Search This Blog

Friday 31 March 2023

दस्त नोंदणी करतांना येणाऱ्या अडचणी व नोंदणी अधिनियमाचे सक्षमीकरण करण्याच्या दृष्टीने समिती गठीत

 

दस्त नोंदणी करतांना येणाऱ्या अडचणी व नोंदणी अधिनियमाचे सक्षमीकरण करण्याच्या दृष्टीने समिती गठीत

Ø सदस्य म्हणून जिल्हाधिकारी विनय गौडा यांचा समितीत समावेश

चंद्रपूर, दि. 31: शासन निर्णयाच्या अनुषंगाने नोंदणी अधिनियमाचे कलम 21 व 22 आणि महाराष्ट्र नोंदणी नियम, 1661 चे नियम 44 तसेच दि.12 जुलै 2021 नुसार दस्त नोंदणी करताना सदर कलम, नियम व परिपत्रकाचे पालन करून दस्त नोंदणी करण्याबाबत दुय्यम निबंधकांना येणाऱ्या अडीअडचणी दूर करण्याच्या अनुषंगाने, तसेच नोंदणी अधिनियमाची कलम 21 व 22 चे सक्षमीकरण करण्याच्या दृष्टीने व त्यामधील तरतुदी अधिक परिणाम करण्यासाठी त्यात सुधारणा करण्याच्या अनुषंगाने सर्वकष अभ्यास करून शासनास शिफारशी करण्यासाठी नोंदणी महानिरीक्षक व मुद्रांक नियंत्रक, महाराष्ट्र राज्य, पुणे यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठित करण्यास शासन मान्यता देण्यात आली आहे. या गठीत समितीमध्ये सदस्य म्हणून चंद्रपूरचे जिल्हाधिकारी विनय गौडा जी सी यांचा समावेश आहे.

सदर गठीत करण्यात आलेल्या समितीमध्ये अध्यक्ष म्हणून पुणेचे नोंदणी महानिरीक्षक व मुद्रांक नियंत्रक श्रावण हर्डीकर, सदस्य म्हणून नागपूरचे जिल्हाधिकारी डॉ.विपिन इटनकर, चंद्रपूरचे जिल्हाधिकारी विनय गौडा जी सी, सांगलीचे जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी, पुणेचे भूमी अभिलेख उपसंचालक बी.डी. काळे, जिल्हाध्यक्ष भूमी अभिलेख कमलाकर हत्तेकर,पालघरचे सह जिल्हा निबंधक वर्ग-1 तथा मुद्रांक जिल्हाधिकारी उदयराज चव्हाण, पुणे विभाग पुणेचे सह जिल्हा निबंधक वर्ग-2 तथा प्रशासकीय अधिकारी, नोंदणी उपमहानिरीक्षक व मुद्रांक उपनियंत्रक संतोष हिंगाणे तर सदस्य सचिव म्हणून नोंदणी उपमहानिरीक्षक व मुद्रांक उपनियंत्रक (संगणक) दीपक सोनवणे यांचा गठीत करण्यात आलेल्या समितीमध्ये समावेश करण्यात आला आहे.

सदर समितीची पहिली सभा 6 एप्रिल 2023 रोजी नोंदणी महानिरीक्षक कार्यालयात सकाळी 11 वाजता आयोजित करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी नागपूर, चंद्रपूर व सांगली यांना प्रत्यक्ष उपस्थित राहता येत नसल्याने ते ऑनलाइन उपस्थित राहू शकतील. याबाबतची लिंक 5 एप्रिल रोजी पाठवण्यात येणार आहे. असे पुण्याचे नोंदणी महानिरीक्षक व मुद्रांक नियंत्रक श्रावण हर्डीकर यांनी कळविले आहे.

00000

चिचपल्ली येथील बांबू संशोधन व प्रशिक्षण केंद्राकरीता 6.93 कोटी निधीचे वितरण

 चिचपल्ली येथील बांबू संशोधन व प्रशिक्षण केंद्राकरीता 6.93 कोटी निधीचे वितरण

चंद्रपूर, दि. 30 : बांबू संशोधन व प्रशिक्षण केंद्र, चिचपल्ली या शासनाच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पासाठी दुसऱ्या टप्प्यातील 6.93 कोटी निधीचे वितरण 29 मार्च 2023 चे शासन निर्णयानुसार करण्यात आले आहे. प्रकल्प वेळेत पूर्ण करण्यासाठी रु. 13.86 कोटी रूपयांचा पुरवणी मागणी प्रस्ताव ऑगस्ट 2022 च्या पावसाळी अधिवेशनात मंजूर करण्यात आला होता. मंजूर झालेल्या प्रस्तावानुसार हा निधी दोन टप्प्यात प्रकल्पाकरिता शासनाकडून वितरीत करण्यात आला आहे.  

पहिल्या टप्प्यात रु.6.93 कोटी निधीचे वितरण यापूर्वीच ऑक्टोबर 2022 मध्ये करण्यात आले आहे. या निधीच्या माध्यमातून प्रकल्पातील वसतिगृह, शैक्षणिक इमारत, उपहारगृह, पाणी टाकी व फर्निचर इत्यादी कामे वेळेत पूर्ण होऊन प्रकल्प पूर्णत्वास येण्यास मदत होणार आहे. सदर प्रकल्पाच्या माध्यमातून राज्यात नवीन बांबू धोरणाची व्यापक अंमलबजावणी करण्यासाठी प्रशिक्षण व तांत्रिक मार्गदर्शन करण्याच्या दृष्टीकोणातून तसेच बांबू क्षेत्रास प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने राज्याचे वने, सांस्कृतिक कार्य व मस्यव्यवसाय मंत्री सुधीर मूनगंटीवार यांचा हा एक महत्वाचा प्रकल्प असून चिचपल्ली येथे 8 हेक्टर क्षेत्रामध्ये तो साकारण्यात येत आहे.

या निधी वितरणामुळे प्रकल्पाचे काम शीघ्रगतीने पूर्ण होऊन येत्या काही दिवसातच हा प्रकल्प बांबू क्षेत्रासाठी तसेच या क्षेत्रात काम करणाऱ्या विविध कारागिरांना आणि युवक व युवतींना आधुनिक व तांत्रिक प्रशिक्षणाचे माध्यमातून रोजगाराचे दालन उपलब्ध करून देईल, असे बांबू संशोधन आणि प्रशिक्षण केंद्राचे संचालक अविनाश कुमार यांनी सांगितले.

000000

Wednesday 29 March 2023

मतदार यादीत नाव नोंदणी न केलेल्या नागरीकांनी नमुना-6 मधील अर्ज त्वरीत भरून द्यावे - सहाय्यक जिल्हाधिकारी मुरुगानंथम एम.

 मतदार यादीत नाव नोंदणी न केलेल्या नागरीकांनी नमुना-मधील अर्ज त्वरीत भरून द्यावे

                                              - सहाय्यक जिल्हाधिकारी मुरुगानंथम एम.

चंद्रपूर,दि. 29 : आगामी लोकसभा/विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या पूर्वी विधानसभा मतदारसंघाच्या याद्या अद्यावत व चुका विरहित तयार करण्याच्या दृष्टीने प्रयत्न करण्यात येत आहे. त्यानुसार 71-चंद्रपूर विधानसभा मतदारसंघात हजार 897 मतदाराचे एकापेक्षा अधिक ठिकाणी समान नोंदी असून 15 हजार 580 मतदाराचे मतदार यादीत अस्पष्ट फोटो व 80 वर्षाच्यावरील हजार 959 मतदार आहेत. विधानसभा मतदारसंघातील लक्ष 57 हजार 554 मतदारापैकी लक्ष हजार 562 मतदाराचे आधार क्रमांकाशी जोडणी झालेली नाही.

