Search This Blog

Tuesday, 12 September 2023

मुलीच्या विवाहासाठी शुभमंगल, सामुहिक/नोंदणीकृत विवाह योजना

 

मुलीच्या विवाहासाठी शुभमंगल, सामुहिक/नोंदणीकृत विवाह योजना

चंद्रपूर, दि. 12 : जिल्हा महिला व बालविकास अधिकारी कार्यालयाद्वारा जिल्ह्यातील शेतकरी, शेतमजूर, निराधार, परित्यक्त्या, विधवांच्या मुलींच्या विवाहाकरीता शुभमंगल, सामूहिक/नोंदणीकृत विवाह योजना जिल्हा नियोजन विकास समितीकडून मिळणाऱ्या निधीतून राबविण्यात येते. या योजनेअंतर्गत वधूच्या कुटुंबाचे वार्षिक कमाल उत्पन्न मर्यादा रु.1 लाख इतके राहील. अशा कुटुंबातील मुलींच्या विवाहासाठी प्रतिजोडपे रु. 10 हजार एवढे अनुदान शासन निर्णयातील विहित अटी व शर्तीच्या अधीन राहून लाभार्थ्यांना लाभ देण्यात येते.

शुभमंगल, सामुहिक/नोंदणीकृत विवाह योजनेअंतर्गत, सामूहिक विवाहाचे आयोजन करणाऱ्या स्वयंसेवी संस्था नोंदणीकृत असणे आवश्यक राहील. संस्था नोंदणी अधिनियम 1860, बॉम्बे पब्लिक ट्रस्ट कायदा 1950 अंतर्गत नोंदणीकृत स्वयंसेवी संस्था किंवा महाराष्ट्र सहकारी संस्थांचे अधिनियम 1960 अंतर्गत नोंदणीकृत  संस्थामार्फतच  शुभमंगल सामूहिक/नोंदणीकृत विवाहाचे आयोजन करण्यास परवानगी राहील.

या योजनेअंतर्गत सामूहिक विवाहाचे आयोजन स्वयंसेवी संस्थेच्या माध्यमातून 5 ते 100 जोडप्यांचा समावेश करण्याची परवानगी राहील. 100 जोडप्याच्या वर समावेश असलेल्या विवाह सोहळ्यासाठी अनुदान अनुज्ञेय राहणार नाही. एका स्वयंसेवी संस्थेने वर्षातून दोनदाच सामूहिक विवाह समारंभ आयोजित करता येईल. त्यापेक्षा जास्त विवाह सोहळे आयोजित केल्यास त्यासाठी कोणतेही शासकीय अनुदान अनुज्ञेय राहणार नाही. सामूहिक विवाह सोहळ्यात सामील सर्व जोडप्यांची कागदपत्रे विवाह सोहळ्याच्या किमान 1 महिना अगोदर अटी व शर्तीच्या अधीन राहून महिला व बालविकास अधिकारी, चंद्रपूर यांच्या कार्यालयात अर्जासह सादर करावेत.

याशिवाय सुधारीत शुभमंगल, सामुहिक/नोंदणीकृत विवाह योजनेअंतर्गत जे जोडपे सामूहिक  विवाह  सोहळ्यात सहभागी न होता, सरळ  विवाह नोंदणी कार्यालयात जाऊन नोंदणीकृत विवाह करून सामूहिक/ नोंदणीकृत  विवाह  योजनेच्या अटी व शर्ती पूर्ण करणाऱ्या वधू लाभार्थींना रु. 10 हजार इतके अनुदान जिल्हा नियोजन विकास समितीकडून प्राप्त निधीतून देण्यात येते. तसेच सदर योजनेच्या अटी व शर्तीच्या अधिक माहितीकरीता जिल्हा महिला व बालविकास अधिकारी कार्यालयात भेट द्यावी, असे जिल्हा महिला व बालविकास अधिकारी यांनी कळविले आहे.

००००००

No comments:

Post a Comment