Search This Blog

Tuesday 30 November 2021

जिल्ह्यातील जातीवाचक नावे बदलण्याची कार्यवाही संबंधित यंत्रणांनी तातडीने करावी -अपर जिल्हाधिकारी विद्युत वरखेडकर




 जिल्ह्यातील जातीवाचक नावे बदलण्याची कार्यवाही

संबंधित यंत्रणांनी तातडीने करावी

-अपर जिल्हाधिकारी विद्युत वरखेडकर

चंद्रपूर दि. 30 नोव्हेंबर : जिल्ह्यातील गावे, वस्ती आणि रस्त्यांची नावे  जातीवाचक असल्यास ती बदलून अशा सर्व गावे, वस्ती व रस्त्यांना महापुरुष व लोकशाही मूल्यांशी निगडीत नावे देण्यात यावी, यासाठी अशा प्रकारची जातीवाचक नावे ओळखून संबंधित नावे बदलण्यासाठी यंत्रणांनी तातडीने कार्यवाही करावी. असे निर्देश अपर जिल्हाधिकारी विद्युत वरखेडकर यांनी दिले. जिल्हाधिकारी कार्यालयातील वीस कलमी सभागृहात सामाजिक न्याय विभागामार्फत आयोजित बैठकीत त्या बोलत होत्या.

यावेळी, समाजकल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त अमोल यावलीकर,जिल्हा नेत्र शल्यचिकित्सक डॉ. जी. एल. दुधे, पोलीस निरीक्षक राजू मेढे, नगर प्रशासन अधिकारी अजित कुमार डोके, विधी अधिकारी अनिल तानले, न.प. बल्लारपूरच्या कार्यालय अधीक्षक संगीता उमरे प्रामुख्याने उपस्थित होते.

संबंधित यंत्रणांनी त्यांच्या कार्यक्षेत्रात एकही गाव, वस्ती व  रस्ते आदींना जातीवाचक नाव नाही अशी नावे कार्यालयाला पाठवावीत. असे सांगून श्रीमती वरखेडकर म्हणाल्या, तहसीलदार,नगरपालिकांचे मुख्याधिकारी, गट विकास अधिकारी यांनी त्यांच्या कार्यक्षेत्रातील जातीवाचक नावांची माहिती द्यावी. महानगरपालिका, नगरपालिका क्षेत्रात तसेच ग्रामीण भागातील आयडेंटिफाय झालेली यादी व नावे तसेच त्या संदर्भात केलेल्या कार्यवाहीचे प्रस्ताव समाजकल्याण विभागाकडे पाठवावे. व समाज कल्याण विभागाला सहकार्य करावे.

यावेळी श्रीमती विद्युत वरखेडकर यांनी जिल्हा दक्षता व नियंत्रण समितीचा आढावा घेतला.

00000

दावे व हरकतीबाबत आक्षेप, तक्रारीसंदर्भात जिल्हा प्रशासनाकडून 8149557108 व्हाट्सअँप क्रमांक कार्यान्वित

 दावे व हरकतीबाबत आक्षेप, तक्रारीसंदर्भात जिल्हा प्रशासनाकडून     8149557108 व्हाट्सअँप क्रमांक कार्यान्वित

Ø नागरिकांच्या शंकाचे होणार निरसन

चंद्रपूर दि. 30 नोव्हेंबर : 1 जानेवारी 2022 या अहर्ता दिनांकावर आधारित छायाचित्रासह मतदार यादीचा विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम भारत निवडणूक आयोगाने घोषित केला आहे. आयोगाच्या निर्देशानुसार, दावे व हरकती स्विकारण्याचा कालावधी 1 ते 30 नोव्हेंबर 2021 पर्यंत आहे. दावे व हरकती सोमवार, दि. 20 डिसेंबर 2021 पर्यंत निकालात काढण्यात येतील. तर बुधवार दि. 5 जानेवारी 2022 रोजी मतदार यादीची अंतिम प्रसिद्धी करण्यात येईल.

दावे व हरकतीबाबत काही आक्षेप तथा तक्रारी संदर्भात जिल्ह्यासाठी 8149557108 हा व्हाट्सअँप क्रमांक कार्यान्वित करण्यात आला आहे. यावर निवडणुकीसंबंधी संदेश सुद्धा स्वीकारले जातील. मतदारांना या क्रमांकावर तक्रारी दाखल करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली असून त्यांच्या शंकाचे निरसन करून घेता येईल. तसेच 1950 हा टोल फ्री क्रमांक सुद्धा उपलब्ध करून देण्यात आला आहे.

तरी, ज्या मतदारांची नावे मतदार यादीत समाविष्ट नाहीत अशा नागरिकांनी नजीकच्या मतदान केंद्रावर जाऊन मतदार यादीत आपले नाव नोंदणी करून घ्यावे व उपलब्ध संधीचा अवश्य लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी केले आहे.

00000

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना जास्तीत जास्त मदत मिळवून देऊ - मदत व पुनर्वसन मंत्री वड़ेट्टीवार

 








नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना जास्तीत जास्त मदत मिळवून देऊ

- मदत व पुनर्वसन मंत्री वड़ेट्टीवार

राज्य सरकारचे शेतकऱ्यांच्या हिताला सर्वोच्च प्राधान्य

- कृषीमंत्री भुसे

Ø पालकमंत्री व कृषीमंत्र्यांनी बांधावर जावून जाणून घेतल्या शेतकऱ्यांच्या व्यथा

Ø अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानग्रस्त पिकाची पाहणी

Ø आढावा बैठकीत कृषी विभागाला खड़सावले

चंद्रपूर, दि. 30 : पंधरा दिवसांपूर्वी आलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांच्या शेतातील धानाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामुळे चिंताग्रस्त असलेल्या शेतकऱ्यांच्या डोळ्यातील अश्रू पुसून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना जास्तीत जास्त मदत मिळवून देऊ, असा विश्वास राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री विजय वड़ेट्टीवार यांनी दिला. तर सिंदेवाही, सावली, मूल, पोंभुर्णा तालुक्यात अतिवृष्टिमुळे नष्ट झालेल्या पिकांची आज पाहणी केली. ज्यांचे नुकसान झाले आहे, अशा शेतकऱ्यांच्या मागे राज्य सरकार खंबीरपणे उभे असून शेतकरी हिताला सर्वोच्च प्राधान्य आहे, असे मत राज्याचे कृषीमंत्री दादाजी भूसे यांनी व्यक्त केले.

सिंदेवाही, सावली, मूल तालुक्यातील आठ ते दहा गावात अतिवृष्टीने नुकसान झालेल्या पिकांची पाहणी करतांना मंत्रीद्वय बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी अजय गुल्हाने, मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष संतोषसिंह रावत, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी भाऊसाहेब बऱ्हाटे आदी उपस्थित होते.

