जिल्ह्यात माझी माती माझा देश उपक्रमा अंतर्गत उत्साहाच्या वातावरणात गावागावांत कलश यात्रा सुरु
चंद्रपूर, दि. 17 : स्वातंत्राच्या अमृत महोत्सवानिमित शासन या वर्षी माझी माती माझा देश उपक्रम राबवित आहे व त्या अंतर्गत या पूर्वी शिलाफलक व अमृत वाटीकांची निर्मिती जिल्ह्यातील सर्व ८२५ ग्रामपंचायती मधे पूर्ण झाली असून प्रत्येक घरी हर घर तिरंगा अंतर्गत अभिमानाने तिरंगा फडकविला. त्याचाच दुसरा टप्पा म्हणून जिह्यात सर्वत्र घराघरातून माती किंवा तांदूळ जमा करत गावोगावी उत्साहाच्या वातावरणात अमृत कलश यात्रा सुरु आहे.
‘माझी माती माझा देश’ या अभियानाच्या दुसऱ्या टप्प्यात प्रत्येक गावाच्या प्रत्येक घरातून उत्साहाच्या वातावरणात कलशात माती जमा करायची असून ते करत असताना नागरिकाना पंचप्रण शपथ द्यावयाची आहे. त्या नंतर गावातील जमा झालेली माती तालुक्याच्या ठिकाणी एकत्रित करून तालुक्याचा एक कलश दोन युवकांसह २७ ऑक्टोबर रोजी मुंबई येथे पाठवायचा आहे. येथूनच सर्व स्वयंसेवक पारंपरिक वेशभूषेत दिल्ली येथे मुख्य कार्यक्रमाला हजर राहतील.
सदर अभियानाचा मुख्य कार्यक्रम दिनांक २८ ते ३० ऑक्टोबर दरम्यान मा प्रधानमंत्री यांच्या उपस्थितीत दिल्ली येथे कर्तव्यपथ या जागी होणार असून देशातील प्रत्येक तालुक्यातून असे ७५००० स्वयंसेवक आपापल्या तालुक्याचा कलश घेऊन उपस्थित राहणार आहे. यातूनच शहिदांच्या स्मृती प्रित्यर्थ भव्य अश्या अमृत वटिकेची निर्मिती कर्तव्य पथावर होणार आहे.
जिल्ह्यातील ८२५ ग्रामपंचायत अंतर्गत १४६४ गावांत घरोघरून माती किवा तांदूळ जमा करने सुरु असून गावागावांत कलश यात्रा निघाल्या आहेत व यातूनच ‘एक भारत श्रेष्ठ भारत’ ची स्फूर्ती मनामनात कायम राहील. सदर अभियानात जिल्ह्यातील प्रत्येक नागरिकाने हिरिरीने सहभागी होऊन या राष्ट्रीय उत्सवात शामिल होण्याचे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री विवेक जॉन्सन यांनी केले आहे.
000000
No comments:
Post a Comment