Search This Blog

Monday 9 April 2018

मुद्रा बँकेचे कर्ज वाटप करतांना येणा-या प्रत्येक अर्जाची नोंद ठेवा लघु उद्योग वाढविण्यासाठी बँकांनी पतपुरवठयात पुढे यावे - ना.अहीर


चंद्रपूर, दि.9 एप्रिल- प्रधानमंत्री मुद्रा बँक योजना, महाराष्ट्र जीवनोन्नती अभियान, खरीप कर्ज वाटप व विविध योजनातून जिल्हयातील बँका, विविध मंडळे यांच्याकडून होत असलेल्या पतपुरवठा व त्यावर आधारीत राज्य व केंद्राच्या विविध योजनांचा आढावा केंद्रीय गृहराज्यमंत्री ना.हंसराज अहीर यांनी आज घेतला.
            या बैठकीला आमदार नाना शामकुळे, जिल्हाधिकारी आशुतोष सलिल, मनपा आयुक्त संजय काकडे, जिल्हा अग्रणी बँकेचे महाव्यवस्थापक एस.एन.झा व जिल्हयातील सर्व बँकाचे प्रमुख उपस्थित होते. यावेळी तालुकानिहाय बँकाचा आढावा घेण्यात आला. मुद्रा बँक योजनेच्या संदर्भात घेण्यात आलेला आढावा. यावर्षी मार्च अखरेपर्यंत 147.52 कोटी रुपयांचे कर्ज या योजनेअंतर्गत देण्यात आले आहे. या कर्जासाठी जिल्हाभरातून 17 हजार 510 लोकांनी अर्ज दाखल केले होते. लोकप्रतिनिधींकडे या योजनेसंदर्भात अनेक तक्रारी आल्या असून स्वत: प्रधानमंत्री या योजनेबाबत अतिशय सकारात्मक असून बँकानी पतपुरवठा करतांना विनाकारण अटी व शर्ती घालू नये. कर्ज घेणा-या नागरिकांनी देखील अल्पदरातील कर्ज व्यवसाय सुरु करताच परत करावे. अन्य लोकांना देखील त्याचा फायदा मिळेल, असे सांगितले. यावेळी काही तक्रारींचा त्यांनी उल्लेख केला.  जिल्हयातील सुशिक्षीत तरुणांना बँकेने कर्ज देण्यास बँक उत्सुक नसल्याचे तक्रारी काही ठिकाणावरुन आल्या आहेत. तर काही ठिकाणी कोटा पूर्ण झाला, गॅरंटर हवा अशा चुकीच्या सबबीवर कर्ज देण्यास नकार दिल्याचे आढळून आले. मात्र हंसराज अहीर यांनी आज सर्व बँकेच्या अधिका-यांना तरुणांना बँकेतून परत पाठवू नका, कोणत्याही कारणासाठी मुद्रा बँक योजनेतून कर्ज नाकारु नका, पतपुरवठा करण्यासाठी कोणतीही अट नसून प्रत्येकाला कर्ज देता येईल, अशा पध्दतीने बँकेने तरुणांना मदत करावी, असे आवाहन केले.  तसेच उपजिवीका विकास योजनेअंतर्गत सुरु असलेल्या व्यवसायाचा आढावा त्यांनी घेतला. त्याचप्रमाणे जिवनोन्नती अभियानाअंतर्गत स्वंय सहायता समुहाच्या माध्यमातून राबविण्यात येत असलेल्या लघु उद्योगाची माहिती त्यांनी यावेळी जाणून घेतली.
पीक कर्जाचा आढावा
यावेळी जिल्हयातील सर्व बँकांना पीक कर्ज वाटपाबाबत सूचना त्यांनी केली. कर्ज वाटपाच्या यशस्वी मोहीमेनंतर यावर्षीच्या पीक कर्ज वाटपाच्या हयगय होऊ देवू नये, याबद्दल त्यांनी काळजी घ्यायला सांगितली. सन 2018-19 या वर्षाच्या खरीप व रब्बी हंगामासाठी जिल्हास्तरीय समितीने मान्यता दिल्यानुसार राष्ट्रीयकृत बँका व जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक मिळून चंद्रपूर जिल्हयाचा पीककर्जाचा 1036.26 कोटी रुपयांचे उद्दिष्ट  निश्चित केले आहे. सदर उद्दिष्ट सर्व बँकांना कळविण्यात आले असून बँकनिहाय पीककर्ज वाटपाची सूचना सर्व बँकांना देण्यात आली आहे.  बँकानी शेतक-यांना कर्ज वाटप करतांना हयगय करु नये, असेही त्यांनी सांगितले.                                       
0000