पुढे बोलतांना पालकमंत्री म्हणाले, गत 15 दिवसापूर्वी सावली, सिंदेवाही, पोंभुर्णा व मूल आदी भागात अतिवृष्टी सदृश्य परिस्थिती असल्यामुळे संपूर्ण धान नष्ट झाले. शेतकऱ्यांना सावरायलाही वेळ मिळाला नाही. शेतकऱ्यांचे संकट अतिशय मोठे आहे. याबाबत मंत्रिमंडळात विषय मांडून कृषिमंत्र्यांना नुकसानग्रस्त पिकांची पाहणी करण्यासाठी विनंती केली. त्यांनी लगेच होकार देत आज जिल्ह्यातील नुकसानग्रस्त धानाची पाहणी केली. शेतकऱ्याचे संपूर्ण बजेट कोलमडले आहे. राज्याचा मदत व पुनर्वसन मंत्री म्हणून मी आणि कृषिमंत्री शेतकऱ्यांना जास्तीत जास्त मदत मिळवून देण्यासाठी कटिबद्ध आहोत. खरीप हंगाम तर हातातून गेला. मात्र, रब्बी हंगामात शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी ज्वारी, हरभरा अल्पदरात त्वरित उपलब्ध करून देऊ. येत्या तीन ते चार दिवसात अल्पदरात बियाण्यांचे वाटप करण्याच्या सूचना जिल्हा प्रशासन व कृषी विभागाला दिल्या आहे.

राज्य सरकार शेतकऱ्यांच्या पाठीमागे भक्कमपणे उभे आहे. हातातील धान गेल्यामुळे 31 डिसेंबर पर्यंत असलेली धान खरेदीची मुदत फेब्रूवारी महिन्याअखेरपर्यंत वाढवून द्यावी, अशी मागणी पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी कृषिमंत्र्यांना केली. तसेच या परिसरात रानडुकरांचा शेतमालाला प्रचंड त्रास आहे. शेतातील उभे पीक रानडुक्कर नष्ट करत असल्यामुळे डुकरांना मारण्याचा धोरणात्मक निर्णय घ्यावा, अशा सूचनाही पालकमंत्र्यांनी केल्या.

संपूर्ण पाहणी झाल्यानंतर मूल येथील उपविभागीय अधिकारी कार्यालयात झालेल्या आढावा बैठकीत ग्राम स्तरावरील यंत्रणेच्या कामकाजाबद्दल पालकमंत्र्यांनी नाराजी व्यक्त केली. ज्या गावात नुकसान झाले आहे, तेथील पंचनामे तातडीने पूर्ण करून दोन दिवसात अहवाल सादर करावा. शेतकरी अडचणीत असतांना ग्रामीण यंत्रणा कामात हलगर्जीपणा करत असेल तर खपवून घेणार नाही. संबंधित अधिकारी - कर्मचा-यांवर कठोर कार्यवाही करण्यात येईल, असा इशारा त्यांनी दिला.

कृषिमंत्री श्री. दादाजी भुसे म्हणाले, चंद्रपूर जिल्ह्यातील आठ ते दहा गावांमध्ये जिल्ह्याचे पालकमंत्री श्री. वडेट्टीवार आणि संपूर्ण यंत्रणेसह दौरा केला. शेतकऱ्याच्या बांधावर जाऊन प्रत्यक्ष पाहणी केली असता तोंडाशी आलेला घास अवकाळी पावसाने हिरावून घेतला आहे. प्रशासनाने याची दखल घेतली असून पंचनामे पूर्ण करण्याचे आदेश देण्यात आले आहे. येणार्‍या मंत्रिमंडळ बैठकीत हा विषय राज्याचे मुख्यमंत्री श्री. उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात व इतर सर्वांसमोर मांडून शेतकऱ्यांना मदत दिली जाईल. शेतकरी हिताला राज्य शासनाचे प्राधान्य आहे. ज्याचे नुकसान झाले आहे, त्यांच्या पाठीमागे सरकार खंबीरपणे उभे असून संपूर्ण मदत मिळवून देऊ अशी ग्वाही कृषिमंत्री यांनी दिली.

यावेळी मंत्रीद्वयांच्या हस्ते चिमढा येथे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या शेतकरी कल्याण निधी योजनेतून कॅन्सरग्रस्त विनोद वाढई आणि प्रभाकर लेनगुरे यांना तसेच टेकाडी येथील यशोदा कोटरंगे या कॅन्सरग्रस्त महिलेला प्रत्येकी 30 हजार रुपयांचा धनादेश देण्यात आला.

पालकमंत्री श्री. वड़ेट्टीवार आणि कृषी मंत्री श्री. भूसे यांनी सर्व यंत्रणेसह सिंदेवाही तालुक्यातील मेंढा (माल) येथील शंकर रावजी रामटेके, तांबेगढ़ी (मेंढा) येथील रामदास बाबूराव मंगाम, तांबेगढ़ी, पालेबारसा येथील पुष्पावती तुमराम,मंगरमेंढा येथील राजेंद्र वागरे, मुंडाळा येथील काशीनाथ डाचेवार, चिमढा येथील उत्तम लेनगुरे, टेकाडी येथील निर्मला मेश्राम यांच्या शेतातील नुकसानग्रस्त धानाची पाहणी केली. तत्पुर्वी मंत्री महोदयांनी सिंदेवाही येथील विभागीय कृषी संशोधन केंद्राला भेट दिली.

यावेळी सावलीचे तहसीलदार परीक्षित पाटील, सिंदेवाहीचे तहसीलदार गणेश जगदाळे, गटविकास अधिकारी संजय पूरी, उपविभागीय कृषी अधिकारी सोनाली गजबे, कृषी विकास अधिकारी लक्ष्मीनारायण दोडके, तालुका कृषी अधिकारी अनिल महाले, मेंढा (माल) च्या सरपंच श्रद्धा गुरनुले यांच्यासह गावकरी उपस्थित होते.

00000

Friday 26 November 2021

अवैध रेती उत्खनन व वाहतूक प्रकरणी 5 वाहनांवर कार्यवाही

 

अवैध रेती उत्खनन व वाहतूक प्रकरणी 5 वाहनांवर कार्यवाही

चंद्रपूर दि. 26 नोव्हेंबर: जिल्हा भरारी पथकाने दि. 22 नोव्हेंबर रोजी रात्री 11 वाजता नागभीड - ब्रह्मपुरी हायवे रोड, मौजा नागभीड येथे तर सकाळी 4.30 वाजता चंद्रपूर-गडचिरोली हायवे रोड मौजा चिचपल्ली येथे अवैध रेती वाहतूक करणाऱ्या एकूण पाच वाहनांवर जप्तीची  कारवाई करण्यात आली. सदर कारवाई अपर जिल्हाधिकारी विद्युत वरखेडकर यांच्या मार्गदर्शनात करण्यात आली.

