Search This Blog

Saturday 30 September 2023

ओबीसी समाजाच्या उत्थानाला राज्य सरकारचे विशेष प्राधान्य - उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस






ओबीसी समाजाच्या उत्थानाला राज्य सरकारचे विशेष प्राधान्य - उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Ø उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते निंबूपाणी देऊन रविंद्र टोंगे यांच्या उपोषणाची सांगता

Ø राष्ट्रीय ओबीसी महासंघाने सरकारसोबत नियमित समन्वय ठेवण्याचे आवाहन

चंद्रपूर दि. ३० : मुंबई येथे शुक्रवारी (दि.२९) राज्याचे मुख्यमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली विविध ओबीसी संघटनांच्या प्रतिनिधींची अतिशय सकारात्मक बैठक घेण्यात आली. यात संघटनांच्यावतीने मांडण्यात आलेल्या सर्व मागण्या सरकारने मान्य केल्या असून राज्य सरकार ओबीसी समाजाच्या उत्थानाला प्राधान्य देईलअशी ग्वाही राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. विशेष म्हणजे राज्याचे वनेसांस्कृतिक कार्य तसेच मत्स्यव्यवसाय मंत्री तथा चंद्रपूरचे पालकमंत्री  सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकारामुळे ही बैठक घडून आली.

चंद्रपूर येथे राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे जिल्हाध्यक्ष रविंद्र टोंगे यांच्या उपोषण मंडपाला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी भेट दिली. उपोषणकर्ते श्री. टोंगेविजय बलकीप्रेमानंद जोगी यांना लिंबू पाणी देऊन २० दिवसांपासून सुरू असलेल्या उपोषणाची सांगता करण्यात आली. यावेळी राज्याचे वनेसांस्कृतिक कार्यमत्स्यव्यवसाय मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवारआमदार किर्तीकुमार उर्फ बंटी भांगडियाकिशोर जोरगेवारपरिणय फुकेराष्ट्रीय ओबीसी महासंघाचे अध्यक्ष बबनराव तायवाडे आदी उपस्थित होते.

ओबीसी आरक्षणावर कुठलाही आघात होणार नाहीअसे सांगून उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले, ‘आरक्षणासंदर्भात ओबीसी समाजाने कोणतीही शंका मनात ठेवू नये. राज्यात आपण सर्व एकत्रित नांदत असतोत्यामुळे राज्य सरकार ओबीसी विरुद्ध मराठा अशी परिस्थिती निर्माण होऊ देणार नाही. मुंबई येथील बैठकीत ओबीसी समाजाकडून मांडण्यात आलेल्या मागण्या सरकारने मान्य केल्या आहेत. तसेच ओबीसीमधील सूक्ष्म असलेले भटके आणि विमुक्त जाती यांच्याबाबतही बैठकीत सकारात्मक चर्चा करण्यात आली आहे. बैठकीचे सर्व छायाचित्रीकरण आणि इतिवृत्त राष्ट्रीय ओबीसी महासंघाला देण्यात येईल.

राज्य सरकारने ओबीसी संदर्भात आतापर्यंत २६ शासन निर्णय काढले आहेत. यात विद्यार्थ्यांची परदेशी शिष्यवृत्तीवसतीगृह व इतर महत्त्वाचे निर्णय आहेत. एवढेच नव्हे तर विद्यार्थी आणि युवकांच्या विकासासाठी व ओबीसी समाजाच्या उत्थानासाठी चार हजार कोटींची तरतूद केली आहे. माझ्या मुख्यमंत्रीपदाच्या काळात ओबीसीसाठी वेगळे मंत्रालय राज्यात स्थापन करण्यात आले. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ओबीसी हिताचे अनेक निर्णय घेतले असून वैद्यकीय क्षेत्रात ओबीसींसाठी २७ टक्के आरक्षण दिले आहे. तसेच ओबीसी आयोगाला घटनात्मक दर्जा प्राप्त करून दिला आहेयाचाही उपमुख्यमंत्र्यांनी आवर्जून उल्लेख केला.

श्री. फडणवीस पुढे म्हणाले, ‘राज्य सरकारने ओबीसी विद्यार्थ्यांकरीता वसतिगृहासाठी इमारती भाड्याने घेतल्या आहेत. या वसतिगृहात ज्या विद्यार्थ्यांना प्रवेश मिळणार नाहीत्यांना स्वाधार योजनेच्या माध्यमातून राज्य सरकार निधी उपलब्ध करून देईल. राज्य सरकार ओबीसी समाजाच्या उत्थानाला विशेष प्राधान्य देणार आहे. ओबीसी नागरिकांसाठी १० लाख घरांची योजना राबविण्यात येत आहे. सर्व प्रश्न सोडविण्याची सरकारची तयारी आहेमात्र त्यासाठी राष्ट्रीय ओबीसी महासंघाने सरकारसोबत नियमित समन्वय ठेवावा.

निधी कमी पडणार नाही

ओबीसी प्रवर्गाच्या योजनांकरिता निधीची कमतरता पडणार नाही. याची काळजी सरकार घेणार आहे. ज्या ओबीसी संघटना मुंबईतील बैठकीला उपस्थित राहू शकल्या नाहीतत्यांचे म्हणणे सुद्धा सरकार ऐकून घेईल. अशा संघटनांनी सरकारसोबत समन्वय ठेवून चर्चा करावीअसे आवाहन उपमुख्यमंत्र्यांनी केले.

उपोषणकर्त्यांची काळजी

चंद्रपूरमध्ये ओबीसी महासंघाचे जिल्हाध्यक्ष रवींद्र टोंगेविजय बल्कीप्रेमानंद जोगी यांनी उपोषण मागे घेतलेयाचा आनंद आहे. यासाठी राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे त्यांनी आभार मानले. रवींद्र टोंगे यांनी आपल्या तब्येतीची काळजी घ्यावी. तसेच पदाधिकाऱ्यांनी सुद्धा त्यांची वैद्यकीय तपासणी करून घ्यावीअसे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

श्री. मुनगंटीवार यांच्या शिष्टाईमुळे उपोषणाची सांगता

ओबीसी समाजाच्या मागण्यांसाठी २० दिवसांपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अन्नत्याग उपोषण करणारे राष्ट्रीय ओबीसी विद्यार्थी महासंघाचे जिल्हाध्यक्ष रविंद्र टोंगे यांच्या उपोषण मंडपाला पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी १८ सप्टेंबरला भेट दिली होती. त्यांच्यासोबत जवळपास दीड तास चर्चा केली. ओबीसी समाजाच्या मागण्या चर्चेतून आणि संवादातून सोडविण्यात येतीलअसा विश्वास देऊन श्री. टोंगे यांनी अन्नत्याग उपोषण सोडावेअसे आवाहन त्यांनी केले होते.  श्री. मुनगंटीवार यांच्या शिष्टाईमुळेच उपोषणाची सांगता होऊ शकलीअशी प्रतिक्रिया जनमानसांतून व्यक्त होत आहे.

