पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळावा
Ø 218 उमेदवारांचा सहभाग तर 76 उमेदवारांची प्राथमिक निवड
चंद्रपूर, दि. 10 जून: स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र व औद्योगिक प्रशिक्षण संस्था, चंद्रपूर अंतर्गत मूलभूत प्रशिक्षण तथा अनुषंगिक सूचना केंद्राच्या संयुक्त विद्यमाने पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन दि. 9 जून रोजी औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत करण्यात आले होते. या रोजगार मेळाव्यात जिल्हयातील 218 उमेदवार सहभागी झाले होते तर 76 उमेदवारांची प्राथमिक निवड करण्यात आली.
या रोजगार मेळाव्याचे उद्घाटन जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी सुशील भुजाडे यांच्या हस्ते पार पडले. यावेळी जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहाय्यक आयुक्त भैयाजी येरमे, सहाय्यक प्रशिक्षणार्थी सल्लागार प्रणाली दहाटे, भारतीय जीवन बीमा निगमचे संजय बुलदेव प्रामुख्याने उपस्थित होते.
या मेळाव्यामध्ये उमेदवारांनी आपल्या कौशल्याचा वापर रोजगार व स्वयंरोजगार मिळवण्यासाठी करावा, असे आवाहन जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी सुशील भुजाडे यांनी यावेळी केले. तर उद्योजकांनी जास्तीत जास्त उमेदवारांना रोजगाराची संधी उपलब्ध करून द्यावी, असे कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहाय्यक आयुक्त भैय्याजी येरमे म्हणाले.
सदर मेळाव्यामध्ये परम स्किल डेव्हलपमेंट, महिंद्रा अँड महिंद्रा चाकण जि.पुणे, ऋचा इंजिनिअरिंग प्रा. लि.औरंगाबाद, ऑगस्टा मोटर्स चंद्रपूर, वैभव इंटरप्राईजेस नागपूर, समाधान पूर्ती बाजार चंद्रपुर, अॅलेक्सी मॅच्युअल बेनिफिट निधी लिमिटेड चंद्रपूर तसेच ऑक्स फर्स्ट इंटरप्राइजेस चंद्रपूर आदी नामांकित कंपन्याचा समावेश होता. या रोजगार मेळाव्यामध्ये चंद्रपूर जिल्ह्यातील 218 उमेदवारांची नोंदणी करण्यात आली होती, पात्रतेनुसार उमेदवारांच्या वेगवेगळ्या उद्योजकांकडे मुलाखती घेण्यात आल्या. यामध्ये संबंधित उद्योजकांनी उमेदवारांना योग्य ते मार्गदर्शन करून 76 उमेदवारांची प्राथमिक निवड करण्यात आली.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन अधिकारी शैलेश भगत तर आभार जिल्हा समन्वयक मुकेश मुंजनकर यांनी मानले.
00000
No comments:
Post a Comment