नागपूर रहिवासी अमोल भोंदे यांच्या मालकीचे हायवा ट्रक क्र. एमएच-40/ एके-8190, उमरेड जि. नागपूर येथील कैलाश सपाटे यांच्या मालकीचे हायवा ट्रक क्र. एमएच-40/ एके-7116 तर प्रतीक निदवानसा यांच्या मालकीचे हायवा ट्रक क्र. एमएच-36/ एए-0112 हि वाहने नागभीड-ब्रह्मपुरी हायवे रोड, मौजा नागभीड येथे  तर अजयपुर येथील मधुकर मेश्राम यांच्या मालकीचे दोन हायवा ट्रक क्र. एमएच-34-4485 व एमएच-34 बीजी-5540 हि वाहने चंद्रपूर-गडचिरोली हायवे रोड, मौजा चिचपल्ली येथे सदर वाहनांची तपासणी केली असता अवैध रेती उत्खनन करून वाहतूक करीत असल्याचे स्पष्ट झाले. सदर पाचही वाहनांवर जप्तीची कार्यवाही करण्यात आली आहे. प्रती वाहन 2 लक्ष 55 हजार 500 याप्रमाणे दंड आकारण्यात आला असून एकूण 12 लक्ष 77 हजार 500 रुपये दंडाची वसुली कार्यवाही करण्यात येत आहे. असे जिल्हा खनिकर्म अधिकारी यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे.

00000

मत्स्यव्यवसाय विभागाकडुन तालुकास्तरावर किसान क्रेडिट कार्ड मेळाव्याचे आयोजन

 

मत्स्यव्यवसाय विभागाकडुन तालुकास्तरावर किसान क्रेडिट कार्ड

मेळाव्याचे आयोजन

Ø मच्छीमारांच्या आर्थिक प्रगतीकरिता किसान क्रेडिट कार्ड योजना

चंद्रपूर दि. 26 नोव्हेंबर: केंद्र शासनाकडून सामान्य मच्छीमारांच्या आर्थिक प्रगतीकरिता किसान क्रेडिट कार्ड योजना राबविण्याचा निर्णय शासनस्तरावरून घेण्यात आला आहे. या कल्याणकारी योजनेच्या माध्यमातून चंद्रपूर जिल्ह्यातील मच्छिमार तसेच खाजगी मत्स्यसंवर्धक यांना मत्स्यव्यवसायाकरिता लागणारे आवश्यक भांडवली साहित्य जसे की, मासेमारीकरिता वापरण्यात येणारी सामुग्री, मत्स्यबीज, मत्स्यखाद्य, खते आदी साहित्य खरेदीकरिता किसान क्रेडिट कार्डच्या माध्यमातून सहज भांडवल उभारणे शक्य होऊ शकेल. त्याकरिता इच्छुक मत्स्यसंवर्धकांनी त्यांचे स्वतःचे खाते असलेले राष्ट्रीयीकृत बँक अथवा सहकारी बँकेशी संपर्क साधून बँकेला अर्ज सादर करावा. किसान क्रेडिट कार्डचा लाभ देण्याकरिता जिल्ह्यातील विविध बँका व मत्स्यव्यवसाय विभागाच्या समन्वयाने तालुकास्तरावर किसान क्रेडिट कार्ड मेळाव्याचे आयोजन करण्यात येत आहे. सदर मेळाव्यात इच्छुकांकडून थेट अर्ज भरून घेण्यात येणार आहे.

इच्छुक मत्स्यसंवर्धक, मच्छिमार, मत्स्यपालन सहकारी संस्था, बचतगट यांनी किसान क्रेडिट कार्ड मिळवण्यासाठी आधारकार्ड, पॅनकार्ड, शेतीचा सातबारा, तलाव, जलाशय करारपत्र व इतर आवश्यक  कागदपत्रे घेऊन मेळाव्यात उपस्थित रहावे. किसान क्रेडिट कार्ड मार्फत कर्ज प्राप्त करण्यासाठी बँकेच्या विहित अटी व शर्तींची पूर्तता करून लाभार्थी मत्स्यसंवर्धकास योजनेचा लाभ घेता येईल.

तरी, चंद्रपूर जिल्ह्यातील जास्तीत जास्त मत्स्यसंवर्धक, मच्छिमार, मत्स्यपालन सहकारी संस्था, बचतगट यांनी केंद्र शासनाच्या कल्याणकारी किसान क्रेडिट कार्ड योजनेचा लाभ घेऊन आपल्या व्यवसायामध्ये भांडवली खर्चाची व्यवस्था करण्याबाबतचे आवाहन मत्स्यव्यवसाय विभागाचे सहाय्यक आयुक्त श्री. बळकटे यांनी केले आहे.

या ठिकाणी होणार मेळाव्याचे आयोजन:

सदर मेळाव्याचे आयोजन नागभीड येथे दि.3 डिसेंबर 2021 रोजी सकाळी 10 वाजता, पंचायत समिती नागभीड, दि. 10 डिसेंबर रोजी  पंचायत समिती, बल्लारपूर, दि. 17 डिसेंबर रोजी पंचायत समिती पोंभूर्णा तर दुपारी 2 वाजता गोंडपिंपरी, दि. 24 डिसेंबर रोजी पंचायत समिती, सावली तर दुपारी 2 वाजता पंचायत समिती मुल, दि.31 डिसेंबर 2021 रोजी जिल्हा परिषद शाळा सिदेंवाही, दि. 7 जानेवारी 2022 रोजी पंचायत समिती चिमूर, दि. 14 जानेवारी 2022 रोजी पंचायत समिती गडचांदूर तर दि. 21 जानेवारी 2022 रोजी सकाळी 10 वाजता पंचायत समिती ब्रह्मपुरी येथे आयोजित केले जाणार आहे.

00000

शुक्रवारी जिल्ह्यात 3 कोरोनामुक्त, 1 बाधित

 

शुक्रवारी जिल्ह्यात 3 कोरोनामुक्त, 1 बाधित

Ø ॲक्टीव्ह रुग्णांची संख्या 10

चंद्रपूर, दि. 26 नोव्हेंबर : गत 24 तासात जिल्ह्यात 3 जणांनी कोरोनावर मात केली आहे. त्या रुग्णांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली. तसेच 1 नवीन रुग्ण बाधीत झाला आहे. जिल्ह्यात शुक्रवारी मृत्यू संख्या शून्य आहे.

आरोग्य विभागाकडून प्राप्त अहवालानुसार, बाधित आलेल्या रुग्णांमध्ये चंद्रपूर महानगरपालिका क्षेत्रात 1 रुग्ण आढळला असून चंद्रपूर, बल्लारपूर, भद्रावती, ब्रह्मपुरी, नागभीड, सिंदेवाही, मुल, सावली, पोंभूर्णा, गोंडपिपरी, राजुरा, चिमूर, वरोरा, कोरपना, जिवती व इतर  ठिकाणी बाधित रुग्णांची संख्या शून्य आहे.

जिल्ह्यात आतापर्यंत एकूण बाधितांची संख्या 88 हजार 846 वर पोहोचली आहे. तसेच सुरवातीपासून आतापर्यंत बरे झालेल्यांची संख्या 87 हजार 293 झाली आहे. सध्या 10 बाधितांवर उपचार सुरू आहेत. आतापर्यंत 7 लाख 59 हजार 477 नमुन्यांची तपासणी करण्यात आली असून त्यापैकी 6 लाख 69 हजार 203  नमुने निगेटीव्ह आले आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत 1543 बाधितांचे मृत्यू झाले आहे.