तसेच 72-बल्लारपूर विधानसभा मतदारसंघातील चंद्रपूर तालुका कार्यक्षेत्रातील मतदार यादी भागात हजार 932 समान नोंदी असलेले मतदार, 3084 अस्पष्ट फोटो असलेले मतदार व 80 वर्षाच्यावरील 851 मतदार आहेत. तसेच एकूण 58 हजार 302 मतदारांपैकी 29 हजार 688 मतदार आधार क्रमांकाशी जोडणी करण्यास शिल्लक आहेत.

मतदान केंद्रस्तरीय अधिकारी यांच्यामार्फतीने समान नोंदी असलेले मतदारमतदार यादीत अस्पष्ट फोटो असलेले मतदार तसेच 80 वर्षाच्या वरील मतदार यांची प्रत्यक्षात पडताळणी करण्यात येत आहे. तसेच आधार क्रमांकाशी जोडणी न झालेले मतदार यांच्याकडून नमुना 6-ब भरून घेणार आहे. त्याचबरोबर 18 वर्षाच्यावरील ज्या पात्र नागरीकांनी अद्यापही मतदार यादीत नावाची नोंदणी केलेली नाहीअशा मतदारांनी नमुना-मधील अर्ज संबंधित मतदान केंद्रस्तरीय अधिकारी यांच्याकडे भरून द्यावेत. तसेच मतदारांनी मतदान केंद्रस्तरीय अधिकारी यांना आवश्यक ते सहकार्य करण्याचे आवाहन मतदार नोंदणी अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी मुरुगानंथम एम. यांनी केले आहे.

००००००


ग्रंथदिडींने चंद्रपूर ग्रंथोत्सवाचे उद्घाटन

 





ग्रंथदिडींने चंद्रपूर ग्रंथोत्सवाचे उद्घाटन

चंद्रपूर, दि. 29 : उच्च व तंत्र शिक्षण विभाग, ग्रंथालय संचालनालय, मुंबई व जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय, चंद्रपूर यांच्या संयुक्त विद्यमाने दोन दिवसीय चंद्रपूर ग्रंथोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. यांच्या हस्ते ग्रंथदिंडीचे पुजन करून सदर ग्रंथदिंडी शहरातील आजाद बगीच्या-प्रियदर्शिनी इंदिरा गांधी चौक-डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी वाचनालयापर्यंत काढण्यात आली.
डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी येथे ग्रंथोत्सवाच्या उद्घाटन सोहळ्याला आमदार किशोर जोरगेवार, आमदार सुधाकर अडबाले, पद्मश्री डॉ. परशुराम खुणे, गोंडवाना विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. कीर्तीवर्धन दीक्षित, महाराष्ट्र राज्य ग्रंथालय, मुंबईचे माजी अध्यक्ष अनिल बोरगमवार, इरफान शेख, जिल्हा ग्रंथालय अधिकारी भीमराव जीवने तसेच साहित्य क्षेत्रातील व ग्रंथालय क्षेत्रातील मान्यवर प्रामुख्याने उपस्थित होते.
अध्यक्षीय भाषणात बोलतांना गोंडवाना विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. कीर्तीवर्धन दीक्षित म्हणाले, अनेक वाचकवर्ग या जिल्ह्यात आहे. त्यामुळे आजच्या डिजीटल युगातही वाचनाचे महत्त्व कमी होऊ शकले नाही. ग्रंथोत्सवाच्या माध्यमातून साहित्य व वाचन संस्कृतीला चालना मिळेल. वर्षातून 12 ते 13 कार्यक्रम जिल्ह्याच्या ठिकाणी व्हावेत. चंद्रपूरमध्ये पुस्तक मेला आयोजित करावा जेणेकरून, वाचकांना कमी किमतीत पुस्तके उपलब्ध होतील व चांगली वस्तु, पुस्तके कमी किमतीत वाचकांपर्यंत पोहोचतील. तसेच साहित्याचा वारसा जपावा, असेही ते म्हणाले.
आमदार किशोर जोरगेवार म्हणाले, ग्रंथोत्सवाच्या माध्यमातून ग्रंथचळवळ व वाचक वाढविण्यासाठी पाठबळ देण्याची आवश्यकता आहे. चंद्रपूरमध्ये 11 ठिकाणी अभ्यासिका निर्माण करण्याचे कार्य सुरू असून सात ठिकाणी अभ्यासिकेचे बांधकाम सुरू आहे. दीक्षाभूमी परीसरात एक लाख पुस्तक असलेली अभ्यासिका, वाचनालय उभे करण्याचा संकल्प आहे. यासाठी 1 कोटी इतका निधी उपलब्ध करून दिला आहे व उर्वरित निधी उपलब्ध करून देणार असल्याचेही ते म्हणाले.
आमदार सुधाकर अडबाले म्हणाले, वाचन संस्कृतीची जोपासना व्हावी. विद्यार्थी व पालकांत वाचनाची आवड निर्माण व्हावी यासाठी ग्रंथोत्सवाचे आयोजन करण्यात येते. ग्रंथमहोत्सव कसा वाढविता येईल? शाळा तेथे ग्रंथालय कसे निर्माण करता येईल? याकडे लक्ष देण्याची आवश्यकता असल्याचे ते म्हणाले. वाचनालयात अफाट विश्व आहे. सुसंस्कृत समाजाला व नव्या पिढीला वाचनालयाच्या माध्यमातून चांगले संस्कार देता येईल, असे पद्मश्री डॉ. परशुराम खुणे म्हणाले.
तत्पूर्वी, चंद्रपूर जिल्ह्यातील साहित्य क्षेत्रातील निवडणूक साहित्यिकांचा व ग्रंथालय क्षेत्रातील मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. यामध्ये अनिल बोरगमवार, चंद्रकांत पानसे, सुभाष शेषकर, श्री. वानखेडे, विश्वास जनबंधू व नागोराव थुटे यांच्यासह गोंडवाना विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. कीर्तीवर्धन दीक्षित यांचा शॉल, श्रीफळ, सन्मानचिन्ह व पुस्तक देऊन सत्कार देखील करण्यात आला.
प्रारंभी, कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलन व डॉ. एस. आर. रंगनाथम यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. कार्यक्रमाचे संचालन मुक्ता बोझावार तर आभार इरफान शेख यांनी मानले.
००००००

Tuesday 28 March 2023

काष्ठपुजन शोभायात्रा दरम्यान शहरातील वाहतूक व्यवस्थेत बदल


 

काष्ठपुजन शोभायात्रा दरम्यान शहरातील वाहतूक व्यवस्थेत बदल

चंद्रपूर, दि. 28 : 29 मार्च रोजी प्रभु श्रीराम मंदिर अयोध्या काष्ठपुजन समिती, चंद्रपुरद्वारा आयोजित प्रभु श्रीराम मंदिर अयोध्याकरीता बल्लारपुर येथील एफ.डी.सी.एम. मधुन काष्ठ पाठविण्यात येत आहे. शोभायात्रा एफ.डी.सी.एम बल्लारपुर येथुन विसापुरमार्गे राजीव गांधी अभियांत्रिकी महाविद्यालय,चंद्रपुर-माता महाकाली मंदिर- गिरणार चौक-गांधी चौक-जटपुरा गेट-प्रियदर्शिनी चौक-चांदा क्लब ग्राउंड, चंद्रपुर पर्यंत काढण्यात येणार आहे. सदर शोभायात्रेमध्ये वाहतुकीला अडथळा होवु नये म्हणुन या मार्गावरील जड वाहतुक बंद करण्यात येत आहे.

