Search This Blog

Wednesday 10 November 2021

शेतकऱ्यांनी तुरीवरील शेंगा पोखरणाऱ्या अळयांचे व्यवस्थापन करावे


शेतकऱ्यांनी तुरीवरील शेंगा पोखरणाऱ्या अळयांचे व्यवस्थापन करावे

चंद्रपूर दि.10 नोव्हेंबर: सद्यस्थितीमध्ये रात्रीचे थंड हवामान तूर पिकावरील शेंगा पोखरणाऱ्या अळीच्या वाढीस पोषक आहे. अशा वातावरणामुळे तूर पिकाला शेंगा पोखरणाऱ्या अळयांपासून नुकसान होण्याची शक्यता अधिक असते. त्यामुळे शेतकरी बंधूनी आपल्या पिकाची पाहणी करून वेळीच व्यवस्थापनाचे उपाय करणे आवश्यक आहे. असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी भाऊसाहेब बऱ्हाटे यांनी केले आहे.

शेंगा पोखरणाऱ्या अळयांमध्ये खालील प्रकारच्या अळयांचा समावेश:

            शेंगा पोखरणारी अळी (हेलीकोवर्पा) या किडीची मादी पतंग तुरीच्या कळया, फुले व शेंगा यावर अंडी घालते. अंडयातून निघालेल्या अळया तूरीच्या कळया आणि फुले खाऊन नुकसान करतात पुर्ण वाढ झालेली अळी 30 ते 40 मिमी. लांब विविध रंग छटेत दिसून येते. जसे पोपटी, फिक्कट गुलाबी व करडया रंगाची असून तीच्या पाठीवर तुटका करड्या रेषा असतात. मोठया अळ्या शेंगांना छिद्र करून आतील दाणे पोखरून खातात.

पिसारी पतंग-या पतंगाची अळी 12.5 मिमी. लांब हिरवट तपकिरी रंगाची असते. तिच्या अंगावर सुक्ष्म काटे व केस असतात. अळी शेंगावरील साल खरडून छिद्र करते. व बाहेर राहून दाने पोखरते.

शेंगे माशी- या माशीची अळी बारीक गुळगुळीत व पांढ-या रंगाची असून तिला पाय नसतात. तोंडाकडील भाग निमुळता व टोकदार असतो. ही अळी शेंगाच्या आत राहून शेंगातील दाने अर्धवट कुरतडून खाते व त्यामुळे दाण्याची मुकनी होते.

एकात्मिक किड व्यवस्थापन:

            या तिन्ही किडी कळया, फुले व शेंगावर आक्रमण करीत असल्यामुळे त्यांच्या व्यवस्थापनाकरीता जवळ जवळ सारखेच उपाय योजावे लागतात. प्रति हेक्टरी 20 पक्षी थांबे शेतात उभारावेत. त्यामुळे पक्षी किडीच्या अळया खाऊन फस्त करतात.

पहिली फवारणी (50 टक्के फुलोरावर असतांना) निंबोळी अर्क 5 टक्के किंवा अझाडिरेक्टीन 300 पीपीएम 50 मिली किंवा अझाडिरेक्टीन 1500 पीपीएम 25 मिली किंवा एच.ए.एन.पि.व्हि.(1x10पिओबी/मिली) 500 एल ई./ हे किंवा बॉसिलस थुरिनजिएंसिस 15 मिली किंवा क्विनॉलफॉस 25 ई.सी., 20 मिली प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.

दुसरी फवारणी (पहिल्या फवारणीनंतर 15 दिवसानी) इमामेक्टीन बेझोएट 5 टक्के 3 एस.जी. ग्रॅम किंवा लॅब्डा सायहॅलोमेथ्रीन 5 टक्के प्रवाही 10 मिली किंवा क्लोरॅनट्रनीलिप्रोल 18.5 टक्के एस.सी. प्रवाही 2.5 मिली प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. अळयांचा प्रादुर्भाव मोठया प्रमाणावर असल्यास तुरीच्या झाडाखाली पोते टाकुण झाड हलवावे. त्यामुळे झाडावरील अळया पोत्यावर पडतील त्या गोळा करून नष्ट कराव्यात. असे कृषी विभागामार्फत कळविण्यात आले आहे.

00000

No comments:

Post a Comment