डॉ.बाबासाहेब आंबेडकरावरील विशेष लोकराज्य अंकाचे प्रकाशन


चंद्रपूर, दि.9 एप्रिल- एप्रिल 2018 चा लोकराज्य अंक महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्यकर्तृत्वाचा गौरव करणारा अंक आहे. यामध्ये त्यांच्या व्यक्तिमहत्वाच्या विविध पैलूंना उलगडणारे लेख घेण्यात आले असून याशिवाय या अंकामध्ये 2018 च्या अर्थसंकल्पावरील विश्लेषन घेण्यात आले आहे. राज्याचे वित्त, नियोजन व वनमंत्री तथा चंद्रपूरचे पालकमंत्री ना.सुधीर मुनगंटीवार, केंद्रीय गृहराज्यमंत्री ना.हंसराज अहीर, राज्याचे आदिवासी विकास मंत्री विष्णू सावरा यांनी चंद्रपूरमध्ये आयोजित वेगवेगळया कार्यक्रमात लोकराज्याच्या एप्रिल महिन्याच्या अंकाचे प्रकाशन करण्यात आले.
            यावेळी राज्य शासनाने गेल्या काही वर्षात भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या संदर्भातील साहित्याला माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या लोकराज्यमार्फत जनतेपर्यंत पोहचविण्याचे कार्य केले आहे. यामधील दर्जेदार व माहितीपूर्ण लेख वाचणीय असल्याचे त्यांनी सांगितले. अर्थसंकल्पावरील आपली मुलाखत अर्थसंकल्पाचे धेय्य आणि उद्दिष्ट मांडणारी असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. स्थानिक लोकप्रतिनिधी मार्फत प्रकाशन करण्याच्या मोहिमेचे देखील त्यांनी कौतुक केले. बांबू संशोधन व प्रशिक्षण केंद्राच्या व महिला बचत गटांच्या कार्यक्रमामध्ये रविवारी या अंकाचे त्यांनी प्रकाशन केले.
            एप्रिलच्या लोकराज्य अंकामध्ये बाबासाहेबांवरील विविध मान्यवरांनी लिहीलेले लेख असून यामध्ये सामाजिक न्याय मंत्री राजकुमार बडोले, सामाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळे, डॉ.जयसिंगराव पवार, डॉ.शैलेद्र लेंडे, अविनाश चौगुले, डॉ.जी.एस. कांबळे, डॉ.संभाजी खराट, मिलींद मानकर, प्रा.म.सु.पगारे, दत्ता गायकवाड, डॉ.अक्रम पठाण, प्रा.नागसेन ताकसांडे, डॉ.बबन जोगदंड, डॉ.विजय खरे, विष्णु काकडे, यशवंत भंडारे आदींचे विविध विषयांवरील लेख आहेत. हा अंक सर्वत्र उपलब्ध असून जिल्हा माहिती कार्यालयातही विक्रीसाठी उपलब्ध आहे. राज्याचे वित्त व नियोजन मंत्री ना.सुधीर मुनगंटीवार यांनी काल या अंकाचे चंद्रपूर येथे प्रकाशन केले. या अंकामध्ये बाबासाहेबांच्या विविध लेखासोबतच अर्थसंकल्पावर ना.मुनगंटीवार यांची विशेष मुलाखत आहे. चंद्रपूर दौ-यावर असणारे राज्याचे आदिवासी विकास मंत्री विष्णू सावरा हे आदिवासी आश्रम शाळेच्या विद्यार्थ्यांना शुभेच्छा देण्यासाठी चंद्रपूरला आले होते. कार्यक्रमापूर्वी त्यांनी या अंकाचे कौतुक केले. आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांना एव्हरेस्ट मोहीमेसाठी पाठवून राज्य शासन सामाजिक समता सप्ताहमध्ये मोलाचे काम करीत असल्याचे त्यांनी सांगितले. सर्वांना संधी, सर्वांना न्याय मिळावा यासाठी बाबासाहेबांनी आयुष्य वेचले. हा कार्यक्रम सामाजिक न्यायाप्रती बांधिलकी जोपासण्याचा असल्याचे त्यांनी सांगितले.
केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांनी देखील लोकराज्याच्या नव्या अंकाचे स्वागत केले आहे. डॉ.बाबासाहेबांचे चरित्र्य हे कायम प्रेरणादायी असून राज्य शासनाने लोकराज्याच्या माध्यमातून बाबासाहेबांच्या व्यक्तिमहत्वाच्या विविध पैलूंना उजागर केले आहे. नव्या पिढीसाठी हे साहित्य प्रेरणादायी असून यासाठी माहिती व जनसंपर्क विभागाचे त्यांनी कौतुक केले.
00