शोभायात्रा दरम्यान मोठ्या प्रमाणात जनसमुदायाची गर्दी होण्याची शक्यता आहे. सार्वजनिक ठिकाणी शांतता व सुव्यवस्था तसेच रहदारीस कुठलाही त्रास अथवा अडथळा निर्माण हो नये याकरीता दि. 29 मार्च रोजी 4 वाजतापासुन ते 10 वाजेपर्यंत वाहतूक व्यवस्थेत बदल करण्यात येत आहे.

बामणी फाटा बल्लारपुर ते कामगार चौक, चंद्रपुर हा मार्ग जडवाहनांकरीता बंद राहील. यादरम्यान जड वाहतुकदारांनी गडचांदुर किंवा राजुराकडुन चंद्रपुर येण्यासाठी भोयगांव रोड-धानोरा फाटा-पडोली-चंद्रपुर या मार्गाचा अवलंब करावा. तसेच वरोरा, भद्रावती व चंद्रपुरकडुन गडचांदुर किंवा राजुरा जाण्यासाठी धानोरा फाटा-भोयगांव रोड-गडचांदुर या मार्गाचा अवलंब करावा. तसेच गोंडपिपरी व कोठारीकडुन चंद्रपुर येण्यासाठी पोंभुर्णा रोडचा अवलंब करावा.

यानंतर महाकाली मंदिर पासुन सदर शोभायात्रा सुरू होवुन कस्तुरबा चौक मार्गे गांधी चौक-जटपुरा गेट-प्रियदर्शिनी चौक-चांदा क्लब ग्राउंड येथे कार्यक्रमस्थळी पोहचणार आहे. यावेळी शोभायात्रा दरम्यान सदर मार्गावर सर्व प्रकारची वाहने वाहतुकीकरीता बंद राहील.

यादरम्यान नागरीकांनी पर्यायी मार्गाचा करावा अबलंब:

 शोभायात्रा महाकाली मंदिर ते शिवाजी चौक या दरम्यान असतांना नागरीकांनी भिवापुर किंवा लालपेठ जाण्यासाठी कस्तुरबा चौक-हनुमान खिडकी-भिवापुर-लालपेठ या मार्गाचा अवलंब करावा. तसेच शहरातुन बाहेर जाण्यासाठी कस्तुरबा चौक-दस्तगिर चौक-मिलन चौक-श्री टॉकीज-बिनबा गेट या मार्गाचा वापर करावा. शोभायात्रा शिवाजी चौक ते गांधी चौक या दरम्यान असतांना नागरीकांनी शहरामध्ये किंवा बाहेर जाण्यासाठी एसबीआय बँक मार्गे गोलबाजार रोडने बँक ऑफ इंडिया या मार्गाचा अवलंब करावा. शोभयात्रा गिरणार चौक पास झाल्यानंतर नागरीकांनी भिवापुर किंवा बागला चौक जाण्यासाठी हनुमान खिडकी-भिवापुर-बागला चौक या मार्गाचा वापर करावा. तसेच शहरातुन बाहेर जाण्यासाठी कस्तुरबा चौक-दस्तगिर चौक-मिलन चौक-श्री टॉकीज-बिनबा गेट या मार्गाचा वापर करावा.

तसेच वरोरा नाका ते प्रियदर्शनी चौक हा मार्ग 29 मार्च 2023 रोजी सर्व प्रकारच्या वाहतुकीस बंद राहील. दरम्यानच्या काळात पडोलीकडून शहरांमध्ये जाणारी वाहतूक डॉ. बाबासाहेब आंबेडकर कॉलेज-जटपुरा गेट या मार्गाचा किंवा सावरकर चौक-बस स्टॉप-प्रियदर्शनी चौक-जटपुरा गेट या मार्गाचा वापर करतील.

नागरीकांनी याठिकाणी पार्क करावी वाहने :

शोभायात्राकरीता बाहेरून येणाऱ्या वाहनांकरीता पार्किंगची व्यवस्था करण्यात आली आहे. यामध्ये मूल आणि बल्लारपूरकडून येणा-या वाहनांसाठी नियोजित वाहनतळ कृषी भवन, सिंधी पंचायत भवन, रामनगर येथे तर नागपूरकडून येणारी वाहतूक जनता कॉलेज, ईदगाह मैदान तसेच शकुंतला लॉन या ठिकाणी वाहने पार्क करावीत.

तसेच या मार्गावर प्रवास करणाऱ्या नागरीकांनी सदर मार्गावर वाहतूक कोंडी होण्याची शक्यता असल्याने आपल्या अत्यावश्यक कामाशिवाय या मार्गावर सदर कालावधीत प्रवास करू नये, असे आवाहन प्रशासनामार्फत करण्यात आल्याचे वाहतुक नियंत्रण शाखेने कळविले आहे.

०००००

छत्रपतींच्या महाराष्ट्रातील काष्ठ आज अयोध्येला रवाना होणार

 


छत्रपतींच्या महाराष्ट्रातील काष्ठ आज अयोध्येला रवाना होणार

Ø शोभायात्रेची जय्यत तयारीदोन हजार कलावंतांचा सहभाग,

Ø कैलाश खेर यांची रामधून - ना. सुधीर मुनगंटीवार

Ø आचार्य गोविंद देव गीरी महाराजउपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह नामवंतांची उपस्थिती

चंद्रपूर,दि.28 :  छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रातील सागवन काष्ठ प्रभू श्रीरामचंद्रांच्या अयोध्येला उद्या (बुधवार) रवाना होणार आहे. रामायणात ज्या दंडकारण्याचा उल्लेख आहे त्या दंडकारण्याचा भाग असलेल्या चंद्रपूरमधील सागवन काष्ठ अयोध्येतील श्रीराम मंदिराच्या निर्माण कार्यासाठी वापरले जाणार आहे. हे काष्ठ पाठविण्याचा आनंदोत्सव चंद्रपूर आणि बल्लारशामध्ये उद्या बुधवारी साजरा होणार आहेअशी माहिती राज्याचे वने व सांस्कृतिक कार्यमंत्री तसेच चंद्रपूरचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.

या काष्ठपूजन सोहळ्याला श्री राम जन्मभूमी तीर्थक्षेत्रचे कोष्याध्यक्ष आचार्य गोविंददेव गीरी महाराज,महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर,उत्तर प्रदेशचे उच्च व तंत्र  शिक्षण मंत्री श्री.योगेंद्र उपाध्याय स्टॅम्पन्यायालय शुल्क राज्यमंत्री श्री रविंद्र जायस्वाल वनपर्यावरण राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) डॉ अरुणकुमारजी सक्सेना अभिनेते अरुण गोवील,सुनील लहरी,अभिनेत्री दिपीका चिखलिया या सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत.

काष्ठपुजनशोभायात्रा तसेच विविध सांस्कृतिक कार्यक्रमांची जय्यत तयारी झालेली आहे. संपूर्ण महाराष्ट्रातील जवळपास दोन हजार कलावंत सांस्कृतिक कार्यक्रमात सहभागी होणार आहेतअसेही ना. सुधीर मुनगंटीवार म्हणाले. दुपारी ३.३० वाजता बल्लारपूर एफडीसीएम डेपोमध्ये काष्ठपुजन होईल. त्यानंतर चंद्रपूर येथील माता महाकाली मंदिरापासून प्रभू श्रीरामाच्या मंदिरापर्यंत  शोभायात्रेचे आयोजन होईल. रात्री ९.३० च्या सुमारास चांदा क्लब ग्राऊंड शोभायात्रेचा समारोप होणार आहे. त्यानंतर त्याच ठिकाणी रात्री ९.३० वाजता सुप्रसिद्ध गायक कैलाश खेर यांचा रामधून व राम भजनाचा कार्यक्रम होईल.

या ऐतिहासिक सोहळ्यासाठी चंद्रपूर शहर आणि बल्लारपूर शहर सज्ज झाले असूनठिकठिकाणी होणाऱ्या शोभयात्रेसाठी स्वागतकमानी,पताका,भगवे झेंडे लावण्यात आले असून मार्गावर रामधून सुरू असून वातावरण  राममय झाले आहे. आयोजनासाठी शेकडो कार्यकर्ते स्वयंस्फूर्तीने या परिश्रम घेत आहेत.

