Search This Blog

Thursday, 30 June 2022

जलशक्ती अभियानात यंत्रणांनी सक्रीय सहभाग नोंदवावा - जिल्हाधिकारी अजय गुल्हाने

 




जलशक्ती अभियानात यंत्रणांनी सक्रीय सहभाग नोंदवावा - जिल्हाधिकारी अजय गुल्हाने

चंद्रपूर, दि. 30 जून पावसाच्या पाण्याच्या प्रत्येक थेंबाचे जतन करणे व त्या पाण्याचा पुनर्वापर आणि संरचनेचे पुनर्भरण करण्यासाठी केंद्र शासनाने जलशक्ती अभियानाला सुरवात केली आहे. या अभियानामध्ये जिल्ह्यातील संबंधित यंत्रणांनी सक्रीय सहभाग नोंदवावा व केलेली कामे पोर्टलवर अपलोड करावी, अशा सुचना जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी दिल्या.

जिल्हाधिकारी कार्यालयात मृद व जलसंधारण विभागामार्फत आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा गौरकार, उपविभागीय अधिकारी संपत खलाटे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पंचायत) कपिल कलोडे, जलसंधारण विभागाचे कार्यकारी अभियंता सुभाष आकोसकर आदी उपस्थित होते.

जलशक्ती अभियानाला केंद्र शासनाच्या वतीने 29 मार्च 2022 पासून सुरवात करण्यात आली आहे, असे सांगून जिल्हाधिकारी श्री. गुल्हाने म्हणाले, या योजनेचा कालावधी मार्च 2022 ते 30 नोव्हेंबर 2022 असा आहे. मात्र यंत्रणांनी जलसंधारणासंदर्भात जानेवारीपासून केलेली कामे सदर पोर्टलवर अपलोड करायची आहे. तसेच या अभियानांतर्गत पाण्याच्या प्रत्येक थेंबाचे जतन करणे, पाण्याचा पुनर्वापर आणि संरचनेचे पुनर्भरण, जलसंधारण संरचनेसाठी संभाव्य ग्रामस्तरीय योजना / पाणलोट योजना तयार करणे आणि गावाचा नकाशाचा वापर करून नियोजनबध्द कार्यक्रम राबविणे, पाणलोट क्षेत्रापैकी किमान 20 टक्के क्षेत्र हरीताखाली आणणे, जमिनीतील मृद ओलावा संवर्धन आदी कामे करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

अमृत सरोवर योजनेचा आढावा : अमृत सरोवर योजनेचा आढावा घेतांना जिल्हाधिकारी अजय गुल्हाने म्हणाले, जे काम हाती घेण्यात आले आहे, त्या प्रत्येक साईटचे काम पोर्टलवर टाकावे. जेणेकरून राज्यस्तरावर कामांची प्रगती दिसेल. तसेच अमृत सरोवरची जी कामे सुरू आहेत, ते तातडीने 100 टक्के पूर्ण करण्यासाठी तहसीलदारांनी नियोजन करावे. अमृत सरोवराची कामेसुध्दा जलशक्ती पोर्टलवर अपलोड करता येते, असे ते म्हणाले. यावेळी त्यांनी बल्लारपूर, भद्रावती, चंद्रपूर, ब्रम्हपुरी, चिमूर, गोंडपिपरी, जिवती, कोरपना, मूल, नागभीड, कोरपना, पोंभुर्णा आदी तालुक्यांचा आढावा घेतला.

बैठकीला सर्व उपविभागीय अधिकारी, सर्व तहसीलदार, गटविकास अधिकारी दूरदृष्य प्रणालीद्वारे उपस्थित होते.

०००००००

No comments:

Post a Comment