Search This Blog

Friday, 3 March 2023

युवाशक्तीचा वापर देशाच्या विकासासाठी व्हावा -डॉ. विजय आईंचवार



 युवाशक्तीचा वापर देशाच्या विकासासाठी व्हावा -डॉ. विजय आईंचवार

Ø जिल्हास्तरीय पडोस युवा संसद कार्यक्रम

चंद्रपूर,दि. 3: देशात युवावर्ग मोठ्या प्रमाणावर असून  युवापिढी ही या देशाची खरी ताकद आहे. युवा शक्तीमध्ये भरपूर ताकद, सहनशीलता, सृजनशीलता व समजण्याची शक्ती असून या शक्तीचा वापर देशाच्या विकासासाठी व चांगला नागरिक घडविण्यासाठी व्हावा, असे मत गोंडवाना विद्यापिठाचे माजी कुलगुरु डॉ. विजय आईंचवार यांनी व्यक्त केले.

जी-20 चे अध्यक्षपद भारताला मिळाल्याच्या पार्श्वभुमीवर केंद्र सरकारच्या निर्देशानुसार नेहरू युवा केंद्र, चंद्रपूर व खेळ मंत्रालय भारत सरकारद्वारा जिल्हास्तरीय पडोस युवा संसद कार्यक्रमाचे आयोजन प्रियदर्शिनी सांस्कृतिक सभागृह, चंद्रपूर येथे करण्यात आले होते. याप्रसंगी ते बोलत होते.

यावेळी सेवानिवृत्त अतिरिक्त जिल्हाधिकारी शफिक अहमद, गोंडवाना विद्यापीठाच्या जिल्हा राष्ट्रीय सेवा योजना अधिकारी डॉ. विजया गेडाम, राजीव गांधी इंजीनियरिंग कॉलेजच्या प्राध्यापक डॉ. अंजुम कुरेशी, आयुर्वेद चिकित्सक डॉ. मनिषा घुगल, नेहरू युवा केंद्राचे जिल्हा समन्वयक समशेर सुभेदार आदी उपस्थित होते.

डॉ. आईचंवार म्हणाले, नेहरू युवा केंद्रामध्ये साधारणतः 18 ते 25 वर्षे वयोगटातील विद्यार्थ्यांचा समावेश आहे. आजची युवापिढी ही देशाचे भविष्य आहे. युवाशक्तीचा देशाच्या विकासासाठी कशाप्रकारे वापर केला जाईल, या सर्व गोष्टीचे प्रशिक्षण देण्यासाठी, व त्याचा अभ्यास करण्यासाठी ही युवा संसद आहे. या युवा संसदेच्या माध्यमातून युवकांना वेगवेगळ्या विषयांवर चर्चा करण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करून दिले आहे. विद्यार्थ्यांना सर्व गोष्टीचे ज्ञान असणे आवश्यक आहे. विद्यार्थ्यांनी सकारात्मक भूमिका स्वीकारावी. विद्यार्थ्यांनी स्वतःबद्दलचा आत्मविश्वास, ध्येयपूर्तीसाठी आत्मनिर्भरता व स्वतःबद्दल आत्मसन्मान व स्वाभिमान या तीन गोष्टी महत्त्वाच्या आहे. त्यासोबतच सुसंवाद, कार्य करतांना सामूहिकरित्या कार्य करण्याची आवड व समन्वयाची भावना असावी तसेच देशाचा चांगला नागरिक घडण्याच्या दृष्टीने कृती करण्याचे आवाहन त्यांनी केले.

सेवानिवृत्त अतिरीक्त जिल्हाधिकारी शफीक अहमद म्हणाले, जी-20 शिखर परिषदेचे हे 18 वर्ष आहे. नागपूरमध्ये जी-20 ची तयारी मोठया उत्साहात सुरु आहे. यामध्ये एकुण 19 देश व युरोपियन संघाचा समावेश आहे. या शिखर परीषदेत देशातंर्गत अर्थव्यवस्था, व्यापार, आरोग्य, कृषी, ग्लोबल वार्मिंग, पर्यावरण, हवामान बदल आदी विषयावर चर्चा व समस्या निराकरण करण्यात येणार आहे.

प्रस्ताविकेत समशेर सुभेदार म्हणाले, नेहरू युवा केंद्र संघटन, युवा कार्यक्रम आणि खेळ मंत्रालय भारत सरकारच्या अखत्यारित येणारी स्वायत्त संस्था आहे. या संस्थेचा एकमेव उद्देश म्हणजे ग्रामीण भागातील युवकांना राष्ट्रनिर्माणाच्या कार्यात वळविण्याचा आहे. युवा संसद म्हणजे ग्रामीण भागातील युवकांना त्याचे मत मांडण्यासाठी मंच प्रदान करणे असून त्यांच्या कलागुणांना वाव मिळावा या हेतूने ही युवा संसद आयोजित करण्यात आली आहे.

कार्यक्रमाचे संचलन मकसूद खान तर आभार नेहरू युवा केंद्राचे नजीर कुरेशी यांनी मानले. तत्पूर्वी, कार्यक्रमाची सुरुवात महात्मा गांधी यांच्या प्रतिमेस माल्यार्पन व दीप प्रज्वलन करून करण्यात आली. कार्यक्रमाला राष्ट्रीय सेवा योजनेचे प्राध्यापक तथा विद्यार्थी-विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

००००००

No comments:

Post a Comment