 तिरुपती मंदिराने पाठविला प्रसाद : तिरूपती येथील बालाजी मंदिराने १५ हजार मंदिरांचे प्रसाद लाडू भाविकांसाठी पाठविले आहेत. तिरुपती देवस्थानाला आपण सागवन काष्ठ अयोध्येच्या राम मंदिर निर्माणासाठी पाठवत असल्याचे कळविले होते. त्यानंतर त्यांनी सोहळ्याला उपस्थित राहणाऱ्यांसाठी एवढ्या मोठ्या प्रमाणात प्रसाद पाठवित असल्याचे सांगितलेअशी माहिती ना. मुनगंटीवार यांनी दिली.

स्वप्नपूर्तीचा क्षण : श्रीरामचंद्रांचे पिता महाराज दशरथ यांच्या मातोश्री इंदूमती या विदर्भाच्या. त्यामुळे आजीच्या भूमीतून नातवाच्या मंदिर निर्माणासाठी सागवन काष्ठ जात असल्याचा हा ऐतिहासिक क्षण असणार आहे. संपूर्ण महाराष्ट्रासाठी हा स्वप्नपूर्तीचा क्षण असल्याचे ना. मुनगंटीवार म्हणाले.

००००००

सर्वधर्मीय सण आनंदात व शांततेत साजरे करा - जिल्हाधिकारी विनय गौडा

 





सर्वधर्मीय सण आनंदात व शांततेत साजरे करा

          - जिल्हाधिकारी विनय गौडा

Ø शांतता समितीच्या बैठकीत पोलिस प्रशासन व नागरिकांना सुचना

चंद्रपूरदि. 28 : पुढील एक ते दीड महिन्यात सर्वधर्मीय सण मोठ्या प्रमाणात येत आहेत. सोबतच चंद्रपूर शहरात 27 मार्चपासून महाकाली यात्रेला प्रारंभ झाला असून बुधवारी काष्ठपुजन शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. याच काळात रमजान महिनासुध्दा सुरू झाला आहे. पुढील काही दिवसात श्रीरामनवमी, महावीर जयंती, हनुमान जयंती, गुडफ्रायडे, डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती, रमजान ईद (ईद – उल - फित्र) हे सण साजरे होणार आहे. विशेष म्हणजे चंद्रपूर जिल्हा हा शांततेसाठी ओळखला जातो. हीच ओळख कायम ठेवण्यासाठी नागरिकांनी सर्व सण आनंदात आणि शांततेत साजरे करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. यांनी केले.

नियोजन सभागृह येथे जिल्हा प्रशासन व पोलिस प्रशासनाच्या वतीने आयोजित जिल्हास्तरीय शांतता समितीच्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी जिल्हा पोलिस अधिक्षक रविंद्रसिंह परदेशी, सहाय्यक जिल्हाधिकारी मुरुगानंथम एम., मनपा आयुक्त विपीन पालिवाल, उत्पादन शुल्क विभागाचे अधिक्षक संजय पाटील उपस्थित होते.

समाजाच्या विकासासाठी शांततेची अत्यंत गरज आहे, असे सांगून जिल्हाधिकारी श्री. गौडा म्हणाले, आपल्या गावाची, जिल्ह्याची तसेच राष्ट्राची कायदा व सुव्यवस्था अबाधित राहिली तरच विकासाकडे वाटचाल होते. शांतता भंग करणे सोपे काम आहे मात्र ती कायम टिकवून ठेवणे कठीण आहे. त्यामुळेच आपल्या सर्वांवर शांतता टिकवून ठेवण्याची मोठी जबाबदारी आहे. सर्व धर्मात शांततेचाच संदेश देण्यात आला आहे. सण, उत्सव पाहून काही समाजकंटक परिस्थिती बिघडविण्याचा प्रयत्न करीत असतात. अशांना वेळीच आळा घाला. कोणताही असामाजिक विषय मोठा होऊ देऊ नका. पोलिस प्रशासन, नागरीक आणि शांतता समितीच्या सदस्यांनी एकमेकांच्या संपर्कात राहून अशा विषयाला वेळीच निर्बंध घालावा.

डीजे पथक प्रमुखांची यादी पोलिसांनी त्वरीत मिळवावी. त्यांच्याशी संपर्क करून त्यांना नियमांची जाणीव करून द्या. शहरातील जेटपूरा गेट, गिरनार चौक, गांधी चौक तसेच इतर ठिकाणीही वाहतुकीची कोंडी होणार नाही, याची काळजी घ्या. कोणतीही शहानिशा न करता आजकाल तरुणाई सोशल मिडीयावर व्यक्त होत असते. त्यामुळे नकारात्मक संदेश जाणार नाही, यासाठी प्रत्येकाने आपल्या घरातूनच जनजागृती करावी. सण, उत्सव साजरे करतांना जिल्हा प्रशासनाला सर्वांनी सहकार्य करावे, असे आवाहनही त्यांनी केले.

पोलिस अधिक्षक श्री. परदेशी म्हणाले, आपली परंपरा सर्वधर्मसमभावाची आहे. त्याचे जतन करणे हे आपले कर्तव्य आहे. कोणतीही समस्या उद्भवली तर त्यातून मार्ग निघतो, यावर चंद्रपूरकरांचा विश्वास आहे. मिरवणुकीदरम्यान मुख्य रस्ते, मशीद आदींसमोर पार्किंगची समस्या निर्माण होणार नाही, याबाबत पोलिसांनी दक्ष राहावे. डीजे वाजविणा-यांनी नियमांचे पालन करावे, यासाठी पथक प्रमुखांना सुचना द्या. जिल्ह्यातील सर्व पोलिस यंत्रणेने एकमेकांच्या संपर्कात राहावे. होणीही नॉट रिचेबल राहता कामा नये. सोशल मिडीयावर येणाच्या पोस्टची शहानिशा झाल्याशिवाय नागरिकांनी व्यक्त होऊ नये, अशा सुचना त्यांनी दिल्या.

शांतता समितीच्या सदस्यांनी केलेल्या सुचना : ध्वनी प्रदुषणावर नियंत्रण असावे. अफवा पसरू नये, याबाबत योग्य नियोजन करावे. परीक्षा कालावधी असल्याने डीजेचा आवाज कमी किंवा बंद ठेवावा. समाजकंटकाचा बंदोबस्त करावा. सोशल मिडीयावर सामाजिक सलोखा बिघडविणा-या किंवा धार्मिक भावना भडकविणा-या पोस्टवर कडक कारवाई करावी. मुख्य रस्त्यावर वाहतुकीस अडथळा होणार नाही किंवा पार्किंगच्या समस्याबाबत योग्य नियोजन करावे. तरुणाईला प्रत्येक कुटुंबाने समज द्यावी. बॅनरबाजीमुळे तेढ निर्माण होणार नाही, याची काळजी घ्यावी. मद्यप्राशन किंवा धिंगाणा करणा-यांवर कडक कारवाई करावी.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक पोलिस उपअधिक्षक शेखर पाटील यांनी केले. संचालन श्री. आवळे यांनी तर आभार विशेष शाखेचे पोलिस निरीक्षक शिवाजी कदम यांनी मानले. बैठकीला पोलिस उपअधिक्षक (गृह), यांच्यासह सर्व उपविभागीय पोलिस अधिकारी, पोलिस निरीक्षक, पोलिस पाटील आणि शांतता समितीचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.

