Search This Blog

Thursday 30 June 2022

जलशक्ती अभियानात यंत्रणांनी सक्रीय सहभाग नोंदवावा - जिल्हाधिकारी अजय गुल्हाने

 




जलशक्ती अभियानात यंत्रणांनी सक्रीय सहभाग नोंदवावा - जिल्हाधिकारी अजय गुल्हाने

चंद्रपूर, दि. 30 जून पावसाच्या पाण्याच्या प्रत्येक थेंबाचे जतन करणे व त्या पाण्याचा पुनर्वापर आणि संरचनेचे पुनर्भरण करण्यासाठी केंद्र शासनाने जलशक्ती अभियानाला सुरवात केली आहे. या अभियानामध्ये जिल्ह्यातील संबंधित यंत्रणांनी सक्रीय सहभाग नोंदवावा व केलेली कामे पोर्टलवर अपलोड करावी, अशा सुचना जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी दिल्या.

जिल्हाधिकारी कार्यालयात मृद व जलसंधारण विभागामार्फत आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा गौरकार, उपविभागीय अधिकारी संपत खलाटे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पंचायत) कपिल कलोडे, जलसंधारण विभागाचे कार्यकारी अभियंता सुभाष आकोसकर आदी उपस्थित होते.

जलशक्ती अभियानाला केंद्र शासनाच्या वतीने 29 मार्च 2022 पासून सुरवात करण्यात आली आहे, असे सांगून जिल्हाधिकारी श्री. गुल्हाने म्हणाले, या योजनेचा कालावधी मार्च 2022 ते 30 नोव्हेंबर 2022 असा आहे. मात्र यंत्रणांनी जलसंधारणासंदर्भात जानेवारीपासून केलेली कामे सदर पोर्टलवर अपलोड करायची आहे. तसेच या अभियानांतर्गत पाण्याच्या प्रत्येक थेंबाचे जतन करणे, पाण्याचा पुनर्वापर आणि संरचनेचे पुनर्भरण, जलसंधारण संरचनेसाठी संभाव्य ग्रामस्तरीय योजना / पाणलोट योजना तयार करणे आणि गावाचा नकाशाचा वापर करून नियोजनबध्द कार्यक्रम राबविणे, पाणलोट क्षेत्रापैकी किमान 20 टक्के क्षेत्र हरीताखाली आणणे, जमिनीतील मृद ओलावा संवर्धन आदी कामे करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

अमृत सरोवर योजनेचा आढावा : अमृत सरोवर योजनेचा आढावा घेतांना जिल्हाधिकारी अजय गुल्हाने म्हणाले, जे काम हाती घेण्यात आले आहे, त्या प्रत्येक साईटचे काम पोर्टलवर टाकावे. जेणेकरून राज्यस्तरावर कामांची प्रगती दिसेल. तसेच अमृत सरोवरची जी कामे सुरू आहेत, ते तातडीने 100 टक्के पूर्ण करण्यासाठी तहसीलदारांनी नियोजन करावे. अमृत सरोवराची कामेसुध्दा जलशक्ती पोर्टलवर अपलोड करता येते, असे ते म्हणाले. यावेळी त्यांनी बल्लारपूर, भद्रावती, चंद्रपूर, ब्रम्हपुरी, चिमूर, गोंडपिपरी, जिवती, कोरपना, मूल, नागभीड, कोरपना, पोंभुर्णा आदी तालुक्यांचा आढावा घेतला.

बैठकीला सर्व उपविभागीय अधिकारी, सर्व तहसीलदार, गटविकास अधिकारी दूरदृष्य प्रणालीद्वारे उपस्थित होते.

०००००००

कवठाळा ते गडचांदूर मार्गावर जड वाहनांना 30 जुलैपर्यंत वाहतुकीस मनाई

 

कवठाळा ते गडचांदूर मार्गावर जड वाहनांना 30 जुलैपर्यंत वाहतुकीस मनाई

चंद्रपूर, दि. 30 जून : भोयगांव-कवठाळा- गडचांदुर या मार्गावर रस्त्याचे सिमेंट काँक्रीटचे काम चालू आहे व त्याकरीता वापरण्यात येणारी मशीनरी ही मोठी आहे. रस्ता बांधकाम करताना जड वाहतूक सुरू ठेवणे धोकादायक आहे. जड वाहतक सुरू ठेवल्यास लहान वाहनांना येण्याजाण्याकरीता रस्ता अपूरा पडत असल्याने अपघात होण्याची शक्यता आहे. त्यामुळ कवठाळा ते गडचांदूर मार्गावर जड वाहनांना 30 जुलैपर्यंत वाहतुकीस मनाई करण्यात आल्याचे पोलिस अधिक्षक अरविंद साळवे यांनी कळविले आहे.

कवठाळा ते गडचांदूर हा रस्ता जड वाहनाकरीता पूर्णपणे बंद करण्याची सार्वजनिक बांधकाम विभागाने सुचना केली होती. त्याप्रमाणे मुंबई पोलिस अधिनियम-1951 च्या कलम- 33(1)(ब) नुसार सार्वजनिक ठिकाणी व रस्त्यावर रहदारीचे नियमनासाठी प्राप्त असलेल्या कायदेशीर अधिकारान्वयेसदर वाहतूक बंद करण्यात आली आहे. 

यापूर्वी 2 जून ते 30 जून 2022 पर्यंत वाहतूक बंद करण्याची परवानगी देण्यात आली होती. सदर कालावधीत रस्त्याच्या रूंदीकरणाचे काम पूर्ण न झाल्याचे सार्वजनिक बांधकाम विभागाने कळविल्यामुळे  30 जुलै 2022 पर्यंत सर्व प्रकारच्या जड वाहनांना वाहतुकीस बंदी ठेवण्यात आली आहे. जनतेने पर्यायी मार्ग म्हणून गडचांदुरकडून चंद्रपुरकडे येणारी जड वाहतूक ही गडचांदूर- राजुरा-बल्लारशा-चंद्रपुर या मार्गाचा वापर करावा. तसेच गडचांदुरकडून घुग्घुसकडे जाणारी जड वाहतुक ही गडचांदुर-आवाळपुर-गाडेगांव-कवठाळा- भोयगांव-घुग्गुस या मार्गांचा वापर करावा, असे कळविण्यात आले आहे.

