पर्यावरणपूरक जीवनपद्धती आणि पायाभूत विकासासाठी सरकार कटिबध्द - केंद्रीय पर्यावरण मंत्री भुपेंदर यादव
Ø वन अकादमी येथे जागतिक व्याघ्र दिनाचे आयोजन
Ø भारतातील 52 व्याघ्र प्रकल्पांपैकी 17 प्रकल्पांना आंतरराष्ट्रीय दर्जा प्राप्त
चंद्रपूर, दि. 29 जुलै : मानवी जीवनात जंगलांचे अनन्यसाधारण महत्व असून जल, जंगल, जमीन हे नैसर्गिक घटक आपल्याला मुबलक प्रमाणात मिळाले आहेत. तसेच निसर्गाच्या चक्रात वाघ, सिंह व वन्यजीव यांचेसुध्दा प्रमुख स्थान आहे. निसर्गाचे संतुलन राखून आपल्याला विकासाच्या क्षेत्रात भरारी घ्यायची आहे. त्यामुळे पर्यावरण पूरक जीवन पद्धतीचा अवलंब करून पायाभुत विकासासाठी केंद्र सरकार काम करीत आहे, असे मत केंद्रीय पर्यावरण, वन आणि वातावरणीय बदल मंत्री भुपेंदर यादव यांनी व्यक्त केले.
राष्ट्रीय व्याघ्र दिनानिमित्त वन अकादमी, चंद्रपूर येथे आयोजित कार्यक्रमात ते प्रमुख अतिथी म्हणून बोलत होते. यावेळी केंद्रीय पर्यावरण, वन आणि वातावरणीय बदल विभागाचे राज्यमंत्री आश्विनीकुमार चौबे, आमदार किशोर जोरगेवार, राष्ट्रीय व्याघ्र प्राधिकरणचे सचिव तथा अतिरिक्त महानिदेशक एस.पी.यादव, अतिरिक्त महासंचालक (वन्यजीव) विभाष रंजन, महाराष्ट्राचे वनबल प्रमुख डॉ. वाय.एल.पी.राव, महाराष्ट्राचे मुख्य वनसंरक्षक सुनील लिमये, अमित मलिक आदी उपस्थित होते.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात केंद्र सरकार, विकास, विज्ञान, व्याघ्र सुरक्षा, आदिवासींचे संरक्षण, अनुकूल वातावरण निर्मिती, जैवविविधता संरक्षण, जलवायू वाढविण्यासाठी उपाययोजना तसेच स्थानिकांना घेऊन वनांचे आणि पर्यावरणाचे संरक्षण या क्षेत्रात भरीव काम करीत आहे, असे सांगून केंद्रीय मंत्री श्री. भुपेंदर यादव म्हणाले, जगातील 75 टक्के वाघ भारतात सुरक्षित आहेत. देशात सद्यस्थितीत 52 व्याघ्र संरक्षण प्रकल्प असून यापैकी 17 प्रकल्पांना आंतरराष्ट्रीय दर्जा प्राप्त आहे. याचे श्रेय वन विभागासोबतच जंगलालगत राहणा-या लोकांनासुध्दा आहे. पर्यावरण बदलाच्या संदर्भात नवीन संशोधन आणि संकल्पना घेऊन आपल्याला वन क्षेत्रांचे संरक्षण करायचे आहे. केंद्र सरकारतर्फे वन्यजीव संरक्षण कायदा, जैवविविधता कायदा, वनहक्क कायदा याबाबत मोठे काम होत आहे. भारताची लोकसंख्या जगाच्या तुलनेत जवळपास 17 टक्के असून आपल्या देशात कार्बन उत्सर्जनाचे प्रमाण 4 टक्के आहे. तर आपल्यापेक्षा कमी लोकसंख्या असलेल्या देशांचे कार्बन उत्सर्जनाचे प्रमाण 60 टक्क्यांच्या जवळपास आहे.
