Search This Blog

Thursday 14 February 2019

आयुष्यमान भारत ही स्वातंत्र्यानंतरची सर्वात महत्त्वाची योजना: ना.सुधीर मुनगंटीवार



चंद्रपूर जिल्हयात 1 लक्ष गोल्डन ई-कार्डचे वाटप

चंद्रपूर, दि. 14 फेब्रुवारी : सामान्यातल्या सामान्य माणसाला आरोग्याच्या अडचणी निर्माण झाल्यानंतर  आरोग्याच्या काळजी सोबत उपचाराचे ओझे डोक्यावर राहू नये यासाठी आयुष्यमान भारत ही प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी सुरू केलेली स्वातंत्र्यानंतरची सर्वात महत्त्वाची योजना आहे. या योजनेचा लाभ चंद्रपूर जिल्ह्यातील सर्व पात्र कुटुंबांना मिळावा. त्यासाठी आरोग्य यंत्रणेने गरीबसामान्य कुटुंबाचे देवदूत बनावेअसे आवाहन राज्याचे वित्त, नियोजन व वने मंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री ना. सुधीर मुनगंटीवार यांनी आज येथे केले.
       जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनात आज प्रधानमंत्री जन आरोग्य योजनाअर्थात आयुष्यमान भारत योजना संदर्भात मार्गदर्शन व कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. या कार्यशाळेला जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणेत गावपातळीपासून तर मुख्यालयापर्यंत काम करणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांचा सहभाग होता. या कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन करताना त्यांनी आजारी माणसाच्या आयुष्यात देवदूत बनून जा. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी ही योजना सुरू करताना परवडणारी आरोग्यसेवा आणि प्रतिबंधक आरोग्यसेवा या दोन्ही गोष्टीवर लक्ष करण्याचे आवाहन केले होते. हे लक्ष आपण पूर्ण करू याअसे त्यांनी सांगितले. 
       या कार्यक्रमाच्या व्यासपीठावर आमदार नानाभाऊ शामकुळेजिल्हा परिषद अध्यक्ष देवराव भोंगळे, महापौर अंजलीताई घोटेकरउपाध्यक्ष कृष्णा सहारेउपमहापौर अनिल फुलझेलेजिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र पापळकर,सीएससीचे राज्य प्रमुख वैभव देशपांडेडॉ.नायगावकर, वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ.एस.एस.मोरे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.निवृत्ती राठोड, सभापती अर्चनाताई जिवतोडे, सभापती संतोष तंगडपल्लीवार आदींची उपस्थिती होती. यावेळी ना.सुधीर मुनगंटीवार यांच्या मार्गदर्शनात तयार करण्यात आलेल्या माहिती पुस्तिकेचे विमोचनही करण्यात आले.
        स्वातंत्र्यानंतर महत्त्वाची ही योजना सुरू झाली असून आर्थिक परिस्थिती नसताना आजार घरात येणे हा अतिशय कठीण प्रसंग असतो.  रुग्णांची संख्या कमी व्हावीसर्वांचे आरोग्य उत्तम असावे, रुग्ण सेवा सहज सुलभ मिळावी, सार्वजनिक आरोग्य शिबिरामध्ये एकही रुग्ण उपस्थित राहू नयेअशी आदर्श व्यवस्था निर्माण करण्यासाठी आपणा सर्वांना प्रयत्न करावे लागणार आहेत. जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात सार्वजनिक आरोग्यासाठी निधी उपलब्ध करण्यात आला आहे. सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रांना प्रत्येकी आठ कोटी रुपये विशेष बाब म्हणून मंजूर करण्यात आली आहे. लवकरच टाटा ट्रस्टच्या मदतीने कॅन्सर हॉस्पिटल सुरू होणार आहे. त्यामुळे जिल्ह्यातील रुग्णांना उत्तम सेवा द्यावीसोबतच आलेल्या रुग्णाला अतिशय उत्तम वागणूक मिळावी. इलाज करणाऱ्यांच्या डोळ्यात देवदूत असावाअशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.
      आपल्या मार्गदर्शनाचे शेवटी ते म्हणाले कीआपल्याकडे आरोग्य यंत्रणेमध्ये मणुष्यबळासह काही कमतरता आहे. मात्र जे उपलब्ध संसाधने आहेत. जी काही यंत्रणा सध्या कार्यरत आहे. त्यातील उत्तमात उत्तम सामान्य माणसाला मिळावे यासाठी सगळ्या कर्मचाऱ्यांनी प्रयत्न करावेतअसे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
     जिल्ह्यांमध्ये 40 टक्‍क्‍यांपेक्षा अधिक दिव्यांग असणाऱ्या 1 हजार व्यक्तींना इलेक्ट्रिक बॅटरीवर चालणाऱ्या गाड्या देणार असल्याचे त्यांनी यावेळी पुनरुच्चार केला.
        यावेळी आमदार नानाभाऊ शामकुळेमहापौर अंजलीताई घोटेकर यांनी देखील मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.निवृत्ती राठोड यांनी केले. त्यांनी आपल्या प्रास्ताविकामध्ये या योजनेसाठी महाराष्ट्रामध्ये नाशिक आणि चंद्रपूर या दोन जिल्ह्याची निवड झाली असून प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेचे गोल्डन कार्ड लाभार्थ्यांना काढण्याकरता कॉमन सर्विस सेंटरआपले सरकार केंद्रात सुविधा उपलब्ध करण्यात आली असल्याचे सांगितले. आत्तापर्यंत एकूण एक लाख गोल्डन कार्डचे वाटप करण्यात आल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
      या कार्यक्रमात काही व्यक्तींना गोल्डन कार्डचे देखील वाटप करण्यात आले. चंद्रपूर जिल्ह्यात आतापर्यंत एकूण एकशे एक्कावन रुग्णांना या योजनेचा लाभ मिळाला आहे. त्याचप्रमाणे राज्यात पूर्वीपासूनच सुरू असलेल्या महात्मा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत आतापर्यंत 18 हजार 458 व्यक्तींना या योजनेचा लाभ मिळाला असल्याचे सांगितले. चंद्रपूर जिल्ह्यात एकूण 2 लाख 74 हजार 838 दुर्बल घटकांना व गरीब कुटुंबांना या योजनेचा लाभ मिळणार असल्याचे त्यांनी सांगितले. कार्यक्रमाचे संचालन सोनाली गायकी यांनी केले. तर आभार प्रदर्शन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.प्रकाश साठे यांनी केले.
                                                            0000