०००००००


सेवानिवृत्तीच्या दिवशी जि.प.च्या 73 अधिकारी कर्मचा-यांना अनुषंगीक लाभाचे वितरण


 

सेवानिवृत्तीच्या दिवशी जि.प.च्या 73 अधिकारी कर्मचा-यांना अनुषंगीक लाभाचे वितरण

चंद्रपूर, दि. 30 जून : जिल्हा परिषदेच्या विविध विभागांतर्गत व विविध पंचायत समित्यांतर्गत कार्यरत असलेले वर्ग-1 ते 4 चे एकूण 73 अधिकारी / कर्मचारी वयाची 58 /60 वर्षे पूर्ण करून नियत वयोमानाने सेवानिवृत्त होत आहेत, त्यांना सेवानिवृत्तीच्याच दिवशी अनुषंगिक लाभाचे वितरण करण्यात आले आहे.  

सेवा निवृत्तीच्या दिवशी संबंधित अधिकारी व कर्मचा-याला लाभ मिळावा, या  उपक्रमाची सुरुवात जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. मिताली सेठी यांनी डिसेंबर  2021 पासून सुरू केली. गत सहा महिन्यात एकूण 149 अधिकारी / कर्मचारी यांचा सत्कार व निरोप समारंभ महिन्याच्या शेवटच्या दिनांकास जिल्हा परिषदेच्या कन्नमवार सभागृहात आयोजित करण्यात येतो. त्यानुसार आज (दि.30 जून) एकूण 73 अधिकारी/कर्मचारी नियत वयोमानाने सेवानिवृत्त झाले.

कार्यक्रमाला प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा गौरकारउपमुख्य कार्यकारी अधिकारी (सामान्य) श्याम वाखर्डे,  उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पंचायत) कपिल कलोडे, मुख्य लेखा व वित्त अधिकारी अशोक मातकरमहिला व बालकल्याण विभागाचे जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक संग्राम शिंदे, जिल्हा आरोग्य अधिकारी राजकुमार गहलोत, उपमुख्य लेखा तथा वित्त अधिकारी धर्मराव पेंदाम, उपशिक्षणाधिकारी निकिता ठाकरे आदी उपस्थित होते.

कार्यक्रमांचे संचालन सहाय्यक प्रशासन अधिकारी नितीन फुलझेले यांनी तर आभार विलास मांडवकर यांनी मानले. कनिष्ठ प्रशासन अधिकारी यांनी केले. कार्यक्रमाला जिल्हा परिषदेचे सर्व विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

००००००

4 जुलै रोजी लोकशाही दिनाचे आयोजन

 

जुलै रोजी लोकशाही दिनाचे आयोजन

चंद्रपूर दि. 30 जून : सर्वसामान्य जनतेच्या तक्रारी आणि अडचणी यांची न्याय व तत्परतेने शासकीय यंत्रणेकडून सोडवणूक करण्यासाठी एक प्रभावी उपाययोजना म्हणून जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली लोकशाही दिनाचे आयोजन दर महिन्याच्या पहिल्या सोमवारी करण्यात येते. या लोकशाही दिनानिमित्त नागरिक व शेतकरी जिल्हाधिकारी यांच्याकडे तक्रार अर्ज दाखल करतात.

सोमवार दि. 4 जुलै 2022 रोजी दुपारी 1 वाजता जिल्हाधिकारी कार्यालय, चंद्रपूर येथे लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात येत आहे. जिल्हास्तरीय लोकशाही दिनात तक्रार सादर करतांना विहित नमुन्यातील तक्रार अर्जासोबत तालुका लोकशाही दिनातील टोकन क्रमांकाची प्रत तसेच अर्ज सादर करावा. तदनंतरच तक्रार अर्ज स्वीकारण्यात येईल, तसेच निवेदन स्वीकारण्याची वेळ दुपारी 12 ते 1 वाजेपर्यंतच्या कालावधीत राहील. लोकशाही दिनात नागरिकांनी मास्क घालणे व सामाजिक अंतराचे पालन करणे अनिवार्य राहील, असे जिल्हा प्रशासनामार्फत कळविण्यात आले आहे.

००००००

Wednesday 29 June 2022

टीबी नियंत्रण व राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रमाचा आढावा



 

टीबी नियंत्रण व राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रमाचा आढावा

Ø अतिरिक्त जिल्हाधिका-यांच्या अध्यक्षतेखाली बैठक

चंद्रपूर, दि.29 जून राष्ट्रीय क्षयरोग दूरीकरण कार्यक्रमांतर्गत जिल्ह्यात टीबी नियंत्रणासाठी प्रभावी उपाययोजना तसेच तंबाखु नियंत्रणासाठी ‘कोटपा’ कायद्याच्या प्रभावी अंमलबजावणीबाबत अतिरिक्त जिल्हाधिकारी विद्युत वरखेडकर यांनी आरोग्य विभागाचा आढावा घेतला.

जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या या बैठकीला जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. निवृत्ती राठोड, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. राजकुमार गहलोत, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. हेमचंद कन्नाके, मनपाच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. वनिता गर्गेलवार, डॉ. श्वेता सवळीकर आदी उपस्थित होते.

यावेळी अतिरिक्त जिल्हाधिकारी विद्युत वरखेडकर म्हणाल्या,आरोग्य विभागाने जिल्ह्यातील टीबी रुग्णांच्या संपर्कात राहून सदर रुग्ण नियमितपणे औषधोपचार घेतो की नाही, याकडे गांभिर्याने लक्ष द्यावे. टीबी हा संसर्गजन्य आजार आहे. हा संसर्ग इतरांना होऊ नये, याची काळजी घ्यावी. तसेच टीबी मुक्त प्रमाणपत्र जिल्ह्याला मिळण्यासाठी आरोग्य विभागाने योग्य नियोजन करावे, अशा सुचना त्यांनी दिल्या.

बैठकीत राष्ट्रीय क्षयरोग दूरीकरण कार्यक्रम, टीबी रुग्णांना सामाजिक योजनांचा लाभ, सामाजिक संघटनांमार्फत त्यांना देण्यात आलेली मदत, समाजामध्ये टीबी नियंत्रणासाठी करण्यात आलेली जनजागृती, क्षयरोग प्रतिसाद मजबुत करणे, क्षयरोग बाबत समाजामध्ये असलेले भेदभाव दूर करणे याशिवाय तंबाखु कार्यक्रम नियंत्रण कार्यक्रमांतर्गत जिल्ह्यामध्ये कोटपा कायद्याची प्रभावी अंमलबजावणी, पोलिस व अन्न व औषध प्रशासन विभागामार्फत कोटपा कायद्यांतर्गत केलेल्या कार्यवाहीचा अहवाल, जिल्ह्यातील शाळा तंबाखु मुक्त करणे आणि ‘येलो लाईन कॅम्पेन’ राबविणे आदींचा आढावा घेण्यात आला.

