जिल्ह्यात 1 जुलै ते 15 जुलै 2022 पर्यंत विशेष अतिसार नियंत्रण पंधरवाडा
◆ दुर्गापुर पीएचसी येथे ओआरटी झिंक कॉर्नर कार्यक्रम
चंद्रपूर दि. 2 जुलै: जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र, दुर्गापूर येथे विशेष अतिसार नियंत्रण पंधरवडा अंतर्गत ओआरटी झिंक कॉर्नर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे उद्घाटन प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा गौरकार यांच्या हस्ते पार पडले.
यावेळी, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. राजकुमार गहलोत जिल्हा माता व बालसंगोपन अधिकारी डॉ.माधुरी मेश्राम वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रीती राजगोपाल तालुका आरोग्य अधिकारी डॉ. एन.जे.शृंगारे प्राथमिक आरोग्य केंद्र दुर्गापूरचे वैद्यकीय अधिकारी डॉ. आशिष वाकडे, वैद्यकीय अधिकारी डॉ. अमित जयस्वाल प्रामुख्याने उपस्थित होते.
विशेष अतिसार नियंत्रण पंधरवाडा कार्यक्रमात जिल्ह्यातील 0 ते 5 वर्षापर्यंतच्या 1 लक्ष 62 हजार 412 ग्रामीण, 37 हजार 568 शहरी तर 35 हजार 543 महानगरपालिका असे एकूण 2 लक्ष 35 हजार 523 मुलामुलींना ओआरटी झिंकचे जिल्ह्यातील 2 हजार 3 आशा कर्मचाऱ्यांमार्फत वाटप करण्याचे उद्दिष्ट आहे. त्यासोबतच स्वच्छता राखण्यासाठी माहिती व समुपदेशन करण्यात येणार आहे.
देशातील अर्भक मृत्यूदर व बाल मृत्यूदर कमी करणे हे केंद्र व राज्यशासनाचे एक महत्त्वाचे उद्दिष्ट आहे. देशात पाच वर्षापर्यंतच्या बालकांच्या मृत्यूमागे अतिसार हे प्रमुख कारण असून 7 टक्के बालके अतिसरामुळे दगावतात आणि ह्या बालमृत्यूचे प्रमाण उन्हाळ्यात व पावसाळ्यात जास्त असते. अतिसारामुळे होणारे बालमृत्यू शून्य करणे हे उद्दिष्ट समोर ठेवून राज्यातील सर्व जिल्ह्यात 1 जुलै ते 15 जुलै 2022 पर्यंत विशेष अतिसार नियंत्रण पंधरवाडा राबविण्यात येत आहे.
नियंत्रण पंधरवाडा कार्यक्रमाची जनजागृती करून कार्यक्रम यशस्वी करण्याचे आवाहन प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा गौरकार यांनी यावेळी केले. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. राजकुमार गहलोत यांनी कार्यक्रमाच्या प्रास्ताविकेत विशेष अतिसार नियंत्रण पंधरवडा कार्यक्रमाचे महत्त्व याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे संचालन मुरलीधर नन्नावरे तर आभार डॉ.आशिष वाकडे यांनी मानले. कार्यक्रमाला प्राथमिक आरोग्य केंद्र, दुर्गापुर येथील कर्मचारी उपस्थित होते.
00000
No comments:
Post a Comment