ्या व्यवस्था या परस्पर संलग्न आणि सोयीच्या असाव्यात.
युनिक झाडांचे उद्यान तयार केले जावेबांबू रोपांची लागवड सुनियोजित पद्धतीने केली जावीवीज वापराच्या दृष्टीने ही शाळा स्वयंपूर्ण होऊ शकते का याचा अभ्यास करावायासंबंधीची अधिक माहिती मेडा कडून प्राप्त करून घेण्यात यावी. शाळेमध्ये एक महिन्याचे छोटे प्रशिक्षण वर्ग आयोजित केले जावेत. शाळेमध्ये रेनवॉटर हार्वेस्टिंगची व्यवस्था करण्यात यावी. मिल्ट्री म्युझियमविद्यार्थ्यांच्या दैनंदिन गरजा भागवण्यासाठीची दुकाने, याचीही येथे व्यवस्था असावी असेही ते यावेळी म्हणाले.
चंद्रपूर येथे सैनिक शाळा सुरु करण्याचा निर्णय एप्रिल २०१५ मधील मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला होता. सातारा सैनिक शाळेच्या धर्तीवर चंद्रपूर येथे सैनिक शाळा सुरु करण्याच्या प्रस्तावास केंद्र शासनाकडून मान्यता देण्यात आल्यानंतर यासाठी एकूण सुमारे ३०९ कोटी रुपयांच्या प्रस्तावास प्रशासकीय मान्यता देण्यात आली असल्याची माहिती शालेय शिक्षण विभागाकडून यावेळी देण्यात आली.
 बैठकीत सैनिक शाळेचा विकास आराखडा श्री. मुनगंटीवार यांच्यासमोर सादर करण्यात आला. यावेळी शालेय शिक्षण तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
                                                 0 0 0

Friday 6 October 2017

परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी महाकर्जमाफीचा घेतला आढावा

चंद्रपूर, दि.06 ऑक्टोंबर  चंद्रपूर जिल्हयातील छत्रपती शिवाजी महाराज महाकर्जमाफी अंतर्गत दाखल केलेल्या अर्जाची सद्यास्थिती, बँकांमधील या संदर्भात सुरु असलेली कामे, चावडी वाचनाच्या कार्यक्रमाचा आढावा आदीबाबत आज राज्याचे परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी आढावा घेतला.
          आज दुपारी त्यांनी चंद्रपूर जिल्हयाच्या महाकर्जमाफी संदर्भात आढावा घेण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाला भेट दिली. यावेळी अप्पर जिल्हाधिकारी सचिन कलंत्रे, निवासी उपजिल्हाधिकारी वैभव नावडकर यांनी त्यांचे स्वागत केले. यावेळी जिल्हयातील विविध बँकांचे अधिकारी उपस्थित होते.
          यावेळी अधिका-यांशी चर्चा करतांना त्यांनी ऑनलाईन अर्जाच्या संदर्भातील संपूर्ण डाटा तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश दिले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितल्याप्रमाणे शक्य तेवढया लवकर शेतक-यांना दिलासा मिळेल, यासाठी यंत्रणा वाढवण्याचे आवाहनही त्यांनी केले. चंद्रपूर जिल्हयामध्ये कर्ज भरणा-या शेतक-यांची संख्या मोठया प्रमाणात असल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले असून मोठया संख्येत कर्जाची परतफेड करणा-यांना देखील योजनेतील तरतूदींचा लाभ मिळावा, असे निर्देश त्यांनी दिले.
          यवतमाळ जिल्हयातील शेतकरी फवारणी करतांना विषबाधा होवून मृत्यूमुखी पडल्याच्या घटनेबद्दल त्यांनी दु:ख व्यक्त केले. कृषी विभागामार्फत या संदर्भात जनजागृती मोहीम राबविण्यात यावी. चंद्रपूर जिल्हयामध्ये अशा पध्दतीच्या घटना घडू नये, यासाठी कृषी व आरोग्य विभागाने लक्ष वेधावे असेही त्यांनी सांगितले.
                                                                  000