पुढे श्री. यादव म्हणाले, मूळ वनवासी लोकांशिवाय जंगलांचे संरक्षण शक्य नाही. त्यामुळे या लोकांचे प्रश्न सोडविण्यासाठी पर्यावरण व वन विभागातर्फे वनहक्क कायद्याअंतर्गत चांगले काम सुरू आहे. वन विभागाने वन्यजीवांचे संरक्षण करण्याकरिता प्रत्यक्ष फिल्डवर जावून काम करावे. तसेच स्थानिकांना घेऊन पर्यावरणाचे रक्षण करणे गरजेचे आहे. भाषणाच्या सुरवातीलाच केंद्रीय मंत्री श्री. यादव यांनी चंद्रपूर येथील शहीद झालेल्या वनरक्षक स्वाती ढुमणे यांना श्रध्दांजली अर्पण केली.
केंद्रीय पर्यावरण व वन राज्यमंत्री श्री. चौबे म्हणाले, दरवर्षी 29 जुलै हा जागतिक व्याघ्र दिन म्हणून साजरा करण्यात येतो. जगात वाघांच्या 9 प्रजातींपैकी 3 नामशेष झाल्या असून 13 देशात 6 प्रजाती शिल्लक आहेत. यापैकी 70 टक्के प्रजाती भारतात आढळतात. भारतात वाघांची संख्या वाढत आहे, हे अतिशय चांगले लक्षण आहे. वाघ सुरक्षित तर जंगल सुरक्षित. वनांशिवाय जीवन नाही. वन, वन्यजीव आपला नैसर्गिक वारसा आहे. त्याचे जतन करा. ‘नेचर आणि कल्चर’ सोबत घेऊन आपल्याला विकास साधायचा आहे. वाघांच्या संरक्षणासाठी भारताची भूमिका आग्रही राहिली आहे. तसेच वन्यप्राण्यांच्या शिकारीविरोधात केंद्र सरकारची कठोर भुमिका आहे. टायगर, टी – गार्डन आणि ताजमहल या तीन ‘टी’ मुळे देशाची विशेष ओळख आहे, असेही ते म्हणाले.
व्याघ्र संरक्षण प्राधिकरणचे सचिव श्री. यादव म्हणाले, 2010 मध्ये रशियातील पिट्सबर्ग येथे आयोजित एका सेमीनारमध्ये ठरले की, दरवर्षी 29 जुलै हा जागतिक व्याघ्र दिन म्हणून साजरा करण्यात यावा. वाघ हा पर्यावरणाचे संरक्षण करीत असून त्यामुळे आपले जंगल सुरक्षित आहे. 2010 मध्ये वाघांची जेवढी संख्या होती ती 2022 पर्यंत दुप्पट झाली पाहिजे, असे उद्दिष्ट ठरविण्यात आले होते. मात्र हे उद्दिष्ट भारताने 2018 मध्येच पूर्ण केले. भारत, नेपाळ, भुटान, रशिया या देशात वाघांची संख्या सातत्याने वाढत असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी मान्यवरांच्या हस्ते उत्कृष्ट कार्य करणारे पेरीयार (केरळ) येथील वनअधिकारी गणेश एम., कान्हा (मध्यप्रदेश) येथील मेहरूसिंग मेहरापे, कान्हा येथील जोधासिंग बघेल, सातपुडा (मध्यप्रदेश) येथील अनिल चव्हाण, केरळ येथील धीरू कोमल, तामिळनाडू येथील तिरू मधान आणि मिना कालन यांचा रोख रक्कम आणि प्रशस्तीपत्र देऊन सन्मान करण्यात आला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्य वनसंरक्षक सुनील लिमये यांनी केले. संचालन श्वेता शेलगावकर यांनी तर आभार अमित मलिक यांनी मानले. कार्यक्रमाच्या सुरवातीला परेड संचलन तर सांगता राष्ट्रगिताने झाली. कार्यक्रमाला जिल्हाधिकारी अजय गुल्हाने, पोलिस अधिक्षक अरविंद साळवे, चंद्रपूर वनविभागाचे मुख्य वनसंरक्षक प्रवीण लोणकर, ताडोबा – अंधारी व्याघ्र प्रकल्पाचे क्षेत्र संचालक जितेंद्र रामगावकर, बफरचे उपसंचालक जी. गुरुप्रसाद, ब्रम्हपुरी वनविभागाचे उपवनसंरक्षक जितेश मल्होत्रा यांच्यासह वन विभागाचे वरिष्ठ अधिकारी व कर्मचारी आदी उपस्थित होते.
००००००
No comments:
Post a Comment