चंद्रपूर, दि. 15 जून : पावसाळ्याची चाहूल लागली आहे. पावसाच्या सरींसोबतच आकाशात होणा-या विजेच्या गडगडाटामुळे मानवाच्या मनात धडकी भरते. आकाशात काळे ढग, वादळी वारे आणि विजांचा कडकडाट होत असतांना योग्य दक्षता घेतली नाही तर आपल्या जीवाला धोका होऊ शकतो. त्यामुळे अशा प्रसंगी काय करावे आणि काय करू नये, हे प्रत्येक नागरिकाने लक्षात ठेवणे गरजेचे आहे.
काही लोक वादळाची चिन्हे दिसली तरी त्याकडे दुर्लक्ष करतात आणि त्याचा परिणाम म्हणजे ऐनवेळेला वादळात योग्य आसरा न मिळाल्याने मृत्यू पावतात किंवा गंभीर जखमी होतात. मेघगर्जना, वीज, वादळ होत असतांना काय करावे किंवा काय करू नये, याबाबत मार्गदर्शक सुचना जारी करण्यात आल्या आहेत.
काय करावे : घराबाहेर असाल तर त्वरीत आसरा शोधा. इमारत हा सुरक्षित आसरा आहे. पण इमारत नसेल तर गुहा, खड्डा किंवा खिंडी सारख्या भागात आश्रय घ्या. झाडे ह्यासाठी कधीच सुरक्षित नसतात. उंच झाडे स्वत: कडे विजेला आकर्षित करतात. आसरा मिळाला नाही तरी परिसरातील सर्वात उंच जागा टाळा. जर जवळपास फक्त उंच झाडे असतील, तर झाडाच्या उंचीच्या दुप्पट अंतरावर थांबा. जमिनीवर वाका किंवा वाकून बसा. घरातच राहा किंवा बाहेर असाल तर घरी जा. जेंव्हा विजा चमकणे किंवा वादळ खूप जोरात चालू असेल, तेव्हा विजेच्या सुवाहकांपासून दूर रहा. उदा. धुराडी, रेडिएटर्स, स्टोव्ह, धातूचे नळ, टेलीफोन इत्यादी. पाण्यातून तात्काळ बाहेर या. जर तुम्हाला विद्युत भारित वाटत असेल, तुमचे केस उभे असतील किंवा त्वचेला मुंग्या येत असतील, तर तुमच्या वर वीज कोसळण्याची शक्यता आहे. त्वरित जमिनीवर ओणवे व्हा किंवा गुडघ्यात मान घालून बसा. अचानक आलेल्या वादळाच्या वेळी झाडाजवळ असाल तर जमिनी वर बसा. दोन्ही पावले जमिनीवर ठेवा. पाय गुडघ्यात दुमडून ऐकमेकांना जोडा आणि त्याभोवती हातांचा विळखा घाला. हनुवटी गुडघ्यावर दाबून धरा.
काय करू नये : विद्युत उपकरणे चालु करून वापरू नका. टेलिफोनचा वापर टाळा. वीज टेलिफोनच्या घरावरील तारांमधून वाहू शकते. बाहेर असतांना धातूच्या वस्तूंचा वापर टाळा. धातू असलेल्या वाहनाच्या भागाला स्पर्श करू नका. उंच एकाकी झाडाखाली आसरा घेऊ नका. अर्धवट अवस्थेत बांधकाम झालेल्या इमारतीचा आसरा घेऊ नका.
वीज पडली तर करावयाच्या उपाययोजना : आजूबाजूला अथवा एखाद्या व्यक्ती वर वीज पडली, तर ताबडतोब वैद्यकीय मदत मिळवा. बाधित व्यक्तीवर प्राथमिक उपचार करतांना या गोष्टींचा विचार करा. श्वासोच्छवास थांबला असेल, तर त्या व्यक्तीच्या तोंडावर तोंड ठेवून कृत्रिम श्वासोच्छवास द्यावा. त्यामुळे त्या व्यक्तीचा श्वासोच्छवास नैसर्गिकरित्या सुरू होण्यास मदत होईल. ह्रदयाचे ठोके थांबले असल्यास सीपीआरचा (छातीवर विशिष्ट पध्दतीने दाब देणे) उपयोग करावा. शरीरावर इतर काही जखमा, भाजल्याच्या खुणा, हाडांच्या इजा ह्याबाबत नोंद करा.
वरील सर्व सुचनांचे नागरिकांनी पालन करावे, असे प्रशासनामार्फत कळविण्यात आले आहे.
००००००००
No comments:
Post a Comment