०००००००

Tuesday 28 June 2022

बेपत्ता महिलेबाबत पोलीस स्टेशन पडोली येथे संपर्क साधण्याचे आवाहन

 बेपत्ता महिलेबाबत पोलीस स्टेशन पडोली येथे संपर्क साधण्याचे आवाहन

चंद्रपूर, दि. 28  जून : मोरवा येथील रहिवासी रजनी अनिल मोहुर्ले (वय 24)  ही महीला शुक्रवार, दि. 17 जून 2022 रोजी दुपारी 3.30 वाजता घरातील कुणालाही काही न सांगता निघून गेली आहे. तिचा शोध घेतला असता ती मिळून आलेली नाही. या प्रकरणी सदर महिलेचा पती अनिल विठ्ठल मोहुर्ले यांच्या तक्रारीवरुन पोलिस स्टेशन, पडोली येथे बेपत्ता असल्याची नोंद करण्यात आली आहे. सदर महिला आढळून आल्यास पोलिस स्टेशन, पडोली  येथे संपर्क साधावा, असे पोलीस स्टेशन, पडोलीचे तपास अधिकारी भुषण टोंग यानी कळविले आहे.

०००००००

जि.प. व पं.स. सार्वत्रिक निवडणुका अंतिम प्रभाग रचना नोटीस बोर्डावर प्रसिध्द

 

जि.प. व पं.स. सार्वत्रिक निवडणुका अंतिम प्रभाग रचना नोटीस बोर्डावर प्रसिध्द

चंद्रपूर, दि.28 जून राज्य निवडणूक आयोगाच्या कार्यक्रमान्वये जिल्हा परिषद व पंचायत समिती भौगोलिक सीमा निश्चित केलेल्या अंतिम प्रभाग रचनेस नागपूर विभागीय आयुक्तांकडून मान्यता प्रदान करण्यात आली आहे. सदर अंतिम प्रभाग रचना व अनुसूची 27 जून 2022 रोजी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नोटीस बोर्डवर, तसेच जिल्हा परिषद कार्यालय, जिल्ह्यातील सर्व तहसील कार्यालय, सर्व पंचायत समिती कार्यालयाच्या नोटीस बोर्डवर प्रसिध्द करण्यात आल्याचे उपजिल्हा निवडणूक अधिकारी यांनी कळविले आहे.

००००००

बाल संरक्षण कक्ष व चाईल्ड लाईनच्या सतर्कतेने बालविवाह रोखण्यात यश

 

बाल संरक्षण कक्ष व चाईल्ड लाईनच्या सतर्कतेने बालविवाह रोखण्यात यश

चंद्रपूर, दि. 28  जून : गोंडपिपरी तालुक्यात 16 वर्षाच्या बालिकेचा व  20 वर्षीय बालकाचा बालविवाह होणार असल्याची माहिती मिळताच त्या माहितीच्या आधारे जिल्हा महिला व बालविकास अधिकारी, जिल्हा बाल संरक्षण कक्ष, चाइल्ड लाईन व गोंडपिपरी पोलीस प्रशासनाच्या सतर्कतेने व संयुक्त कार्यवाहीने सदर बालविवाह थांबविण्यात आला.

गोंडपिपरी तालुक्यातील एका गावात बालविवाह होणार असल्याची माहिती मिळाल्यानंतर जिल्हा महिला व बालविकास अधिकारी कार्यालय, जिल्हा बाल संरक्षण कक्ष व चाईल्ड लाईन या यंत्रणेने गोंडपिपरी पोलीस प्रशासनाशी संपर्क साधून माहिती दिली. पोलीस प्रशासनाने सदर गावात भेट देत बालविवाह थांबविण्याची कार्यवाही करत बालविवाह न करण्याचे आदेश दिले.

दुसऱ्या दिवशी चाईल्ड लाईन, आणि जिल्हा बाल संरक्षण कक्ष यांनी संयुक्तरीत्या विवाह स्थळी भेट दिली तसेच अल्पवयीन बालकाच्या व बालिकेच्या कुटुंबाचे समुपदेशन केले आणि बालविवाह न करण्यासंबंधी हमीपत्र लिहून घेण्यात आले.

सदर प्रकरणांमध्ये जिल्हा महिला व बालविकास अधिकारी दीपक बानाईत, महिला विकास मंडळाच्या सरचिटणीस प्रभावती मुठाळ, चाईल्ड लाईनच्या संचालिका नंदाताई अल्लुरवार, समन्वयक अभिषेक मोहुर्ले,  संरक्षण अधिकारी सचिंद्र नाईक, पोलीस विभाग आदींचे सहकार्य लाभले.

०००००००

दिवसा चावणा-या डेंग्यू डासापासून स्वत:चे संरक्षण करा

 जलजन्य आजार विशेष वृत्त :


दिवसा चावणा-या डेंग्यू डासापासून स्वत:चे संरक्षण करा

Ø स्वच्छ पाण्यात होते उत्पती

चंद्रपूर, दि.28 जून पावसाळ्याला सुरुवात झाल्यामुळे या कालावधीत अनेक जलजन्य आजारांची उत्पत्ती होते. आजारांपैकी डेंग्यू हा एक प्रमुख आजार आहे. विशेष म्हणजे डेंग्यूचा डास हा रात्री नाही तर दिवसा चावा घेतो. तसेच याची उत्पत्ती स्वच्छ पाण्यामध्ये होते. 

डेंग्यू ताप म्हणजे काय : राज्यातील काही भागातील पाण्याचे दूभिक्ष्य व त्यामुळे जनतेत पाणी साठविण्याच्या प्रवृत्तीत झालेली वाढ आणि डासोत्पत्ती रोखण्यातील निष्काळजीपणा ही डेंग्यूताप उद्रेकाची प्रमुख कारणे आहेत.  डेंग्यू ताप हा किटकजन्य आजार असून तो फलॅव्हीव्हायरस प्रकारच्या विषांणूमुळे होतो. त्याचे डेंग्यू-1 ते डेंग्यू- 4 असे चार प्रकार आहेत.  डेंग्यू तापाचा प्रसार एडिस एजिप्टाय(टायगरमॉसकिटो) प्रकारच्या डासांच्या मादीमार्फत होतो.

प्रसार कसा होतो : घरातील व परिसरातील साठविलेले स्वच्छ पाण्याचे साठे. (उदा. रांजणहौदपाण्याचे मोठे बॅरलइमारतीवरील पाण्याच्या टाक्याकुलर्स् कारंजीफुलदाण्या इत्यादी) घराच्या परिसरातील टाकलेल्या निरपयोगी वस्तुमध्ये साठलेले स्वच्छ पाणी (उदा. नारळाच्या करवंटयाडबेबाठल्याप्लास्टिकची भांडीरिकाम्या कुंडयाटायर्स्  इत्यादी) बांधकामाच्या ठिकाणी असलेले पाण्याचे उघडे साठे.