Wednesday 13 February 2019

क्षेत्रीय निवडणूक अधिकाऱ्यांचे प्रशिक्षण संपन्न


चंद्रपूर, दि.13 फेब्रुवारी : आगामी लोकसभा निवडणुका लक्षात घेता जिल्हा प्रशासनातील क्षेत्रीय निवडणूक अधिकाऱ्यांच्या प्रशिक्षणाचे आयोजन मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनात करण्यात आले होते. यावेळी जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमनार यांनी मार्गदर्शन केले.
       कार्यक्रमाच्या व्यासपीठावर अप्पर जिल्हाधिकारी सचिन कलंत्रेसहाय्यक जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर, निवासी उपजिल्हाधिकारी घनश्याम भूगावकरउपविभागीय अधिकारी मनोहर गव्हाळ  आदी उपस्थित होते.
            यावेळी निवडणुकीच्या संदर्भातील केंद्रीय निवडणूक आयोगाने पाठवलेल्या सूचनांबाबतची माहिती जिल्‍हाधिकारी डॉ.कुणाल खेमनार यांनी दिली.  यावेळी त्यांनी जिल्हाभरात गेल्या महिन्याभरात सुरू असलेल्या ईव्हीएम व व्हीव्ही पॅट मशीनमुळे जिल्ह्यातील मतदारांमध्ये जनजागृतीची मोठी मोहीम जिल्हा प्रशासनाने पार पाडली. यासाठी काम करणाऱ्या अधिकाऱ्यांची त्यांनी कौतुक केले. आगामी काळात निवडणूक आयोगाकडून आलेल्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करण्याचे त्यांनी निर्देश दिले.
                                                                0000