प्रशासनाचे आवाहन : नागरिकांनी कोरोना पुर्णपणे संपला या मानसिकतेतून बाहेर यावे आणि मास्कचा वापर, वारंवार हात धुणे व सुरक्षीत अंतर राखणे या त्रीसुत्रीचा नियमित वापर करावा, स्वत:ची काळजी घ्यावी तसेच पात्र सर्व नागरिकांनी जवळच्या केंद्रावरून कोरोनाची लस घ्यावी, व प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी केले आहे.

00000

ब्रम्हपुरी क्षेत्राच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध - पालकमंत्री विजय वड़ेट्टीवार

 





ब्रम्हपुरी क्षेत्राच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध

- पालकमंत्री विजय वड़ेट्टीवार

Ø अंदाजीत नऊ कोटींच्या विविध विकासकामांचे भूमिपूजन

चंद्रपूर, दि. 26 नोव्हेंबर: कोरोनामुळे गत दोन वर्षांपासून विकास कामांची गती काही प्रमाणात संथ झाली होती. आता मात्र, राज्यशासन कोरोनाच्या संकटावर मात करून विकासाकडे अग्रेसर झाले आहे. या क्षेत्राचा लोकप्रतिनिधी म्हणून विकास कामांसाठी आपण सदैव कटिबद्ध आहोत, अशी ग्वाही राज्याचे मदत व पुनर्वसन, आपत्ती व्यवस्थापन मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री विजय वड़ेट्टीवार यांनी दिली.

ब्रम्हपुरी तालुक्यातील एकारा येथे आदिवासी मोहल्ल्यातील सभागृहाच्या बांधकामाचे व जल शुद्धिकरण केंद्राचे भूमिपूजन करतांना ते बोलत होते. यावेळी जिल्हा परिषद सदस्य प्रमोद चिमुरकर, प्रा. राजेश कांबळे, खेमराज तिड़के, प्रभाकर सेलोकर, पं. स. सदस्य ज्ञानेश्वर कायरकर, मंगला लोनबळे, प्रमोद मोटघरे, उषा भोयर, राम राऊत आदी उपस्थित होते.

आज संविधान दिन आहे. संविधानामुळेच आपली लोकशाही सशक्त असून विकासाची फळे आपण चाखत आहोत, असे सांगून पालकमंत्री श्री. वड़ेट्टीवार म्हणाले, एकारा येथील अंतर्गत रस्त्यासाठी 35 लक्ष रुपये आणि येथे नाट्यगृहासाठी 7 लक्ष रुपये त्वरीत देऊ. पुढील आठवड्यात या दोन्ही कामांना मंजूरी देण्यात येईल. परिसरातील विकासाच्या सर्व समस्या तातडीने सोडवू. येत्या दोन वर्षात ब्रम्हपुरी क्षेत्र विकासात अग्रेसर दिसेल, असेही ते म्हणाले.

अपघातग्रस्त शेतकऱ्याची आस्थेने विचारणा : बोन्द्रा येथे भूमिपूजन झाल्यानंतर, दोन दिवसांपूर्वी बैलाच्या धडकेत अपघातग्रस्त झालेले भूमिहीन शेतकरी अंबादास कोठेवार (वय 65) यांच्या घरी भेट देवून पालकमंत्र्यांनी त्यांची आस्थेने विचारपूस केली. तसेच औषधोपचारासाठी आर्थिक मदत सुद्धा केली. तर भुज येथील जिल्हा परिषद शाळेत संविधान दिनानिमित्त पालकमंत्र्यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला.

विकासकामांच्या भूमिपूजन वेळी भुजचे सरपंच शालू रामटेके, कोसंबीचे सरपंच संगीता जेंठे, वान्द्राचे सरपंच महादेव मड़ावी, उपसरपंच गुरुदेव वागरे, सायगावचे सरपंच प्रतिभा कोडापे, गोगावचे सरपंच जयश्री दोडके आदी उपस्थित होते.

 भूमिपूजन झालेली विकासकामे : यावेळी पालकमंत्री विजय वड़ेट्टीवार यांच्या हस्ते एकारा येथे सभागृहाचे (20 लक्ष रुपये) तसेच जल शुध्दीकरण केंद्र (16 लक्ष), बोंद्रा येथे समाज मंदीर बांधकाम (15 लक्ष), जि. प. शाळा संरक्षण भिंत (15 लक्ष), भुज येथे जलशुध्दीकरण केंद्र (16 लक्ष), सामाजिक सभागृह (30 लक्ष), जि.प.शाळेतील विज्ञान कक्ष (16 लक्ष) आणि शाळेच्या संरक्षण भिंत (14 लक्ष), बुद्ध विहाराचे लोकार्पण (8 लक्ष), वांद्रा येथे जलशुध्दीकरण केंद्र (16 लक्ष), सभागृह बांधकाम (30 लक्ष) आणि वांद्रा -आक्सापूर - पवनपार - सायगाव - कमळगाव - मेंडकीला जोडणारा रस्ता (1.50 कोटी), सायगाव येथे बौध्द समाज मंदीर (15 लक्ष), हनुमान मंदिराजवळ समाज मंदिर (12 लक्ष), कमळगाव येथे जलशुध्दीकरण केंद्र, समाज मंदीर तसेच जि.प.शाळेची संरक्षण भिंत, गोगाव येथे पोच मार्गाचे मजबुतीकरण व डांबरीकरण (70 लक्ष), गांगलवाडी येथे सामाजिक सभागृह, गांगलवाडी प्रा.आ.केंद्र ते राज्य मार्गाला जोडणारा रस्ता, बौध्द मोहल्ल्यातील सभागृह, बरडकिन्ही येथे सामाजिक सभागृह, जलशुध्दीकरण केंद्र, गांगलवाडी - बरडकिन्ही रस्त्यावर लहान पुलाचे पुर्नबांधणी बांधकाम तसेच आरोग्य उपकेंद्र इमारत, आवळगाव येथे जलशुध्दीकरण केंद्र, येथे बौध्द समाज मंदीर, सामाजिक सभागृह आणि जलशुध्दीकरण केंद्र आणि बोडधा येथे जलशुध्दीकरण केंद्राचे भुमिपूजन करण्यात आले.

00000

Thursday 25 November 2021

गुरुवारी जिल्ह्यात 2 कोरोनामुक्त, 1 बाधित

 

गुरुवारी जिल्ह्यात 2 कोरोनामुक्त, 1 बाधित

Ø ॲक्टीव्ह रुग्णांची संख्या 12

चंद्रपूर, दि. 25 नोव्हेंबर : गत 24 तासात जिल्ह्यात 2 जणांनी कोरोनावर मात केली आहे. त्या रुग्णांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली. तसेच 1 नवीन रुग्ण बाधीत झाला आहे. जिल्ह्यात गुरुवारी मृत्यू संख्या शून्य आहे.

आरोग्य विभागाकडून प्राप्त अहवालानुसार, बाधित आलेल्या रुग्णांमध्ये चंद्रपूर महानगरपालिका क्षेत्रात 1 रुग्ण आढळला असून चंद्रपूर, बल्लारपूर, भद्रावती, ब्रह्मपुरी, नागभीड, सिंदेवाही, मुल, सावली, पोंभूर्णा, गोंडपिपरी, राजुरा, चिमूर, वरोरा, कोरपना, जिवती व इतर  ठिकाणी बाधित रुग्णांची संख्या शून्य आहे.