Wednesday 4 October 2017

दुसऱ्याला मदतीचा हात देणारा विद्यार्थी घडावा - सुधीर मुनगंटीवार



6 व्या वर्धापन दिनी मुलांचे व मुलींच्या वसतीगृहाचे उद्घाटन संपन्न
गडचिरोली दि.4:- चंद्रपूर- गडचिरोली   जिल्हयातील युवक कोणत्याही क्षेत्रात यशस्वी होईल अशी क्षमता असलेला युवक. त्याला संधी मिळाली तर एकलव्यासारखी  कामगिरी केल्याशिवाय रहाणार नाही. याकरीताच  या दोन जिल्हयासाठी स्वतंत्र गोंडवाना विद्यापीठाची निर्मिती  करण्यात आली.   या विद्यापीठातुन मदत मागणारा  विद्यार्थी न घडता दुसऱ्याला मदतीचा हात देणारा विद्यार्थी घडावा, असे प्रतिपादन राज्याचे वित्त, वने व नियोजन मंत्री सुधीर मुनगंटीवार  यांनी आज येथे केले.
6 व्या वर्धापन दिन सोहळयाचे  औचित्य साधून विद्यापीठ परिसरातील मुलांचे व मुलींचे वसतीगृहाचे उद्घाटन प्रसंगी  ते बोलत होते.
यावेळी राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण, शालेय शिक्षण, मराठी भाषा मंत्री विनोद तावडे  मुलींच्या वसतीगृहाचे उद्घाटक म्हणून उपस्थित होते. तर मुलांच्या वसतीगृहाचे उद्घाटक म्हणून राज्याचे वित्त, वन व नियोजन मंत्री सुधीर मुनंगटीवार उपस्थित होते. तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून कुलगुरु डॉ. एन. व्ही. कल्याणकर  होते.  प्रमुख उपस्थितीत प्र. कुलगुरु डॉ. चंद्रशेखर भुसारी हे होते.  या कार्यक्रमात विशेष अतिथी म्हणून पालकमंत्री राजे अम्ब्रीशराव आत्राम होते.  
याप्रसंगी विशेष उपस्थिती  खासदार अशोक नेते, जिल्हा परिषद अध्यक्षा योगिता भांडेकर, आमदार डॉ. देवराव होळी, आमदार कृष्णा गजबे, जिल्हाधिकारी ए.एस.आर. नायक, नगराध्यक्षा योगिता पिपरे, डॉ. विकास आमटे, कुलसचिव जुनघरे हे प्रामुख्याने उपस्थित होते.
पुढे बोलताना मुनगंटीवार म्हणाले की, या विद्यापीठाच्या निर्मितीसाठी  सर्व आयुधांचा वापर करुन  गोंडवाना विद्यापीठाची गडचिरोली येथे  आदिवासी बहूल जिल्हयात  स्थापना करण्यात आली.  येथे जंगल, पाणी , जमीन, खनिज   विपुल प्रमाणात आहे.  या  सर्व बाबींचा अभ्यास करुन  येथील युवकांना  या विद्यापीठानी  रोजगाराभिमूख, उद्योपती, कुशल कारागिर कसा बनेल याचा विचार करुन  अभ्यासक्रम राबवावा अशी  सुचना यावेळी त्यांनी केली.  आता ज्ञान संपादन करण्याची व्याख्या बदलली आहे.  तेव्हा  विविधांगी अभ्यासक्रमातून  असा विद्यार्थी तयार करा की जेणे करुन  या विद्यापीठाच्या अनुरोधाने शासनाचे उत्पन्न वाढेल असे ते म्हणाले.
शालेय शिक्षण मंत्री विनोद तावडे उद्घाटनपर भाषणात म्हणाले की,  विद्यापीठाच्या पायाभूत सुविधा करण्यासाठी  संपुर्ण शक्ती खर्च करुन येथील कामे  करण्यात येतील.  लवकर राज्यपाल विद्यासागर राव यांनी यासंदर्भात बैठक  आयोजित करीत आहेत. या बैठकीत विचार विनिमय करुन , सर्व स्तरावर पाठपुरावा करुन  तातडीने 200 एकर जमीन खरेदी  करण्याची व्यवस्था करण्यात येत आहे.   विद्यापीठात  सर्वंकष अभ्यासक्रमासोबतच  बांबुवर आधारीत प्रकल्प, आयुर्वेद, लोककला यावर आधारीत पदवी अभ्यासक्रम  सुरु करण्याचा   प्रयत्न करावा. तसेच कुशल खेळाडू तयार करण्यासाठीसुध्दा अभ्यासक्रमात  सिल्याबस तयार करण्याच्या सुचनाही यावेळी त्यांनी केल्या
याप्रसंगी  विद्यापीठातर्फे  सुप्रसिध्द समाजसेवक  डॉ. विकास बाबा आमटे यांना जीवन साधना गौरव पुरस्कार अध्यक्ष, प्रमख अतिथी, विशेष अतिथी यांच्या हस्ते प्रदान करुन  सन्मानीत करण्यात आले. शाल, श्रीफळ, मानपत्र, सन्मानचिन्ह व पुरस्कार राशी धनादेश रुपये 25 हजार  देऊन गौरव करण्यात आला.
तसेच  सरदार पटेल महाविद्यालय, चंद्रपूरला  उत्कृष्ट महाविद्यालय पुरस्कार, प्राचार्य डॉ. नामदेव एस. कोकोडे यांचा उत्कृष्ट प्राचार्य पुरस्कार, शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय चंद्रपूर येथील डॉ. सुधीर आकोजवार  यांना उत्कृष्ट शिक्षक पुरस्कार, असिस्टंट प्रोगामर प्रमोद किसन बोरकर यांना  उत्कृष्ट विद्यापीठ अधिकारी पुरस्कार,  निवड श्रेणी लिपीक विपीन कालीदास राऊत  यांना उत्कृष्ट विद्यापीठ कर्मचारी पुरस्कार, संजय पिरु राठोड यांना उत्कृष्ट विद्यापीठ कर्मचारी पुरस्कार,  शिवाजी महाविद्यालयाचे  संजय नामदेव संतोषवार यांना उत्कृष्ट कर्मचारी पुरस्कार,  कुणाल बाबा खणके  यांना उत्कृष्ट विद्यार्थी पुरस्कार, कुमारी जयश्री प्रभाकर नाकाडे हिला उत्कृष्ट विद्यार्थीनी पुरस्कार प्रदान करुन यावेळी गौरविण्यात आले.
कुलगुरु डॉ. एन.व्ही. कल्याणकर यांनी   प्रास्ताविक करतांना विद्यापिठानी या सहा वर्षात केलेल्या कामाची  तसेच पुढील नियोजनाची माहिती दिली.
कार्यक्रमाचे संचलन प्राध्यापक नरेंद्र आरेकर यांनी केले तर आभार  कुलसचिव दिपक एस. जुनघरे यांनी मानले.