जल आणि वन विषयाला शालेय अभ्यासक्रमात सहभागी करण्यात येईल : ना. मुनगंटीवार




चंद्रपूरमधून महाराष्ट्रव्यापी जलसंवाद यात्रेला सुरूवात
जलपुरुष राजेंद्र सिंग यांनी पिकांचे पावसाच्या
ऋतुचक्राची सांगड घालण्याचे केले आवाहन
जलसाक्षरता कार्यशाळेचा समारोप

चंद्रपूर, दि.13 फेब्रुवारी : महाराष्ट्रात जाणवणाऱ्या पाणीटंचाईवर मात करण्यासाठी वेगवेगळ्या उपाययोजना करतानाच जल आणि वन याबद्दलची  आत्मियता अगदी प्राथमिक स्तरावर निर्माण व्हावी,  यासाठी शालेय  शिक्षणात या संदर्भातील विषय अभ्यासक्रमात असावेत यासाठी निश्‍चित प्रयत्न केले जातीलअसे आश्वासन राज्याचे वित्तनियोजन व वने मंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री ना.सुधीर मुनगंटीवार यांनी आज येथे दिले.
           चंद्रपूर वन प्रशासन विकास व व्यवस्थापन प्रबोधीनी चंद्रपूर तथा विभागीय जलसाक्षरता केंद्र चंद्रपूर यांच्यावतीने जलसाक्षरता कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी आपल्या उद्घाटनीय भाषणात ते बोलत होते.
           व्यासपीठावर जल पुरुष डॉ. राजेंद्र सिंगजलयोद्धा किशोर धारियायशदा जलसाक्षरता केंद्राचे कार्यकारी संचालक डॉ. सुमंत पांडेजलयोद्धा देवाजी तोफाजलनायक मोहन हिराबाईचंद्रपूर वन प्रशासन प्रबोधिनीचे संचालक अशोक खडसे,निवासी उपजिल्हाधिकारी घनश्याम भूगावकरअधीक्षक अभियंता वेमलकुंडाआनंद पुसावळेजलयुद्ध कौस्तुभ आमटेप्रशांत खाडे यांच्यासह महाराष्ट्रातील विविध भागातून आलेले जलयोद्धा, जलप्रेमी उपस्थित होते.
           महाराष्ट्रात जाणवणाऱ्या पाणीटंचाईवर मात करण्यासाठी जल व्यवस्थापन करणे काळाची गरज बनली आहे. या अनुषंगाने नागपूर विभागात जलसंवर्धनसंरक्षणजनजागृती याचबरोबर जल व्यवस्थापन करण्यासाठी जलयोध्दा, जलनायक,जलदूतजनकर्मी यांची अनिवासी एक दिवशीय कार्यशाळा जलपुरुष डॉं. राजेंद्र सिंग यांच्या प्रमुख मार्गदर्शनात आयोजित करण्यात आली होती. चंद्रपूर वरुन जलसाक्षरतेचा संदेश देणाऱ्या जलसंवाद यात्रेची त्यांच्या उपस्थितीत जलकुंभ हाती देऊन सुरुवात झाली.   
          या कार्यक्रमाला संबोधीत करताना ना. मुनगंटीवार यांनी जल पुरुष डॉ. राजेंद्र सिंग यांचे जलसाक्षरतेबद्दल राज्य शासनाला वेळोवेळी मिळत असलेल्या मार्गदर्शना बद्दल आभार मानले . ते म्हणाले, शिक्षण विभागाचे खाते आपल्याकडे जरी नसले तरी महाराष्ट्र शासन जल आणि जंगल याबाबतीत अतिशय जागरूकपणे काम करत असून जलपुरुष श्री. राजेंद्र सिंग यांनी दिलेल्या या प्रस्तावाची निश्चितच दखल घेईल.
       चंद्रपूरच्या जल प्रबोधिनीमधून महाराष्ट्रात जलसाक्षरतेच्या संदर्भात प्रचार-प्रसार करण्यासाठी आज जलसंवाद यात्रा सुरू करण्यात आली.  या जलसंवाद यात्रेला हिरवी झेंडी त्यांनी दाखवली. या संवाद यात्रेमध्ये राज्यातील सर्व वनाधिकारी निश्चित सहभागी होतील असेही त्यांनी सांगितले.
          पाणी व्यवस्थापनजलसंधारण, शाश्वत जलसाठे याबाबत  राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व त्यांची पूर्ण टीम अतिशय सकारात्मक आहे.  मोठ्या प्रमाणात या संदर्भात काम झाले आहे.  त्यामुळे  जलसाक्षरतेचाबाबत  जल पुरुष  डॉ. राजेंद्र सिंग यांच्याकडून आलेल्या कोणत्याही सूचनेचे राज्य सरकार कायम स्वागत करत आले आहे आणि यापुढे देखील स्वागत करेल.
          तत्पूर्वी जल पुरुष डॉ. राजेंद्र सिंग यांनी यावेळी उपस्थित जल प्रेमी नागरिकांना संबोधित करताना महाराष्ट्रामध्ये आता पिकाचे चक्र पावसाच्या चक्राशी एकरूप होणे अत्यंत गरजेचे असल्याचे स्पष्ट केले. आपल्या भागातील वृक्षांची संख्या कमी झाल्यामुळे ऋतू बदलले आहे. नियमित पाऊस ज्या भागात पडत होता. त्या ठिकाणच्या वृक्षाची कमतरता पुढे राहणार नाही. यासाठी काळजी घेण्याची गरज आहे. पाण्याचे साठे वाढवले की हिरवळ वाढते आणि हळूहळू हिरवळ वाढली की त्या ठिकाणी पावसाचे चक्र निश्चित होते. त्यामुळे हिरवळ वाढविण्यासाठी आगामी काळामध्ये नियोजनबद्धपणे प्रयत्न करणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगीतले. या कार्यक्रमाचे संचालन हेमंत शेंडे यांनी केले तर आभार प्रदर्शन अप्पर संचालक प्रशांत खाडे यांनी केले.
                                                            00000