डेंग्यू तापाच्या रुग्णांस एडिस एजिप्टाय डासाची मादी चावल्यास तिच्या शरीरात डेंग्यू तापाचे विषाणू प्रवेश करतात.  साधारपणपणे 8 ते 10 दिवसांत डासांच्या शरीरात डेंग्यू विषाणूंची पूर्ण वाढ झाल्यावर हा दूषित डास कोणत्याही निरोगी व्यक्तीला चावल्यास त्या व्यक्तीस डेंग्यू ताप होऊ शकतो. एकदा दूषित झालेला डास तो मरेपर्यत दूषित राहतो.

रुग्णाची लक्षणे : तीव्रताप, तीव्र डोकेदूखीस्थायूदूखी व सांधेदूखी, उलटया होणे, डोळयांच्या आतिल बाजूस दुखणे, अंगावर पुरळ, अशक्तपणाभुक मंदावणेतोंडाला कोरड पडणे, रक्तातील प्लेटलेटची संख्या कमी होणे, डेंग्यू तापाची लागण ही साथ स्वरुपाची असून त्यातील रुग्णांची संख्या मोठी असते. रुग्ण बेशुध्द होऊ शकतो व गंभीर बेशुध्द अवस्थेला डेंग्यू शॉकसिंड्रोंम असे म्हणतात.  यामध्ये मृत्यूचे प्रमाण जास्त असते. रक्तस्त्रावासह डेंग्यूताप (डेंग्यू हेमोरेजिक फिवर) व डेंग्यू शॉक सिंड्रोमच्या रुग्णांना तातडीने रुग्णालयात उपचारासाठी दाखल करणे आवश्यक आहे.

तापाचे निदान : डेंग्यु तापाचे निश्चित निदान करण्याकरीता रुग्णांच्या रक्ताचे नमुने घेतले जाते. सदर नमुने शासकिय वैद्यकिय महाविद्यालय येथे तपासणीकरीता पाठवून डेंग्यु तापाचे निश्चित निदान करता येते.

 उपचार : डेंग्यू तापावर निश्चित असे उपचार नाहीत.  वेदनाशामक औषधे व विश्रांती घेणे आवश्यक असते. या रुग्णांना ऑस्पीरिनब्रुफेन इत्यादी सारखी औषधे देवू नयेत. डेंग्यू तापाच्या रुग्णांना वयोमानानुसार पॅरेसिटेमॉल गोळयांचा उपचार करावा.

प्रतिबंधक / नियंत्रणासाठी उपाययोजना : डास नियंत्रणासाठी उपाययोजनेंतर्गत डासोत्पत्ती स्थानामध्ये डासाच्या अळया खाणारे गप्पी मासे सोडावेत. आठवडयातून किमान एका ठराविक दिवशी कोरडा दिवस पाळावा. घरातील पाणी साठयाची भांडीमाठरांजणसिमेंटची टाकी आठवडयातून किमान एकदा रिकामी करून घासून पुसून कोरडी करावी व नंतर त्यात पाणी भरावे.  घराच्या परिसरातील किंवा घराच्या छतावरील निरुपयोगी वस्तु नष्ट करावी. डासांपासून व्यक्तीगत सुरक्षिततेसाठी मच्छरदाणीचा वापरडासप्रतिरोध क्रिमचा वापरडेंग्युचा डास हा दिवसा चावत असल्यामुळे शरीर पूर्ण झाकेल असे कपडे घालणेघर व घराचा परिसर तसचे कार्यालयीन कामाच्या ठिकाणी व शाळेत स्वच्छता ठेवावी. नविन बांधकाम सुरु असलेल्या ठिकाणी पाणी साचु देऊ नये.

टायर आणि भंगार इ. निरोपयोगी सामानामध्ये पाणी साठुन राहणार नाही याची दक्षता घ्यावी. निरोपयोगी प्लॅस्टीकच्या वस्तुची विल्हेवाट लावावी. घरातील सर्व पाणी साठयांना हवाबंद झाकणे बसवावित किंवा पातळ स्वच्छ फडक्याने बांधुन ठेवावे ज्यामुळे डास आत जाऊन अंडी घालणार नाही. रिकाम्या भुखंडावर पाणी कचरा किंवा पाणी साचणार जाणार नाही याची दक्षता घ्यावी. शोषखडयाचा वापर करण्यात यावा.

फ्रिजचा ड्रिपपॅनकुलरफुलदाणीयातील पाणी बदलत राहावे. कुंडयातील पाण्याचा दर तीन दिवसाने निचरा करावा. फुलाच्या कुंडयामध्ये लाल मातीचा वापर करावा. पाण्याची टाकी घरात असल्यास ती झाकण लावून बंद करून ठेवावी. खिडक्यांवर घट्ट जाळी किंवा काच लावावी आणि दरवाजेसुध्दा बंद करून ठेवावे, जेणेकरुन डास घरात येणार नाहीत. डेंग्यू ताप नियंत्रणसाठी शासकीय प्रयत्नांबरोबरच जनतेचे सक्रिय सहकार्य अत्यंत आवश्यक आहे.

चंद्रपुर जिल्हयात सन 2021 मध्ये ग्रामीण भागात 326 व शहरी भागात 265 असे एकूण 591 डेंग्युचे रुग्ण आढळुन आलेले होते. त्यापैकी 5 रुग्णाचा मृत्यु झाल्याचे आरोग्य विभागाने कळविले आहे.

००००००००

जागतिक बालकामगार विरोधी दिवसानिमित्त चित्रकला स्पर्धेचे बक्षीस वितरण

 


जागतिक बालकामगार विरोधी दिवसानिमित्त चित्रकला स्पर्धेचे बक्षीस वितरण

चंद्रपूर, दि. 28  जून जागतिक बालकामगार विरोधी दिवसाचे महत्त्व जिल्ह्यातील मुलांना व्हावे, याकरीता महिला विकास मंडळ द्वारा संचालित चाइल्ड लाईन, चंद्रपूर द्वारे जिल्हास्तरीय चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या चित्रकला स्पर्धेचा बक्षीस वितरण सोहळा नुकताच पार पडला. याप्रसंगी बालकल्याण समितीच्या अध्यक्षा क्षमा धर्मपुरीवार, सरचिटणीस प्रभावती मुठाळ, संचालिका नंदा अल्लुरवार, महिला आर्थिक विकास महामंडळाचे सदस्य व चाईल्ड लाईन चंद्रपुरची टिम प्रामुख्याने उपस्थित होती.