जिल्ह्यात आतापर्यंत एकूण बाधितांची संख्या 88 हजार 845 वर पोहोचली आहे. तसेच सुरवातीपासून आतापर्यंत बरे झालेल्यांची संख्या 87 हजार 290 झाली आहे. सध्या 12 बाधितांवर उपचार सुरू आहेत. आतापर्यंत 7 लाख 58 हजार 66 नमुन्यांची तपासणी करण्यात आली असून त्यापैकी 6 लाख 67 हजार 854 नमुने निगेटीव्ह आले आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत 1543 बाधितांचे मृत्यू झाले आहे.

प्रशासनाचे आवाहन : नागरिकांनी कोरोना पुर्णपणे संपला या मानसिकतेतून बाहेर यावे आणि मास्कचा वापर, वारंवार हात धुणे व सुरक्षीत अंतर राखणे या त्रीसुत्रीचा नियमित वापर करावा, स्वत:ची काळजी घ्यावी तसेच पात्र सर्व नागरिकांनी जवळच्या केंद्रावरून कोरोनाची लस घ्यावी, व प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी केले आहे.

00000

अवैधरित्या रेती उत्खनन व वाहतूक करतांना आढळून आलेल्या वाहनांचा जाहीर लिलाव

 अवैधरित्या रेती उत्खनन व वाहतूक करतांना आढळून आलेल्या वाहनांचा जाहीर लिलाव

चंद्रपूर दि. 25 नोव्हेंबर: चंद्रपूर,तहसील कार्यालयातील पथकाद्वारे अवैधरीत्या रेती उत्खनन व वाहतूक करतांना आढळून आलेल्या वाहनांच्या वाहन मालकावर दंडात्मक कार्यवाही करण्यात आली होती. परंतु, वाहन मालकांनी त्यांच्यावर ठोठावण्यात आलेली दंडाची रक्कम त्यांना वाजवी संधी देऊनही अद्यापपर्यंत सरकार जमा केली नाही. त्यामुळे महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 च्या तरतुदींना अधीन राहून सदर दंडाची रक्कम जमीन महसुलाची थकबाकी म्हणून वसूल करणे अपेक्षित आहे. त्यामुळे सदर वाहनांचा जाहीर लिलाव करण्यात येत आहे, असे तहसीलदार तथा तालुका दंडाधिकारी यांनी कळविले आहे.

00000

केंद्रपुरस्कृत नोकरी करणाऱ्या महिलांसाठी वसतीगृह योजना


केंद्रपुरस्कृत नोकरी करणाऱ्या महिलांसाठी वसतीगृह योजना

चंद्रपूर दि. 25 नोव्हेंबर : महिला व बाल विकास विभागाच्या 23 ऑगस्ट 2021 च्या शासन निर्णयानुसार चंद्रपूर जिल्ह्यात 100, केंद्र पुरस्कृत नोकरी करणाऱ्या महिलांसाठी वसतिगृह ही सुधारित योजना नव्याने सुरू करण्याचे प्रस्तावित आहे. त्या अनुषंगाने  शासन निर्णयानुसार पात्रता धारण करणाऱ्या सक्षम व इच्छुक संस्थांनी त्याबाबतचा प्रस्ताव आवश्यक कागदपत्र व छायाचित्रासह दिनांक 29 नोव्हेंबर 2021 रोजी सायंकाळी 5 वाजेपर्यंत जिल्हा महिला व बालविकास अधिकारी, यांचे कार्यालय जुना कलेक्टर बंगला, आकाशवाणीचे मागे, साईबाबा वार्ड चंद्रपूर येथे तीन प्रतीमध्ये प्रत्यक्ष सादर करावे, असे जिल्हा महिला व बालविकास अधिकारी दिपक बानाईत यांनी कळविले आहे.

00000

आधारभूत खरेदी योजनेअंतर्गत जिल्ह्यातील 35 धान केंद्रांना खरेदीची मंजुरी

 

आधारभूत खरेदी योजनेअंतर्गत जिल्ह्यातील 35 धान केंद्रांना खरेदीची मंजुरी

Ø धान खरेदीला 31 जानेवारी 2022 पर्यंत मान्यता

चंद्रपूर दि. 25 नोव्हेंबर:  खरीप पणन हंगाम 2021-22 मधील शासकीय आधारभूत खरेदी योजनेअंतर्गत जिल्ह्यातील एकूण 35 धान खरेदी केंद्रांना धान खरेदी सुरू करण्यासाठी जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी मंजुरी प्रदान केली आहे. शासन निर्णयानुसार धान खरेदीचा कालावधी दि.1 ऑक्टोबर 2021 ते 31 जानेवारी 2022 पर्यंत निश्चित करण्यात आला आहे.

शासन निर्णयातील नमूद सुचनेनुसार, प्रत्येक गाव एका विशिष्ट खरेदी केंद्रास जोडण्यात आला होता. खरेदी केंद्राशी जोडलेल्या गावातील शेतकऱ्यांना त्याच खरेदी केंद्रावर आपला धान विकणे अनिवार्य होते. तो इतर केंद्रावर धान विक्री करू शकत नव्हता. परंतु शेतकरी हिताच्या दृष्टीने यात सुधारणा करून तालुका हद्दीमध्ये कोणत्याही गावातील शेतकरी शेतकरी त्याच्या इच्छेनुसार तालुक्यातील कोणत्याही खरेदी केंद्रावर धान विक्री करू शकतो.

तरी, ऑनलाईन नोंदणीकृत शेतकऱ्यांनी तालुक्यातील कोणत्याही खरेदी केंद्रावर जाऊन धानाची विक्री करावी. तसेच ऑनलाईन नोंदणी करतेवेळी शेतकऱ्यांनी आधार कार्ड, वोटिंग कार्ड, शेतीचा सातबारा, बँक खाते पासबुक इत्यादी कागदपत्रासह खरेदी केंद्रावर जाऊन नोंदणी करावी व  धानाची नियोजित वेळेत विक्री करावी, असे आवाहन जिल्हा मार्केटिंग अधिकारी अनिल गोगीरवार यांनी केले आहे.

तालुकानिहाय खरेदी केंद्रांची यादी:

सावली तालुक्यातील  विविध कार्यकारी सहकारी संस्था मर्या. सावली व व्याहाळ (खुर्द), किसान सहकारी तांदुळ गिरणी व्याहाळ (बुज), सेवा सहकारी संस्था मर्या,पाथरी. सिंदेवाही तालुक्यातील विविध कार्यकारी सहकारी संस्था मर्या. नवरगाव, नवरगाव सह. राईस मिल, नवरगाव, सेवा सहकारी संस्था मर्या. रत्नापूर, सिंदेवाही सह.भात गिरणी संस्था मर्या. सिंदेवाही. नागभीड तालुक्यातील सह.खरेदी विक्री संस्था मर्या. नागभीड, सेवा सहकारी संस्था मर्यादित तळोधी (बा.), श्री. गुरुदेव सहकारी राईस मिल, कोर्धा. मूल तालुक्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती, मुल व राजोली वि. का.सह. संस्था मर्या. राजोली. चिमूर तालुक्यातील चंद्रपूर जिल्हा कृषी औ. संघ मर्या. चिमूर,  व चिमूर ता. सह.शेतकी ख.वि. संस्था नेरी. बल्लारपूर तालुक्यातील कोरपणा ता.ख.वि. समिती कोरपणा, कोठारी.

