महाविद्यालय स्तरावर शिष्यवृत्तीचे प्रलंबित अर्ज मंजुरीसाठी जिल्हा कार्यालयाकडे सादर करण्याचे आवाहन
चंद्रपूर, दि. 27 : सामाजिक न्याय विभागामार्फत ऑनलाईन महाडीबीटी प्रणालीवर अनुसूचित जाती प्रवर्गासाठी भारत सरकार मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती, शिक्षण व परीक्षा शुल्क योजना, राजर्षी शाहू महाराज गुणवत्ता शिष्यवृत्ती, व्यावसायिक पाठ्यक्रमाशी संलग्न वस्तीगृहातील विद्यार्थ्यांना निर्वाह भत्ता, व्यवसाय प्रशिक्षण शुल्क प्रतिपूर्ती योजना आदी योजना राबविण्यात येतात. या योजनांचे अनेक अर्ज महाविद्यालय स्तरावर प्रलंबित असल्याचे उघडकीस आले आहे. मागासवर्गीय विद्यार्थ्यांचे महाविद्यालय स्तरावर शिष्यवृत्तीचे प्रलंबित अर्ज मंजुरी साठी जिल्हा कार्यालयाकडे सादर करण्याचे आवाहन समाजकल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त बाबासाहेब देशमुख यांनी केले आहे.
सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत अनुसूचित जाती प्रवर्गातील घटकांसाठी विविध कल्याणकारी योजना राबविल्या जातात. या योजनांची रक्कम महाडीबीटी प्रणालीद्वारे आधार संलग्न बँक खात्यात वितरीत करण्यात येते. महाडीबीटी पोर्टलच्या संकेतस्थळावर विद्यार्थ्यांकडून ऑनलाईन अर्ज केले जातात. पात्र विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती सत्रनिहाय दिली जाते. शैक्षणिक वर्ष 2022-23 मधील योजनेचे महाविद्यालय स्तरावर अनुसूचित जाती प्रवर्गातील एकूण 631 अर्ज अद्यापही प्रलंबित आहेत.
समाजकल्याण विभागाने या महाविद्यालयांची यादी जाहीर केली आहे. सदर योजनांचे महाडीबीटी प्रणालीवर अनुसूचित जाती प्रवर्गाचे अर्ज महाविद्यालय स्तरावर प्रलंबित आहेत. संबंधित महाविद्यालयांनी अर्ज मंजुरीसाठी जिल्हा कार्यालयाकडे सादर केले नाहीत.
शिष्यवृत्तीची अर्ज प्रलंबित असलेली महाविद्यालये:
बल्लारपुर इंस्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी बामणी, गोंडपिपरी शिक्षण महाविद्यालय गोंडपिपरी, शासकीय वैद्यकिय महाविद्यालय चंद्रपूर, श्रीमती विमलादेवी आयुर्वेदिक वैद्यकिय महाविद्यालय वांढरी, कल्याण नर्सिंग कॉलेज राजूरा, शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था सिंदेवाही, शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था मुल, शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था सावली, शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था चंद्रपूर, एस.आर.व्ही. नर्सिंग स्कुल सिंदेवाही, सम्राट अशोक ज्यु. कॉलेज चिचपल्ली, अॅड. यादवराव धोटे ज्यु. कॉलेज राजूरा, जनता ज्यु. कॉलेज, गोंडपिपरी, नवभारत ज्यु. कॉलेज मुल या महाविद्यालयाचे अर्ज महाविद्यालय स्तरावर प्रलंबित आहेत. प्राचार्यांनी आपआपल्या महाविद्यालय स्तरावर प्रलंबित असलेले पात्र अर्ज जिल्हा लॉगीन वर पाठवावे. तसेच विद्यार्थी लॉगीन त्रुटी पूर्ततेसाठी परत केलेल्या अर्जाची संबंधित महाविद्यालयांनी विद्यार्थ्यांकडून त्वरीत पूर्तता करावी तसेच अर्ज जिल्हा लॉगीन वर पाठविण्यात यावे. विद्यार्थी शिष्यवृत्तीच्या लाभापासून वंचित राहिल्यास त्यास सदर महाविद्यालय जबाबदार राहील, याची महाविद्यालयांनी नोंद घ्यावी, असे समाजकल्याण विभागामार्फत कळविण्यात आले आहे.
०००००
No comments:
Post a Comment