०००००००

शिर्डी येथील महाएक्स्पो राज्यस्तरीय पशुपशी प्रदर्शनीत चंद्रपूर जिल्ह्यातील कठाणी गाय ठरली प्रथम विजेती



शिर्डी येथील महाएक्स्पो राज्यस्तरीय पशुपशी प्रदर्शनीत

चंद्रपूर जिल्ह्यातील कठाणी गाय ठरली प्रथम विजेती

चंद्रपूर, दि. 28 : महाएक्स्पो राज्यस्तरीय पशुपशी प्रदर्शनी शिर्डी येथे 24 ते 26 मार्च कालावधीत घेण्यात आली. राज्यस्तरीय प्रदर्शनात 12 राज्यातून 250 प्रजातींच्या जातीवंत गाय, म्हैस, घोडेशेळी, मेंढीकुक्कुट, श्वानमांजर, बदके, तितर यासह  823 पशुंचा सहभाग होता. यात चंद्रपूर जिल्ह्यातील कठाणी गाय ही प्रथम क्रमांकाची विजेती ठरली.

या राज्यस्तरीय प्रदर्शनीचे उद्घाटन महसूल व पशुसंवर्धन मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले. अध्यक्षस्थानी कृषिमंत्री अब्दुल सत्तार होते. तसेच राज्यस्तरीय प्रदर्शनीच्या समारोपीय कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित होते. यावेळी मुख्यमंत्र्यांनी पशुपशी प्रदर्शनीत आलेल्या शेतकरी / पशुपालकांना शुभेच्छा दिल्या. तसेच शेतकरी हा शासनाचा केंद्रबिंदु असून शेतकरी व इतर घटकांसाठी राज्याचा पंचामृत अर्थसंकल्प सादर करण्यात आला आहे, असे सांगितले.

या प्रदर्शनात सहभागी असलेल्या प्रजाती पशुचे स्पर्धात्मक व गुणात्मक परीक्षण करून प्रत्येक प्रजातीतून प्रथम तीन क्रमांकाच्या पशुमालकांना तसेच जिल्ह्यतील वरोरा तालुक्यातील शुभम शंकर ढफ यांच्या कठाणी गायीला प्रमुख अतिथीच्या हस्ते शिल्ड / ट्रॉफी, प्रमाणपत्र, रक्कम देऊन गौरविण्यात आले. या प्रदर्शनीमधील विविध स्टाल, मंडपमधील पशुला प्रमुख अतिथी, राज्याचे प्रधान सचिव जे.पी.गुप्ता, पशुसंवर्धन आयुक्त सचिंद्र प्रताप सिंग  यांनी भेट देऊन माहिती जाणुन घेतली.

            तसेच राज्यस्तरीय प्रदर्शनीमध्ये चंद्रपूरचे जिल्ह्यधिकारी विनय गौडा, जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक जॉन्सन, यांच्या मार्गदर्शनात जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. मंगेश काळे  व  डॉ. जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी उमेश हिरूडकर  यांच्या नेतृत्वात पशुविकास अधिकारी डॉ. विकास ताजणे, सहा.पशुधन विकास अधिकारी डॉ बंडू आकनुरवारडॉ राहुल घिवेडॉ हेमंत  घुई, पशुधन पर्यवेक्षक डॉ. सुनिल आलामडॉ दत्ता नन्नावरेडॉ जंयत खानेकर आदी सहभागी झाले होते.

०००००००

Monday 27 March 2023

कृषी विभागाच्या सतर्कतेमुळे पीक विमा कंपनीचे पितळ उघड

 




कृषी विभागाच्या सतर्कतेमुळे पीक विमा कंपनीचे पितळ उघड

Ø जिल्हाधिका-यांनी दिले चौकशीचे आदेश

चंद्रपूरदि. 27 : स्थानिक नैसर्गिक आपत्ती व हंगामातील प्रतिकूल परिस्थितीमुळे नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे करतांना विमा कंपनीने अफरातफर केल्याचे कृषी विभागाच्या निदर्शनास आले आहे. सदर बाब उघडकीस येताच जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. यांनी आढावा बैठक घेऊन याबाबत त्वरीत चौकशी करण्याचे आदेश दिले आहे.

जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडलेल्या या बैठकीला अपर पोलिस अधिक्षक रिना जनबंधू, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी भाऊसाहेब ब-हाटे, जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापक प्रशांत धोंगळे तर तालुकास्तरावरून तहसीलदार, तालुका कृषी अधिकारी हे दूरदृष्यप्रणालीद्वारे उपस्थित होते.

कृषी विभागाचे क्षेत्रीय कर्मचारी आणि विमा कंपनीचा प्रतिनिधी हे संबंधित शेतक-यासमोर पिकांचे पंचनामे करीत असतात. मात्र विमा कंपनीने शेतक-यांसमोर केलेल्या पंचनाम्यात अफरातफर केल्याचे समोर आले आहे. यात मूळ पंचनाम्यात खोडतोड, बनावट स्वाक्षरी, आकड्यांमध्ये तफावत, वेगळे शिक्के, बनावट झेरॉक्स असे प्रकार काही तालुक्यांमध्ये आढळून आले आहेत. सदर बाब जिल्हाधिका-यांच्या लक्षात आणून देताच कृषी विभागाचे अधिकारी व विमा कंपनीच्या प्रतिनिधीसोबत जिल्हाधिका-यांनी बैठक घेतली. पंचनाम्यामधील आकड्यात तफावत, खोडतोड, व्हाईटनर लावून पुन्हा लिहिलेले असे वेगवेगळे वर्गीकरण करून तालुका कृषी अधिका-यांनी त्वरीत जिल्हा मुख्यालयी माहिती सादर करावी. जेणेकरून विमा कंपनीकडून मूळ पंचनाम्याची प्रत उपलब्ध करणे सोपे होईल. त्यानंतर या प्रकरणाची चौकशी करण्यात येईल, असे जिल्हाधिका-यांनी सांगितले.

जिल्ह्यात आतापर्यंत सहा तालुक्यातील 1111 पंचनाम्यामध्ये तफावत आढळून आली असून यात सर्वाधिक वरोरा तालुक्यात 822 प्रकरणे, चिमूर 162, पोंभुर्णा 60, गोंडपिपरी 37, चंद्रपूर 25 आणि सावली येथील 5 प्रकरणांचा समावेश आहे. काही तालुक्यांचा अहवाल अप्राप्त असून त्यांनी त्वरीत अहवाल सादर करावा. तर इतर तालुक्यातील अहवाल निरंक असला तरी तेथील तालुका कृषी अधिका-यांनी याबाबत माहिती घ्यावी, असे निर्देशही जिल्हाधिका-यांनी दिले.

०००००००

29 व 30 मार्च रोजी चंद्रपूर ग्रंथोत्सवाचे आयोजन


 29 व 30 मार्च रोजी चंद्रपूर ग्रंथोत्सवाचे आयोजन

Ø पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते होणार उद्घाटन

चंद्रपूरदि. 27 : महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक धोरण-2010 अंतर्गत, उच्च व तंत्र शिक्षण विभाग, ग्रंथालय संचालनालय, महाराष्ट्र राज्य, मुंबई व जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय, चंद्रपूर यांच्या संयुक्त विद्यमाने 29 व 30 मार्च 2023 रोजी डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी सार्वजनिक ग्रंथालय, चंद्रपूर येथे चंद्रपूर ग्रंथोत्सवाचे आयोजन होणार आहे. सदर ग्रंथोत्सवाचे उद्घाटन राज्याचे वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते पार पडणार आहे.