गोंडपिपरी तालुक्यातील कोरपणा ता.ख.वि. समिती कोरपणा,ता.गोंडपिपरी. पोंभूर्णा तालुक्यातील कोरपणा ता.ख.वि. समिती कोरपणा, बोर्डा व कृषी उत्पन्न बाजार समिती, पोंभूर्णा. ब्रम्हपुरी तालुक्यातील सेवा सहकारी संस्था पिंपळगाव, आवळगाव, चौगान, अऱ्हेर नवरगाव, चंद्रपूर जिल्हा कृषी औ. संघ, ब्रह्मपुरी, सहकारी खरेदी विक्री संस्था ब्रह्मपुरी, चंद्रपूर जिल्हा कृषी औ. संघ, ब्रह्मपुरी बरडकिन्ही, सेवा सहकारी संस्था मराळमेंढा, उदापूर, तोरगाव (खुर्द) या खरेदी केंद्रावर जाऊन धान खरेदी करावी, असे कळविण्यात आले आहे.

00000

पालकमंत्री वडेट्टीवार चंद्रपूर जिल्ह्याच्या दौ-यावर

पालकमंत्री वडेट्टीवार चंद्रपूर जिल्ह्याच्या दौ-यावर

चंद्रपूर दि. 25 नोव्हेंबर : राज्याचे आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन, खार जमिनी विकास, इतर मागास बहुजन कल्याण विभाग मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार हे 26 नोव्हेंबर रोजी चंद्रपूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहे. त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.

शुक्रवार दि. 26 नोव्हेंबर रोजी सकाळी 9 वाजता ब्रम्हपूरी तालुक्यातील एकारा येथे आदिवासी मोहल्ल्यातील सभागृहाचे तसेच जल शुध्दीकरण केंद्राच्या भुमिपूजन कार्यक्रमास उपस्थिती. सकाळी 11 वाजता बोंद्रा (ता. ब्रम्हपूरी) येथे हनुमान मंदिराजवळील खुल्या जागेत समाज मंदीर बांधकामाचे भुमिपूजन, दुपारी 12 वाजता भुज (ता. ब्रम्हपूरी) येथे जलशुध्दीकरण केंद्र, सामाजिक सभागृह, जि.प.शाळेतील विज्ञान कक्ष आणि शाळेच्या संरक्षण भिंतीच्या बांधकामाचे भुमिपूजन. दुपारी 12.30 वाजता कोसंबी खड (ता. ब्रम्हपूरी)  येथे जलशुध्दीकरण केद्राचे भुमिपूजन.

दुपारी 1 वाजता वांद्रा (ता. ब्रम्हपूरी) येथे जलशुध्दीकरण केंद्र, सभागृह बांधकाम आणि वांद्रा -आक्सापूर - पवनपार - सायगाव - कमळगाव - मेंडकी ला जोडणा-या रस्त्याची सुधारणा कामाचे भुमिपूजन, दुपारी 1.30 वाजता सायगाव येथे दलित वस्तीमध्ये बौध्द समाज मंदीर व हनुमान मंदिराजवळ समाज मंदिराच्या बांधकामाचे भुमिपूजन, दुपारी 2 वाजता कमळगाव (ता. ब्रम्हपूरी) येथे जलशुध्दीकरण केंद्र, समाज मंदीर बांधकामाचे तसेच जि.प.शाळेच्या संरक्षण भिंतीच्या बांधकामाचे भुमिपूजन, दुपारी 2.30 वाजता गोगाव येथे गोगाव पोच मार्गाचे मजबुतीकरण व डांबरीकरणाच्या कामाचे भुमिपूजन, दुपारी 3 वाजता गांगलवाडी (ता. ब्रम्हपूरी) येथे सामाजिक सभागृह, गांगलवाडी प्रा.आ.केंद्र ते राज्य मार्गाला जोडणा-या रस्त्याचे मजबुतीकरण व डांबरीकरण कामाचे भुमिपूजन, बौध्द मोहल्ल्यातील सभागृहाच्या बांधकामाचे भुमिपूजन.

दुपारी 4.30 वाजता बरडकिन्ही (ता. ब्रम्हपूरी)  येथे सामाजिक सभागृह, जलशुध्दीकरण केंद्र, गांगलवाडी - बरडकिन्ही रस्त्यावर लहान पुलाचे पुर्नबांधणी बांधकाम तसेच आरोग्य उपकेंद्र इमारतीच्या बांधकामाचे भुमिपूजन. सायंकाळी 5.30 वाजता आवळगाव येथे जलशुध्दीकरण केंद्राचे भुमिपूजन, सायंकाळी 6 वाजता हळदा (ता. ब्रम्हपूरी) येथे बौध्द समाज मंदीर, सामाजिक सभागृह आणि जलशुध्दीकरण केंद्राचे भुमिपूजन, सायंकाळी 6.30 वाजता बोडधा येथे जलशुध्दीकरण केंद्राचे भुमिपूजन, रात्री 8 वाजता शासकीय विश्रामगृह ब्रम्हपूरी येथे आगमन व राखीव.

शनिवार दि. 27 नोव्हेंबर रोजी सकाळी 10 वाजता गुंजेवाही (ता. सिंदेवाही) येथे सामाजिक सभागृहाच्या बांधकामाचे भुमिपूजन, सकाळी 10.30 वाजता कोटा येथे काँक्रीट रस्त्याचे भुमिपूजन, सकाळी 11 वाजता पवनचक येथे काँक्रीट रस्त्याचे भुमिपूजन, सकाळी 11.30 वाजता सावरगाटा येथे सावरगाटा - मरेगाव ते टकेरी रस्त्याच्या दुरुस्तीच्या कामाचे भुमिपूजन, दुपारी 12.30 वाजता पवनपार येथे जलशुध्दीकरण केंद्र व आरोग्य उपकेंद्राच्या बांधकामाचे भुमिपूजन, दुपारी 1 वाजता मरेगाव येथे दलित वस्तीमध्ये सभागृहाच्या बांधकामाचे भुमिपूजन, दुपारी 1.30 वाजता सिंदेवाही येथे आगमन व राखीव. दुपारी 2 वाजता सिंदेवाही येथे पदाधिका-यांसोबत चर्चा, दुपारी 4.30 वाजता सिंदेवाही वरून सावलीकडे प्रयाण, सायंकाळी 5 वाजता सावली येथे पदाधिका-यांसोबत चर्चा, रात्री 8 वाजता सावली येथून गडचिरोलीकडे प्रयाण.