बांबू उद्योगाचे प्रमुख केंद्र म्हणून चंद्रपूरची ओळख बनवा - ना.मुनगंटीवार




बीआरटीसीच्या प्रदर्शनी व विक्री केंद्राचे उदघाटन

चंद्रपूर, दि.8 एप्रिल- चंद्रपूरच्या बांबू संशोधन व प्रशिक्षण केंद्राने (बीआरटीसीगेल्‍या दोन वर्षात अतिशय गतीने कामे सुरु केली आहे. बांबूपासून विविध वस्तू तयार करण्याच्या कार्यशाळा तसेच प्रशिक्षण शिबीर या माध्यमातून मोठा प्रशिक्षीत वर्ग जिल्हयात तयार होत असून रोजगार युक्त जिल्हयाकडे आम्ही वाटचाल करीत आहोत. भविष्यात बांबूपासून वस्तू बनविणारे शहर म्हणून चंद्रपूरची ओळख निर्माण करा, असे आवाहन राज्याचे वित्त, नियोजन व वनमंत्री तथा पालकमंत्री ना.सुधीर मुनगंटीवार यांनी आज येथे केले.
बांबू संशोधन व प्रशिक्षण केंद्राच्या मुख्य वनसरंक्षक कार्यालयाजवळील वन धन जन धन वस्तू विक्री केंद्राच्या अत्याधुनिक दालनाचे त्यांनी आज उदघाटन केले. कुठल्याही अद्ययावत विक्री केंद्राला शोभेल अशा या केंद्रामध्ये बांबूपासून तयार करण्यात आलेल्या विविध आकर्षक वस्तू ठेवण्यात आल्या आहेत. यामध्ये तिरंगा, बांबूपासून सायकल, तलवार, समई, आकाश दिवा तसेच अनेक शोभेच्या वस्तू या ठिकाणी विक्री व प्रदर्शनीसाठी मांडण्यात आल्या आहेत. चंद्रपूरमध्ये येणा-या पर्यटक आणि पाहुण्यांना चंद्रपूरचे वैशिष्टय व वेगळेपणा दाखविण्यासाठी हे केंद्र आकर्षण ठरणार आहे. बांबूपासून बनलेल्या अभिनव भेट वस्तूंनी हे केंद्र सज्ज आहे. या केद्राचे उदघाटन आज ना.सुधीर मुनगंटीवार यानी केले. यावेळी आदिवासी विकास मंत्री विष्णू सावरा उपस्थित होते. ना.सावरा यांना यावेळी ना.मुनगंटीवार यांनी कलाकुसरेचा टेबल लॅम्प त्यांना भेट म्हणून दिला.
यानंतर रेंजर कॉलेज भागातील बांबू हॅन्डीक्राफ्ट ॲड आर्ट युनिट (भाऊ) या निर्मिती आणि सामुहिक उपयोगिता केंद्राचे उदघाटन करण्यात आले. या ठिकाणी बांबूपासून विविध वस्तू बनविण्यासाठी आवश्यक असणा-या आधुनिक मशिन लावण्यात आल्या आहेत. मोठया प्रमाणात महिला बचत गटांना या ठिकाणी प्रशिक्षण दिल्या जात असून जिल्हयात चंद्रपूरनंतर विसापूर, मूल, पोंभूर्णा, जिवती, नागभिड, चिमूर या भागात सामुहिक उपयोगिता केंद्र लवकरच निर्माण होणार आहे. त्यामुळे जिल्हाभर प्रशिक्षण व निर्मितीचे वातावरण निर्माण होत आहे.
आज रेंजर कॉलेज परिसरात एका कार्यक्रमात महिला बचत गटांच्या शेकडो महिलांपुढे या दोन्ही उपक्रमाच्या उदघाटनाची घोषणा केल्यानंतर पालकमंत्र्यांनी चंद्रपूरला बांबूपासून वस्तू निर्मिती केंद्राचे प्रमुख शहर बनविण्याचे आवाहन महिलांना केले. जिल्हा उद्योग युक्त बनविण्याचा आपला संकल्प असून या ठिकाणी तयार होणा-या बांबूपासूनच्या विविध वस्तू विक्री क्षेत्रातल्या दिग्गज कंपन्यामार्फत वितरीत व्हाव्यात त्यासाठी आपले प्रयत्न सुरु असल्याचे त्यांनी सांगितले. अगरबत्तीच्या उद्योगासाठी चंद्रपूर हे महत्वाचे केंद्र नजिकच्या काळात बनणार असून देशात आयात होणारी अगरबत्ती हद्दपार होऊन त्या ठिकाणी चंद्रपूरमध्ये तयार झालेल्या अगरबत्तीचा वापर जनता लवकरच करेल, असे त्यांनी सांगितले. बांबू प्रशिक्षण केंद्रातील तिरंगा प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या कार्यालयात पोहचला आहे. राज्याच्या मंत्रीमंडळातील सर्व सदस्यांना समई भेट देण्यात आली आहे. महानायक अमिताभ बच्चन यांच्या घरी देखील बीआरटीसी मध्ये तयार झालेली समई पोहचली आहे. त्यामुळे येणा-या काळात महिला बचत गटांना मोठया प्रमाणात काम मिळणार असून त्यासाठी विशेष प्रयत्न केले जात असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी बीआरटीसीचे संचालक राहूल पाटील व महिला आर्थिक विकास मंडळाचे जिल्हा समन्वयक नरेश उगेमुगे यांच्यामध्ये सामज्यस्य करारावर स्वाक्षरी झाली. या माध्यमातून 1 हजार महिलांना प्रशिक्षण दिले जणार आहे.
या दोन्ही कार्यक्रमाला आमदार नाना शामकुळे, आमदार ॲड.संजय धोटे, महापौर अंजली घोटेकर, बल्लारपूरचे नगराध्यक्ष हरीष शर्मा, मनपा सभापती राहूल पावडे, पोभूर्णाच्या सभापती अल्का आत्राम, मुख्य वनसंरक्षक विजय शेळके, बांबू प्रशिक्षण केंद्राचे संचालक राहूल पाटील, वनअकादमी संचालक अशोक खडसे, विभागीय वनअधिकारी अशोक सोनकुसरे आदींची उपस्थिती होती.