******

Tuesday 3 October 2017

मिशन अत्योंदय आणि कौशल्य रथाव्दारे विकास गंगा आपल्या दारी : अशोक सिरसे, अति.मुख्य कार्यकारी अधिकारी

चंद्रपूर दि.03 ऑक्टोंबर- राज्यात 1 ऑक्टोंबर ते 15 ऑक्टोंबर 2017 पर्यंत मिशन अंत्योदय अंतर्गत जिल्हातील 157 ग्राम पंचायतीमध्ये पथदर्थी ग्राम समृध्दी व स्वच्छता पंधरवडा राबविण्यात येत आहे. पंधरवडयामध्ये जिल्हयातील सर्व गावांमध्ये विविध स्वच्छतेच्या कार्यक्रमाचा जागर होत आहे. यामुळे या पंधरवडयात लोकांचा ग्रामसभेत सहभाग व गांवाचा विकास आराखडा तयार करणे, स्वच्छता विषयी जनजागृती, प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत घरकुलाच्या कामास सुरवात करणे आणि विविध योजनेची जाणीव जागृती करण्याकरीता कौशल्य रथासह कलापथकाची सोबत असल्याने लोकांच्या सहभागाने विकासाची गंगा आपल्या दारी आलेली आहे. तीचे स्वागत उत्स्फुर्तपणे करण्याचे आवाहन अतिरीक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अशोक सिरसे  यांनी आज कौशल्य रथाचे स्वागत करतांना केले. यावेळी जिल्हा आरोग्य अधिकारी श्रीराम गोगुलवार, गोंडपिंपरीचे गटविकास अधिकारी यशवंत मोहितकर, सहाय्यक गटविकास अधिकारी श्रीमती आशा ढवळे, जिल्हा अभियान व्यवस्थापक सचिन देशमुख यांच्या उपस्थित कौशल्य रथाला हिरवी झेंडी दाखवून कार्यक्रमाचे उद्घाटन केले.
मिशन अंत्योदय अंतर्गत 157 ग्रामपंचायतीमध्ये पायाभुत सर्वेक्षणाचे काम दिनांक 1 ऑक्टोंबर ते 15 ऑक्टोंबर या कालावधीत करण्यात येणार आहे. यामध्ये गावातील विविध संसाधने आणि विकास आराखडा तयार करण्याच्या दृष्टीने आवश्यक माहितीची नोंद ‘समृध्द ग्राम’ ह्या ॲप्लीकेशनवर ऑनलाईन पध्दतीने घेण्यात येणार आहे. सर्वेक्षण गावातील महिला बचत गटातील CRP, ग्राम रोजगार सेवक व एक महाविद्यालयीन विद्यार्थी या चमुमार्फत करण्यात येणार आहे. वरील सर्व चमूंचे प्रशिक्षण तालुका स्तरावर घेण्यात येणार आहे. सन 2011 च्या जनगणनेनुसार गावाला आवश्यक सुविधा या माध्यमातुन उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न आहे. गावातील सर्वेक्षणातून प्राप्त माहितीचे संकलन झाल्यानंतर ग्राम पंचायतीच्या मासिक सभेमध्ये सदर माहितीचे प्रमाणीकरण करून मगच संकलीत माहिती ॲपवर अंतिम ऑनलाईन भरण्याची प्रक्रिया पूर्ण केली जाणार आहे.
स्वच्छता पंधरवडा जिल्हातील सर्वच ग्राम पंचायतीमध्ये राबविण्यात येत असून या अंतर्गत ग्रामपंचायतीच्या कामाचे नियोजन व माहिती भरण्यासाठी स्वतंत्र “स्वच्छता ॲप” तयार करण्यात येणार आहे. याकरीता शासनाने तालुकास्तरावर गट विकास अधिकारी यांना नोडल अधिकारी म्हणून नेमणूक केलेली आहे.
कौशल्य रथाच्या उद्घाटन कार्यक्रमाचे संचालन सांख्येकी विस्तार अधिकारी पी.डब्लु.पाल व प्रास्ताविक जिल्हा अभियान व्यवस्थापन सचिन देशमुख यांनी केले. कार्यक्रमाला जिल्हातील बचत गटातील सर्वच भागातील महिला मोठया संख्येने उपस्थित होत्या.