रविवार दि. 28 नोव्हेंबर रोजी सकाळी 9.15 वाजता डोंगरगाव मस्के (ता. सावली) येथे रस्त्याच्या बांधकामाचे भुमिपूजन, सकाळी 9.30 वाजता गेवरा (बुज) येथे रस्त्याच्या बांधकामाचे भुमिपूजन व तलाठी कार्यालयाचे लोकार्पण, सकाळी 10 वाजता मंगरमेंढा (ता. सावली) येथे लहान पुलाच्या बांधकामाचे तसेच जलशुध्दीकरण केंद्राचे भूमिपूजन, सकाळी 11 वाजता पाथरी येथे तलाठी कार्यालयाचे लोकार्पण, दुपारी 3.30 वाजता गडचिरोलीकडे प्रयाण. 

मंगळवार दिनांक 30 नोव्हेंबर सकाळी 9.30 वाजता मेंढा (ता. सिंदेवाही) येथे अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीच्या संदर्भात शेतीची पाहणी, सकाळी 10.20 वाजता विभागीय कृषी संशोधन केंद्र सिंदेवाही येथे भेट व पाहणी, सकाळी 11 वाजता तांबेगडी (ता. सिंदेवाही) येथे अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीच्या संदर्भात शेतीची पाहणी , सकाळी 11.20 वाजता तांबेगडी येथून उसेरपार - तुकूम कडे प्रयाण.

दुपारी 12 वाजता उसेरपार येथे (ता. सावली) येथे अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीच्या संदर्भात शेतीची पाहणी, दुपारी 12.30 वाजता पालेबारसा येथे अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीच्या संदर्भात शेतीची पाहणी, दुपारी 1 वाजता चिंमडा (ता. मूल) कडे प्रयाण. दुपारी 1.30 वाजता टेकाडी (ता. मूल) येथे अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीच्या संदर्भात शेतीची पाहणी, दुपारी 1.50 वाजता चिंमडा येथे अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीच्या संदर्भात शेतीची पाहणी,

दुपारी 2.15 वाजता शासकीय विश्रामगृह येथे आगमन व राखीव, दुपारी 2.45 वाजता चंद्रपूरकडे प्रयाण, अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या शेतीची / परिसराच्या संदर्भात संबंधित अधिका-यांची दुपारी 3.15 वाजता नियोजन भवन येथे आढावा बैठक, सायंकाळी 5 वाजता चंद्रपूर येथून नागपूरकडे प्रयाण.

00000

Wednesday 24 November 2021

मतदार यादीचा विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम अंतर्गत विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली 27 रोजी बैठक

 

मतदार यादीचा विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम अंतर्गत

विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली 27 रोजी बैठक

Ø 1 ते 30 नोव्हेंबरपर्यंत दावे व हरकती स्वीकारणार

चंद्रपूर दि. 24 नोव्हेंबर : 1 जानेवारी 2022 या अहर्ता दिनांकावर आधारित छायाचित्रासह मतदार यादीचा विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम भारत निवडणूक आयोगाने घोषित केला आहे. आयोगाच्या निर्देशानुसारदावे व हरकती स्विकारण्याचा कालावधी 1 ते 30 नोव्हेंबर 2021 पर्यंत आहे. दावे व हरकती स्विकारण्याबाबत विशेष मोहीम 27 व 28 नोव्हेंबर रोजी राबविन्यात येणार आहे. तसेच विभागीय आयुक्त प्राजक्ता लवंगारे यांच्या अध्यक्षतेखाली दि. 27 रोजी बैठक आयोजित करण्यात आली आहे.

असा आहे कार्यक्रम :

सोमवारदि. 1 नोव्हेंबर 2021 रोजी एकत्रित प्रारुप मतदार यादी प्रसिद्धदि. 1 नोव्हेंबर ते 30 नोव्हेंबर 2021 या कालावधीत दावे व हरकती स्वीकारण्यात येतील. दावे व हरकती स्वीकारण्याची विशेष मोहीम शनिवार दि.13 नोव्हेंबर व रविवार दि. 14 नोव्हेंबर 2021 रोजी घेण्यात आली. तसेच येत्या शनिवारी दि. 27 नोव्हेंबर व रविवार दि. 28 नोव्हेंबर 2021 रोजी दावे व हरकती स्विकारण्याची विशेष मोहीम राबविण्यात येणार आहे.

दावे व हरकती सोमवारदि. 20 डिसेंबर 2021 पर्यंत निकालात काढण्यात येतील. तर बुधवार दि. 5 जानेवारी 2022 रोजी मतदार यादीची अंतिम प्रसिद्धी करण्यात येईल.

दावे व हरकती सादर करण्याच्या कालावधीत पहिली भेट म्हणून मतदार यादी निरीक्षक तथा नागपूरच्या विभागीय आयुक्त प्राजक्ता लवंगारे दि. 27 नोव्हेंबर 2021 रोजी चंद्रपूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्या अनुषंगाने जिल्हाधिकारी कार्यालयात 27 नोव्हेंबर रोजी दुपारी 3 वाजता खासदारआमदार तसेच मान्यताप्राप्त राजकीय पक्षाची बैठक आयोजित करण्यात आली आहे. विशेष मोहीमेच्या दिवशी मतदान केंद्रस्तरीय अधिकारी मतदान केंद्रावर उपस्थित राहून दावे व हरकती स्वीकारणार आहे.

तरीज्या मतदारांची नावे मतदार यादीत समाविष्ट नाहीत अशा नागरिकांनी नजीकच्या मतदान केंद्रावर जाऊन मतदार यादीत आपले नाव नोंदणी करून घ्यावे व उपलब्ध संधीचा अवश्य लाभ घ्यावाअसे आवाहन जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी केले आहे.

00000

बुधवारी जिल्ह्यात 1 कोरोनामुक्त, 1 बाधित

 बुधवारी जिल्ह्यात 1 कोरोनामुक्त, 1 बाधित

Ø ॲक्टीव्ह रुग्णांची संख्या 13

चंद्रपूर, दि. 24 नोव्हेंबर : गत 24 तासात जिल्ह्यात एकाने कोरोनावर मात केली आहे. त्या रुग्णाला रुग्णालयातून सुटी देण्यात आली. तसेच 1 नवीन रुग्ण बाधीत झाला आहे. जिल्ह्यात बुधवारी मृत्यू संख्या शून्य आहे.

आरोग्य विभागाकडून प्राप्त अहवालानुसार, बाधित आलेल्या रुग्णांमध्ये चंद्रपूर महानगरपालिका क्षेत्रात 1 रुग्ण आढळला असून चंद्रपूर, बल्लारपूर, भद्रावती, ब्रह्मपुरी, नागभीड, सिंदेवाही, मुल, सावली, पोंभूर्णा, गोंडपिपरी, राजुरा, चिमूर, वरोरा, कोरपना, जिवती व इतर  ठिकाणी बाधित रुग्णांची संख्या शून्य आहे.

जिल्ह्यात आतापर्यंत एकूण बाधितांची संख्या 88 हजार 844 वर पोहोचली आहे. तसेच सुरवातीपासून आतापर्यंत बरे झालेल्यांची संख्या 87 हजार 288 झाली आहे. सध्या 13 बाधितांवर उपचार सुरू आहेत. आतापर्यंत 7 लाख 56 हजार 426 नमुन्यांची तपासणी करण्यात आली असून त्यापैकी 6 लाख 66 हजार 322 नमुने निगेटीव्ह आले आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत 1543 बाधितांचे मृत्यू झाले आहे.