श्री. मुनगंटीवार यांचा पुढाकार

ओबीसी समाजाच्या मागण्यांबाबत श्री. मुनगंटीवार सुरुवातीपासून अतिशय आग्रही आहेत. त्यांनी याबाबत सातत्याने सरकारकडे पाठपुरावा देखील केला. त्यांच्याच पुढाकारातून शुक्रवार दि. २९ सप्टेंबर २०२३ ला मुंबई येथे ओबीसींच्या मागण्यांबाबत सकारात्मक चर्चा घडून आली. राज्य शासनाने सर्व मागण्या मान्य केल्या. तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना श्री. टोंगे यांचे उपोषण सोडण्यासाठी चंद्रपुरात आणण्यात पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यशस्वी देखील ठरले.

00000

Thursday 28 September 2023

3 ऑक्टोबर रोजी लोकशाही दिनाचे आयोजन


 3 ऑक्टोबर रोजी लोकशाही दिनाचे आयोजन

चंद्रपूर दि. 28 : सर्वसामान्य जनतेच्या तक्रारी आणि अडचणी यांची न्याय व तत्परतेने शासकीय यंत्रणेकडून सोडवणूक करण्यासाठी एक प्रभावी उपाययोजना म्हणून जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली  लोकशाही  दिनाचे  आयोजन  दर महिन्याच्या पहिल्या सोमवारी करण्यात येते. या लोकशाही  दिनानिमित्त  नागरीक व शेतकरी  जिल्हाधिकारी यांच्याकडे तक्रार अर्ज दाखल करतात.

सोमवार, दि. 2 ऑक्टोबर रोजी सुट्टी असल्याने, दि. 3 ऑक्टोबर 2023 रोजी दुपारी 1 वाजता जिल्हाधिकारी कार्यालय, चंद्रपूर येथे लोकशाही   दिनाचे  आयोजन  करण्यात आले आहे.  जिल्हास्तरीय  लोकशाही  दिनात तक्रार सादर करतांना विहित नमुन्यातील तक्रार अर्जासोबत तालुका लोकशाही दिनातील टोकन क्रमांकाची प्रत तसेच अर्ज 15 दिवसाआधी 2 प्रतीत सादर करावा. तक्रार व निवेदन वैयक्तिक स्वरुपाची असावी. तद्नंतरच तक्रार अर्ज स्वीकारण्यात येईल, असे तहसिलदार (सामान्य) श्रीधर राजमाने यांनी कळविले आहे.

०००००

29 सप्टेंबर रोजीच्या वाहन योग्यता प्रमाणपत्र नूतनीकरण ऑनलाईन अपॉइंटमेंट वेळेत बदल

 

29 सप्टेंबर रोजीच्या वाहन योग्यता प्रमाणपत्र नूतनीकरण ऑनलाईन अपॉइंटमेंट वेळेत बदल

Ø 3 ते 6 ऑक्टोबर कालावधीत होईल कामकाज

चंद्रपूर दि. 28 : शासनाने दि. 29 सप्टेंबर 2023 रोजी ईद-ए-मिलाद सणाकरीता सार्वजनिक सुट्टी जाहीर केली आहे. त्यामुळे 29 सप्टेंबर रोजी योग्यता प्रमाणपत्राकरीता घेण्यात आलेल्या ऑनलाईन अपॉइंटमेंटच्या वेळेत बदल करण्यात आले असून दि. 3 ते 6 ऑक्टोबर 2023 या कालावधीत दि. 29 सप्टेंबर रोजी अपॉइंटमेंट घेण्यात आलेल्या वाहन योग्यता प्रमाणपत्र नूतनीकरणाचे कामकाज करण्यात येईल, याची सर्व वाहनधारकांनी नोंद घ्यावी, असे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी किरण मोरे यांनी कळविले आहे.

००००००

1 ऑक्टोबरपासून जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल रुग्ण व रुग्णाच्या नातेवाईकास मिळणार पास

 

1 ऑक्टोबरपासून जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल रुग्ण व रुग्णाच्या नातेवाईकास मिळणार पास

Ø गर्दी टाळण्याकरीता रुग्णालय प्रशासनाचा निर्णय

चंद्रपूर दि. 28 : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (जिल्हा सामान्य रुग्णालय),चंद्रपूर येथे रुग्ण दाखल होतांना रुग्णासोबत बरेच नातेवाईक रुग्णालयात गर्दी करतात. त्यामुळे वारंवार सुरक्षेचा प्रश्न निर्माण होत असतो. त्यादृष्टीने दि. 1 ऑक्टोबर 2023 पासून रुग्णालयात रुग्णास दाखल करतांना संबंधित रुग्ण व रुग्णाच्या एका नातेवाईकास पास वितरित करण्यात येणार आहे.

या पासच्या आधारे रुग्णांच्या नातेवाईकास रुग्णालयामध्ये प्रवेश दिला जाईल. तसेच रुग्णास भेटण्याची व रुग्णासोबत थांबण्याची परवानगी देखील देण्यात येणार आहे. विनाकारण रुग्णालयामध्ये गर्दी होऊ नये, याकरीता नागरीकांनी रुग्णालय प्रशासन, डॉक्टर्स व कर्मचाऱ्यांना सहकार्य करण्याचे आवाहन शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता यांनी केले आहे.

