Search This Blog

Tuesday 3 October 2017

जिल्हयातील कृषी, आरोग्य सेवा बळकट करा : ना.हंसराज अहीर


जिल्हा विकास समन्वय व सनियंत्रण समितीचा आढावा

चंद्रपूर, दि.3 ऑक्टोंबर – जिल्हयातील शेतकरी हा शासनाच्या प्रत्येक योजनांनी लाभान्वित झाला पाहिजे, त्यांच्या आर्थिक उत्कर्षासाठी योजना, प्रशिक्षण सुविधा, सल्ला आणि आवश्यक तिथे थेट मदत पोहचली पाहीजे. शासनाच्या विविध योजना केवळ कागदांवरच न राहता जनतेपर्यंत पोहचल्या पाहीजे, त्यासाठी अधिका-यांनी कर्तव्य नव्हे दायित्व म्हणून काम करावे, असे आवाहन केंद्रीय गृहराज्य मंत्री हंसराज अहीर यांनी केले.
जिल्हा विकास समन्वय व सनियंत्रण समितीची आढावा बैठक आज जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बचत भवनात आयोजित करण्यात आली होती. व्यासपीठावर आमदार ॲड. संजय धोटे, जिल्हा परिषद अध्यक्ष देवराव भोंगळे, महापौर अंजलीताई घोटेकर, जिल्हाधिकारी आशुतोष सलिल, मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र पापळकर, मनपा आयुक्त संजय काकडे, अतिरीक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अशोक सिरसे, जिल्हा दक्षता समितीचे सदस्य खुशाल बोंडे, सर्व पंचायत समितीचे सभापती, सर्व गट विकास अधिकारी, नगरपालिकांचे नगराध्यक्ष, सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते .
या बैठकीमध्ये महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना, पंडित दिनदयाल उपाध्याय अंतोदय योजना, पंडित दिनदयाल उपाध्याय ग्रामीण कौशल्य योजना, प्रधानमंत्री ग्राम सडक योजना, राष्ट्रीय सामाजिक साहाय्यता कार्यक्रम, प्रधानमंत्री आवास योजना, स्वच्छ भारत अभियान, राष्ट्रीय ग्रामीण पेयजल कार्यक्रम, पीक विमा, प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना, पंडित दिनदयाल उपाध्याय ग्राम ज्योती योजना, शामाप्रसाद मुखर्जी शहरी उपक्रम, कौशल्य विकास, अमृत योजना याशिवाय विविध पायाभूत सुविधांचा आढावा घेण्यात आला.  
जिल्हयातील दुर्गम भागातील नागरिकांना उत्तम सोयी, सुविधा पुरवण्‍यात याव्यात, 2022 पर्यंत शेतक-यांचे उत्पन्न दुप्पट करण्यात यावे, सर्वांना मूलभूत आरोग्य सुविधा मिळाव्यात यासाठी सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करावे, असे निर्देश केंद्रीय मंत्री हंसराज अहीर यांनी आढावा बैठकीनंतर केले. तत्पूर्वी त्यांनी कृषी विभागाच्या योजना आणि त्याची अंमलबजावणी याबाबत जिल्हयातील दुर्गम भागातील लोकप्रतिनिधींशी चर्चा केली. त्यांच्या अपेक्षेप्रमाणे शेतक-यांसाठी योजनांची माहिती, प्रशिक्षण, सवलती आणि सुविधा देण्याबाबत चर्चा झाली. या चर्चेमध्ये पंचायत समितीचे सभापती व अन्य लोकप्रतिनिधींनी आपली बाजू मांडली. जिल्हयातील प्राथमिक आरोग्य यंत्रणा ही अधिक सक्षम व्हावी. प्रसूतीला येणा-या महिलांना उत्तम सुविधा व सोयी मिळाव्यात. यासाठी प्राथमिक आरोग्य केंद्र बळकट करण्याचे निर्देश यावेळी अहीर यांनी दिले.
महात्मा गांधी ग्रामीण रोजगार हमी योजनेचा आढावा घेताना नियमित मस्टर भरून कामाची उपलब्धता करण्यात यावी. मजूरांची उपलब्धता करण्यात यावी, याविषयी लक्ष वेधण्याचे आवाहन हंसराज अहीर यांनी केले. पंडित दिनदयाल उपाध्याय अंतोदय योजनेमध्ये बँकनिहाय भौतिक व आर्थिक उद्धिष्ठय पूर्ण करण्याचे आवाहन केले. बँक अधिकारी, कर्मचारी यांच्या जनतेसोबतच्या तक्रारी वाढत असल्याबद्दल नाराजी व्यक्त करण्यात आली. शेतकरी, महिला, विद्यार्थी व महिला बचत गट यांना होत असलेल्या त्रासाबद्दल सभापती व पदाधिकाऱ्यांनी नाराजी व्यक्त केली. जिल्हाधिकारी आशुतोष सलिल यांनी यामध्ये हस्तक्षेप करीत बँकाँच्या संदर्भात वेगळी बैठक आयोजित करण्याचे निर्देश जिल्हा अग्रणी बँकेचे प्रमुखांना दिले. जिल्हयातील विविध योजना, उपक्रम यामध्ये बँकाँनी सक्रीयतेने सहभागी होण्याचे आवाहन त्यांनी केले.
  प्रधानमंत्री आवास योजनेतील वरोरा, भद्रावती, बल्लारपूर आदी नगरपालिकांनी आपला आढावा सादर केला. शहरातील उपलब्ध जागा, डीपीआर पूर्ण करणे आदीबाबत चर्चा करण्यात आली. उज्वला गॅस वितरण योजनेबद्दल या वेळी चर्चा झाली. गॅस वितरण संदर्भात तक्रारी राहणार नाही, याची सूचना करण्यात आली. कृषी, आरोग्य आणि पायाभूत सुविधांवरही चर्चा झाली.
            दिनदयाल उपाध्याय ग्राम ज्योती योजना, फवारणी  करताना होणारे अपघात, ग्रामीण भागातील जनतेने शेती संदर्भातील प्रशिक्षण, जिल्हयातील प्रशिक्षण उत्सुक शेतकऱ्यांना पुढाकार घेऊन शिक्षीत करण्याबाबत माहिती दिली. राष्ट्रीय आरोग्य अभियान आढावा अंतर्गत 58 प्राथमिक आरोग्य केंद्राचा आढावा घेण्यात आला. रिक्त पदामुळे ग्रामीण भागातील आरोग्य यंत्रणा आजारी होता कामा नये, अशी सूचना करण्यात आली. दुर्गम भागात वैद्यकीय अधिकारी तातडीने देण्यात यावे, असे निर्देश देण्यात आले. एकात्मिक बाल विकास योजना अंतर्गत प्रलंबित अंगणवाडी बांधकाम संदर्भात यावेळी चर्चा करण्यात आली . प्रकल्प संचालक रवी शिवदास यांनी प्रास्ताविक केले. संचलन अरुणा गतफणे तर आभार प्रदर्शन उत्कर्ष वाघरे यांनी केले.

000

No comments:

Post a Comment