कृषी संजीवनी मोहिमेत सहभागी होण्याचे शेतक-यांना आवाहन
चंद्रपूर, दि. 27 जून : खरीप हंगाम 2022 यशस्वी करण्यासाठी व आधुनिक कृषी तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी कृषी विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या महत्वाच्या मोहिमांवर विशेष भर देऊन दि.25 जून ते 1 जुलै 2022 या कालावधीत कृषी संजीवनी मोहीमेचे आयोजन करण्यात आले आहे. दि. 1 जुलै 2022 रोजी हरित क्रांतीचे प्रणेते स्व. वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त साजरा केल्या जाणाऱ्या कृषी दिनी या कृषी संजीवनी मोहिमेचा समारोप करण्यात येणार आहे.
सदर कार्यक्रमामध्ये प्रामुख्याने पीएम किसान सन्मान निधी योजनांची माहिती देणे, ई-पिक पाहणी प्रचार व प्रसार करणे, लक्ष्मी मुक्ती योजनेची माहिती देणे, घरचे बियाणे तयार करणेची मोहीम राबविणे, बियाणाची उगवण क्षमता तपासणी प्रात्यक्षिक, बीज प्रक्रीया प्रात्यक्षिक करून दाखविणे (3 टक्के मिठाच्या द्रावणाची प्रक्रीया, जिवाणू संवर्धकाचा वापर इत्यादी), उकिरडा मुक्त गाव व खतयुक्त शिवार अभियानातंर्गत गांडूळ खत, नाडेप टाके बांधकामासाठी मग्रारोहयो अंतर्गत नियोजन आराखड्यात समाविष्ट करून कामे सुरु करणे, युरिया ब्रिकेटचे नमुना ठेवणे व वापराबाबत माहिती देणे, डीएपी खताऐवजी सूपर फॉस्फेट व युरिया खताच्या वापराबाबत माहिती देणे, अझोला निर्मिती प्रात्यक्षिक व उपयोग मार्गदर्शन करणे, जिवामृत, दशपर्णी अर्क इत्यादी सेंद्रीय निविष्ठा निर्मिती प्रात्यक्षिक आयोजित करणे, 5 टक्के निंबोळी अर्क तयार करण्याचे प्रात्यक्षिक करून दाखविणे, पिक संरक्षण-फेरोमन सापळे, चिकट सापळे, प्रकाश सापळे आदींची प्रात्यक्षिकाव्दारे माहिती देणे, मुख्य पिकावरील प्रमुख किडीचे जीवनचक्र छायाचित्र, फ्लॅश कार्डच्या माध्यमातून माहिती देणे, विषबाधा टाळण्यासाठी फवारणी करतांना घ्यावयाची काळजीबाबत जनजागृती करणे, चाऱ्याची सकसता वाढविण्याकरिता प्रात्यक्षिक आयोजित करणे, पोषणयुक्त सुरक्षित योजनेअंतर्गत भाजीपाला किट वितरण व माहिती देणे, मनरेगा योजनेंतर्गत फळबाग लागवड योजनेचे अर्ज व प्रधानमंत्री सुक्ष्म खाद्य योजनेतंर्गत अर्ज भरून घेणे, स्मार्ट प्रकल्पातंर्गत शेतकरी उत्पादक कंपन्यासाठी अनुदानाच्या योजनांची माहिती देणे, महाडीबीटी पोर्टलवर शेतकऱ्यांनी अर्ज कसा करावा याबाबत सविस्तर मार्गदर्शन आदी विषयांचा अंतर्भाव करण्यात येणार आहे.
तरी, जिल्हयातील सर्व शेतकरी बाधंवानी कृषी संजीवनी मोहिमेमध्ये जास्तीत जास्त संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी भाऊसाहेब बऱ्हाटे यांनी केले आहे.
०००००००
No comments:
Post a Comment