०००००

फळे व भाजीपाला विक्रीकरीता शितचेंबरच्या सुविधेसह रेखांकन आराखडा व अंदाजपत्रकांचे प्रस्ताव आमंत्रित

 

फळे व भाजीपाला विक्रीकरीता शितचेंबरच्या सुविधेसह रेखांकन आराखडा व अंदाजपत्रकांचे प्रस्ताव आमंत्रित

चंद्रपूर दि. 28 : महाराष्ट्र राज्य फलोत्पादन व औषधी वनस्पती मंडळामार्फत एकात्मिक फलोत्पादन अभियान योजना राबविण्यात येते. या योजनेमध्ये पणन सुविधेअंतर्गत फळे व भाजीपाला विक्रीकरीता शीतचेंबरच्या सुविधेसह फिरते विक्री केंद्र या घटकास प्रोत्साहन दिले जाते. ग्राहकांच्या सुविधेसाठी लोकवस्तीमध्ये व लोकवस्तीजवळ कमी खर्चाचे फिरते फळे-भाजीपाला विक्री हातगाडी/केंद्र स्थापन करून आवश्यक त्यावेळेस ग्राहकांना फळे व भाजीपाला पुरविणे हा या घटकाचा मुख्य उद्देश आहे.

            या घटकामध्ये शीतचेंबरच्या सुविधेसह हातगाडी, विक्री कट्टा तसेच वजन काटे आदी भांडवली खर्च अनुदानासाठी ग्राह्य धरला जातो व प्रकल्प खर्चाच्या 50 टक्के किंवा कमाल 15 हजार रुपयाचे अर्थसहाय्य उपलब्ध आहे. या घटकाकरीता सुयोग्य रेखांकन आराखडा व अंदाजपत्रक निश्चित करावयाचे आहे. याकरीता, इच्छुक उत्पादक व पुरवठादार कंपन्यांकडून फळे व भाजीपाला फिरते विक्री केंद्र शीतचेंबरच्या सुविधेसह रेखांकन आराखडा व अंदाजपत्रकाचे प्रस्ताव ऑनलाईन मागविण्यात येत आहे.

प्रस्ताव सादर करण्याकरीता अटी व शर्ती तसेच इतर तपशील कृषी विभागाच्या www.krishi.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात येत आहे. त्याअनुषंगाने, फळे व भाजीपाला फिरते विक्री केंद्र शीतचेंबरच्या सुविधेसह या घटकाकरीता उत्पादक व पुरवठादारांनी info@mahanhm.in या ई-मेल आयडीवर प्रस्ताव सादर करावेत, असे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शंकर तोटावर यांनी कळविले आहे.

०००००

आता ग्रामपंचायत स्तरावर प्रधानमंत्री कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रम

 

आता ग्रामपंचायत स्तरावर प्रधानमंत्री कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रम

Ø युवकांना ग्रामपंचायत कार्यालयात नोंद करण्याचे आवाहन

चंद्रपूर दि. 28 : कौशल्य विकास उपक्रमांचा लाभ ग्रामीण भागातील सर्व घटकांपर्यंत पोहोचावा व युवकांना स्थानिक ठिकाणी रोजगार व स्वयंरोजगाराच्या संधी प्राप्त होऊन ग्रामीण भागातील युवकांचे स्थलांतरण कमी व्हावे, या उद्देशाने कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाचे मंत्री यांच्या निर्देशानुसार, ग्रामीण भागात कौशल्य विकास केंद्र सुरू करावयाचे आहे. जेणेकरून ग्रामीण भागातील युवकांना कौशल्य विकासाचे प्रशिक्षण देण्यात येऊन त्यांना स्थानिक ठिकाणी रोजगार उपलब्ध होईल.

 यादृष्टीने चंद्रपूर जिल्ह्यातील 15 ग्रामपंचायतीमध्ये बल्लारपूर तालुक्यातील कोठारी, भद्रावती-चंदनखेडा, ब्रह्मपुरी-गांगलवाडी, चंद्रपूर-मोरवा, चिमूर-नेरी, गोंडपिपरी-भंगाराम तळोधी, जिवती-शेणगाव, कोरपना-नांदा, मुल-राजोली, नागभीड-तळोधी बाळापुर, पोंभुर्णा-देवाडा(खु.), राजुरा-विरुर, सावली-व्याहाड खुर्द, सिंदेवाही-नवरगाव तसेच वरोरा-शेगांव येथे कौशल्य विकास केंद्र स्थापित करण्याचे प्रस्तावित करण्यात आले आहे. सदर ग्रामपंचायत भागातील युवकांना कौशल्य विकास केंद्रामार्फत रोजगार व स्वयंरोजगाच्या संधी प्राप्त करून घेण्याकरीता ग्रामपंचायत कार्यालयात नोंद करावी, असे जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहाय्यक आयुक्त भैय्याजी येरमे यांनी कळविले आहे.

००००००

एकात्मिक फलोत्पादन विकास अभियानांतर्गत जुन्या फळबागांचे होणार पुनरुज्जीवन

 

एकात्मिक फलोत्पादन विकास अभियानांतर्गत जुन्या फळबागांचे होणार पुनरुज्जीवन

Ø शेतकऱ्यांना महाडीबीटी पोर्टलवर अर्ज करण्याचे आवाहन

चंद्रपूर दि. 28 : एकात्मिक फलोत्पादन विकास अभियानांतर्गत सन 2023-24 मध्ये जुन्या फळबागांचे पुनरुज्जीवन करणे हा घटक राबविण्यात येत आहे. योग्य मशागत पद्धतीचा अवलंब न करणे, नांग्या न भरणे, खते व औषधांचा योग्य वापर न करणे तसेच झाडांना व्यवस्थित आकार न देणे आदी बाबींमुळे बऱ्याचश्या जुन्या फळबागांची उत्पादकता कमी होत आहे.  

नवीन लागवडीप्रमाणेच जुन्या फळबागांची उत्पादकता वाढविणे ही राज्याच्या फळपिकांची एकूण उत्पादकता वाढविण्याच्या दृष्टिकोनातून महत्त्वाची बाब आहे. सन 2023-24 मध्ये राज्यात जुन्या फळबागांची उत्पादकता वाढविण्याच्या दृष्टीने सदर कार्यक्रम राबविण्यात येत आहे. यामध्ये आंबा, संत्रा, मोसंबी व चिक्कू या फळपिकांचा समावेश आहे. या घटकांतर्गत जुन्या फळबागांच्या पुनरुज्जीवनासाठी प्रकल्प खर्च रक्कम रु. 40 हजार प्रति हेक्टर ग्राह्य धरून त्याच्या 50 टक्के प्रमाणे जास्तीत जास्त रक्कम रु. 20 हजार प्रति हेक्टर याप्रमाणे अनुदान देय आहे. यामध्ये कमीत कमी 0.20 हेक्टर व कमाल 2 हेक्टर क्षेत्रासाठी अनुदान देय राहील.