                                                  000  

केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांनी आदिवासी विद्यार्थ्यांना राष्ट्रपतीच्या भेटीचे आमंत्रण


मोहिम फत्ते झाल्यावर दिल्लीत कार्यक्रमाच्या आयोजनाचे आश्वासन

      चंद्रपूर, दि.8 एप्रिल- चंद्रपूरच्या विविध आश्रम शाळेतील 10 विद्यार्थी एव्हरेस्ट शिखरावर स्वारी करण्यासाठी सिध्द झाले आहेत. या 10 विद्यार्थ्यांची केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांनी आज सकाळी विश्रामगृहावर भेट घेतली. त्यांना मोहीम फत्ते झाल्यानंतर राष्ट्रपतींची नवी दिल्ली येथे भेट घालून देण्यात येणार असल्याचे सांगितले.
चंद्रपूरच्या बोर्डा, देवाडा व जिवती या तीन आश्रमशाळेतील 10 आदिवासी विद्यार्थी 10 एप्रिलपासून हिमालयाच्या पायथ्याशी असणा-या बेस कॅम्पवरुन महिनाभराच्या एव्हरेस्ट मोहिमेला सुरुवात करणार आहेत. एक वर्षाच्या सात टप्यातील प्रशिक्षणानंतर ही मुले गिर्यारोहण मोहिमेसाठी सिध्द झाली आहे.  या मोहिमेवर आश्रम शाळेतील आकाश चिन्नु मडावी, शुंभम रविंद्र पेंदोर, छाया सुरेश आत्राम, इंदू भाऊराव कन्नाके, कविदास पांडूरंग काटमोडे, मनिषा धर्मा धुर्वे, प्रमेश शिताराम आडे, आकाश मलाका आत्राम, उमाकांत सुरेश मडावी, विकास महादेव सोयाम हे विद्यार्थी जाणार आहेत. आज चंद्रपूरच्या प्रियदर्शिनी सभागृहामध्ये चंद्रपूर जिल्हा प्रशासनाच्या वतीने त्यांना शुभेच्छा देण्याच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. पूर्व नियोजित कार्यक्रमामुळे या कार्यक्रमाला उपस्थित राहू शकत नसलेले केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांनी सकाळीच मुलांची भेट घेतली. त्यांना भेट वस्तू देऊन त्यांचा सत्कार केला. त्यांना एव्हरेस्ट मोहिमेसाठी शुभेच्छा दिल्या. तसेच त्यांच्यासोबत अर्धा तास चर्चा केली. यावेळी महापौर अंजली घोटेकर, जिल्हाधिकारी आशुतोष सलिल, गोंदिया जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजा दयानिधी, प्रकल्प अधिकारी केशव बावनकर, अपर जिल्हा पोलीस अधीक्षक हेमराजसिंह राजपूत, प्रशिक्षक बिमला देवसकर, उपमहापौर अनिल फुलझेले आदी उपस्थित होते.
                                                    000  

प्रतिकूलतेवर मात करण्याची आदिवासींची उपजत ताकद; एव्हरेस्ट सर करेल : विष्णू सावरा




चांदाचे एकलव्य एव्हरेस्टवर महाराष्ट्राचा झेंडा चढवतील- ना.मुनगंटीवार
चंद्रपूरने अनुभवला आदिवासी मुलांना शुभेच्छा देणारा भावनिक सोहळा