या ग्रंथोत्सवात 29 मार्च रोजी सकाळी 9 वाजता ग्रंथदिडीचे आयोजन करण्यात आले असून शहरातील आझाद बगीचा-प्रियदर्शिनी इंदिरा गांधी चौक-डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी वाचनालय पर्यंत ग्रंथदिडी काढण्यात येणार आहे. त्यानंतर ग्रंथोत्सव कार्यक्रमाचे उद्घाटन व सत्कार समारंभ आयोजित आहे. 29 मार्च रोजी दुपारी 3 ते 4 या कालवधीत पद्मश्री डॉ. परशुराम खुणे यांची प्रकट मुलाखत, सायंकाळी 4 ते 6 वा. चर्चासत्र, सायंकाळी 6 ते रात्री 8 वा. कविसंमेलन, गुरवार दि. 30 मार्च रोजी सकाळी 11 वाजता चर्चासत्र, दुपारी 2 वाजता कथाकथन, दुपारी 3 वाजता गझल मुशायरा, सायंकाळी 5 वाजता समारोप होणार आहे.

ग्रामीण व शहरी भागातील जनतेच्या वाचन संस्कृतीमध्ये वाढ व्हावी या हेतूने राज्य शासनातर्फे ग्रंथोत्सवाचे आयोजन करण्यात येते. ग्रंथ प्रेमींना एकच ठिकाणी विविध ग्रंथ प्राप्त व्हावेत, तसेच प्रकाशक व ग्रंथ विक्रेता यांना ग्रंथ विक्रीसाठी एकाच ठिकाणी आवश्यक ती सुविधा उपलब्ध व्हावी तसेच वाचन संस्कृती संवर्धनासाठी ग्रंथ महोत्सव आयोजनाचा मुख्य उद्देश आहे.

सदर ग्रंथोत्सवाचा लाभ जिल्ह्यातील सर्व प्रकारच्या विद्यार्थी, वाचक, साहित्यिक व ग्रंथप्रेमींनी घ्यावा, असे आवाहन जिल्हा ग्रंथालय अधिकारी भीमराव जीवने यांनी केले आहे.

००००००

अल्पसंख्याक समाजातील उमेदवारांना निवासी पोलीस शिपाई भरती पूर्व परीक्षा प्रशिक्षण

 अल्पसंख्याक समाजातील उमेदवारांना निवासी पोलीस शिपाई भरती पूर्व परीक्षा प्रशिक्षण

Ø 29 मार्च रोजी पोलिस ग्राउंड येथे उपस्थित राहून अर्ज सादर करण्याचे आवाहन

चंद्रपूरदि. 27 : अल्पसंख्याक समाजातील उमेदवारांना स्पर्धात्मक परीक्षेमध्ये समान संधी प्राप्त होण्याच्या दृष्टीने शासनाद्वारे प्रशिक्षण कार्यान्वित करण्यात आले आहे. त्यासंदर्भात निवासी पोलिस शिपाई भरती पूर्व परीक्षा प्रशिक्षण कार्यक्रमातंर्गत सन 2022-23 करीता जिल्ह्यातील मुस्लिम, ख्रिश्चन, बौद्ध, शीख, पारसी, जैन आणि ज्यु या अल्पसंख्यांक समाजातील इच्छुक उमेदवारांना पोलीस शिपाई भरती पूर्व परीक्षा प्रशिक्षण देण्याकरीता सदर उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. उमेदवारांनी दि. 29 मार्च रोजी सकाळी 11 वाजेपर्यंत चंद्रपूर जिल्हा मुख्यालयातील पोलीस ग्राउंड, चंद्रपूर येथे उपस्थित राहून अर्ज सादर करावेत.

प्रशिक्षणार्थ्याचे वार्षिक कौटुंबिक उत्पन्न 8 लाखापेक्षा जास्त नसावे. (तहसीलदार, नायब तहसीलदार यांचे उत्पन्न प्रमाणपत्रानुसार), उमेदवार हा अल्पसंख्यांक समाजातील असावा. उमेदवार 18 ते 45 वर्षे वयोगटातील असावा. उमेदवाराची उंची पुरुष 165 सेमी व महिला 155 सेमी असावी. तर छाती (पुरुष) 79 सेमी (फुगवून 84 सेमी) असावी. उमेदवार इयत्ता बारावी पास असावा. उमेदवाराने रहिवासी दाखला ओळखपत्राची सत्यप्रत देणे आवश्यक आहे. निवडलेल्या उमेदवारांपैकी किमान 70 उमेदवार मुस्लिम अल्पसंख्यांक समाजातील, 20 उमेदवार बौद्ध समाजातील, चार उमेदवार ख्रिश्चन, चार उमेदवार जैन, आणि प्रत्येकी एक उमेदवार शीख व पारशी समाजामधून निवडण्यात येईल. ख्रिश्चन, जैन, शीख आणि पारसी समाजामधून उमेदवार उपलब्ध न झाल्यास इतर अल्पसंख्यांक समाजामधील उमेदवार निवडण्यात येईल.

या योजनेअंतर्गत प्रशिक्षणाचा कालावधी तीन महिन्यांचा राहील. तरी, जिल्ह्यातील उमेदवारांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन साईबाबा बहुउद्देशिय शिक्षण संस्था, पिटीगुडा-1 अल्पसंख्याक निवासी पोलीस शिपाई भरती पूर्व परीक्षा प्रशिक्षण जिवतीचे अध्यक्ष यांनी केले आहे.

०००००

Saturday 25 March 2023

पोलिस अहवाल अप्राप्त असल्यामुळे शस्त्र परवान्याचे नुतनीकरण प्रलंबित

 


पोलिस अहवाल अप्राप्त असल्यामुळे शस्त्र परवान्याचे नुतनीकरण प्रलंबित

चंद्रपूरदि. 25 : जिल्ह्यातील दि. 31 डिसेंबर 2022 रोजी मुदत संपलेल्या 188 (आत्मसंरक्षणार्थबँक संरक्षणार्थ व कंपनी संरक्षणार्थ) शस्त्र परवानाधारकांनी जिल्हाधिकारी कार्यालयात परवाना नुतणीकरणासाठी विहित नमुन्यात अर्ज सादर केला. मात्र समोरच्या प्रक्रियेकरीता जिल्हाधिकारी कार्यालयाकडून शस्त्र नियम, 2016 चे नियम 14 अन्वये एस-यामध्ये अहवाल सादर करण्यास पोलिस विभागास कळविण्यात आले होते.

त्याअनुषंगाने आजपर्यंत पोलिस अधीक्षक कार्यालयाकडून 13 शस्त्र परवान्याच्या नुतनीकरणाचे अहवाल प्राप्त झाले. त्यानुसार 13 शस्त्र परवाने नुतनीकरण करून देण्यात आले आहे. उर्वरित 175 शस्त्र परवानाधारकांचे पोलिस अहवालपोलिस अधीक्षक कार्यालयाकडून अप्राप्त असल्याने सदर अर्जावर कार्यालयाचा निर्णय प्रलंबित आहे, असे अपर जिल्हा दंडाधिकारी तथा निवासी उपजिल्हाधिकारी विशालकुमार मेश्राम यांनी कळविले आहे .

०००००००

28 ते 31 मार्च रोजी पंडित दिनदयाळ उपाध्याय ऑनलाईन रोजगार मेळाव्याचे आयोजन

 

28 ते 31 मार्च रोजी पंडित दिनदयाळ उपाध्याय ऑनलाईन रोजगार मेळाव्याचे आयोजन

चंद्रपूर, दि. 25 : जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, चंद्रपूर कार्यालयाच्या वतीने दि. 28 ते 31 मार्च 2023 या कालावधीत पंडित दिनदयाळ उपाध्याय ऑनलाईन रोजगार मेळाव्याचे आयोजन  करण्यात आले आहे.

इच्छुक उमेदवारांनी कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता विभागाच्या वेबपोर्टलवर स्वतःची नाव नोंदणी करून किंवा ज्यांनी यापूर्वी नाव नोंदणी केलेली असेल त्या उमेदवारांनी अप्लाय करावे, असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहायक आयुक्त भैय्याजी येरमे यांनी केले आहे.

