Search This Blog

Wednesday, 18 October 2017

शेती, शेतकरी व गावाच्या विकासाबाबत राज्य व केंद्र शासन जागरुक --- केद्रीय गृह राज्यमंत्री हंसराज अहीर



चंद्रपूरमध्ये 31 शेतक-यांना महाकर्जमाफीचे प्रातिनिधीक प्रमाणपत्र वाटप

चंद्रपूर, दि.18 ऑक्टोंबर- केवळ आश्वासने देऊन बोळवण करणारे हे सरकार नसून शेती, शेतकरी व गावाच्या विकासाबाबत अतिशय जागरुकतेने काम करणारे हे सरकार आहे. राज्यातील देवेंद्र फडणवीस सरकारने जलयुक्त शिवार सारखी अभिनव योजना आणि महाकर्जमाफीचा निर्णय घेऊन शेतक-यांच्या केवळ आजच्या भल्याचाच विचार केला नाही, तर भविष्याचा देखील विचार केला आहे. शाश्वत विकासावर या सरकारचा भर असून याचे दृष्यपरिणाम लवकरच दिसून येतील, असे प्रतिपादन केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांनी आज येथे केले.
आज चंद्रपूर जिल्हाधिकारी कार्यालयात बचत साफल्य भवन सभागृहात छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना कार्यक्रमामध्ये जिल्हयातील 31 शेतकरी दाम्पत्यांना कर्जमाफी प्रमाणपत्र व दिवाळी निमित्त भेट वस्तू देऊन सन्मान करण्यात आला. ऐनदिवाळीमध्ये राज्य शासनाने जाहिर केल्याप्रमाणे शेतक-यांना कर्जमाफी दिली जात असल्याचा आनंद आहे. यासाठी राज्यातील देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातील सरकारचे अभिनंदन करतो, अशा शब्दात शेतक-यांची सेवा करण्याची संधी मिळाल्याबद्दल त्यांनी कृतज्ञता व्यक्त केली. यावेळी व्यासपीठावर आमदार ॲड.संजय धोटे, आमदार किर्तीकुमार भांगडिया, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष देवराव भोंगळे, जिल्हाधिकारी आशुतोष सलिल, मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र पापळकर, अपर जिल्हाधिकारी सचिन कलंत्रे, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष मनोहर पाऊणकर, जिल्हा उपनिबंधक आर.डी.कौसडीकर, खुशाल बोंडे आदी उपस्थित होते.
यावेळी अहीर यांनी केंद्रातील प्रधानमंत्री नरेंद्र मोदी व राज्यातील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातील दोनही सरकार शेती, शेतकरी व गावाच्या विकासाबद्दल अतिशय आग्रही आहे. राज्य शासनाच्या जलयुक्त शिवार या योजनेचे कौतुक करतांना त्यांनी या योजनेमुळे गावागावात पाण्याची साठवण होत असून पाणी पातळी वाढण्यात मदत झाली आहे. महाकर्जमाफी सारखी घोषणा असो की शेतक-यांच्या बांधावर थेट खते पोहचविण्याची योजना असो, शेतकरी कायम विकासाचा केंद्र बिंदू राहिला आहे. आतापर्यंत कोणत्याही शासनाने महाराष्ट्रामध्ये किटकनाशकाच्या प्रादूर्भावाने अपघात घडलेल्या, जीव गमवाव्या लागलेल्या शेतक-यांना मदत केली नाही. राज्यात आपण या दु:खात शेतक-यांच्या पाठीशी राहिलो व पहिल्यांदाच कोणत्या शासनाने यासाठी मदत केली. थेट 2 लाखाची मदत मुख्यमंत्र्यांनी जाहीर केली आहे. राज्य व केंद्र शासनाच्या विविध योजना कार्यान्वित असून त्यातून शेतक-यांचे 2022 पर्यंत उत्पन्न दुप्पट करण्याचा केंद्र सरकारचा संकल्प आहे. शेतक-यांना वीजपुरवठा असो, बियाणे असो, खतपुरवठा असो हे सरकार प्रयत्नशील असून सिंचनाचा बॅकलॉग भरुन काढण्यासाठी केंद्र शासनाने मोठया प्रमाणात सिंचन प्रकल्पांसाठी निधी मंजूर केला आहे.  