यावेळी क्षमा धर्मपुरीवार यांनी, बालकामगार वृत्तीला विरोध करून बालकामगार आढळल्यास बालकल्याण समिती, चंद्रपूर तसेच चाईल्ड लाईन 1098 या टोल फ्री क्रमांकावर माहिती देण्याचे आवाहन केले. संचालिका नंदा आलूरवार यांनी संस्थेचे सदस्य व चाईल्ड लाईन टीम बाल कामगारांसाठी करीत असलेल्या कार्याचे कौतुक केले. तर संस्थेच्या सरचिटणीस श्रीमती मुठाळ यांनी संस्था स्थापनेचा उद्देश व भविष्यकालीन वाटचालीबाबत उपस्थितांना माहिती दिली. जिल्ह्यात कोणतेही 0 ते 18 वर्षे वयोगटातील काळजी व संरक्षण संदर्भात गरज असलेली बालके आढळल्यास 1098 या टोल फ्री क्रमांकावर माहिती द्यावी. माहिती देणाऱ्या व्यक्तीचे नाव पूर्णतः गोपनीय ठेवण्यात येईलअसे आवाहन करण्यात आले.

याप्रसंगी जिल्हास्तरीय चित्रकला स्पर्धेमध्ये विजेत्या व सर्व सहभागी विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र, डायरी व पेन देऊन गौरविण्यात आले.

००००००

कळमना येथे कापसाचे 3 लक्ष 94 हजार 470 रुपयांचे अनधिकृत बियाणे जप्त


कळमना येथे कापसाचे 3 लक्ष 94 हजार 470 रुपयांचे अनधिकृत बियाणे जप्त

Ø तालुका गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक पथकाची कारवाई

चंद्रपूर, दि. 28  जून : बल्लारपूर तालुक्यातील कळमना येथे बोगस बीटी कापसाचे अंदाजित रक्कम 3 लक्ष 94 हजार 470 रुपयांचे अनधिकृत बियाणे तालुका गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक यांच्या पथकाने जप्त केले.

बल्लारपूर तालुक्यातील कळमना गावात जलसंपदा विभागाच्या पळसगाव आमडी उपसा सिंचन प्रकल्प इमारतीमध्ये बोगस व प्रतिबंधित कापूस बियाण्याचा साठा असल्याची गुप्त माहिती तालुका कृषी अधिकारी तथा तालुका गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक श्रीधर चव्हाण यांना मिळाली होती. त्या माहितीच्या आधारे  जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी भाऊसाहेब बऱ्हाटे यांच्या मार्गदर्शनात कृषी व पोलीस पथकासह सदर इमारतीची पाहणी केली असता बोगस अनधिकृत बीटी कापसाचे बियाणे आढळून आले. तालुका कृषी अधिकारी व पोलीस पथकाने सदर ठिकाणाहून 3 लक्ष 94 हजार 470 रुपये किमतीचे 487 पाकीट बियाणे जप्त केले.

            तालुका कृषी अधिकारी श्रीधर चव्हाण यांच्या फिर्यादीवरून सदर प्रकरणी पोलीस स्टेशन, बल्लारपूर येथे बियाणे नियम 1968, बियाणे नियंत्रण आदेश 1983, महाराष्ट्र कापूस बियाणे कायदा 2009, पर्यावरण (संरक्षण) अधिनियम 1986, भारतीय दंड संहिता कलम 420 याप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला. ही कारवाई तालुका गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक श्रीधर चव्हाण, कृषी सहायक आर.ए.अहिरराव, बी.आर.हराळ, एस.आर.राठोड, सहायक पोलिस उपनिरीक्षक धनंजय गिन्नलवार व पोलीस कर्मचारी यांच्या उपस्थितीत करण्यात आली.

००००००

Monday 27 June 2022

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त 11 ते 17 ऑगस्टदरम्यान ‘हर घर झेंडा’ अभियान

 




स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त 11 ते 17 ऑगस्टदरम्यान ‘हर घर झेंडा’ अभियान

Ø जिल्हाधिका-यांनी घेतला आढावा

चंद्रपूर, दि.27 जून भारतीय स्वातंत्र्याचे हे अमृत महोत्सवी वर्ष आहे. या अनुषंगाने केंद्र व राज्य सरकारच्या वतीने अनेक उपक्रम राबविण्यात येत आहे. याच उपक्रमाचा एक भाग म्हणून 11 ते 17 ऑगस्ट 2022 या कालावधीत ‘हर घर झेंडा’ अभियान जिल्ह्यात राबविण्यात येणार आहे. याबाबत शासनाच्यावतीने मार्गदर्शक सुचना प्राप्त झाल्या असून जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी सोमवारी आढावा घेतला.

जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या या बैठकीला प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा गौरकार, निवासी उपजिल्हाधिकारी विशालकुमार मेश्राम, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. राजकुमार गहलोत, पोलिस उपअधिक्षक (गृह) राधिका फडके, तहसीलदार यशवंत दैट, सर्व उपविभागीय अधिकारी, सर्व तालुक्यांचे तहसीलदार आणि मुख्य कार्यकारी अधिकारी उपस्थित होते.

यावेळी बोलतांना जिल्हाधिकारी अजय गुल्हाने म्हणाले, 20 जून 2022 च्या शासन निर्णयानुसार स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त जनतेच्या मनात स्वातंत्र्य लढ्याच्या स्मृती तेवत राहाव्यात, स्वातंत्र संग्रामातील अज्ञात नायक, क्रांतीकारक यांचे तसेच स्वातंत्र संग्रामात घडलेल्या विविध घटनांचे स्मरण व्हावे, स्वातंत्र्यासाठी चेतवलेले स्फुल्लिंग कायम तेवत राहावे व देशभक्तीची भावना जनमाणसात कायम राहावी, या उद्देशाने हे अभियान राबविण्यात येत आहे. 

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त ‘हर घर झेंडा’ अभियानांतर्गत जिल्ह्यातील जवळपास पाच लक्ष कुटुंबासाठी झेंडे तयार करण्याचे नियोजन आहे. 11 ते 17 ऑगस्ट या कालावधीमध्ये प्रत्येक शासकीय, निमशासकीय, खाजगी आस्थापना, सहकारी संस्था, शैक्षणिक संस्था यांनी त्यांच्या इमारतीवर तर नागरिकांनी स्वत:च्या घरावर स्वयंस्फुर्तीने राष्ट्रध्वजाची उभारणी करावी.  स्थानिक स्वराज्य संस्था, पोलिस यंत्रणा, शाळा व महाविद्यालये, परिवहन, आरोग्य केंद्रे, स्वस्त धान्य दुकाने, सहकारी संस्था अशा सर्वसामान्य नागरिकांशी निगडीत यंत्रणांचा वापर करून सर्वांनी योग्य नियोजन करावे, असे शासन आदेशात नमुद आहे. नागरिकांनी राष्ट्रध्वज स्वयंस्फुर्तीने लावायचा आहे. त्यासाठी ध्वजसंहितेच्या मार्गदर्शक सुचनांचे पालन करणे आवश्यक राहील. जाणते – अजाणतेपणे राष्ट्रध्वजाचा अपमान होणार नाही, याची सर्वांनी काळजी घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिका-यांनी केले आहे.