आवास योजनेमध्ये चंद्रपूर जिल्हा महाराष्ट्रातील सर्वाधिक घरे बांधणारा जिल्हा झाला पाहिजे: ना.मुनगंटीवार



पालकमंत्र्यांनी घेतला 21 विभागांचा आढावा

चंद्रपूर दि.13 फेब्रुवारी : चंद्रपूर जिल्ह्यामध्ये प्रधानमंत्री आवास योजनेच्या विविध योजनेतून सर्वाधिक घरे जनतेला मिळेल यासाठी स्वतंत्र यंत्रणा तयार करण्याची गरज आहे. प्रत्येक स्थानिक स्वराज्य संस्थांनी या योजनेच्या अंमलबजावणी व पाठपुरवण्यासाठी स्वतंत्र यंत्रणा निर्माण करावीकोणत्याही परिस्थितीत आवास योजनेमध्ये चंद्रपूर जिल्हा महाराष्ट्रातील सर्वाधिक घरे बांधणारा जिल्हा झाला पाहिजेयासाठी कामाला लागावे असे निर्देश राज्याचे वित्त, नियोजन व वने मंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री ना. सुधीर मुनगंटीवार यांनी आज येथे दिले.
         
स्थानिक जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनामध्ये पालकमंत्री यांच्या नेतृत्वात 21 विविध विभागावर आज चर्चा करण्यात आली. सकाळी बारा वाजता या चर्चेला सुरुवात करण्यात आली. प्रधानमंत्री आवास योजना शहरी या योजनेवर प्रामुख्याने चर्चा झाली. या बैठकीत बोलताना त्यांनी चंद्रपूर जिल्ह्यातील शहरे उत्तमरीत्या पुढील काळात उभी राहावीत यासाठी या आवास योजनेचा कल्पकतेने विचार करणे गरजेचे असल्याचे सांगितले.
या बैठकीला आमदार नानाभाऊ शामकुळेड. संजय धोटेजिल्हा परिषदेचे अध्यक्ष देवराव भोंगळेमहापौर अंजलीताई घोटेकरजिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमनारजिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डीमनपा आयुक्त संजय काकडे,सहाय्यक जिल्हाधिकारी तथा प्रकल्प अधिकारी योगेश कुंभेजकरस्थाई समितीचे सभापती राहुल पावडेसमाज कल्याण सभापती ब्रिजभूषण पाझारेजिल्हा नियोजन अधिकारी जी.आर. वायाळ यांच्यासह विविध विभागाचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते. दुपारी बारा वाजता सुरू झालेली ही बैठक रात्री उशिरापर्यंत सुरू होती.
सकाळच्या सत्रात प्रधानमंत्री आवास योजना शहरी याबाबत आढावा घेताना त्यांनी आमदार नानाभाऊ शामकुळेमहापौर अंजलीताई घोटेकरस्थायी समितीचे सभापती राहुल पावडे व मनपा आयुक्त संजय काकडे यांच्याशी चर्चा केली. शहरात मोठ्या प्रमाणात आवास योजनेतून घरे देताना नदीच्या पात्रातील नागरिकांचे देखील पुनर्वसन महत्त्वाचे