       चंद्रपूर, दि.08 एप्रिल  कठोर परिश्रमाला यशाचा सुंगध असतो आणि उपजत गुणवत्तेला संधी मिळाली की आकाश मोकळे होते,  हा संदेश देणारा एक हृदयस्पर्शी सोहळा चंद्रपूरच्या जनतेने आज अनुभवला. जिल्हयातील  आदिवासी शाळेतील 10 विद्यार्थ्यांनी वर्षभर चाललेल्या खडतर आणि कठीण प्रशिक्षणानंतर एव्हरेस्ट सर करण्याचा संकल्प सोडला. महाराष्ट्राच्या मंत्री मंडळातील दोन दिग्गज मंत्र्यांनी त्यांच्या पाठीवर यशस्वी व्हा ! अशी प्रेमाची थाप दिली आणि यासोबतच प्रवास सुरु झाला गडचांदा ते एव्हरेस्टचा !   
            चंद्रपूरच्या बोर्डा, देवाडा व जिवती या तीन आश्रमशाळेतील 10 आदिवासी विद्यार्थी 10 एप्रिलपासून हिमालयाच्या पायथ्याशी असणा-या बेस कॅम्पवरुन महिनाभराच्या एव्हरेस्ट मोहिमेला सुरुवात करणार आहेत. एक वर्षाच्या सात टप्यातील प्रशिक्षणानंतर ही मुले गिर्यारोहण मोहिमेसाठी सिध्द झाली आहे. आज चंद्रपूरमध्ये खचाखच भरलेल्या प्रियदर्शिनी सभागृहामध्ये या विद्यार्थ्यांना शुभेच्छा देण्यात आल्या. या मोहिमेवर आश्रम शाळेतील आकाश चिन्नु मडावी, शुंभम रविंद्र पेंदोर, छाया सुरेश आत्राम, इंदू भाऊराव कन्नाके, कविदास पांडूरंग काटमोडे, मनिषा धर्मा धुर्वे, प्रमेश शितारामआडे, आकाश मलाका आत्राम, उमाकांत सुरेश मडावी, विकास महादेव सोयाम हे विद्यार्थी जाणार आहेत,राज्याचे वित्त, नियोजन व वनमंत्री तथा पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार, राज्याचे आदिवासी विकास मंत्री विष्णू सावरा, आदिवासी विकास विभागाच्या प्रधान सचिव मनिषा वर्मा, प्रशिक्षक विमला नेगी देवसकर, जिल्हाधिकारी आशुतोष सलिल, या प्रकल्पासाठी सुरुवातीपासून परिश्रम घेणारे सद्याचे गोदिंया जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजा दयानिधी आदींच्या प्रोत्साहनपर शब्दानंतर या 10 आदिवासी विद्यार्थ्यांच्या हातात चंद्रपूरचा झेंडा दिला गेला. त्यावेळी अवघ्या सभागृहाने टाळयांचा कडकडाट करीत या मुलांना शुभेच्छा दिल्यात. यावेळी व्यासपिठावर चंद्रपूर शहराच्या महापौर अंजली घोटेकर, आमदार नाना शामकुळे, आमदार संजय धोटे, जिल्हा पोलीस अधीक्षक नियती ठाकर, मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र पापळकर, आदिवासी विभागाच्या अप्पर आयुक्त माधवी खोडे, प्रकल्प अधिकारी केशव बावनकर, अपर जिल्हा पोलीस अधीक्षक हेमराजसिंह राजपूत आदी उपस्थित होते.
            या कार्यक्रमात आदिवासी मुलांनी गेल्या वर्षभरात केलेल्या खडतर परिश्रमाची चित्रफित दाखविण्यात आली. काही मिनीटांच्या या चित्रफितीने मुलांच्या साहसाची कल्पना आली. सोबतच एव्हरेस्ट चढून जाणे हे किती कठीण काम आहे. त्यासाठी लागणारी चिकाटी, जिद्द आणि पैसा याचीही सभागृहातील उपस्थितांना कल्पना आली. यावेळी महाराष्ट्राचा झेंडा खांदयावर घेऊन मुलांना एव्हरेस्ट सर करण्यासाठी परवानगी देणा-या आदिवासी मुलांच्या आई वडीलांचा सत्कार करण्यात आला. 10 मुलांपैकी दोघांनी यावेळी आपले मनोगत व्यक्त केले. त्यांच्या मनोगतातील आत्मविश्वास त्यांच्या यशाची खात्री देत होता. पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी या 10 मुलांसाठी शुभेच्छा गिफ्ट म्हणून टॅब वितरीत केले.