असा राहील राष्ट्रध्वज : केंद्रीय गृह विभागाच्या 30 डिसेंबर 2021 रोजीच्या अधिसुचनेनुसार भारतीय ध्वज संहिता – 2002 भाग – 1 मधील परिच्छेद 1.2 मधील राष्ट्रध्वज हे हाताने कातलेल्या किंवा विणलेल्या लोकर / सुत / सिल्क / खादी कापडापासून बनविलेला असेल, या तरतुदीमध्ये बदल करण्यात आला आहे. सदर बदलानुसार राष्ट्रध्वज हे हाताने कातलेल्या किंवा हाताने विणलेल्या किंवा मशीनद्वारे तयार केलेल्या सुत / पॉलिस्टर / लोकर / सिल्क / खादीपासून बनविलेल्या कापडाचे असावेत, असा उल्लेख केला आहे.

०००००००

समग्र शिक्षा अंतर्गत मोफत पाठ्यपुस्तक योजना सुरू

 

समग्र शिक्षा अंतर्गत मोफत पाठ्यपुस्तक योजना सुरू

Ø जिल्ह्यात 9 लक्ष 44 हजार पाठ्यपुस्तके उपलब्ध

चंद्रपूर, दि. 27 जून : वर्ग 1 ली ते 8 वी मध्ये शिकणारा कोणतेही बालक पुस्तकापासून वंचित राहू नये तसेच पाठ्यपुस्तकाअभावी शिक्षणात अडचण येऊ नये, शाळेतील सर्व दाखल पात्र मुलांची 100 टक्के उपस्थिती टिकविणे व गळतीचे प्रमाण शून्यावर आणण्यासाठी समग्र शिक्षा अंतर्गत मोफत पाठ्यपुस्तक योजना सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत शासकीय शाळा, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळा, खाजगी अनुदानित शाळा व अंशतः अनुदानित शाळांमध्ये शिकत असलेल्या सर्व विद्यार्थ्यांना सन 2022-23 करीता मोफत पाठ्यपुस्तके पुरविण्यात येणार आहे.

सन 2022-23 मध्ये चंद्रपूर जिल्ह्याकरीता 1 लक्ष 62 हजार 724 विद्यार्थ्यांकरीता 9 लक्ष 44 हजार 71 पाठ्यपुस्तकाची मागणी बालभारतीकडे करण्यात आली होती. त्यानुसार सर्व पाठ्यपुस्तके तालुकास्तरावर व तालुकास्तरावरून, शाळास्तरापर्यंत पोहोचती करण्यात आली आहे.

सदर पुस्तके शाळेच्या पहिल्या दिवशी शाळा व्यवस्थापन समिती सदस्य, गावातील पदाधिकारी, अधिकारी, पालक व प्रतिष्ठित नागरिक यांच्या उपस्थितीत समारंभपूर्वक विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तके वितरीत करून पुस्तक दिन साजरा करण्यात येणार आहे, असे शिक्षणाधिकारी (प्राथमिक) यांनी कळविले आहे.

००००००

कृषी संजीवनी मोहिमेत सहभागी होण्याचे शेतक-यांना आवाहन


 कृषी संजीवनी मोहिमेत सहभागी होण्याचे शेतक-यांना आवाहन

                चंद्रपूर, दि. 27 जून : खरीप हंगाम 2022 यशस्वी करण्यासाठी व आधुनिक कृषी तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी कृषी विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या महत्वाच्या मोहिमांवर विशेष भर देऊन दि.25 जून ते 1 जुलै 2022 या कालावधीत कृषी संजीवनी मोहीमेचे आयोजन करण्यात आले आहे. दि. 1 जुलै 2022 रोजी हरित क्रांतीचे प्रणेते स्व. वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त साजरा केल्या जाणाऱ्या कृषी दिनी या कृषी संजीवनी मोहिमेचा समारोप करण्यात येणार आहे.

        सदर कार्यक्रमामध्ये प्रामुख्याने पीएम किसान सन्मान निधी योजनांची माहिती देणे, ई-पिक पाहणी प्रचार व प्रसार करणे, लक्ष्मी मुक्ती योजनेची माहिती देणे, घरचे बियाणे तयार करणेची मोहीम राबविणे, बियाणाची उगवण क्षमता तपासणी प्रात्यक्षिक, बीज प्रक्रीया प्रात्यक्षिक करून दाखविणे (3 टक्के मिठाच्या द्रावणाची प्रक्रीया, जिवाणू संवर्धकाचा वापर इत्यादी), उकिरडा मुक्त गाव व खतयुक्त शिवार अभियानातंर्गत गांडूळ खत, नाडेप टाके बांधकामासाठी  मग्रारोहयो अंतर्गत नियोजन आराखड्यात समाविष्ट करून कामे सुरु करणे, युरिया ब्रिकेटचे नमुना ठेवणे व वापराबाबत माहिती देणे, डीएपी खताऐवजी सूपर फॉस्फेट व युरिया खताच्या वापराबाबत माहिती देणे, अझोला निर्मिती प्रात्यक्षिक व उपयोग मार्गदर्शन करणे, जिवामृत, दशपर्णी अर्क इत्यादी सेंद्रीय निविष्ठा निर्मिती प्रात्यक्षिक आयोजित करणे, 5 टक्के निंबोळी अर्क तयार करण्याचे प्रात्यक्षिक करून दाखविणे, पिक संरक्षण-फेरोमन सापळे, चिकट सापळे, प्रकाश सापळे आदींची प्रात्यक्षिकाव्दारे माहिती देणे, मुख्य पिकावरील प्रमुख किडीचे जीवनचक्र छायाचित्र, फ्लॅश कार्डच्या माध्यमातून माहिती देणे, विषबाधा टाळण्यासाठी फवारणी करतांना घ्यावयाची काळजीबाबत जनजागृती करणे, चाऱ्याची सकसता वाढविण्याकरिता प्रात्यक्षिक आयोजित करणे, पोषणयुक्त सुरक्षित योजनेअंतर्गत भाजीपाला किट वितरण व माहिती देणे, मनरेगा योजनेंतर्गत फळबाग लागवड योजनेचे अर्ज व प्रधानमंत्री सुक्ष्म खाद्य योजनेतंर्गत अर्ज भरून घेणे, स्मार्ट प्रकल्पातंर्गत शेतकरी उत्पादक कंपन्यासाठी अनुदानाच्या योजनांची माहिती देणे, महाडीबीटी पोर्टलवर शेतकऱ्यांनी अर्ज कसा करावा याबाबत सविस्तर मार्गदर्शन आदी विषयांचा अंतर्भाव करण्यात येणार आहे.

