Search This Blog

Monday 22 November 2021

नोव्हेंबर अखेरपर्यंत 100 टक्के लसीकरणाचे उद्दिष्ट पूर्ण करा - जिल्हाधिकारी अजय गुल्हाने

 




नोव्हेंबर अखेरपर्यंत 100 टक्के लसीकरणाचे उद्दिष्ट पूर्ण करा

- जिल्हाधिकारी अजय गुल्हाने

Ø आरोग्य विभागाच्या टिम प्रत्येकाच्या दारापर्यंत पोहचणे आवश्यक

चंद्रपूर दिनांक 22 नोव्हेंबर : कोरोनावर प्रतिबंधात्मक उपाय म्हणून कोविड लसीकरणाकडे बघितले जाते. परंतु अद्यापही नागरिकांमध्ये कोविड लसीकरणाबाबत उदासीनता दिसून येत आहे. काही तालुक्यांमध्ये नागरिकांचे लसीकरण अपेक्षेपेक्षा कमी प्रमाणात झाले आहे. त्यामुळे नोव्हेंबर अखेरपर्यंत लसीकरणाचे 100 टक्के उद्दिष्ट गाठण्यासाठी यंत्रणांनी मिशन मोडवर  काम करावे, असे निर्देश जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी दिले.

जिल्हाधिकारी कार्यालयातील वीस कलमी सभागृहात आयोजित जिल्हा टास्क फोर्स समितीच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी अपर जिल्हाधिकारी विद्युत वरखेडकर, मनपा आयुक्त राजेश मोहिते, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.निवृत्ती राठोड, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. राजकुमार गहलोत, जिल्हा लसीकरण अधिकारी डॉ. संदीप गेडाम, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. मिलिंद सोमकुवर, नगर प्रशासन अधिकारी अजितकुमार डोके, हिवताप अधिकारी डॉ. प्रतिक बोरकर प्रामुख्याने उपस्थित होते.

काही तालुक्यात अपेक्षेपेक्षा कमी प्रमाणात लसीकरण झाले आहे, असे सांगून जिल्हाधिकारी श्री. गुल्हाने म्हणाले, गावनिहाय सुक्ष्म नियोजन करून लस न घेतलेल्या नागरिकांचे लसीकरण पूर्ण करून घ्यावे, दिलेले लक्ष समोर ठेवून कामे करावीत. तालुका व गावनिहाय अजून किती लाभार्थी लसीकरणासाठी शिल्लक आहेत, याची माहिती घ्यावी. शिल्लक असलेल्या नागरिकांची यादी तयार करावी. जिल्हा प्रशासनाद्वारे ‘हर घर दस्तक’ ही मोहिम राबविली जात आहे. त्या मोहिमेअंतर्गत नागरिकांच्या दारापर्यंत आरोग्य कर्मचारी गेलेत का याची माहिती घ्यावी, असेही ते म्हणाले.

जिल्हाधिकारी श्री.गुल्हाने पुढे म्हणाले, शेतीचा हंगाम असल्याने ग्रामीण भागातील नागरिक सकाळच्या सुमारास शेतात निघून जातात. त्यामुळे ग्रामीण भागातील नागरिकांचे वेळेत लसीकरण व्हावे यासाठी सकाळी 8 वाजता लसीकरण केंद्र सुरू झाले पाहिजे. नेमून दिलेले संपर्क अधिकारी व पालक अधिकाऱ्यांनी लसीकरण केंद्राला नियमीत भेट द्यावी. लसीकरण केंद्रावरील लसीचा मुबलक साठा, लसीकरण करणारे कर्मचारी याबाबत माहिती घ्यावी. त्यासोबतच लसीकरणासाठी आलेल्या नागरिकांच्या समस्या जाणून घेत लसीकरणास प्रोत्साहित करावे. तालुक्यातील उपविभागीय अधिकारी तसेच तहसीलदारांनी लसीकरणासंदर्भात नियमित आढावा घ्यावा. तसेच सकाळी लसीकरण केंद्राला भेट द्यावी.

पालक अधिकारी, नोडल अधिकारी वेळेत पोहोचतात का, लसीकरण केंद्र सकाळी नियमित उघडतात का आदींची याची खात्री करावी. प्रत्येक गटविकास अधिकारी यांना लसीकरणासाठी गावे नेमून द्या, अशा सूचना जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी दिल्या. येत्या 24 नोव्हेंबरपासून स्वत: तालुक्यातील लसीकरण केंद्राला भेट देणार असून यावेळी कार्य दिसत नसल्यास संबंधितांवर कडक कार्यवाही करणार असल्याचेही जिल्हाधिकारी अजय गुल्हाने म्हणाले.

21 नोव्हेंबरपर्यंत जिल्ह्यात 13 लक्ष 80 हजार 237 नागरीकांचा पहिला डोज तर 5 लक्ष 33 हजार 196 नागरिकांचे दोन्ही डोज असे एकूण 19 लक्ष 13 हजार 433 डोज देण्यात आले आहेत, अशी माहिती जिल्हा लसीकरण अधिकारी डॉ.संदीप गेडाम यांनी उपस्थितांना दिली. यावेळी जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी उपविभागीय अधिकारी व तहसीलदार यांच्याशी व्हिसीद्वारे संवाद साधून तालुकानिहाय लसीकरणाचा आढावा घेतला.

00000





No comments:

Post a Comment