यावेळी संबोधित करतांना पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार म्हणाले, जगातल्या सर्वात कठीण असणा-या गिर्यारोहण मोहीमेसाठी एव्हरेस्टचे नाव घेतल्या जाते. कधी शाळेत असतांना एव्हरेस्टच्या पराक्रमाचे संदर्भ वाचनात आले होते. आज एव्हरेस्टवर चढाई करणा-या मुलांसोबत व्यासपिठावर उपस्थित राहणे अभिमानाचे वाटते. यावेळी त्यांनी मुलांच्या या जिद्दीला सलाम करण्यासाठी संपूर्ण सभागृहालाच उभे राहून टाळयांचा कडकडाट करण्याचे आवाहन केले. आदिवासी मुले जेव्हा एव्हरेस्ट सर करुन येतील तेव्हा पंतप्रधानांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्याचा प्रयत्न करु असे सूतोवाच करताच हा आवाज टिपेला पोहचला. त्यांनी यावेळी आदिवासी विकास मंत्री विष्णू सावरा यांना या भागातील आदिवासीं बांधवाच्या सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक घोडदौडीची आढावा दिला. जिल्हयात सुरु असलेल्या विकास कामांचीही माहिती दिली. याशिवाय खोज, हॅलो चांदा अशा वेगळया उपक्रमांचीही माहिती दिली.  हा जिल्हा एकलव्यांचा असून जिद्दी, काटक असणा-या या आदिवासी मुलांकडून एव्हरेस्ट   सर केला जाईल, असे हीरे चंद्रपूरच्या सारख्या कोळश्याच्या खाणीत तयार होतात. ही 10 मुले म्हणजे आमचे कोहीनूर असून चंद्रपूरचा, महाराष्ट्राचा झेंडा निश्चितच एव्हरेस्टवर फडकवतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. सोबतच या मुलांना तुम्ही मोहिम फत्ते करुन या  तुम्हाला पोलीस विभागातील सेवा देण्यासाठी प्रयत्न करु, असे आश्वासनही त्यांनी दिले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून बोलतांना आदिवासी विकास मंत्री विष्णू सावरा यांनी आदिवासींनी जगाच्या स्पर्धेत उतरण्याची परिस्थिती सद्या निर्माण झाली आहे. मुळप्रवाहात येण्यासाठी एव्हरेस्टसारखे प्रकल्प पतदर्शी ठरतात. आदिवासींमध्ये उपजतच काटकता, जिद्द, चिकाटी असते. प्रतिकुल परिस्थितून जिवन जगत आमच्या पिढया न पिढया पुढे आल्या आहेत. कष्ट अडथळे येतीलच, मात्र इच्छा आहे ते तिथे मार्ग असतो. तुम्ही कठोर परिश्रम घेतले आहे. त्यामुळे तुमचा विजय निश्चित आहे, अशा शुभकामना दिल्या.  
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रधान सचिव मनिषा शर्मा यांनी केले. एव्हरेस्ट हे खडतर परिश्रमाचे प्रतिम म्हणून ओळखले जाते. आदिवासी मुलांमध्ये प्रचंड क्षमता, गुणवत्ता असून त्यांना संधी मिळाली तर एव्हरेस्ट सुध्दा सर करु शकतात. हे आम्हाला समाजाला सांगायचे आहे. ही मुले आदिवासी समाजाचे नवे रोल मॉडल म्हणून पुढे येतील, असेही त्यांनी सांगितले. या प्रकल्पावर सुरुवातीपासून काम करणारे आदिवासी विभागाचे तत्कालीन प्रकल्प अधिकारी सद्याचे गोंदिया जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजा दयानिधी यांनी या मुलांच्या सरुवातीच्या प्रवासाची मांडणी केल्याची माहिती दिली. प्रशिक्षक विमला देवसकर यांनी एव्हेरस्टस्वारी किती खडतड व कठीण असते याची माहिती दिली. मुलांनी सात टप्प्यामध्ये प्रशिक्षण घेतले असून ते निश्चित यशस्वी होतील, असे सांगितले. आमदार नाना शामकुळे यांनीही विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे संचालन हेमंत शेंडे यांनी केले तर आभार प्रदर्शन प्रकल्प अधिकारी केशव बावनकर यांनी केले.
                                                            000