तरी, जिल्हयातील सर्व शेतकरी बाधंवानी कृषी संजीवनी मोहिमेमध्ये जास्तीत जास्त संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी भाऊसाहेब बऱ्हाटे यांनी केले आहे.  

०००००००

Friday 24 June 2022

शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी विशेष उपाययोजना राबविण्याबाबत जिल्हाधिका-यांनी घेतला आढावा



 

शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी विशेष उपाययोजना राबविण्याबाबत जिल्हाधिका-यांनी घेतला आढावा

चंद्रपूर, दि.24 जून शेतीमध्ये सततची नापिकीकर्जबाजारीपणा व कर्ज परतफेडीचा तगादा या तीन प्रमुख कारणांपैकी शेतकरी आत्महत्या झाली असल्यास संबंधित कुटुंबाला शासन निर्णयाद्वारे आर्थिक मदत देण्यात येते. मात्र शेतक-यांनी आत्महत्या करू नये, यासाठी ठोस उपाययोजना करणे गरजेचे असून विशेष मदतीचा कार्यक्रम राबविण्यासंदर्भात जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी आढावा घेतला.

बैठकीला अतिरिक्त जिल्हाधिकारी विद्युत वरखेडकर, निवासी उपजिल्हाधिकारी विशालकुमार मेश्राम, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी भाऊसाहेब ब-हाटे, जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापक प्रशांत धोंगळे, तहसीलदार यशवंत दैट, पशुसंवर्धन उपायुक्त पी.एम.काळे, जलसंधारण अधिकारी जी.टी. कालकर आदी उपस्थित होते.

 यावेळी जिल्हाधिकारी श्री. गुल्हाने म्हणाले, शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबाला शासनातर्फे आर्थिक मदत देण्यासाठी जिल्हास्तरीय समिती मध्ये सदर प्रकरणे पात्र-अपात्र ठरविली जातात. मात्र शेतक-यांनी आत्महत्याच करू नये, यासाठी काही उपाययोजना करणे आवश्यक आहे. त्यासाठी शेतकरी कुटुंबांना विविध शासकीय योजनांचा लाभ, पूरक व्यवसायासाठी प्रोत्साहित करणे शक्य आहे.

जिल्ह्यात पाण्याची मुबलकता असल्यामुळे रब्बी आणि उन्हाळी पिके घेण्यासाठी कृषी विभागाने शेतक-यांना प्रवृत्त करावे. दुबार पिके घेतल्यास शेतक-यांच्या हाती पैसा राहील. त्यामुळे कृषी अधिका-यांनी याबाबत नियोजन करावे. शेतकरी आत्महत्याग्रस्त किंवा आता कोवीडमुळे मृत्यु झालेल्या कुटुंबातील युवकांना रोजगार मेळाव्यात समाविष्ट करून घेण्यासाठी कौशल्य विकास विभागाने लक्ष द्यावे. एवढेच नाही तर अशा कुटुंबातील महिला किंवा तरुणांना कोणत्या प्रकारचे प्रशिक्षण देता येईल, जेणेकरून त्यांना रोजगाराची संधी मिळेल, याबाबतही नियोजन करावे.  

यावेळी अतिरिक्त जिल्हाधिकारी विद्युत वरखेडकर म्हणाल्या, कुटुंबाला मदत मिळण्याच्या उद्देशाने शेतकरी आत्महत्येची जास्तीत जास्त प्रकरणे पात्र करण्याचा प्रशासनाचा भर असतो. शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबातील महिला तसेच कोवीडमुळे विधवा झालेल्या महिलांसाठी विविध योजनांचा लाभ मिळण्याच्या दृष्टीने तालुकास्तरावर मेळाव्याचे आयोजन करण्यात येणार आहे.

बैठकीत बैठकीत बँकेच्या योजना पशुसंवर्धन विभाग, रोहयो, जलसंधारण आदी विभागाच्या योजनांसदर्भात चर्चा करण्यात आली.

०००००००

जलजन्य आजार : हिवतापाबाबत प्रतिबंधात्मक उपाययोजना

विशेष वृत्त :


जलजन्य आजार : हिवतापाबाबत प्रतिबंधात्मक उपाययोजना

चंद्रपूर, दि.24 जून सध्या पावसाळ्याला सुरुवात झाली आहे. या कालावधीत अनेक जलजन्य आजारांची उत्पत्ती होते. त्यामुळे आपला आजुबाजूचा परिसर स्वच्छ ठेवणे, रोगांचा प्रसार होणार नाही, याची काळजी घेणे आदी बाबींबाबत प्रतिबंधात्मक उपाययोजना करणे आवश्यक आहे. अशाच जलजन्य आजारांपैकी हिवताप हा एक प्रमुख आजार आहे. याबाबत नागरिकांनी घ्यावयाची काळजी, याबाबत पुढीलप्रमाणे उपाययोजना कराव्यात. 

हिवताप म्हणजे काय : हिवताप हा ‘प्लासमोडीअम’ या परोपजिवी जंतुमूळे होतो. हे जंतू चार प्रकारचे असतात. प्लासमोडीअम पॅुल्सीपॅरम या प्रकारच्या जंतुमूळे होणारा हिवताप घातक ठरू शकतो. विदर्भात गडचिरोलीगांदिया व चंद्रपूर जिल्हयात हया जंतुमूळे होणाऱ्या हिवतापाचे प्रमाण अधिक आढळते.