यामध्ये चंद्रपूर जिल्हयातील डोंगरगावच्या प्रकल्पाचा सुध्दा समावेश आहे. यावेळी आमदार संजय धोटे यांनी संबोधित केले. ते म्हणाले राज्य शासनातर्फे या महाकर्जमाफीचे पूर्णपणे अंमलबजावणी होईल. प्रत्येक लाभार्थी शेतक-यांला यातून कर्जमाफी मिळेल. शेतक-यांना दिलासा देणारी ही मोहीम असून त्याचा लाभ शेतक-यांनी घ्यावा. जिल्हाधिकारी आशुतोष सलिल यांनी देखील यावेळी शेतक-यांशी संवाद साधला. मुख्यमंत्री महोदयांनी दिवाळी पूर्वी महाकर्जमाफीची घोषणा केली होती. ती प्रत्यक्षात उतरली असून जिल्हा प्रशासनातर्फे सर्व लाभार्थी शेतक-यांना लवकरच याबाबत लाभ मिळेल, असे त्यांनी स्पष्ट केले.  
जिल्हयातील ज्या शेतक-यांना प्रातिनिधीक स्वरुपात कर्जमाफीचे प्रमाणपत्र वितरीत करण्यात आले, त्या शेतक-यांची तालुकानिहाय नावे पुढीलप्रमाणे आहेत. ब्रम्हपूरी तालुका- अशोक मोहुर्ले, कोरपना-अशोक मंगाम, राजूरा- राजया बेडकमवार, गोंडपिरी-अनिल चौधरी, भाऊजी ठुसे, भद्रावती-गणपती साव, प्रविण गेडाम, गजानन घोटकर, बल्लारपूर- पुंजाराम सोयाम, पोंभूर्णा- भाऊजी मडावी, सुनिल लोणारे, दिलीप दिवसे, सावली-राजु मुप्पावार, शामराव मोहुर्ले, चिमूर-वासुदेव दोडके, विलास वाघाडे, मुल-रामप्रसाद गेडाम, सखाराम सिडाम, बोडकू मडावी, वरोरा-रविंद्र उरकुडे, अनंता घागी, चंद्रपूर-प्रभाकर पाचभाई, प्रकाश पारपल्लीवार, नागभिड-शांताबाई श्रीरामे, रघुनाथ कन्नाके, मंगेश गुरनुले, सिंदेवाही- आनंदराव लोखंडे व प्रभाकर बोरकर यांचा समावेश आहे. तर अनुपस्थित राहिलेल्या शेतक-यांची नांवे रामदास करंबे, सुधाकर ताजणे, शंकर पवार अशी आहेत.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हाधिकारी आशुतोष सलिल यांनी केले.  संचालन शाम हेडाऊ यांनी तर आभार जिल्हा उपनिबंधक आर.डी.कौसडीकर यांनी मानले. यावेळी जिल्हयातील संपूर्ण तालुक्यामधील शेतकरी मोठया संख्येने उपस्थित होते.
00  


1 comment:

  1. कर्जमाफिच्या पहिल्या टप्प्यात कर्ज माशीचा फार्म भरून सुद्धा २५% कर्जमाफीचा लाभ मिळाला नाही.


    सध्या २५००० कर्जमामाफीकरिता फार्म भरला आहे, परंतु शासनाच्या नविन धोरणाचा नुसार १,५०,००० रूपये कर्जमाफी करिता लाभार्थी होत असल्याने, भरलेला फार्म update करण्याचा प्रयत्न केला, परंतू हे होत नाही,तेव्हा १,५०,००० रूपये कर्जमाफीचा लाभ मिळविण्याकरिता काय करावं लागेल,
    कृपया मार्गदर्शन करा

    ReplyDelete