जिल्हा परिषदतर्फे पाणी टंचाई कक्षाची स्थापना दूरध्वनी क्रमांक 07172-273978 वर सपंर्क करण्याचे आवाहन

चंद्रपूर,दि. 7 एप्रिल -चंद्रपूर जिल्हयातील ग्रामीण भागात ‍निर्माण होणाऱ्या पाणी टंचाईवर बाबतच्या समस्या त्वरीत निकाली काढून ग्रामीण भागातील जनतेला सुरळीत पिण्याचे पाणी उपलब्ध व्हावे.याकरिता तसेच आवश्यक उपाययोजना त्वरीत अंमलात आणता याव्यात यासाठी चंद्रपूर जिल्हा परिषदेच्या स्तरावर ग्रामीण पाणी पुरवठा विभाग जिल्हा परिषद चंद्रपूर येथे पाणी टंचाई कक्ष निर्माण करण्यात आला असून या कक्षाचा दूरध्वनी क्रमांक 07172-273978 हा आहे.त्यामुळे ग्रामीण भागात निर्माण होणाऱ्या आपल्या पाणी टंचाईच्या काही समस्या असल्यास वरील क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन ग्रामीण पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी  अभियंता  यांनी  केले आहे.
               तसेच जिल्हयातील प्रत्येक पंचायत समिती स्तरावर सुध्दा तालुका स्तरीय पाणी टंचाई कक्ष उघडण्यात आलेला आहे.त्यामुळे पाणी टंचाई संबंधाने काही तक्रारी असल्यास नागरीकांनी जिल्हा स्तरावरील किंवा पंचायत समिती स्तरावरील पाणी टंचाई कक्षाकडे सकाळी 8.00 ते रात्री 8.00 वाजेपावेतोच्या दरम्याण तक्रारी नोदवाव्यात असे जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणी पुरवठा विभागाने कळविले आहे.
0000000