Search This Blog

Monday 9 April 2018

बांबू उद्योगाचे प्रमुख केंद्र म्हणून चंद्रपूरची ओळख बनवा - ना.मुनगंटीवार




बीआरटीसीच्या प्रदर्शनी व विक्री केंद्राचे उदघाटन

चंद्रपूर, दि.8 एप्रिल- चंद्रपूरच्या बांबू संशोधन व प्रशिक्षण केंद्राने (बीआरटीसीगेल्‍या दोन वर्षात अतिशय गतीने कामे सुरु केली आहे. बांबूपासून विविध वस्तू तयार करण्याच्या कार्यशाळा तसेच प्रशिक्षण शिबीर या माध्यमातून मोठा प्रशिक्षीत वर्ग जिल्हयात तयार होत असून रोजगार युक्त जिल्हयाकडे आम्ही वाटचाल करीत आहोत. भविष्यात बांबूपासून वस्तू बनविणारे शहर म्हणून चंद्रपूरची ओळख निर्माण करा, असे आवाहन राज्याचे वित्त, नियोजन व वनमंत्री तथा पालकमंत्री ना.सुधीर मुनगंटीवार यांनी आज येथे केले.
बांबू संशोधन व प्रशिक्षण केंद्राच्या मुख्य वनसरंक्षक कार्यालयाजवळील वन धन जन धन वस्तू विक्री केंद्राच्या अत्याधुनिक दालनाचे त्यांनी आज उदघाटन केले. कुठल्याही अद्ययावत विक्री केंद्राला शोभेल अशा या केंद्रामध्ये बांबूपासून तयार करण्यात आलेल्या विविध आकर्षक वस्तू ठेवण्यात आल्या आहेत. यामध्ये तिरंगा, बांबूपासून सायकल, तलवार, समई, आकाश दिवा तसेच अनेक शोभेच्या वस्तू या ठिकाणी विक्री व प्रदर्शनीसाठी मांडण्यात आल्या आहेत. चंद्रपूरमध्ये येणा-या पर्यटक आणि पाहुण्यांना चंद्रपूरचे वैशिष्टय व वेगळेपणा दाखविण्यासाठी हे केंद्र आकर्षण ठरणार आहे. बांबूपासून बनलेल्या अभिनव भेट वस्तूंनी हे केंद्र सज्ज आहे. या केद्राचे उदघाटन आज ना.सुधीर मुनगंटीवार यानी केले. यावेळी आदिवासी विकास मंत्री विष्णू सावरा उपस्थित होते. ना.सावरा यांना यावेळी ना.मुनगंटीवार यांनी कलाकुसरेचा टेबल लॅम्प त्यांना भेट म्हणून दिला.
यानंतर रेंजर कॉलेज भागातील बांबू हॅन्डीक्राफ्ट ॲड आर्ट युनिट (भाऊ) या निर्मिती आणि सामुहिक उपयोगिता केंद्राचे उदघाटन करण्यात आले. या ठिकाणी बांबूपासून विविध वस्तू बनविण्यासाठी आवश्यक असणा-या आधुनिक मशिन लावण्यात आल्या आहेत. मोठया प्रमाणात महिला बचत गटांना या ठिकाणी प्रशिक्षण दिल्या जात असून जिल्हयात चंद्रपूरनंतर विसापूर, मूल, पोंभूर्णा, जिवती, नागभिड, चिमूर या भागात सामुहिक उपयोगिता केंद्र लवकरच निर्माण होणार आहे. त्यामुळे जिल्हाभर प्रशिक्षण व निर्मितीचे वातावरण निर्माण होत आहे.
आज रेंजर कॉलेज परिसरात एका कार्यक्रमात महिला बचत गटांच्या शेकडो महिलांपुढे या दोन्ही उपक्रमाच्या उदघाटनाची घोषणा केल्यानंतर पालकमंत्र्यांनी चंद्रपूरला बांबूपासून वस्तू निर्मिती केंद्राचे प्रमुख शहर बनविण्याचे आवाहन महिलांना केले. जिल्हा उद्योग युक्त बनविण्याचा आपला संकल्प असून या ठिकाणी तयार होणा-या बांबूपासूनच्या विविध वस्तू विक्री क्षेत्रातल्या दिग्गज कंपन्यामार्फत वितरीत व्हाव्यात त्यासाठी आपले प्रयत्न सुरु असल्याचे त्यांनी सांगितले. अगरबत्तीच्या उद्योगासाठी चंद्रपूर हे महत्वाचे केंद्र नजिकच्या काळात बनणार असून देशात आयात होणारी अगरबत्ती हद्दपार होऊन त्या ठिकाणी चंद्रपूरमध्ये तयार झालेल्या अगरबत्तीचा वापर जनता लवकरच करेल, असे त्यांनी सांगितले. बांबू प्रशिक्षण केंद्रातील तिरंगा प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या कार्यालयात पोहचला आहे. राज्याच्या मंत्रीमंडळातील सर्व सदस्यांना समई भेट देण्यात आली आहे. महानायक अमिताभ बच्चन यांच्या घरी देखील बीआरटीसी मध्ये तयार झालेली समई पोहचली आहे. त्यामुळे येणा-या काळात महिला बचत गटांना मोठया प्रमाणात काम मिळणार असून त्यासाठी विशेष प्रयत्न केले जात असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी बीआरटीसीचे संचालक राहूल पाटील व महिला आर्थिक विकास मंडळाचे जिल्हा समन्वयक नरेश उगेमुगे यांच्यामध्ये सामज्यस्य करारावर स्वाक्षरी झाली. या माध्यमातून 1 हजार महिलांना प्रशिक्षण दिले जणार आहे.
या दोन्ही कार्यक्रमाला आमदार नाना शामकुळे, आमदार ॲड.संजय धोटे, महापौर अंजली घोटेकर, बल्लारपूरचे नगराध्यक्ष हरीष शर्मा, मनपा सभापती राहूल पावडे, पोभूर्णाच्या सभापती अल्का आत्राम, मुख्य वनसंरक्षक विजय शेळके, बांबू प्रशिक्षण केंद्राचे संचालक राहूल पाटील, वनअकादमी संचालक अशोक खडसे, विभागीय वनअधिकारी अशोक सोनकुसरे आदींची उपस्थिती होती.

                                                  000  

No comments:

Post a Comment