जुन्या फळबागांचे पुनरुज्जीवन करण्यासाठी आंबा, चिकू, संत्रा व मोसंबी या फळपिकांच्या बागा असलेल्या अधिकाधिक शेतकऱ्यांनी महाडीबीटी पोर्टलवर उत्पादन या घटकाखाली अर्ज करावेत. तसेच योजनेच्या अधिक माहितीसाठी नजीकच्या कृषी कार्यालयाशी संपर्क साधावा, असे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शंकर तोटावार यांनी कळविले आहे.

००००००

Wednesday 27 September 2023

28 सप्टेंबर रोजी जिल्ह्यातील प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांना सुट्टी जाहीर

 

28 सप्टेंबर रोजी जिल्ह्यातील प्राथमिकमाध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांना सुट्टी जाहीर

चंद्रपूरदि. 27 : अनंत चतुर्दशी निमित्त गणपती विसर्जनाच्या वेळी वाहतूक व्यवस्थेला अडथळा निर्माण होऊ नये तसेच विद्यार्थ्यांची गैरसोय होऊ नये म्हणून जिल्ह्यातील प्राथमिकमाध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांना जिल्हाधिकाऱ्यांच्या निर्देशानुसार शिक्षणाधिकारी (प्राथमिक) यांनी गुरुवार दिनांक 28 सप्टेंबर 2023 रोजी सुट्टी जाहीर केली आली आहे. तर जिल्ह्यातील महाविद्यालय आणि शासकीय कार्यालयीन कामकाज गुरुवार दिनांक 28 सप्टेंबर 2023 रोजी नियमितपणे सुरू राहीलयाची सर्वांनी नोंद घ्यावी.

तसेच राज्य शासनाच्या परिपत्रकानुसार शुक्रवार दिनांक 29 सप्टेंबर 2023 रोजी ईद-ए-मिलाद ची सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्यात आल्याचे जिल्हाधिकारी कार्यालयाने कळविले आहे.

00000

28 व 29 सप्टेंबर रोजी ईद-ए-मिलाद निमित्त मिरवणूकीचे आयोजन



28 व 29 सप्टेंबर रोजी ईद-ए-मिलाद निमित्त मिरवणूकीचे आयोजन

चंद्रपूर, दि. 27: जिल्ह्यात 28 व 29 सप्टेंबर रोजी ईद-ए-मिलाद उत्सव साजरा करण्यात येत असून ईद-ए-मिलाद उत्सवानिमित्त मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले आहे.

सदर मिरवणूक 28 सप्टेंबर 2023 रोजी पडोली, राजुरा, कोठारी, वरोरा, भद्रावती, माजरी, चिमूर, शेगाव, भिसी, ब्रह्मपुरी, नागभीड, तळोधी, सिंदेवाही, मुल, गोंडपिपरी, पोभुर्णा, गडचांदुर, कोरपना व जिवती या शहर व तालुक्याच्या ठिकाणी तर 29 सप्टेंबर रोजी चंद्रपूर शहर, रामनगर व बल्लारपूर शहरात मिरवणूक निघणार आहे.

याबाबत नागरीकांनी नोंद घ्यावी व पोलीस प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन पोलीस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी यांनी केले आहे.

00000

नियमबाह्य व्हिडिओ गेम पार्लरवर सक्त कारवाई करणार - जिल्हाधिकारी विनय गौडा



 

नियमबाह्य व्हिडिओ गेम पार्लरवर सक्त कारवाई करणार - जिल्हाधिकारी विनय गौडा

चंद्रपूर, दि. 27: जिल्ह्यातील व्हिडिओ गेम पार्लर व कार्ड क्लब पार्लरबाबत अनेक तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. त्यासोबतच परवानाधारकांकडून परवान्यातील अटी व शर्तीचे भंग होत असल्याचे देखील निदर्शनास आले आहे. याबाबत नियमबाह्य व्हिडिओ गेम पार्लर व कार्ड क्लब पार्लरवर सक्त कारवाई करणार असल्याचे स्पष्ट निर्देश जिल्हाधिकारी विनय गौडा यांनी आज दिले.

 जिल्ह्यातील व्हिडिओ गेम पार्लर व कार्ड क्लब परवानाधारकांची बैठक आयोजित करण्यात आली होती याप्रसंगी ते बोलत होते.

यावेळी सहाय्यक जिल्हाधिकारी मुरुगानंथम एम., निवासी उपजिल्हाधिकारी संजय पवार, उपजिल्हाधिकारी (भूसंपादन)दगडू कुंभार, बल्लारपूरच्या उपविभागीय अधिकारी स्नेहल रहाटे, मुलचे उपविभागीय अधिकारी विशालकुमार मेश्राम, पोलीस निरीक्षक महेश कोंडावार, नायब तहसीलदार गीता उत्तरवार, विधी अधिकारी राजेश दुबे तसेच व्हिडिओ गेम पार्लर व कार्ड क्लब परवानाधारक उपस्थित होते. 

जिल्हाधिकारी विनय गौडा म्हणाले, व्हिडिओ गेम पार्लरबाबत प्रशासनाला अनेक तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. त्यासोबतच वरोरा येथे व्हिडिओ गेम खेळून पैसे हरल्याने एका युवकाने आत्महत्या केली, ही जिल्ह्यासाठी चांगली बाब नाही. व्हिडिओ गेम पार्लर परवानाधारकांनी परवान्यातील अटी व शर्तीनुसारच गेम पार्लर चालवावे. सदर पार्लरमध्ये जुगार खेळता कामा नये. तसे आढळून आल्यास नियमानुसार सक्त कारवाई केल्या जाईल, असे स्पष्ट निर्देश जिल्हाधिकारी श्री. गौडा यांनी उपस्थित व्हिडिओ गेम पार्लर व कार्ड क्लब परवानाधारकांना दिले. तसेच काही व्हिडीओ गेम पार्लरमध्ये जुगार खेळल्या जात असल्याच्या तक्रारी देखील प्राप्त झाल्या असून संयुक्त पथकामार्फत तपासणी केल्या जाणार आहे. तपासणीअंती आढळुन आल्यास दोषींवर कार्रवाई करणार असल्याचे निर्देश बैठकीत दिले.

