Search This Blog

Tuesday, 3 October 2017

मिशन अत्योंदय आणि कौशल्य रथाव्दारे विकास गंगा आपल्या दारी : अशोक सिरसे, अति.मुख्य कार्यकारी अधिकारी

चंद्रपूर दि.03 ऑक्टोंबर- राज्यात 1 ऑक्टोंबर ते 15 ऑक्टोंबर 2017 पर्यंत मिशन अंत्योदय अंतर्गत जिल्हातील 157 ग्राम पंचायतीमध्ये पथदर्थी ग्राम समृध्दी व स्वच्छता पंधरवडा राबविण्यात येत आहे. पंधरवडयामध्ये जिल्हयातील सर्व गावांमध्ये विविध स्वच्छतेच्या कार्यक्रमाचा जागर होत आहे. यामुळे या पंधरवडयात लोकांचा ग्रामसभेत सहभाग व गांवाचा विकास आराखडा तयार करणे, स्वच्छता विषयी जनजागृती, प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत घरकुलाच्या कामास सुरवात करणे आणि विविध योजनेची जाणीव जागृती करण्याकरीता कौशल्य रथासह कलापथकाची सोबत असल्याने लोकांच्या सहभागाने विकासाची गंगा आपल्या दारी आलेली आहे. तीचे स्वागत उत्स्फुर्तपणे करण्याचे आवाहन अतिरीक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अशोक सिरसे  यांनी आज कौशल्य रथाचे स्वागत करतांना केले. यावेळी जिल्हा आरोग्य अधिकारी श्रीराम गोगुलवार, गोंडपिंपरीचे गटविकास अधिकारी यशवंत मोहितकर, सहाय्यक गटविकास अधिकारी श्रीमती आशा ढवळे, जिल्हा अभियान व्यवस्थापक सचिन देशमुख यांच्या उपस्थित कौशल्य रथाला हिरवी झेंडी दाखवून कार्यक्रमाचे उद्घाटन केले.
मिशन अंत्योदय अंतर्गत 157 ग्रामपंचायतीमध्ये पायाभुत सर्वेक्षणाचे काम दिनांक 1 ऑक्टोंबर ते 15 ऑक्टोंबर या कालावधीत करण्यात येणार आहे. यामध्ये गावातील विविध संसाधने आणि विकास आराखडा तयार करण्याच्या दृष्टीने आवश्यक माहितीची नोंद ‘समृध्द ग्राम’ ह्या ॲप्लीकेशनवर ऑनलाईन पध्दतीने घेण्यात येणार आहे. सर्वेक्षण गावातील महिला बचत गटातील CRP, ग्राम रोजगार सेवक व एक महाविद्यालयीन विद्यार्थी या चमुमार्फत करण्यात येणार आहे. वरील सर्व चमूंचे प्रशिक्षण तालुका स्तरावर घेण्यात येणार आहे. सन 2011 च्या जनगणनेनुसार गावाला आवश्यक सुविधा या माध्यमातुन उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न आहे. गावातील सर्वेक्षणातून प्राप्त माहितीचे संकलन झाल्यानंतर ग्राम पंचायतीच्या मासिक सभेमध्ये सदर माहितीचे प्रमाणीकरण करून मगच संकलीत माहिती ॲपवर अंतिम ऑनलाईन भरण्याची प्रक्रिया पूर्ण केली जाणार आहे.
स्वच्छता पंधरवडा जिल्हातील सर्वच ग्राम पंचायतीमध्ये राबविण्यात येत असून या अंतर्गत ग्रामपंचायतीच्या कामाचे नियोजन व माहिती भरण्यासाठी स्वतंत्र “स्वच्छता ॲप” तयार करण्यात येणार आहे. याकरीता शासनाने तालुकास्तरावर गट विकास अधिकारी यांना नोडल अधिकारी म्हणून नेमणूक केलेली आहे.
कौशल्य रथाच्या उद्घाटन कार्यक्रमाचे संचालन सांख्येकी विस्तार अधिकारी पी.डब्लु.पाल व प्रास्ताविक जिल्हा अभियान व्यवस्थापन सचिन देशमुख यांनी केले. कार्यक्रमाला जिल्हातील बचत गटातील सर्वच भागातील महिला मोठया संख्येने उपस्थित होत्या.

000

No comments:

Post a Comment