000

जिल्हयातील कृषी, आरोग्य सेवा बळकट करा : ना.हंसराज अहीर


जिल्हा विकास समन्वय व सनियंत्रण समितीचा आढावा

चंद्रपूर, दि.3 ऑक्टोंबर – जिल्हयातील शेतकरी हा शासनाच्या प्रत्येक योजनांनी लाभान्वित झाला पाहिजे, त्यांच्या आर्थिक उत्कर्षासाठी योजना, प्रशिक्षण सुविधा, सल्ला आणि आवश्यक तिथे थेट मदत पोहचली पाहीजे. शासनाच्या विविध योजना केवळ कागदांवरच न राहता जनतेपर्यंत पोहचल्या पाहीजे, त्यासाठी अधिका-यांनी कर्तव्य नव्हे दायित्व म्हणून काम करावे, असे आवाहन केंद्रीय गृहराज्य मंत्री हंसराज अहीर यांनी केले.
जिल्हा विकास समन्वय व सनियंत्रण समितीची आढावा बैठक आज जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बचत भवनात आयोजित करण्यात आली होती. व्यासपीठावर आमदार ॲड. संजय धोटे, जिल्हा परिषद अध्यक्ष देवराव भोंगळे, महापौर अंजलीताई घोटेकर, जिल्हाधिकारी आशुतोष सलिल, मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र पापळकर, मनपा आयुक्त संजय काकडे, अतिरीक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अशोक सिरसे, जिल्हा दक्षता समितीचे सदस्य खुशाल बोंडे, सर्व पंचायत समितीचे सभापती, सर्व गट विकास अधिकारी, नगरपालिकांचे नगराध्यक्ष, सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते .
या बैठकीमध्ये महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना, पंडित दिनदयाल उपाध्याय अंतोदय योजना, पंडित दिनदयाल उपाध्याय ग्रामीण कौशल्य योजना, प्रधानमंत्री ग्राम सडक योजना, राष्ट्रीय सामाजिक साहाय्यता कार्यक्रम, प्रधानमंत्री आवास योजना, स्वच्छ भारत अभियान, राष्ट्रीय ग्रामीण पेयजल कार्यक्रम, पीक विमा, प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना, पंडित दिनदयाल उपाध्याय ग्राम ज्योती योजना, शामाप्रसाद मुखर्जी शहरी उपक्रम, कौशल्य विकास, अमृत योजना याशिवाय विविध पायाभूत सुविधांचा आढावा घेण्यात आला.  
जिल्हयातील दुर्गम भागातील नागरिकांना उत्तम सोयी, सुविधा पुरवण्‍यात याव्यात, 2022 पर्यंत शेतक-यांचे उत्पन्न दुप्पट करण्यात यावे, सर्वांना मूलभूत आरोग्य सुविधा मिळाव्यात यासाठी सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करावे, असे निर्देश केंद्रीय मंत्री हंसराज अहीर यांनी आढावा बैठकीनंतर केले. तत्पूर्वी त्यांनी कृषी विभागाच्या योजना आणि त्याची अंमलबजावणी याबाबत जिल्हयातील दुर्गम भागातील लोकप्रतिनिधींशी चर्चा केली. त्यांच्या अपेक्षेप्रमाणे