प्रशासनाचे आवाहन : नागरिकांनी कोरोना पुर्णपणे संपला या मानसिकतेतून बाहेर यावे आणि मास्कचा वापर, वारंवार हात धुणे व सुरक्षीत अंतर राखणे या त्रीसुत्रीचा नियमित वापर करावा, स्वत:ची काळजी घ्यावी तसेच पात्र सर्व नागरिकांनी जवळच्या केंद्रावरून कोरोनाची लस घ्यावी, व प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी केले आहे.

00000

जलजीवन मिशन अंतर्गत पाणीपुरवठ्याची प्रलंबित कामे तातडीने मार्गी लावा - खासदार सुरेश धानोरकर

 


जलजीवन मिशन अंतर्गत पाणीपुरवठ्याची प्रलंबित कामे तातडीने मार्गी लावा - खासदार सुरेश धानोरकर

Ø जिल्हा विकास समन्वय व सनियंत्रण समिती

चंद्रपूर दि. 24 नोव्हेंबर : जलजीवन मिशन अंतर्गत पाणीपुरवठ्याच्या योजना महत्त्वाच्या असून कोरोना काळात काही कामे प्रलंबित होती. मात्र, आता कोरोना काही प्रमाणात कमी झाल्यामुळे पाणीपुरवठा योजनांची प्रलंबित कामे तातडीने मार्गी लावावीत, असे निर्देश खासदार सुरेश धानोरकर यांनी बैठकीत दिले. नियोजन भवन येथे आयोजित जिल्हा विकास समन्वय व सनियंत्रण समितीच्या (दिशा) बैठकीत ते बोलत होते.

याप्रसंगी जिल्हा परिषद अध्यक्षा संध्या गुरनुले, खासदार अशोक नेते, आमदार प्रतिभा धानोरकर, जिल्हाधिकारी अजय गुल्हाने, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालक वर्षा गौरकर, उपमुख्य कार्यकारी अधिकारी कपिल कलोडे, श्याम वाखर्डे, प्रकल्प अधिकारी श्री. बक्षी आदी उपस्थित होते.

प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत ग्रामीण भागातील रस्त्यांची कामे मोठ्या प्रमाणात प्रलंबित आहे. असे सांगून खासदार श्री. धानोरकर म्हणाले, प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत रस्त्यावरील एकूण 20 पुलांचे बांधकाम अद्यापही अपूर्ण आहे. ते काम कुठे अडले याबाबत विभागांनी माहिती घ्यावी. तसेच पुलाच्या बांधकामाचे प्रस्ताव 15 दिवसांच्या आत तयार करून मंजुरीसाठी सादर करावेत, अशा सूचना त्यांनी यावेळी केल्या .

खासदार श्री. धानोरकर पुढे म्हणाले, प्रधानमंत्री आवास योजनेत ग्रामीण भागात  लाभार्थ्यांना घरकुल मंजूर झाले असून अद्यापही घरकुलाचा लाभ मिळाला नाही. प्रपत्र ‘ड’ यादीमध्ये काही लाभार्थ्यांची नावे ऑनलाईनमध्ये सुटली आहेत, अशांची माहिती घेत दखल घ्यावी. ज्या गावातील नागरिकांना अजूनही घरकुल मिळाले नाही त्या गावाचा  सर्वे करावा व त्याबाबतचा प्रस्ताव शासनास सादर करावा, असेही ते म्हणाले.

 जलजीवन मिशन अंतर्गत विद्युत पुरवठ्याअभावी वरोरा तालुक्यातील मौजा शेंबळ, राळेगाव, फत्तापूर व बोडखा या चार गावाचा पाणीपुरवठा बंद आहे. तो तातडीने कार्यान्वित करावा. ज्या गावातील प्रादेशिक पाणीपुरवठा योजना बंद आहेत, किंवा रखडल्या आहेत. त्यासंदर्भात स्थानिक आमदार, सरपंच, लोकप्रतिनिधी यांच्याकडून तोडगा काढण्यासाठी बैठक घ्यावी.

शालेय पोषण आहार योजनेसंदर्भात केंद्र शासन व राज्य शासनाकडून धान्याचा पुरवठा होतो. त्याचा दर्जा, साठवणूक आदींसाठी धान्याच्या गोडाऊनला भेट द्यावी तसेच आठवड्यातून एकदा शाळांना भेटी द्याव्यात, अशा सूचनाही शिक्षणाधिकाऱ्यांना दिल्या. प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेअंतर्गत जिल्ह्यात आठ कौशल्य प्रशिक्षण केंद्र कार्यान्वित आहे. प्रशिक्षणाची निगडीत तांत्रिक अडचणी असल्यास, प्रशिक्षणासाठी संस्था मिळत नसल्यास त्या-त्या भागातील लोकप्रतिनिधींशी चर्चा करावी. ग्रामीण भागातील बेरोजगार युवक, विद्यार्थी यांना मार्गदर्शनाचा लाभ घेण्यास प्रवृत्त करावे. संवाद उद्योजकांच्या या धर्तीवर कौशल्य प्रशिक्षण मार्गदर्शनाचा कार्यक्रम राबवावा. अशा सूचना खासदार बाळू धानोरकर यांनी संबंधित विभागाला दिल्या.

घरकुलासंदर्भात एखादे गाव सर्वेतुन सुटून गेले असल्यास अशा गावांची यादी निदर्शनास आणून द्यावी.  शेतकऱ्यांच्या शेतात सिंचनाची साधने उपलब्ध असल्यास तशी नोंद 7/12 वर घेणे आवश्यक आहे. तसेच पिकाच्या नोंदी सुद्धा सातबाऱ्यावर घ्याव्यात. यासाठी नोंदी घेण्याबाबत तलाठ्यांना विशेष सूचना देण्यात येईल, असे

 जिल्हाधिकारी अजय गुल्हाने म्हणाले.

प्रास्ताविकातून प्रकल्प संचालक वर्षा गौरकर यांनी सादरीकरण केले. बैठकीला दिशा समितीचे सदस्य तसेच भद्रावतीचे नगराध्यक्ष अनिल धानोरकर, गोंडपिपरी पं.स. सभापती सुनिता येग्गेवार, जिवती पं.स. सभापती अंजना पवार, राजूरा पं.स. सभापती मुमताज जावेद अब्दूल, सावली पं.स. सभापती विजय कोरेवार, सिंदेवाही पं.स. सभापती मंदा बाळबुधे, नागभीड पं.स. सभापती प्रफुल्ल खापर्डे, जि.प.सदस्य सुनिता धोटे, पवन भगत, कुंदा जेनेकर, मौजा कुचनाच्या सरपंच वर्षा ठाकरे, नगरपरिषदेचे मुख्याधिकारी, सर्व पंचायत समिती सभापती, गटविकास अधिकारी, संबंधित विभागाचे विभाग प्रमुख उपस्थित होत.

00000