0000000

सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांची निराधारांसाठी मुख्यमंत्र्यांना भावनिक साद

 

सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांची निराधारांसाठी मुख्यमंत्र्यांना भावनिक साद

ना.मुनगंटीवार यांची संजय गांधी निराधार योजनेचा निधी तात्काळ वितरित करण्याची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

चंद्रपूरदि.२७ - राज्यातील लाखो निराधारांना राज्य सरकारच्या संजय गांधी निराधार योजनेचा आधार आहे. पण गेल्या काही महिन्यांपासून या योजनेची रक्कम लाभार्थ्यांच्या खात्यात जमा झालेली नाही. त्यामुळे हातावर पोट असलेले आणि या योजनेच्या पेन्शनमधून उदरनिर्वाह चालविणारे लाखो लाभार्थी प्रतीक्षेत आहेत. त्यामुळे संजय गांधी निराधार योजनेची रक्कम तातडीने वितरित करण्याचे निर्देश देऊन निराधारांना दिलासा द्यावाअशी भावनिक साद राज्याचे वने व सांस्कृतिक कार्य मंत्री  सुधीर मुनगंटीवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्राद्वारे घातली आहे.

राज्यातील निराधारवृद्धअंधअपंगशारीरिकमानसिक आजाराने ग्रस्तविधवाघटस्फोटीत महिलांना अर्थसहाय्य देण्याच्या मूळ हेतूने १९८० पासून संजय गांधी निराधार योजना सुरू आहे. महाराष्ट्रात या योजनेची मासिक रक्कम गेल्या काही महिन्यांपासून लाभार्थ्यांच्या खात्यात जमा झालेली नाही. यामध्ये विशेषत्वाने ग्रामीण भागातील लाभार्थी आहेत. त्यांचा उदरनिर्वाह केवळ संजय गांधी निराधार योजनेच्या आधारावर आहे. अशा लाभार्थ्यांवर उपासमारीचे संकट येऊ नयेयासाठी आपण लक्ष्य द्याल असा मला पूर्ण विश्वास आहे,’ असेही ना. मुनगंटीवार यांनी पत्रात नमूद केले आहे. 

उत्सवांमध्ये आर्थिक चणचण

राज्यात दहा लाखांपेक्षा अधिक लोक या योजनेचे लाभार्थी आहेत. सध्या सण-उत्सव प्रारंभ झाले आहेत. अशात सर्वत्र उत्साह असताना या आर्थिकदृष्ट्या दुर्बल व्यक्तीच्या वाट्याला मात्र प्रतीक्षा येत असेल तर लोकप्रतिनिधी म्हणून आम्हाला नक्कीच तात्काळ मार्ग काढणे क्रमप्राप्त आहे. या महत्त्वाच्या विषयाकडे आपण लक्ष देऊनसंजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थ्यांना न्याय मिळण्याच्या दृष्टीने तात्काळ निधी वितरित करण्याचे निर्देश द्यावे,’ अशी मागणी ना. मुनगंटीवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे.

००००००

नमूद तारखेप्रमाणे तालुकानिहाय होणार गणेश विसर्जन

 

नमूद तारखेप्रमाणे तालुकानिहाय होणार गणेश विसर्जन

चंद्रपूरदि. 27 :जिल्ह्यात 19 सप्टेंबर ते 1 ऑक्टोबर 2023 या कालावधीत गणेशोत्सव साजरा करण्यात येत आहे. गणेश उत्सवानिमित्त स्थापन करण्यात आलेल्या गणेशमूर्तींचे तालुकानिहाय विसर्जन होणार अाहे.

दि. 28 सप्टेंबर 2023 रोजी चंद्रपूर शहर व बल्लारपूर येथे अनंत चतुर्दशीच्या दिवशी विसर्जन होणार आहे. तसेच दि. 29 सप्टेंबर रोजी राजुराभद्रावतीब्रह्मपुरी व मूल या ठिकाणी तर 30 सप्टेंबर रोजी वरोरा येथे गणेश विसर्जन होणार आहे. याबाबत नागरिकांनी नोंद घ्यावी व पोलीस प्रशासनास सहकार्य करावेअसे आवाहन पोलीस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी यांनी केले आहे.

००००००

महाविद्यालय स्तरावर शिष्यवृत्तीचे प्रलंबित अर्ज मंजुरीसाठी जिल्हा कार्यालयाकडे सादर करण्याचे आवाहन

 

महाविद्यालय स्तरावर शिष्यवृत्तीचे प्रलंबित अर्ज मंजुरीसाठी जिल्हा कार्यालयाकडे सादर करण्याचे आवाहन

चंद्रपूरदि. 27 : सामाजिक न्याय विभागामार्फत ऑनलाईन महाडीबीटी प्रणालीवर अनुसूचित जाती प्रवर्गासाठी भारत सरकार मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्तीशिक्षण व परीक्षा शुल्क योजनाराजर्षी शाहू महाराज गुणवत्ता शिष्यवृत्तीव्यावसायिक पाठ्यक्रमाशी संलग्न वस्तीगृहातील विद्यार्थ्यांना निर्वाह भत्ताव्यवसाय प्रशिक्षण शुल्क प्रतिपूर्ती योजना आदी योजना राबविण्यात येतात. या योजनांचे अनेक अर्ज महाविद्यालय स्तरावर प्रलंबित असल्याचे उघडकीस आले आहे. मागासवर्गीय विद्यार्थ्यांचे महाविद्यालय स्तरावर शिष्यवृत्तीचे प्रलंबित अर्ज मंजुरी साठी जिल्हा कार्यालयाकडे सादर करण्याचे आवाहन समाजकल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त बाबासाहेब देशमुख यांनी केले आहे.

सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत अनुसूचित जाती प्रवर्गातील घटकांसाठी विविध कल्याणकारी योजना राबविल्या जातात. या योजनांची रक्कम महाडीबीटी  प्रणालीद्वारे आधार संलग्न बँक खात्यात वितरीत करण्यात येते. महाडीबीटी पोर्टलच्या संकेतस्थळावर विद्यार्थ्यांकडून ऑनलाईन अर्ज केले जातात. पात्र विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती सत्रनिहाय दिली जाते. शैक्षणिक वर्ष 2022-23 मधील योजनेचे महाविद्यालय स्तरावर अनुसूचित जाती प्रवर्गातील एकूण 631 अर्ज अद्यापही प्रलंबित आहेत.

समाजकल्याण विभागाने या महाविद्यालयांची यादी जाहीर केली आहे. सदर योजनांचे महाडीबीटी प्रणालीवर अनुसूचित जाती प्रवर्गाचे अर्ज महाविद्यालय स्तरावर प्रलंबित आहेत. संबंधित महाविद्यालयांनी अर्ज मंजुरीसाठी जिल्हा कार्यालयाकडे सादर केले नाहीत.

शिष्यवृत्तीची अर्ज प्रलंबित असलेली महाविद्यालये:

बल्लारपुर इंस्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी बामणीगोंडपिपरी शिक्षण महाविद्यालय गोंडपिपरीशासकीय वैद्यकिय महाविद्यालय चंद्रपूरश्रीमती विमलादेवी आयुर्वेदिक वैद्यकिय महाविद्यालय वांढरीकल्याण नर्सिंग कॉलेज राजूराशासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था सिंदेवाहीशासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था मुलशासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था सावलीशासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था चंद्रपूरएस.आर.व्ही. नर्सिंग स्कुल सिंदेवाहीसम्राट अशोक ज्यु. कॉलेज चिचपल्लीअॅड. यादवराव धोटे ज्यु. कॉलेज राजूराजनता ज्यु. कॉलेजगोंडपिपरीनवभारत ज्यु. कॉलेज मुल या महाविद्यालयाचे अर्ज महाविद्यालय स्तरावर प्रलंबित आहेत. प्राचार्यांनी आपआपल्या महाविद्यालय स्तरावर प्रलंबित असलेले पात्र अर्ज जिल्हा लॉगीन वर पाठवावे. तसेच विद्यार्थी लॉगीन त्रुटी पूर्ततेसाठी परत केलेल्या अर्जाची संबंधित महाविद्यालयांनी विद्यार्थ्यांकडून त्वरीत पूर्तता करावी तसेच अर्ज जिल्हा लॉगीन वर पाठविण्यात यावे. विद्यार्थी शिष्यवृत्तीच्या लाभापासून वंचित राहिल्यास त्यास  सदर महाविद्यालय जबाबदार राहीलयाची महाविद्यालयांनी नोंद घ्यावीअसे समाजकल्याण विभागामार्फत कळविण्यात आले आहे.

०००००

Tuesday 26 September 2023

दिव्यांगांच्या चेहऱ्यावर आनंद झळकविण्यासाठी कटिबद्ध – ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू





 

दिव्यांगांच्या चेहऱ्यावर आनंद झळकविण्यासाठी कटिबद्ध – ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू

Ø दिव्यांगांच्या दारी अभियानाला उत्स्फुर्त प्रतिसाद

चंद्रपूर, दि. 26 : संपूर्ण देशात केवळ महाराष्ट्र सरकारने दिव्यांग मंत्रालय स्थापन केले आहे. अनेक आंदोलनातून हे मंत्रालय स्थापन करता आले, याचा अभिमान आहे. केवळ पाच महिन्यात दिव्यांग बांधवांच्या दारी हे मंत्रालय आले असून दिव्यांगांच्या चेह-यावर आनंद झळकविण्यासाठी आपण नेहमीच कटिबद्ध आहोत, अशी ग्वाही दिव्यांग कल्याण विभागाचे अध्यक्ष ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू (मंत्री दर्जा) यांनी दिली.

शकुंतला लॉन येथे दिव्यांग कल्याण विभाग आणि जिल्हा प्रशासनाच्या वतीने आयोजित 'दिव्यांगांच्या दारी अभियानात' मुख्य मार्गदर्शक म्हणून ते बोलत होते. यावेळी मंचावर मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक जॉन्सन, अतिरिक्त जिल्हाधिकारी श्रीकांत देशपांडे, मनपा आयुक्त विपीन पालीवाल, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुभाष पवार, जिल्हा समाजकल्याण अधिकारी सुरेश पेंदाम, समाजकल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त बाबासाहेब देशमुख आदी उपस्थित होते.

दिव्यांगांचे अनेक प्रश्न आणि दु:ख आहे, असे सांगून आ. बच्चू कडू म्हणाले, या कार्यक्रमाचे जिल्हा प्रशासनाने उत्तम नियोजन केले आहे. मात्र ऐवढ्यावरच न थांबता जिल्ह्यातील प्रत्येक दिव्यांग लाभार्थ्यांना शासकीय योजनांचा लाभ मिळण्यासाठी प्रामाणिकपणे काम करावे. दिव्यांग बांधवांसाठी आपण अनेक आंदोलने केली. याच आंदोलनातून हे मंत्रालय उभे राहिले आहे. शेवटच्या श्वासापर्यंत आपण दिव्यांगांसाठी लढत राहणार आहोत. दिव्यांगांच्या घरापर्यंत योजना कशा पोहचविता येतील, यासाठी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

पुढे श्री. कडू म्हणाले, घरकूल, अंत्योदय, शौचालय या योजनांसोबतच येत्या दोन-तीन महिन्यात दिव्यांगांसाठी चांगल्या योजना आणल्या जातील. ग्रामीण स्तरावर काम करणारे ग्रामसेवक, कोतवाल, तलाठी, कृषी सहाय्यक, रोजगार सहाय्यक आदींनी या योजनांबाबत दिव्यांग बांधवांना अवगत करावे. केवळ शासन निर्णय म्हणून नाही तर कर्तव्य म्हणून काम करा. दिव्यांग तसेच निराधारांना 1500 रुपये महिना दिला जातो. मात्र कधीकधी चार-चार महिने पैसे मिळत नाही, ही शोकांतिका आहे. त्यामुळे महिन्याच्या 5 तारखेपर्यंत संबंधितांच्या खात्यात रक्कम जमा करावी, याकडे मुख्यमंत्र्यांचे लक्ष वेधणार असल्याचे त्यांनी सांगितले.

