Search This Blog

Wednesday, 4 October 2017

दुसऱ्याला मदतीचा हात देणारा विद्यार्थी घडावा - सुधीर मुनगंटीवार



6 व्या वर्धापन दिनी मुलांचे व मुलींच्या वसतीगृहाचे उद्घाटन संपन्न
गडचिरोली दि.4:- चंद्रपूर- गडचिरोली   जिल्हयातील युवक कोणत्याही क्षेत्रात यशस्वी होईल अशी क्षमता असलेला युवक. त्याला संधी मिळाली तर एकलव्यासारखी  कामगिरी केल्याशिवाय रहाणार नाही. याकरीताच  या दोन जिल्हयासाठी स्वतंत्र गोंडवाना विद्यापीठाची निर्मिती  करण्यात आली.   या विद्यापीठातुन मदत मागणारा  विद्यार्थी न घडता दुसऱ्याला मदतीचा हात देणारा विद्यार्थी घडावा, असे प्रतिपादन राज्याचे वित्त, वने व नियोजन मंत्री सुधीर मुनगंटीवार  यांनी आज येथे केले.
6 व्या वर्धापन दिन सोहळयाचे  औचित्य साधून विद्यापीठ परिसरातील मुलांचे व मुलींचे वसतीगृहाचे उद्घाटन प्रसंगी  ते बोलत होते.
यावेळी राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण, शालेय शिक्षण, मराठी भाषा मंत्री विनोद तावडे  मुलींच्या वसतीगृहाचे उद्घाटक म्हणून उपस्थित होते. तर मुलांच्या वसतीगृहाचे उद्घाटक म्हणून राज्याचे वित्त, वन व नियोजन मंत्री सुधीर मुनंगटीवार उपस्थित होते. तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून कुलगुरु डॉ. एन. व्ही. कल्याणकर  होते.  प्रमुख उपस्थितीत प्र. कुलगुरु डॉ. चंद्रशेखर भुसारी हे होते.  या कार्यक्रमात विशेष अतिथी म्हणून पालकमंत्री राजे अम्ब्रीशराव आत्राम होते.  
याप्रसंगी विशेष उपस्थिती  खासदार अशोक नेते, जिल्हा परिषद अध्यक्षा योगिता भांडेकर, आमदार डॉ. देवराव होळी, आमदार कृष्णा गजबे, जिल्हाधिकारी ए.एस.आर. नायक, नगराध्यक्षा योगिता पिपरे, डॉ. विकास आमटे, कुलसचिव जुनघरे हे प्रामुख्याने उपस्थित होते.
पुढे बोलताना मुनगंटीवार म्हणाले की, या विद्यापीठाच्या निर्मितीसाठी  सर्व आयुधांचा वापर करुन  गोंडवाना विद्यापीठाची गडचिरोली येथे  आदिवासी बहूल जिल्हयात  स्थापना करण्यात आली.  येथे जंगल, पाणी , जमीन, खनिज   विपुल प्रमाणात आहे.  या  सर्व बाबींचा अभ्यास करुन  येथील युवकांना  या विद्यापीठानी  रोजगाराभिमूख, उद्योपती, कुशल कारागिर कसा बनेल याचा विचार करुन  अभ्यासक्रम राबवावा अशी  सुचना यावेळी त्यांनी केली.  आता ज्ञान संपादन करण्याची व्याख्या बदलली आहे.  तेव्हा  विविधांगी अभ्यासक्रमातून  असा विद्यार्थी तयार करा की जेणे करुन  या विद्यापीठाच्या अनुरोधाने शासनाचे उत्पन्न वाढेल असे ते म्हणाले.
शालेय शिक्षण मंत्री विनोद तावडे उद्घाटनपर भाषणात म्हणाले की,  विद्यापीठाच्या पायाभूत सुविधा करण्यासाठी  संपुर्ण शक्ती खर्च करुन येथील कामे  करण्यात येतील.  लवकर राज्यपाल विद्यासागर राव यांनी यासंदर्भात बैठक  आयोजित करीत आहेत. या बैठकीत विचार विनिमय करुन , सर्व स्तरावर पाठपुरावा करुन  तातडीने 200 एकर जमीन खरेदी  करण्याची व्यवस्था करण्यात येत आहे.   विद्यापीठात  सर्वंकष अभ्यासक्रमासोबतच  बांबुवर आधारीत प्रकल्प, आयुर्वेद, लोककला यावर आधारीत पदवी अभ्यासक्रम  सुरु करण्याचा   प्रयत्न करावा. तसेच कुशल खेळाडू तयार करण्यासाठीसुध्दा अभ्यासक्रमात  सिल्याबस तयार करण्याच्या सुचनाही यावेळी त्यांनी केल्या
याप्रसंगी  विद्यापीठातर्फे  सुप्रसिध्द समाजसेवक  डॉ. विकास बाबा आमटे यांना जीवन साधना गौरव पुरस्कार अध्यक्ष, प्रमख अतिथी, विशेष अतिथी यांच्या हस्ते प्रदान करुन  सन्मानीत करण्यात आले. शाल, श्रीफळ, मानपत्र, सन्मानचिन्ह व पुरस्कार राशी धनादेश रुपये 25 हजार  देऊन गौरव करण्यात आला.
तसेच  सरदार पटेल महाविद्यालय, चंद्रपूरला  उत्कृष्ट महाविद्यालय पुरस्कार, प्राचार्य डॉ. नामदेव एस. कोकोडे यांचा उत्कृष्ट प्राचार्य पुरस्कार, शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय चंद्रपूर येथील डॉ. सुधीर आकोजवार  यांना उत्कृष्ट शिक्षक पुरस्कार, असिस्टंट प्रोगामर प्रमोद किसन बोरकर यांना  उत्कृष्ट विद्यापीठ अधिकारी पुरस्कार,  निवड श्रेणी लिपीक विपीन कालीदास राऊत  यांना उत्कृष्ट विद्यापीठ कर्मचारी पुरस्कार, संजय पिरु राठोड यांना उत्कृष्ट विद्यापीठ कर्मचारी पुरस्कार,  शिवाजी महाविद्यालयाचे  संजय नामदेव संतोषवार यांना उत्कृष्ट कर्मचारी पुरस्कार,  कुणाल बाबा खणके  यांना उत्कृष्ट विद्यार्थी पुरस्कार, कुमारी जयश्री प्रभाकर नाकाडे हिला उत्कृष्ट विद्यार्थीनी पुरस्कार प्रदान करुन यावेळी गौरविण्यात आले.
कुलगुरु डॉ. एन.व्ही. कल्याणकर यांनी   प्रास्ताविक करतांना विद्यापिठानी या सहा वर्षात केलेल्या कामाची  तसेच पुढील नियोजनाची माहिती दिली.
कार्यक्रमाचे संचलन प्राध्यापक नरेंद्र आरेकर यांनी केले तर आभार  कुलसचिव दिपक एस. जुनघरे यांनी मानले.

******

No comments:

Post a Comment