ऑनलाईन नोंदणी करण्याची कार्यपद्धती :

www.mahaswayam.gov.in  या संकेतस्थळाला भेट द्या किंवा प्ले-स्टोअर मधुन महास्वयंम अप्लीकेशन मोफत डाऊनलोड करुन इन्स्टॉल करा व एम्प्लॉयमेंटवर क्लिक करा. एम्प्लॉयमेंट पृष्ठावरील जॉब सिकर हा पर्याय निवडून नोंदणी, आधार कार्ड क्रमांक व पासवर्डने साइन इन करा. नंतर होम पेजवरील पंडित दीनदयाळ उपाध्याय ऑनलाईन जॉब फेअर हा पर्याय निवडा. चंद्रपूर जिल्ह्याची निवड करुन फिल्टर बटनावर क्लिक करा. क्लिक केल्यानंतर रोजगार मेळाव्यात सहभागी होण्यासाठी पंडित दीनदयाळ उपाध्याय जॉब फेअर-चंद्रपूर या ओळीतील अॅक्शन मेनुतील दुसऱ्या बटणावर (व्हॅकन्सी लिस्टिंग) क्लिक करा. आयअॅग्री हा पर्याय निवडा. पर्याय निवडल्यानंतर शैक्षणिक पात्रतेनुसार जुळणारे विविध आस्थापना, कंपन्यांच्या रिक्त पदांच्या अप्लाय बटनावर क्लिक करा.

सर्व बेरोजगार उमेदवारांनी आपल्या युजर आयडी व पासवर्डने लॉगईन करुन दि. 28 ते 31 मार्च 2023  रोजी वेबपोर्टलवर नोंद केलेल्या उद्योजकांच्या रिक्त पदांकरीता उद्योजकांनी नमुद केलेल्या शैक्षणिक पात्रतेनुसार अप्लाय करावे आणि उद्योजकांसोबत व्हॉट्सॲप, गुगल मिट, व्हिडीओ कॉलींग आदींच्या माध्यमातुन संपर्क साधुन ऑनलाईन मुलाखत द्यावी व ऑनलाईन रोजगार मेळाव्याचा लाभ घ्यावाअसे आवाहन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहायक आयुक्त भैय्याजी येरमे यांनी केले आहे.

०००००

एन.एस.डी.सी दिल्लीमार्फत पहिल्या आंतरराष्ट्रीय रोजगार मेळाव्याचे आयोजन

 


एन.एस.डी.सी दिल्लीमार्फत पहिल्या आंतरराष्ट्रीय रोजगार मेळाव्याचे आयोजन

Ø जिल्ह्यातील उमेदवारांनी सहभागी होऊन संधीचा लाभ घेण्याचे आवाहन

चंद्रपूर, दि. 25 : भारतातील उमेदवारांना परदेशातील नोकरी उपलब्ध होण्यासाठी पहिला आंतरराष्ट्रीय रोजगार मेळावा दि. 21 फेब्रुवारी ते 26 मे 2023 या दरम्यान नॅशनल स्किल डेव्हलपमेंट कार्पोरेशन दिल्ली (एनएसडीसी) यांच्यामार्फत आयोजीत करण्यात आला आहे. सदर रोजगार मेळाव्यामध्ये उमेदवार, उद्योजकांना सहभागी होण्याकरीता लिंक उपलब्ध करून देण्यात आली आहे.

या जॉब फेअरमध्ये उमेदवारांनी सहभागी होण्यासाठी https://www.kaushalmahotsav.nsdcdigital.org/International/Candidate/  या लिंकवर नोंदणी करावयाची आहे. तसेच विविध कंपन्या व उद्योजकांना सहभागी होण्यासाठी www.kaushalmahotsav.nsdcdigital.org/International/Company/ ही लिंक उपलब्ध करुन देण्यात आली असून या लिंकवर नोंदणी करावयाची आहे.

             रोजगार मेळावा ऑनलाइन व ऑफलाइन या दोन्ही पद्धतीने घेण्यात येणार आहे. मेळाव्यामध्ये सहभागी होण्या करीता उमेदवारांना एन.एस.डी.सी.च्या पोर्टलवर नोंदणी करणे आवश्यक आहे. मेळाव्यामध्ये उमेदवारांची प्राथमिक फेरी व अंतिम फेरीचे आयोजन करण्यात येणार असून समारोपीय कार्यक्रमसुद्धा आयोजीत करण्यात आला आहे. मेळाव्यामध्ये सहभागी होणा-या उद्योजकातर्फे प्राथमिक व अंतिम फेरी ऑनलाइन पद्धतीने घेण्यात येणार असून समारोपीय कार्यक्रमाकरीता संबंधित उद्योजक प्रत्यक्ष हजर राहणार आहे. वेगवेगळया झोनमध्ये वेगवेगळया दिवशी प्राथमिक आणि अंतिम फेरीचे आयोजन करण्यात आले आहे.

            या मेळाव्यामध्ये अमेरिका, कॅनडा, इंग्लड, युरोप, पश्चिम आणि दक्षिण आशिया, जपान, आस्ट्रेलिया, न्युझिलंड, पूर्व आणि दक्षिण पूर्व आशिया व भारतातील नामांकित उद्योजक ऑनलाइन उपस्थित राहणार आहे. यामध्ये ऑटोमोटीव्ह, कृषी, कारपेंटर, बांधकाम, ड्रायव्हर, इलेक्ट्रिशिअन, फॅसिलीटी मॅनेजमेंट, फूड आणि बेव्हरेज, हेल्थ केअर, हॉस्पीटॅलीटी, आयटी, लॉजीस्टीक, ऑइल ॲड गॅस, प्लंबर, रेफ्रिरेजेशन, रिटेल सर्व्हिस, शिपयार्ड, वेल्डर आदी क्षेत्रामध्ये उमेदवारांना नोकरीची संधी मिळणार आहे. उमेदवारांकरीता महाराष्ट्रात मुंबई येथे प्राथमिक आणि अंतीम फेरीचे आयोजन करण्यात आले आहे.

जॉब फेअरची प्रक्रिया व कालावधी:

            स्क्रीनिंग व भाषा चाचणीचा ऑनलाइन दिनांक 20 ते 27 मार्च 2023,  उमेदवाराची ऑनलाइन मॅपिंग दि. 28 मार्च ते 10 एप्रिल 2023, तर भारतातील विविध शहरामध्ये प्राथमिक फे-या दि. 11 ते 30 एप्रिल 2023, संपूर्ण भारतातील विविध शहरामध्ये अंतिम फे-या दि. 8 ते 15 मे 2023 कालावधीत पार पडणार आहे. समारोपीय  समारंभ दि.26 मे 2023 रोजी होणार आहे. या आंतरराष्ट्रीय रोजगार मेळाव्याच्या माध्यमातून किमान 2 हजार  उमेदवारांना आंतरराष्ट्रीय स्तरावर नोकरीची संधी प्राप्त करून देण्याचे शासनाचे उद्दिष्ट आहे.

निवड झालेल्या उमेदवारांचे परदेशात प्रस्थानापूर्वी आवश्यक प्रशिक्षण एन.एस.डी.सी.मार्फत आयोजीत करण्यात आले आहे. याबाबत अधिक माहितीकरीता एनएसडीसीच्या व्यवस्थापक पंघोरी बोरगोएन यांच्या 9599495296 भ्रमणध्वनी क्रमांकावर किंवा pangkhuri.borgohain@nsdcindia.org या ई-मेल आयडीवर संपर्क साधावा. पहिल्या आंतरराष्ट्रीय रोजगार मेळाव्यामध्ये चंद्रपूर जिल्ह्यातील जास्तीत जास्त उमेदवारांनी सहभागी होऊन संधीचा लाभ घेण्याचे आवाहन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहायक आयुक्त भैय्याजी येरमे यांनी केले आहे.