आहे. त्यामुळे चांगल्या जागेत घरे देण्यासाठी असणा-या अडचणी व त्यासंदर्भात काय उपाययोजना करता येईल यासाठी एका उच्चस्तरीय समितीचे गठण करण्याचे निर्देश त्यांनी यावेळी दिले. यासंदर्भात लवकरच बैठक घेत असल्याचे सुद्धा सांगितले. याशिवाय कोणते आरक्षण हटवता येते व त्‍यासाठी कोण कोणत्या विभागाची आवश्यक परवानगी घ्यावी लागेल. या संदर्भातही अभ्यास करण्याबाबत अधिकाऱ्यांना निर्देश दिले. झरपट नदीच्या पात्रातील अवैध घरांच्या बाबतीत यावेळी चर्चा झाली.
प्रधानमंत्री आवास योजने मध्ये वेगवेगळ्या घटकांमधून अनेक नवनवीन योजना पुढे आल्या आहेत. नागरिकांना उत्तम घरे देण्याची ही संधी आहे. त्यामुळे जनतेच्या हिताकडे अधिक लक्ष देऊन याबाबतचा आराखडा तयार करण्याचे यावेळी त्यांनी सांगितले.

कायदा हातात घेणार्‍यांवर कडक कारवाई करा

तत्पूर्वी पोलीस सारथी योजनेचा आढावा आज घेण्यात आला. जिल्हाभरात शाळा-कॉलेजेसमध्ये योग्य पद्धतीचा संदेश सर्वांना जाईलअशी प्रचार यंत्रणा राबविण्याचे यावेळी पालकमंत्र्यांनी सांगितले.
गरज भासल्यास कॉल सेंटर आणखी उघडण्यात यावेयासाठी नव्या तंत्रज्ञानाचा वापर करून महिलांच्या सुरक्षा संदर्भात अतिशय काटेकोरपणे या योजनेची अंमलबजावणी व्हावी, असे यावेळी त्यांनी जिल्हा पोलीस अधिक्षक डॉ महेश्वर रेड्डी यांना सांगितले. शहरातील काही भागांमध्ये असामाजिक तत्त्वांचा टोळ्या स्टंटबाजी करण्यामध्ये सक्रिय झाल्याचे यावेळी अनेक समितीच्या सदस्यांनी लक्षात आणून दिले. यावर अशा घटकांवर कडक कारवाई करावीअसे निर्देश त्यांनी दिले.
तत्पूर्वी पोलीस विभागाच्या पुढाकाराने व आदिवासी प्रकल्प विभागाच्या सहकार्याने जिल्ह्यातील दुर्गम भागातील आदिवासी मुलामुलींना महाराष्ट्र दर्शन घडविण्यात आले. आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांच्या या महाराष्ट्र दर्शन कार्यक्रमाची सांगता पालकमंत्री यांच्या उपस्थितीत करण्यात आली. यावेळी पालकमंत्र्यांनी या विद्यार्थ्यांशी संवाद साधला. तसेच त्यांचे प्रवासाबद्दलचे अनुभव सुद्धा ऐकले. जिल्हा माहिती कार्यालयाच्या विविध साहित्याचे प्रकाशन देखील या बैठकीत करण्यात आले.
                                                            0000

जिल्हा माहिती कार्यालयाच्या चित्ररथाला हिरवी झेंडी मिशन सेवा, यशोमुद्रा व पीक विमा पुस्तिकेचे प्रकाशन