दिव्यांग मुलांची शैक्षणिक गुणवत्ता वाढविण्यासाठी चंद्रपूर जिल्हा परिषदेने विशेष अभियान राबविले आहे, हे नक्कीच कौतुकास्पद आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. जॉन्सन आणि त्यांच्या संपूर्ण टीमचे अभिनंदनही यावेळी बच्चू कडू यांनी केले. 

मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. जॉन्सन म्हणाले, विविध योजनांचा लाभ, प्रमाणपत्रे यासाठी दिव्यांगांना फिरावे लागते. सर्व लाभ एकत्र देण्यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. लोकसंख्येच्या सरासरी तीन ते पाच टक्के दिव्यांग असतात. आपल्या जिल्ह्यात दिव्यांगांची नोंदणी कमी आहे, त्यामुळे त्यांना शासकीय योजनांपासून वंचित राहावे लागते. मात्र जिल्हा परिषदेमार्फत विशेष मोहीम राबवून दिव्यांगाची नोंदणी केली जाईल. दिव्यांग विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहू नये म्हणून जिल्हा परिषदेने शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी तपासणी मोहीम हाती घेतली आहे. राज्यात हा अभिनव प्रयोग फक्त चंद्रपूर जिल्ह्यानेच केला असल्याचे श्री. जॉन्सन यांनी सांगितले.

प्रास्ताविकात डॉ. सुभाष पवार म्हणाले, चंद्रपूर जिल्ह्यात जवळपास 13 हजार दिव्यांगांची नोंदणी आहे. जिल्हा प्रशासन, जिल्हा परिषद, महानगरपालिका, नगर पालिका प्रशासन, सामाजिक न्याय, समाजकल्याण विभाग तसेच विविध विभागांमार्फत दिव्यांगांसाठी अनेक योजना राबविल्या जातात व लाभसुध्दा दिला जातो. जिल्ह्यात दिव्यांगांसाठी 12 शाळा असून त्यात 650 विद्यार्थी प्रशिक्षण घेत आहे. तसेच येथे दिव्यांग पुनर्वसन केंद्र कार्यरत असल्याचेही त्यांनी सांगितले.

यावेळी मान्यवरांच्या हस्ते दिव्यांग लाभार्थी सिध्दार्थ टिपले यांना झेरॉक्स मशीन, सुनील गांगरेड्डीवार यांना मोटरपंप, फरान शेख, अर्णव अलोणे यांना व्हीलचेअरचे वाटप करण्यात आले. तसेच दिव्यांग उद्योजकांचा सत्कारसुध्दा करण्यात आला. तत्पूर्वी मान्यवरांच्या हस्ते दिव्यांगासाठी असलेल्या योजनांच्या माहिती पुस्तिकेचे विमोचन करण्यात आले. तसेच येथे लावण्यात आलेल्या विविध स्टॉलची बच्चू कडू यांनी पाहणी केली.

कार्यक्रमाच्या सुरवातीला मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून ब्रेल लिपीचे जनक ग्रॅहम बेल आणि डॉ. हेलन केलर यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करण्यात आले. यावेळी आनंदवन वरोरा येथील संधी निकेतन अपंगांची शाळा येथील दिव्यांग विद्यार्थ्यांनी स्वागतगीत सादर केले. कार्यक्रमाला उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्याम वाखर्डे, कपिलनाथ कलोडे, जिल्हा पुरवठा अधिकारी अजय चरडे, सहाय्यक पांडूरंग माचेवाड यांच्यासह दिव्यांग प्रतिनिधी नीलेश पाझारे व इतर बांधव उपस्थित होते.

०००००

जिल्हाधिकाऱ्यांकडून राज्य व राष्ट्रीय शालेय मैदानी क्रीडा स्पर्धांच्या पूर्व तयारीबाबत आढावा


 

जिल्हाधिकाऱ्यांकडून राज्य व राष्ट्रीय शालेय मैदानी क्रीडा स्पर्धांच्या पूर्व तयारीबाबत आढावा

चंद्रपूरदि. 26 : जिल्ह्यामध्ये प्रथमच राज्यस्तरीय शालेय मैदानी क्रीडा स्पर्धा 26 ते 30 ऑक्टोबर या कालावधीत तर राष्ट्रीय शालेय क्रीडा स्पर्धा 2 ते 5 नोव्हेंबर 2023 या कालावधीत तालुका क्रीडा संकुलबल्लारपूर (विसापूर) या ठिकाणी घेण्यात येणार आहे. स्पर्धेच्या पूर्वतयारी संदर्भात जिल्हाधिकारी विनय गौडा यांनी जिल्हाधिकारी कार्यालयातील वीस कलमी सभागृहात संबंधित यंत्रणेचा आढावा घेतला.

यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक जॉन्सनअपर पोलीस अधीक्षक रीना जनबंधूबल्लारपूरच्या तहसीलदार डॉ. कांचन जगतापउपमुख्य कार्यकारी अधिकारी कपिलनाथ कलोडेश्याम वाखर्डेजिल्हा शल्य चिकित्सक डॉ. महादेव चिंचोळेडॉ. विजय इंगोलेजिल्हा पुरवठा अधिकारी अजय चरडेजिल्हा नियोजन अधिकारी राजेश कळमकर आदींची उपस्थिती होती.

जिल्ह्यात 1417 व 19 वर्षाखालील मुला-मुलींची राज्यस्तरीय शालेय मैदानी क्रीडा स्पर्धा दि. 26 ते 30 ऑक्टोबर या कालावधीत तर 19 वर्षाखालील मुला- मुलींची राष्ट्रीय शालेय क्रीडा स्पर्धा दि. 2 ते 5 नोव्हेंबर 2023 या कालावधीत पार पडणार आहे. या दोन्ही स्पर्धेत राज्यातून अंदाजे 4 हजार खेळाडूपंचपदाधिकारीमार्गदर्शक व व्यवस्थापकांची उपस्थिती असणार आहे. यादरम्यान खेळाडूंना आवश्यक सोयी सुविधा मिळाव्यात यासाठी क्रीडा विभागाने नियोजन करावेयासाठी संबंधित विभागांनी सहकार्य करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी विनय गौडा यांनी दिल्या. 