 

 

हिवतापाचा प्रसार कसा होतो : हिवतापाचा प्रसार ऑनाफिलीस या जातीच्या मादी द्वारे होतो. हिवतापाचे जंतू असलेल्या व्यक्तीस ऑनाफिलीस डासाची मादी चावल्यास हिवतापाचे जंतू डासाच्या शरीरात प्रवेश करतात. डासाच्या शरीरात हया जंतुची वाढ झाल्यानंतर (साधारण 3 ते 5 दिवस) ही डासाची मादी दुसऱ्या निरोगी व्यक्तीला चावल्यास तिच्या शरीरातील हिवतापाचे जंतू त्या व्यक्तीच्या रक्तात प्रवेश करतात व रक्तातून यकृतात जातात. तेथे त्यांची वाढ होते. त्यापैकी काही जंतू त्या व्यक्तीच्या रक्तातील तांबडया पेशीत प्रवेश करतात व तेथे त्यांची वाढ होऊन 48 तासात तांबडया पेशी फुटतात. ज्यावेळी तांबडया पेशी फुटतात त्यावेळी थंडी वाजून ताप येतो. म्हणून हिवतापामध्ये एक दिवसाआड थंडी वाजून ताप येत असतो.

हिवतापाची लक्षणे : एक दिवसाआड थंडी वाजून ताप येणे, डोके दुखीअंग दुखी, मळमळ इत्यादी. यावर वेळेत उपचार न केल्यास तीव्र रक्तक्षयकावीळमूत्रपिंड निकामी होते व मेदुंचा हिवताप होऊन रुग्णांचा मृत्यु संभवतो.

हिवतापाचे निदान : हिवतापाचे निश्चित निदान करण्याकरीता रुग्णांच्या रक्ताचा एक थेंब काचपट्टीवर घेवून त्यावर रंग प्रक्रिया करून सुक्ष्मदर्शक यंत्राखाली निरिक्षण केल्यास हिवतापाचे निश्चित निदान करता येते. परंतु सुक्ष्मदर्शक यंत्राव्दारे तपासणी गावपातळीवर सगळीकडे उपलब्ध नसल्यामूळे रॅपिड डॉयग्नोस्टीक किटव्दारे गावपातळीवर आरोग्य कर्मचारी व आशाव्दारे सुध्दा हिवतापाचे निदान केले जाते.

हिवतापावर उपचार : जंतुच्या प्रकारानूसार (पी.व्ही / पी.एफ. नुसार) उपचार घेणे आवश्यक आहे. महाराष्ट्रात प्लासमोडीअम व्हायव्हॅक्स व प्लासमोडीअम फॅल्सीपॅरम हया दोन प्रकारचे जंतू आढळून येतात. प्लासमोडियम व्हायव्हॅक्सकरीता क्लोरोक्वीन च्या गोळया तीन दिवस व प्रायमाक्वीनच्या गोळया 14 दिवस, (वयोमानानूसार योग्य प्रमाणात) तसेच प्लासमोडीअम फॅल्सीपॅरमकरीता ए.सी.टी अधिक प्रायामाक्वीन च्या गोळया वयोमानानुसार योग्य प्रमाणात घेणे आवश्यक आहे. अर्धवट उपचार घेणे घातक ठरू शकते.

हिवताप प्रतिबंधात्मक उपचार : हिवताप संवेदनशील भागात जातांना हिवताप प्रतिबंधात्मक उपचार म्हणून आरोग्य कर्मचाऱ्या कडून दिली जाणारी डॉक्सीसायक्लीनची मात्रा वयोमानानूसार योग्य प्रमाणात घ्यावे. व संवेदनशील भागातून परत आल्यानंतर रक्ताची तपासणी करुन घ्यावी.

ताप असल्यास काय करावे : कोणत्याही वयोगटातील व्यक्तीस ताप असल्यास नजीकच्या आरोग्य केंद्रात जाऊन रक्ताची तपासणी करून घ्यावी. रक्तात हिवतापाचे जंतू आढळल्यास  त्वरीत समूळ उपचार घ्यावा. तसेच हिवतापाच्या रुग्णांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तीचीसुध्दा रक्ताची तपासणी करून घ्यावी. गरोदर मातालहान मुले व प्रतिकारशक्ती कमी असलेल्या रुगणांमध्ये हिवताप गंभीर स्वरूप धारण करू शकतो. म्हणून त्यांनी डॉक्टरच्या सल्ल्याने समूळ उपचार  घेणे गरजेचे आहे.

 जनतेची जबाबदारी / सहभाग :           हिवतापाचा प्रसार डासामूळे होत असल्यामूळे या आजारावर नियंत्रण मिळवण्याकरीता डास उत्पत्ती होऊ न देणे महत्वाचे आहे. ऑनाफिलीस डासाची मादी स्वच्छ साठलेल्या पाण्यात अंडी घालते व त्यापासून 5-7 दिवसात पूर्ण विकसीत डास तयार होतात. म्हणून पाणी साचू न देणे. प्लॅस्टीकचे कपडब्बेग्लास व इतर भांड्यात पाणी साचल्यास तेथे डासाची पैदास होते. तसेच प्रत्येकानी घरातील व परिसरातील पाण्याचे टाकेहौद इत्यादी आठवड्यातून किमान एक वेळा पूर्ण रिकामे करून घेतले तर डास उत्पत्तीवर आळा बसेल व त्यामूळे  हिवताप व इतर कीटकजन्य आजारावर सुद्धा नियंत्रण ठेवता येईल.

हिवताप नियंत्रणासाठी करावयाच्या उपाययोजना : पाण्याचे साठे पूर्ण रिकामे करणे शक्य नसल्यास आठवडयातून एकदा टेमिफॉस हे अळीनाशक द्रावण टाकावे. त्यामुळे डासाच्या अळ्या मरतील. तसेच येणाऱ्या फवारणी पथकामार्फत संपूर्ण फवारणी करुन घ्यावी. साचलेल्या पाण्यात डासोत्पत्ती होऊ नये म्हणून गप्पी मासे पाण्यात टाकावे. गप्पी मासे डासाच्या अळया खातात त्यामूळे डासोत्पत्ती टाळता येते. गावातील नाल्यामध्ये अळीनाशक फवारणी करून घ्यावी. झोपतांना मच्छरदाणीचा वापर करावा. तसेच डास विरोधी साधनांचा (जसे ओडोमॉसडास विरोधी अगरबत्तीक्रिम,कॉईल इ.) वापर नियमित करावा. त्याचप्रमाणे पूर्ण अंग झाकेल, असे कपडे परीधान करावे. प्रत्येकाने आठवडयातून एकदा कोरडा दिवस पाळावा. परिसरातील नाल्या नेहमी वाहत्या ठेवाव्यात. पाणी साचलेली डबके वेळीच बुजवावे.   प्रत्येक शाळेत विद्यार्थ्यांना डासअळी व गप्पी मासांचे प्रात्यक्षिक दाखविण्यात यावे. त्याचप्रमाणे किटकजन्य आजाराबाबत माहिती, कोरडा दिवसाचे महत्व पटवून द्यावे.

-         जिल्हा माहिती कार्यालय, चंद्रपूर

०००००००