चंद्रपूर, दि.13 फेब्रुवारी : जिल्हा माहिती कार्यालय चंद्रपूर यांच्यामार्फत तयार करण्यात आलेल्या मुद्रा व चांदा ते बांदा योजनेवरील चित्ररथतसेच मिशन सेवायशोमुद्रा व पीक विमा घडिपुस्तिकेचे  तसेच प्रधानमंत्री पीक विमाप्रधानमंत्री जनआरोग्य योजनेच्या माहितीपटाचा शुभारंभ राज्याचे वित्त, नियोजन व वने मंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री ना.सुधीर मुनगंटीवार यांनी आज येथे केले.
           जिल्हा माहिती कार्यालय चंद्रपूर यांच्यामार्फत तयार करण्यात आलेल्या दोन चित्ररथांना पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी हिरवी झेंडी दाखविली. प्रधानमंत्री मुद्रा योजना आणि खास चंद्रपूरसाठी असणाऱ्या चांदा ते बांदा योजनेचा प्रचार प्रसार या चित्ररथामार्फत होणार आहे. जिल्ह्यांमध्येही चित्ररथ फिरणार आहेत.
            यावेळी आमदार नानाभाऊ शामकुळे, आमदार ॲड.संजय धोटे, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष देवराव भोंगळे, महापौर अंजलीताई घोटेकर, जिल्हाधिकारी डॉ.कुणाल खेमनार, जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ.महेश्वर रेड्डी, मनपा आयुक्त संजय काकडे, सहाय्यक जिल्हाधिकारी तथा प्रकल्प अधिकारी योगेश कुंभेजकर, स्थाई समितीचे सभापती राहुल पावडे आदी उपस्थित होते.
          पालकमंत्री ना.मुनगंटीवार यांच्या सूचनेनुसार व जिल्हाधिकारी डॉ.कुणाल खेमनार यांच्या मार्गदर्शनात जिल्हा माहिती कार्यालयातर्फे तयार करण्यात आलेल्या तीन प्रकाशनाचे आज प्रकाशन झाले. यामध्ये चंद्रपूर जिल्ह्यातील युवकांमध्ये अतिशय लोकप्रिय ठरलेल्या मिशन सेवा या प्रकल्पासाठी यशाची गुरुकिल्ली ठरणाऱ्या मिशन सेवा, यशाची प्रेरणा या पुस्तकाचे प्रकाशन थाटात झाले. या पुस्तिकेत जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमनार,  जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी,सहायक जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांनी देखील यामध्ये विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले आहे. तसेच महाराष्ट्रातील स्पर्धा परिक्षेच्या संदर्भात लिखाण करणा-या लेखकांचा सहभाग आहे. या पुस्तकाच्या निर्मितीमध्ये माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे संचालक श्री.सुरेश वांदिले यांनी आपले योगदान दिले आहे. सोबतच नियोजन विभागाद्वारे निर्देशित यशोमुद्रा हे  पुस्तक देखील याठिकाणी प्रकाशित झाले. जिल्हा नियोजन अधिकारी तथा मुद्रा बँक योजनेच्या जिल्हास्तरीय समितीचे सदस्य सचिव जी.आर. वायाळ व चंद्रपूर जिल्ह्याच्या अग्रणी बँकेचे व्यवस्थापक एस.एन.झा उपस्थित होते.
          माहिती कार्यालयाद्वारे आजचे तिसरे प्रकाशन आहे. पिक विमा योजनेच्या घडी पुस्तिकेचे प्रकाशन झाले. यावेळी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी डॉ. उदय पाटील उपस्थित होते. 
            याशिवाय  प्रधानमंत्री जन आरोग्य योजना अर्थात आयुष्यमान योजना    पीक विमा योजना या दोन्ही विषयांवर  तयार करण्यात आलेल्या माहितीपटाचे सादरीकरण देखील यावेळी पालकमंत्र्यांच्या पुढे करण्यात आले.
                                                                     000

Monday 11 February 2019

चंद्रपूर जिल्ह्यातील घोडपेठ गावाची डिजिटल गाव म्हणून घोडदौड सुरू





महाराष्ट्रातील पहिल्या डिजिटल गावात सुविधा देण्यास प्रारंभ
केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर यांनी केले डिजिटल गावाचे उद्घाटन