राज्यस्तरीय स्पर्धेसाठी अंदाजे दीड हजार तर राष्ट्रीय स्पर्धेसाठी अडीच हजार मुले-मुली खेळाडूमार्गदर्शक व व्यवस्थापक सहभागी होणार आहे. त्यांच्या निवासस्थानासाठी सैनिक स्कूलआदिवासी मुला-मुलींचे वस्तीगृहसमाज कल्याण विभागाची वस्तीगृहे आदींना भेटी द्याव्यात. त्यासोबतचशहरातील शासकीय वसतिगृहेविश्रामगृहांची यादी तयार करावी व तेथील कॅपॅसिटी तपासून खेळाडूंच्या निवासाचे नियोजन करावे.

महानगरपालिकेमार्फत शौचालयाची व्यवस्थामोबाईल टॉयलेटकचऱ्याचे व्यवस्थापन आदींची व्यवस्था करावी. सुरक्षेसंदर्भात रामनगर व बल्लारपूर पोलीस स्टेशनची मदत घ्यावी. तसेच पाणीपुरवठासाठी वॉटर टँकर बल्लारपूर नगरपालिकेकडून उपलब्ध करून घ्यावे. त्यासोबतच अतिरिक्त पाण्याचे टँकर उपलब्ध ठेवावे. आरोग्य विभागाने ॲम्बुलन्ससह आरोग्य सुविधा व डॉक्टरांची चमू उपलब्ध ठेवावी. त्यासोबतच स्पर्धेकरिता आवश्यक कर्मचाऱ्यांची नियुक्ती करता येईल. राज्यस्तरीय व राष्ट्रीय स्पर्धेसाठी वेगवेगळे प्लॅन करुन सुधारित निधी मागणी प्रस्ताव पाठविण्याच्या सूचना क्रीडा विभागास दिल्या.

००००००

गुलाबी बोंडअळी व्यवस्थापन मोहिमेची चित्ररथाद्वारे जनजागृती

 


गुलाबी बोंडअळी व्यवस्थापन मोहिमेची चित्ररथाद्वारे जनजागृती

Ø हिरवी झेंडी दाखवून मोहिमेचा शुभारंभ

चंद्रपूरदि.26 : गुलाबी बोंडअळी व्यवस्थापन व फवारणी करतांना घ्यावयाची काळजी या मोहिमेची कृषी विभागामार्फत चित्ररथाद्वारे जिल्हाभरात जनजागृती करण्यात येत आहे. कृषी भवनजिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी कार्यालयाच्या परिसरात जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी शंकर तोटावार यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून या मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला.  

या जनजागृती मोहिमेदरम्यान चित्ररथ गावोगावी जाऊन गुलाबी बोंड अळीची लक्षणेत्याचे नियंत्रण तसेच कीटकनाशके फवारणी करतांना घ्यावयाची काळजी याबाबत दृकश्राव्य माध्यमातून प्रचार-प्रसिद्धी करण्यात येणार आहे.   

सदर चित्ररथ अंकुर सीड्स व जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी चंद्रपूर यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हाभरात प्रत्येक गावोगावी फिरणार आहे.  गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव नियंत्रणाकरीता शेतात गळून पडलेल्या पात्याफुलेबोंडे गोळा करून नष्ट कराव्यात व शेत स्वच्छ ठेवावे. बोंड अळीग्रस्त डोमकळया तोडून आतील अळी सहित नष्ट कराव्यात. कापुस पिकात सर्वेक्षणासाठी हेक्टरी 20-25 कामगंध सापळे (फेरोमन ट्रॅप) लावावेत व त्यात अडकलेले पतंग वेळोवेळी नष्ट करावेत. तसेच शिफारस केलेल्या कालावधीमध्ये योग्य ती काळजी घेवुन कामगंध सापळयामधील ल्युर बदलत राहावे. त्यासोबतच शेतकऱ्यांनी फवारणी करतेवेळी कशाप्रकारे काळजी घ्यावी याबाबत जनजागृती चित्ररथामार्फत करण्यात येणार आहे.

००००००

गणेशोत्सवात ध्वनिक्षेपक व ध्वनिवर्धक वापरासाठी तीन दिवस निश्चित


गणेशोत्सवात ध्वनिक्षेपक व ध्वनिवर्धक वापरासाठी तीन दिवस निश्चित

चंद्रपूरदि. 26 : केंद्र शासनाच्या ध्वनी प्रदुषण (नियमन व नियंत्रण) सुधारित नियम 2017 अन्वये तसेच ध्वनी प्रदूषण(नियमन व नियंत्रण) नियम, 2000 च्या नियम 5(3)नुसारध्वनिक्षेपक व ध्वनीवर्धक यांचा श्रोतगृहेसभागृहेसामूहिक सभागृहे आणि मेजवानी कक्ष यासारख्या बंद जागाखेरीज इतर ठिकाणीध्वनीची विहित मर्यादा राखून सकाळी 6 वाजेपासून ते रात्री 12 वाजेपर्यंत वापर करण्यासाठीसंपूर्ण चंद्रपूर जिल्ह्याकरीता सन-2023 मधील 10 सवलतीचे दिवस निश्चित करण्यात आले आहे. त्यापैकी 5 दिवस राखीव ठेवण्यात आले आहे.  निश्चित करण्यात आलेल्या 10 दिवसांपैकी 3 दिवस गणेश उत्सवाकरीता (अनंत चतुर्दशी हा दिवस धरून) निश्चित करण्यात आले आहे.

गणेश उत्सवा करीता ध्वनिक्षेपक व ध्वनिवर्धक वापरासाठी यापूर्वी निश्चित अनंत चतुर्दशी दि. 28 सप्टेंबर  हा सवलतीचा दिवस व उर्वरित  दि. 27 व 29 सप्टेंबर 2023 हे दोन दिवस  निश्चित करण्यात आले आहे. निश्चित करण्यात आलेल्या सवलतीच्या दिवशी सक्षम प्राधिका-याकडून परवानगी घेऊनच त्यांनी ठरवून दिलेल्या अटी व शर्ती प्रमाणेच ध्वनिक्षेपक व ध्वनीवर्धकाचा वापर करता येईलअसे जिल्हा दंडाधिकारी विनय गौडा यांनी निर्गमित केलेल्या आदेशात नमूद आहे.

०००००