टीबी नियंत्रण व राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रमाचा आढावा
Ø अतिरिक्त जिल्हाधिका-यांच्या अध्यक्षतेखाली बैठक
चंद्रपूर, दि.29 जून : राष्ट्रीय क्षयरोग दूरीकरण कार्यक्रमांतर्गत जिल्ह्यात टीबी नियंत्रणासाठी प्रभावी उपाययोजना तसेच तंबाखु नियंत्रणासाठी ‘कोटपा’ कायद्याच्या प्रभावी अंमलबजावणीबाबत अतिरिक्त जिल्हाधिकारी विद्युत वरखेडकर यांनी आरोग्य विभागाचा आढावा घेतला.
जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या या बैठकीला जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. निवृत्ती राठोड, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. राजकुमार गहलोत, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. हेमचंद कन्नाके, मनपाच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. वनिता गर्गेलवार, डॉ. श्वेता सवळीकर आदी उपस्थित होते.
यावेळी अतिरिक्त जिल्हाधिकारी विद्युत वरखेडकर म्हणाल्या,आरोग्य विभागाने जिल्ह्यातील टीबी रुग्णांच्या संपर्कात राहून सदर रुग्ण नियमितपणे औषधोपचार घेतो की नाही, याकडे गांभिर्याने लक्ष द्यावे. टीबी हा संसर्गजन्य आजार आहे. हा संसर्ग इतरांना होऊ नये, याची काळजी घ्यावी. तसेच टीबी मुक्त प्रमाणपत्र जिल्ह्याला मिळण्यासाठी आरोग्य विभागाने योग्य नियोजन करावे, अशा सुचना त्यांनी दिल्या.
बैठकीत राष्ट्रीय क्षयरोग दूरीकरण कार्यक्रम, टीबी रुग्णांना सामाजिक योजनांचा लाभ, सामाजिक संघटनांमार्फत त्यांना देण्यात आलेली मदत, समाजामध्ये टीबी नियंत्रणासाठी करण्यात आलेली जनजागृती, क्षयरोग प्रतिसाद मजबुत करणे, क्षयरोग बाबत समाजामध्ये असलेले भेदभाव दूर करणे याशिवाय तंबाखु कार्यक्रम नियंत्रण कार्यक्रमांतर्गत जिल्ह्यामध्ये कोटपा कायद्याची प्रभावी अंमलबजावणी, पोलिस व अन्न व औषध प्रशासन विभागामार्फत कोटपा कायद्यांतर्गत केलेल्या कार्यवाहीचा अहवाल, जिल्ह्यातील शाळा तंबाखु मुक्त करणे आणि ‘येलो लाईन कॅम्पेन’ राबविणे आदींचा आढावा घेण्यात आला.
०००००००
No comments:
Post a Comment