चंद्रपूर, दि. 11 फेब्रुवारी - चंद्रपूर जिल्ह्यातील भद्रावती तालुक्यात येणाऱ्या घोडपेठ येथे आज केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर यांच्या शुभहस्ते डिजिटल गावाचा शुभारंभ करण्यात आला. महाराष्ट्रातील पहिले डिजिटल गाव म्हणून आता घोडपेठ उदयास आले असून राज्यातील प्रत्येक जिल्ह्यामध्ये अशा पद्धतीचे एकडिजिटल ग्राम तयार करण्यात येत असल्याची माहिती  केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर यांनी आज येथे दिली.
         चंद्रपूर जिल्ह्यातील घोडपेठ  गावातील नागरिकांना आजपासून  टेलिमेडिसीन सेवाविद्यार्थ्यांना संगणक प्रशिक्षणाची सुरुवात,  महिलांना  सॅनिटरी नॅपकीन तयार करणे व विकण्याची सुविधा आणि  उर्जा वाचविणाऱ्या एलईडी बल्बच्या निर्माण केंद्राची सुरुवात करण्यात आली. याशिवाय वेगवेगळ्या पद्धतीच्या डिजिटल दाखल्यांची सुविधादेखील उपलब्ध करण्यात आली. यासोबतच या गावांमध्ये आता आर्थिक व्यवहारासंदर्भातील प्रशिक्षणाला सुरुवात झाली आहे. गावामध्ये सोलार स्ट्रीट लाईट लवकरच लावले जाणार आहेत.
      कार्यक्रमाच्या व्यासपीठावर  जिल्हा परिषदेचे अध्यक्ष देवराव भोंगळे,  जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र पापळकर, अतिरिक्त जिल्हाधिकारी सचिन कलंत्रेसीएससीचे  (कॉमन सव्हीस सेंटर) महाराष्ट्राचे प्रमुख वैभव देशपांडेजि.प.सभापती अर्चना जिवतोडे, ब्रिजभूषण पाझारेभद्रावती पंचायत समितीचे सभापती विद्या कांबळे, तहसिलदार महेश शितोटे, गावाच्या सरपंच वैशाली उरकुडे, राहुल सराफ, नरेंद्र जिवतोडे, रवी नागापुरेविजय वानखेडेगिरीश बन्नोरे आदींची उपस्थिती होती.
       यावेळी बोलताना केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर यांनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना ग्रामीण भागाबद्दल विशेष कळवळा असून त्यातूनच डिजीटल गाव करण्याची संकल्पना पुढे आली आहे. शेतकरीशेतमजूर, ग्रामीण भागातील जनता यांना मध्यवर्ती ठेवून प्रधानमंत्री प्रत्येक योजना तयार करतात व राबवतात.  देशातील मोठी लोकसंख्या ही गावांमध्ये राहते. त्यामुळे देशात डिजीटल व्यवहार सुरू झाला पाहिजे. कुठलेही मध्यस्थ न ठेवता थेट संगणकाच्या माध्यमातून बँकेपासून तर आरोग्य पर्यंतच्या सर्व सुविधा मिळाल्या पाहीजे. या माध्यमातून विकासाचा लाभ गतिशीलपारदर्शी होऊन थेट लोकांपर्यंत पोहोचला पाहिजे,अशी त्यांची इच्छा आहे.
            यावेळी त्यांनी आयुष्यमान भारत योजना मध्ये चंद्रपूर जिल्ह्याने घेतलेल्या आघाडीचे कौतुक केले. प्रधानमंत्री आयुष्यमान भारत योजना सुरू करून ग्रामीण भागातील जनतेला त्यांच्या आरोग्यासाठी फार मोठी उपलब्धी व संधी तयार करून दिली आहे. याशिवाय यावेळी उपस्थित जनसमुदायाशी संवाद साधताना त्यांनी आपल्या भागात प्रधानमंत्री किसान योजनेसंदर्भातील सुरू असलेल्या सर्वेक्षणIची प्रगती जाणून घेतली. प्रधानमंत्री किसान योजनेतील तरतुदीप्रमाणे आपल्या खात्यामध्ये पैसे जमा होतील असे त्यांनी सांगितले.
