मतदार यादीत नाव नोंदणी न केलेल्या नागरीकांनी नमुना-6 मधील अर्ज त्वरीत भरून द्यावे
चंद्रपूर,दि. 29 : आगामी लोकसभा/विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या पूर्वी विधानसभा मतदारसंघाच्या याद्या अद्यावत व चुका विरहित तयार करण्याच्या दृष्टीने प्रयत्न करण्यात येत आहे. त्यानुसार 71-चंद्रपूर विधानसभा मतदारसंघात 8 हजार 897 मतदाराचे एकापेक्षा अधिक ठिकाणी समान नोंदी असून 15 हजार 580 मतदाराचे मतदार यादीत अस्पष्ट फोटो व 80 वर्षाच्यावरील 6 हजार 959 मतदार आहेत. विधानसभा मतदारसंघातील 3 लक्ष 57 हजार 554 मतदारापैकी 2 लक्ष 1 हजार 562 मतदाराचे आधार क्रमांकाशी जोडणी झालेली नाही.
तसेच 72-बल्लारपूर विधानसभा मतदारसंघातील चंद्रपूर तालुका कार्यक्षेत्रातील मतदार यादी भागात 1 हजार 932 समान नोंदी असलेले मतदार, 3084 अस्पष्ट फोटो असलेले मतदार व 80 वर्षाच्यावरील 851 मतदार आहेत. तसेच एकूण 58 हजार 302 मतदारांपैकी 29 हजार 688 मतदार आधार क्रमांकाशी जोडणी करण्यास शिल्लक आहेत.
मतदान केंद्रस्तरीय अधिकारी यांच्यामार्फतीने समान नोंदी असलेले मतदार, मतदार यादीत अस्पष्ट फोटो असलेले मतदार तसेच 80 वर्षाच्या वरील मतदार यांची प्रत्यक्षात पडताळणी करण्यात येत आहे. तसेच आधार क्रमांकाशी जोडणी न झालेले मतदार यांच्याकडून नमुना 6-ब भरून घेणार आहे. त्याचबरोबर 18 वर्षाच्यावरील ज्या पात्र नागरीकांनी अद्यापही मतदार यादीत नावाची नोंदणी केलेली नाही, अशा मतदारांनी नमुना-6 मधील अर्ज संबंधित मतदान केंद्रस्तरीय अधिकारी यांच्याकडे भरून द्यावेत. तसेच मतदारांनी मतदान केंद्रस्तरीय अधिकारी यांना आवश्यक ते सहकार्य करण्याचे आवाहन मतदार नोंदणी अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी मुरुगानंथम एम. यांनी केले आहे.
००००००
No comments:
Post a Comment