मोहिम फत्ते झाल्यावर दिल्लीत कार्यक्रमाच्या आयोजनाचे आश्वासन
चंद्रपूर, दि.8 एप्रिल- चंद्रपूरच्या विविध आश्रम शाळेतील 10 विद्यार्थी एव्हरेस्ट शिखरावर स्वारी करण्यासाठी सिध्द झाले आहेत. या 10 विद्यार्थ्यांची केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांनी आज सकाळी विश्रामगृहावर भेट घेतली. त्यांना मोहीम फत्ते झाल्यानंतर राष्ट्रपतींची नवी दिल्ली येथे भेट घालून देण्यात येणार असल्याचे सांगितले.
चंद्रपूरच्या बोर्डा, देवाडा व जिवती या तीन आश्रमशाळेतील 10 आदिवासी विद्यार्थी 10 एप्रिलपासून हिमालयाच्या पायथ्याशी असणा-या बेस कॅम्पवरुन महिनाभराच्या एव्हरेस्ट मोहिमेला सुरुवात करणार आहेत. एक वर्षाच्या सात टप्यातील प्रशिक्षणानंतर ही मुले गिर्यारोहण मोहिमेसाठी सिध्द झाली आहे. या मोहिमेवर आश्रम शाळेतील आकाश चिन्नु मडावी, शुंभम रविंद्र पेंदोर, छाया सुरेश आत्राम, इंदू भाऊराव कन्नाके, कविदास पांडूरंग काटमोडे, मनिषा धर्मा धुर्वे, प्रमेश शिताराम आडे, आकाश मलाका आत्राम, उमाकांत सुरेश मडावी, विकास महादेव सोयाम हे विद्यार्थी जाणार आहेत. आज चंद्रपूरच्या प्रियदर्शिनी सभागृहामध्ये चंद्रपूर जिल्हा प्रशासनाच्या वतीने त्यांना शुभेच्छा देण्याच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. पूर्व नियोजित कार्यक्रमामुळे या कार्यक्रमाला उपस्थित राहू शकत नसलेले केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांनी सकाळीच मुलांची भेट घेतली. त्यांना भेट वस्तू देऊन त्यांचा सत्कार केला. त्यांना एव्हरेस्ट मोहिमेसाठी शुभेच्छा दिल्या. तसेच त्यांच्यासोबत अर्धा तास चर्चा केली. यावेळी महापौर अंजली घोटेकर, जिल्हाधिकारी आशुतोष सलिल, गोंदिया जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजा दयानिधी, प्रकल्प अधिकारी केशव बावनकर, अपर जिल्हा पोलीस अधीक्षक हेमराजसिंह राजपूत, प्रशिक्षक बिमला देवसकर, उपमहापौर अनिल फुलझेले आदी उपस्थित होते.
No comments:
Post a Comment