०००००००

Friday 24 March 2023

ॲट्रॉसिटी गुन्ह्यातील पिडीतांना त्वरीत अर्थसहाय्य द्या - जिल्हाधिकारी विनय गौडा

 

ॲट्रॉसिटी गुन्ह्यातील पिडीतांना त्वरीत अर्थसहाय्य द्या - जिल्हाधिकारी विनय गौडा

Ø जिल्हा दक्षता व नियंत्रण समितीची सभा

चंद्रपूरदि. 24 : अनुसूचित जाती / जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत (ॲट्रॉसिटी) दाखल झालेल्या गुन्ह्यातील पिडीतांना त्वरीत अर्थसहाय्य उपलब्ध करून देण्यासाठी नियोजन करावे, अशा सुचना जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. यांनी दिल्या.

जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हा दक्षता व नियंत्रण समितीच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी उपविभागीय पोलिस अधिकारी एस.पी. नंदनवार, विशेष गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक शिवाजी कदम, सहाय्यक आयुक्त (समाजकल्याण) अमोल यावलीकर, परीविक्षा अधिकारी दिवाकर महाकाळकर, सहाय्यक पोलिस निरीक्षक छाया येलकेवाड, विधिज्ञ प्रशांत घटुवार आदी उपस्थित होते.

यावेळी जिल्हाधिकारी श्री. गौडा म्हणाले, न्यायालयात प्रलंबित असलेली प्रकरणे लवकरात लवकर निकाली काढण्यासाठी योग्य नियोजन करावे. त्यासाठी आवश्यक कागदपत्रे त्वरीत गोळा करावीत. अर्थसहाय्याच्या प्रस्तावाची वाट पाहण्यापेक्षा ते संबंधित यंत्रणेने स्वत:हून पुढाकार घेऊन जमा करावे.  व याबाबत योग्य कार्यवाही करून पिडीतांना तातडीने अर्थसहाय्य मिळवून द्यावे, अशा सूचना त्यांनी दिल्या.

अनुसूचित जाती / जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत सुरवातीपासून आतापर्यंत एकूण 1628 गुन्ह्यांची नोंद झाली आहे. पोलिस तपासावर 21 गुन्हे, पोलीस फायनल 130 गुन्हे, न्यायप्रविष्ट 1440 गुन्हे असून यात निकाल लागलेल्या गुन्ह्यांची संख्या 1119 तर न्यायालयात प्रलंबित गुन्ह्यांची संख्या 321 आहे. जिल्ह्यात 1 एप्रिल 2022 ते 28 फेब्रुवारी 2023 या कालवधीत एकूण 71 गुन्ह्यांची नोंद आहे. यात अनुसूचित जातीचे 46 तर अनुसूचित जमातीअंतर्गत 25 गुन्हे आहेत. तर या कालावधीतील 62 प्रकरणे अर्थसहाय्यासाठी पात्र ठरली असून अर्थसहाय्य मंजूर झालेल्या प्रकरणांची संख्या 33 असल्याची माहिती सहाय्यक आयुक्त श्री. यावलीकर यांनी दिली.

००००००

जागतिक क्षयरोग दिनाचे औचित्य साधून उत्कृष्ठ कार्य करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा गौरव





 

जागतिक क्षयरोग दिनाचे औचित्य साधून उत्कृष्ठ कार्य करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा गौरव

चंद्रपूर दि. 24 : जागतिक क्षयरोग दिनाचे औचित्य साधून जिल्हा परिषद येथील कन्नमवार सभागृहात फ्लोरेन्स नाईट अँगल गौरव पुरस्कारराष्ट्रीय कुटुंब कल्याण पुरस्कार व राष्ट्रीय दूरीकरण कार्यक्रम पुरस्कार वितरण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक जॉन्सनजिल्हा शल्य चिकित्सक डॉ. महादेव चिंचोलेजिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.राजकुमार गहलोतजिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. प्रकाश साठेनिवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. हेमचंद्र कन्नाकेमनपाच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. वनिता गर्गेलवार आदी प्रामुख्याने उपस्थित होते.

मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक जॉन्सन म्हणालेक्षयरुग्णांना औषधोपचार दिल्या जाते. परंतु त्यांची  आर्थिक व सामाजिक स्थिती बघून योग्य पुनर्वसनाची आवश्यकता असल्याचे ते म्हणाले. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.राजकुमार गहलोत यांनी क्षयरोगाचे दूरीकरण करण्याकरीता विविध उपाययोजना प्रभावीपणे प्रभावीपणे राबविण्याकरीता मार्गदर्शन केले. तर जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. चिंचोले यांनी उपस्थितांना क्षय रोगाबाबत माहिती दिली.

15 ते 31 मार्च 2023 या कालावधीत क्षयरोग पंधरवडा साजरा करण्यात येत असून जिल्हास्तरावर क्षयरोग जनजागृतीकरीता विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत आहे. जागतिक क्षयरोग दिनानिमित्त क्षयरोग केंद्रचंद्रपूर येथून जनजागृती रॅलीचे आयोजन करण्यात आले. रॅलीचे उद्घाटन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. महादेव चिंचोले यांच्या हस्ते पार पडले. याप्रसंगी रेडक्रॉस सोसायटीचे सचिव डॉ. मंगेश गुलवाडेजिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. प्रकाश साठेनिवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. हेमचंद कन्नाके आदी प्रामुख्याने उपस्थित होते. मान्यवरांनी हिरवी झेंडी दाखवून रॅलीची सुरुवात केली. सदर रॅलीमध्ये जिल्हा सामान्य रुग्णालयप्रभादेवी नर्सिंग महाविद्यालयचंद्रपूर येथील वैद्यकीय अधिकारीविद्यार्थीसेवाभावी संस्थांचे पदाधिकारी तसेच जिल्हा क्षयरोग केंद्रातील अधिकारी व कर्मचारी सहभागी झाले होते.

यावेळी उत्कृष्ट टीबी नोटिफिकेशन केल्याबद्दल डॉ. शरयू पाझारेडॉ. सौरभ राजूरकरडॉ. आनंद बेंडले या खाजगी वैद्यकीय व्यावसायिकांना सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. तसेच प्रधानमंत्री टीबी मुक्त भारत अभियानांतर्गत संस्था व खाजगी वैद्यकीय व्यावसायिकांनी गरजू क्षयरुग्णांना कोरडा आहाराची किट वितरीत करून सहकार्य केल्याबद्दल सन्मानित करण्यात आले. त्यासोबतच जिल्ह्यात उत्कृष्ट कार्य करणारे क्षयरोग पथक ब्रह्मपुरी येथील तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. विकास दूधपचारेविलास लेंनगुरेराजीव खोब्रागडेराजुरा वैद्यकीय अधीक्षक डॉ. लहुजी कुळमेथे यांना तसेच डॉ.भूपेंद्र लोढिया यांना संशयित रुग्णांची माहिती दिल्याबद्दल सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले.

यावेळी क्षयरोगाची जनजागृती करण्याकरीता चित्रकला व निबंध स्पर्धारांगोळी स्पर्धाप्रश्नमंजुषा आदी स्पर्धा घेण्यात आल्या व यामध्ये यशस्वी विद्यार्थ्यांना प्रशस्तीपत्र देण्यात आले. तसेच उत्कृष्ट क्षयरोग कर्मचारी म्हणून जिल्हास्तरावर डॉ. तेजस्विनी ताकसांडेकिशोर माणूसमारेस्वाती चव्हाण यांना गौरविण्यात आले. कार्यक्रमाचे संचालन हेमंत महाजन तर कार्यक्रम यशस्वी करण्याकरीता जिल्हा क्षयरोग केंद्रातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले.

००००००००