Search This Blog

Friday, 22 September 2023

गुणवत्तापूर्ण व दर्जेदार विकास कामामुळेच जिल्ह्याचा नावलौकिक - पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार



 

गुणवत्तापूर्ण व दर्जेदार विकास कामामुळेच जिल्ह्याचा नावलौकिक - पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार

Ø लखमापूर येथे हनुमान मंदिर परिसर सौंदरीकरणाचे लोकार्पण व पाण्याच्या टाकीचे भूमिपूजन

चंद्रपूर, दि. 22 : नागपूर - चंद्रपूर मार्गावरील लखमापूर हनुमान मंदिर परिसर हा अध्यात्मिक ऊर्जा देणारा परिसर आहे. या परिसराच्या सौंदर्यीकरणासाठी 60 लक्ष रुपये मंजूर करण्यात आले होते, या परिसरातील अतिशय चांगले कामे झालेली आहे. शेवटी गुणवत्तापूर्ण व दर्जेदार कामांमुळेच जिल्ह्याचा नावलौकिक वाढतो, असे प्रतिपादन राज्याचे वने, सांस्कृतिक कार्य, मत्स्यव्यवसाय मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले.

लखमापूर येथे हनुमान मंदिर परिसर सौंदर्यीकरणाचे लोकार्पण व नवीन पाण्याच्या टाकीचे भूमिपूजन करताना ते बोलत होते. यावेळी मंचावर देवराव भोंगळे, रामपाल सिंग, हनुमान काकडे, सरपंच शारदा राजूरकर, उपसरपंच प्रभाकर ताजने,  अनिल डोंगरे, विलास टेंभुने, नामदेव आसुटकर, हेमा रायपूरे, फारुख शेख, हनुमान मंदिर देवस्थानचे अध्यक्ष सुरेश शर्मा, शांताराम चौखे, मनोज मानकर आदी मान्यवर उपस्थित होते.

मंदिर परिसराच्या सौंदर्यीकरणाची मागणी हनुमान मंदिर देवस्थानचे अध्यक्ष श्री. शर्मा आणि त्यांच्या टीमने केली होती, असे सांगून पालकमंत्री श्री. मुनगंटीवार म्हणाले, नागरिकांची ही मागणी तत्कालीन ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांना सांगितली व त्यांनी मंदिर परिसराच्या सौंदर्यीकरणासाठी 60 लाख रुपये तात्काळ मंजूर केले. लखमापूर येथील हनुमानजीचे मंदिर हे अधिक सुंदर व आकर्षक होण्यासाठी आणखी काही कामे शिल्लक असल्यास निधी मागणीचा प्रस्ताव सादर करावा. मंदिरासाठी तात्काळ निधी उपलब्ध करून देण्यात येईल, अशी ग्वाही पालकमंत्र्यांनी दिली.

पुढे ते म्हणाले, आज येथे नवीन पाण्याच्या टाकीचे भूमिपूजन करण्यात आले असून यासाठी 1 कोटी 62 लक्ष रुपये मंजूर करण्यात आले आहे. गावात आपण पिढ्यानपिढ्या राहत आलो आहोत. त्यामुळे पाण्याच्या टाकीचे काम उत्तम व  दर्जेदार व्हावे, याकडे गावकऱ्यांनी गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे. कामे दर्जेदार असली तरच आपला परिसर, गाव, शहर व जिल्ह्याचा विकास होतो. चंद्रपूर जिल्हा हा चिंतामुक्त व आनंदयुक्त व्हावा, यासाठी सर्वांनी एकजुटीने प्रयत्न करावे, असे आवाहनही त्यांनी गावकऱ्यांना केले. कार्यक्रमाच्या सुरुवातीला हनुमान मंदिर परिसर सौंदर्यीकरणाचे लोकार्पण व नवीन पाण्याच्या टाकीचे भूमिपूजन झाले, असे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी घोषित केले.

असे आहे हनुमान मंदिर परिसराचे सौंदर्यीकरण : लखमापूर येथील हनुमान मंदिर परिसरातील संरक्षण भिंतीचे बांधकाम व परिसर सौंदर्यीकरणाच्या कामासाठी ग्रामीण विकास निधी अंतर्गत 60 लक्ष रुपये मंजूर करण्यात आले. यात व्यासपीठाचे बांधकाम, भित्तीचित्रे व मूर्ती कामासह सौंदर्यीकरण आणि वृक्ष लागवड यांचा समावेश आहे. साधारणत: 170 मीटर लांबीची व सरासरी 2.2 मीटर उंचीची आर.सी.सी. फ्रेम स्ट्रक्चर एम-25 दर्जाची संरक्षण भिंत पूर्ण करण्यात आली आहे. भिंतीकरिता फ्लॅश एश प्रकारच्या विटांचा वापर करण्यात आला असून भिंत 9 इंच जाडीची आहे. तसेच भिंतीला दोन्ही बाजूस ऍक्रेलिक इमुलशन पेंटने रंगरंगोटी करण्यात आली आहे. नैऋत्य दिशेला 27 स्क्वेअर मीटर क्षेत्रफळाचे व्यासपीठाचे बांधकाम करण्यात आले आहे. या मंदिर परिसरात आध्यात्मिक दर्शन करणारे एफ. आर. पी. प्रकारचे भित्तीचित्रे बनवण्यात आली असून संरक्षण भिंतीला लागून वृक्षलागवड सुद्धा करण्यात आली आहे.

000000


No comments:

Post a Comment