पूर ओसरल्यानंतर नागरिकांनो अशी घ्या काळजी
Ø जिल्हाधिका-यांचे आवाहन
चंद्रपूर, दि. 21 जुलै : सध्या पावसाळा जोरात सुरू आहे. पावसाच्या संततधारेमुळे पूर परिस्थिती निर्माण झाली असून बरीच गावे पूरामुळे बाधित झाली आहे. गावपातळीवर पूरग्रस्त गावांमध्ये वैद्यकीय अधिकारी व आरोग्य कर्मचारी यांचे पथक औषधासह पाठवावेत. मोठ्या लोकसंख्येच्या गावात आरोग्य पथकामध्ये कमीत कमी दोन महिला कर्मचारी व दोन पुरुष कर्मचारी यांचा समावेश असावा. वैद्यकीय अधिकाऱ्याने उपचारासाठी पूरग्रस्त गावांचा दौरा करावा व गावात वैद्यकीय पथक 24 तास उपलब्ध राहील, याची खबरदारी घ्यावी. वैद्यकीय पथकाच्या ठिकाणी पिण्याचे स्वच्छ पाणी तसेच ओ.आर.एस मिसळून तयार केलेले पाणी उपलब्ध ठेवावे. बाधित गावात 24 तास रुग्णवाहिका उपलब्ध ठेवावी. आवश्यक तेव्हा खाजगी वैद्यकीय व्यावसायिकांचे सहकार्य घ्यावे, अशा सुचना जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी आरोग्य विभागाला केल्या आहेत.
गावपातळीवर घ्यावयाची काळजी :
ग्रामपंचायत स्तरावर ब्लिचिंग पावडर साठा पुरेशा प्रमाणात उपलब्ध करून ठेवावा. प्रत्येक जलस्त्रोतांचे पाणी नमुने नियमित प्रयोगशाळेस तपासणीकरीता पाठविण्यात यावे. प्रत्येक जलस्त्रोतांचे शुद्धीकरण करण्यात यावे. पूर ओसरल्यानंतर संपूर्ण गावामध्ये ब्लिचिंग पावडरने डस्टिंग करण्यात यावे. दलदल व कचरा साठलेल्या जागी मॅलेथिऑन 5 टक्केची धुरळणी करावी. माशा व इतर उपद्रवी किटकांचा नायनाट करता येईल. जेणेकरून, रोगराई पसरणार नाही. पूर ओसरल्यानंतर संपूर्ण गावातील व नाल्यातील पाणी वाहते करण्यात यावे. पिण्याच्या पाण्याच्या स्त्रोताजवळील परिसर स्वच्छता करावी.
गावातील नागरिकांनी घ्यावयाची काळजी :
घरात पिण्याचे पाणी घेतांना शक्यतो निर्जंतुकीकरण केलेले पाणी पिण्यासाठी वापरावे. पावसाळ्यातील दिवसात 20 मिनिटे उकळून थंड केलेले पाणी पिण्यासाठी वापरावे. पाणी घेतांना दुपदरी कापडाने गाळून पाणी घ्यावे. घरातील पिण्याचे पाणी उंच जागेवर ठेवावे. पाणी घेण्यासाठी ओरघड्याचा वापर करावा. पिण्याच्या पाण्यात मेडिक्लोरचा (क्लोरीन द्रावण) व जीवन ड्रॉप चा वापर करावा. पाणी गढूळ असल्यास तुरटीचा वापर करावा. शेतावर कामाला जातांना पिण्याचे पाणी घरून न्यावे. नदी, नाले किंवा शेतातील दूषित पाणी पिऊ नये. घराभोवतालचा परिसर स्वच्छ ठेवावा. घराजवळील डबके बुजवावे. घराशेजारी पाणी साचून राहणार नाही याची काळजी घ्यावी.
आपल्या घराभोवती नाल्या, गटारात पाणी साचून राहणार नाही यादृष्टीने कार्यवाही करून पाणी वाहते करावे. साचलेल्या पाण्यात रॉकेल, डास,अळीनाशक औषधी फवारणी करावी. डासांपासून संरक्षण करण्याकरीता झोपतांना मच्छरदाणीचा वापर करावा. आठवड्यातून एक दिवस कोरडा दिवस पाळावा. या दिवशी घरातील सर्व पाणीसाठे रिकामे करून धुवून स्वच्छ कापडाने पुसून कोरडे करावे. रिकामे न करता येणाऱ्या पाणीसाठ्यात टेमी फासचा वापर करावा. गावात ग्रामपंचायतीमार्फत डास प्रतिबंधक धूर फवारणी करावी. पडीत विहिरीत व पाण्याचे साठे यामध्ये गप्पी मासे सोडावे व नागरिकांनी योग्य ते खबरदारी घ्यावी, असे आवाहन जिल्हा प्रशासनामार्फत जिल्हाधिकारी अजय गुल्हाने, प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा गौरकर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. राजकुमार गहलोत यांनी केले आहे.
००००००
No comments:
Post a Comment