शेतक-यांसाठी योजनांची माहिती, प्रशिक्षण, सवलती आणि सुविधा देण्याबाबत चर्चा झाली. या चर्चेमध्ये पंचायत समितीचे सभापती व अन्य लोकप्रतिनिधींनी आपली बाजू मांडली. जिल्हयातील प्राथमिक आरोग्य यंत्रणा ही अधिक सक्षम व्हावी. प्रसूतीला येणा-या महिलांना उत्तम सुविधा व सोयी मिळाव्यात. यासाठी प्राथमिक आरोग्य केंद्र बळकट करण्याचे निर्देश यावेळी अहीर यांनी दिले.
महात्मा गांधी ग्रामीण रोजगार हमी योजनेचा आढावा घेताना नियमित मस्टर भरून कामाची उपलब्धता करण्यात यावी. मजूरांची उपलब्धता करण्यात यावी, याविषयी लक्ष वेधण्याचे आवाहन हंसराज अहीर यांनी केले. पंडित दिनदयाल उपाध्याय अंतोदय योजनेमध्ये बँकनिहाय भौतिक व आर्थिक उद्धिष्ठय पूर्ण करण्याचे आवाहन केले. बँक अधिकारी, कर्मचारी यांच्या जनतेसोबतच्या तक्रारी वाढत असल्याबद्दल नाराजी व्यक्त करण्यात आली. शेतकरी, महिला, विद्यार्थी व महिला बचत गट यांना होत असलेल्या त्रासाबद्दल सभापती व पदाधिकाऱ्यांनी नाराजी व्यक्त केली. जिल्हाधिकारी आशुतोष सलिल यांनी यामध्ये हस्तक्षेप करीत बँकाँच्या संदर्भात वेगळी बैठक आयोजित करण्याचे निर्देश जिल्हा अग्रणी बँकेचे प्रमुखांना दिले. जिल्हयातील विविध योजना, उपक्रम यामध्ये बँकाँनी सक्रीयतेने सहभागी होण्याचे आवाहन त्यांनी केले.
  प्रधानमंत्री आवास योजनेतील वरोरा, भद्रावती, बल्लारपूर आदी नगरपालिकांनी आपला आढावा सादर केला. शहरातील उपलब्ध जागा, डीपीआर पूर्ण करणे आदीबाबत चर्चा करण्यात आली. उज्वला गॅस वितरण योजनेबद्दल या वेळी चर्चा झाली. गॅस वितरण संदर्भात तक्रारी राहणार नाही, याची सूचना करण्यात आली. कृषी, आरोग्य आणि पायाभूत सुविधांवरही चर्चा झाली.
            दिनदयाल उपाध्याय ग्राम ज्योती योजना, फवारणी  करताना होणारे अपघात, ग्रामीण भागातील जनतेने शेती संदर्भातील प्रशिक्षण, जिल्हयातील प्रशिक्षण उत्सुक शेतकऱ्यांना पुढाकार घेऊन शिक्षीत करण्याबाबत माहिती दिली. राष्ट्रीय आरोग्य अभियान आढावा अंतर्गत 58 प्राथमिक आरोग्य केंद्राचा आढावा घेण्यात आला. रिक्त पदामुळे ग्रामीण भागातील आरोग्य यंत्रणा आजारी होता कामा नये, अशी सूचना करण्यात आली. दुर्गम भागात वैद्यकीय अधिकारी तातडीने देण्यात यावे, असे निर्देश देण्यात आले. एकात्मिक बाल विकास योजना अंतर्गत प्रलंबित अंगणवाडी बांधकाम संदर्भात यावेळी चर्चा करण्यात आली . प्रकल्प संचालक रवी शिवदास यांनी प्रास्ताविक केले. संचलन अरुणा गतफणे तर आभार प्रदर्शन उत्कर्ष वाघरे यांनी केले.

000