     यावेळी घोडपेठ गावांमधील सगळ्या नागरिकांच बँक अकाऊंट काढल्याबद्दल अभिनंदन ही त्यांनी केले. टेलिमेडिसीन या सेवेचा अधिक लाभ घेण्याबाबत गावकर्‍यांना सांगितले. आज घोडपेठ येथून  मुंबईच्या अपोलो हॉस्पिटलच्या तज्ञ डॉक्टरांची  एका रुग्णाची थेट बोलणी झाली. त्यांच्यासाठी ऑनलाईन सूचवण्यात आलेल्या औषधोपचाराची डिजिटल  प्रिस्क्रिप्शन’ त्यांनी यावेळी गावकऱ्यांना दाखविल.  यापुढे सर्वांनी आपल्या आरोग्याची तज्ञ डॉक्टरांकडून टेलिमेडिसीनद्वारे तपासणी करावी, असे आवाहनही केले.
      या ठिकाणी उपस्थित बहुसंख्य महिलांशी संवाद साधताना त्यांनी आता घोडपेठ या गावांमध्ये आजपासून सॅनिटरी नॅपकीन तयार होतील. आजूबाजूच्या परिसरातील महिला, तरुणीना देखील ही सुविधा मिळाली पाहिजे, अशी अपेक्षा व्यक्त केली. कार्यक्रमानंतर गावच्या सरपंच वैशाली उरकुडे यांनी गावातील मुलींना सॅनिटरी नॅपकिनचे वाटपही केले.
     या कार्यक्रमाचे प्रास्ताविक सीएससीचे राज्याचे प्रमुख वैभव देशपांडे यांनी केले. घोडपेठ व पांढरकवडा या दोन गावांमध्ये डिजिटल गाव बसविण्यात येत असल्याचे सांगीतले. या डिजीटल गाव अंतर्गत केंद्र शासनाने सुरू केलेल्या ई-गव्हर्नन्स सुविधा उपलब्ध केल्या जातात. राज्य सरकारच्या आपले सेवा केंद्र सारखीच सुविधा या ठिकाणी दिली जाते. सर्व शासकीय दाखले या ठिकाणी उपलब्ध केल्या जातात. घोडपेठ येथे आज उद्घाटित करण्यात आलेल्या डिजिटल व्हिलेजमध्ये चार वेगवेगळ्या युनिटचे उद्घाटन करण्यात आले. यामध्ये मुलांना संगणकाचे प्राथमिक ज्ञान मिळण्यासाठी आवश्यक असणाऱ्या निलीट (नॅशनल इन्स्टिट्युट ऑफ इलेक्ट्रॉनिक्स ॲन्डइन्फॉमेशन टेक्नॉलॉजी) सेंटरचे उद्घाटन करण्यात आले. याच ठिकाणी डिजिटल डॉक्टर सेंटर देखील उघडण्यात आले आहे.या योजनेअंतर्गत टेलिमेडिसीन सुविधा उपलब्ध केल्या जातात. संगणकावर तज्ञ डॉक्टरांचे मार्गदर्शन स्थानिक रुग्णांना उपलब्ध केले जाते. डिजिटल व्हिलेजमधील तिसरे केंद्र हे स्त्री स्वाभिमान केंद्र असून याठिकाणी सॅनिटरी नॅपकिन निर्माण केल्या जाते व तसेच त्याची विक्री देखील केली जाते. एकाच ठिकाणी उघडण्यात आलेले चौथे केंद्र म्हणजे एलईडी निर्माण केंद्र. अवघ्या काही मिनिटात एलीडी बल्फ निर्माण केले जातात. बाजाराच्या किमतीपेक्षा अतिशय कमी किमतीत सीएससी या नावाने हे एलईडी बल्फ तयार होतात. गावातच हे बल्ब तयार करण्याची ही व्यवस्था असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन सरपंच वैशाली उरकुडे यांनी केले. कार्यक्रमाचे संचालन उद्धव पुरी यांनी केले. या कार्यक्रमाला घोडपेठसह आजूबाजूच्या परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सीएससीचे विभागीय समन्वयक निलेश कुंभारेजिल्हा समन्वयक रमजान शेख तसेच कॉमन सर्व्हिस सेंटरच्या केंद्रचालक ममता सारडा यांनी प्रयत्न केले.
                                                              0000