प्रधानमंत्री मातृत्व वंदन योजनेत चंद्रपूर जिल्हा राज्यात अव्वल
Ø 62169 लाभार्थ्यांना 28 कोटी 47 लक्ष अनुदान वाटप
चंद्रपूर, दि. 13 जून : गर्भवती महिला व स्तनदा मातेला सकस आहार देऊन जन्माला येणा-या नवजात बालकांचे आरोग्य सुधारावे तसेच मातामृत्यु व बालमृत्यु दर कमी व्हावा, या उद्देशाने देशात 1 जानेवारी 2017 पासून प्रधानमंत्री मातृत्व वंदन योजना कार्यान्वित करण्यात आली आहे. आरोग्य विभागाच्यावतीने या योजनेची चंद्रपूर जिल्ह्यात प्रभावी अंमलबजावणी झाली असून ग्रामीण आणि शहरी (पालिका) अशा दोन्ही गटात चंद्रपूर जिल्हा राज्यात अव्वल ठरला आहे. जिल्ह्यातील 62169 लाभार्थ्यांच्या खात्यात एकूण 28 कोटी 47 लक्ष 46 हजार रुपयांचे अनुदान जमा करण्यात आले आहे.
गावखेडे तसेच शहरातील रोजमजुरी करणा-या अनेक गर्भवती महिलांना गरोदरपणाच्या शेवटच्या टप्प्यापर्यंत तसेच प्रसुतीनंतर शारिरीक क्षमता नसतांनासुध्दा मजुरीसाठी काम करावे लागते. त्याचा विपरीत परिणाम गर्भवती महिला व नवजात बालकाच्या आरोग्यावर होतो. या बाबीला आळा घालण्यासाठी तसेच मातामृत्यू व बालमृत्युचे प्रमाण कमी करण्यासाठी महिला व बालविकास मंत्रालयाने 1 जानेवारी 2017 पासून देशात प्रधानमंत्री मातृत्व वंदन योजना लागू केली आहे. या योजनेंतर्गत चंद्रपूर जिल्ह्यात एकूण 65592 लाभार्थ्यांची नोंदणी झाली असून आतापर्यंत 62169 लाभार्थ्यांना 28 कोटी 47 लक्ष 46 हजार रुपयांचे वाटप झाले आहे.
ग्रामीण गटामध्ये संपूर्ण राज्यात 50 गुण घेऊन चंद्रपूर जिल्हा अव्वल ठरला असून चंद्रपूरसह गोंदिया, भंडारा, वर्धा, सांगली, सातारा, पुणे, अहमदनगर आणि नाशिक या जिल्ह्यांनासुध्दा 50 गुण मिळाले आहेत. तर 48 गुण घेऊन दुस-या क्रमांकावर धुळे, कोल्हापूर, रत्नागिरी, औरंगाबाद, बीड, नागपूर आणि गडचिरोली जिल्हे आहेत. विशेष म्हणजे शहरी गटात संपूर्ण राज्यात 50 गुणांसह चंद्रपूर हा एकमेव जिल्हा राज्यात प्रथम क्रमांकावर आहे. सांगली दुस-या क्रमांकावर (48गुण), अहमदनगर, धुळे, पुणे तिस-या क्रमांकावर (46 गुण), पिंपरी चिंचवड चवथ्या क्रमांकावर (45 गुण) आणि पाचव्या क्रमांकावर अमरावती, कोल्हापूर, वसई (43 गुण) आहे.
प्रधानमंत्री मातृ वंदन योजनेत मासिक पाळीच्या शेवटच्या तारखेपासून 100 दिवसांत गर्भधारणा नोंदणी केल्यानंतर पहिला हप्ता एक हजार रुपये, किमान एकदा प्रसवपूर्व तपासणी केल्यास गर्भधारणेच्या सहा महिने पूर्ण झाल्यानंतर दुसरा हप्ता दोन हजार रुपये लाभार्थ्याच्या खात्यात जमा केला जातो. तर प्रसुतीनंतर झालेल्या अपत्याची जन्म नोंदणी व बालकाला पेंटा तिसरा लसीकरण डोज दिल्यानंतर तिसरा हप्ता उर्वरीत दोन हजार रुपये संबंधितांच्या खात्यात जमा केले जातात. ही योजना सर्व स्तरातील महिलांना लागू आहे. परंतु वेतनासह मातृत्व रजा घेणा-या महिलांसाठी ही योजना नाही. तसेच या योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थ्याचे आधारकार्ड, पतीचे आधारकार्ड, बँक खाते, माता बाल संरक्षण कार्ड असणे आवश्यक आहे.
०००००००
No comments:
Post a Comment