चंद्रपूर, दि.4 फेब्रुवारी- रस्ते अपघात हे देशापुढील मोठे आव्हान असले तरी शासनस्तरावर वाहतुक नियमांवर प्रभावी अंमल व वाढत्या अपघातांच्या पार्श्वभूमीवर ठोस उपाययोजना राबविल्या गेल्यास अपघातांच्या संख्येत आमुलाग्र घट शक्य आहे. वाहतुक विभागाच्या प्रमुख अधिका-यांनी रस्ता सुरक्षा अभियानाला लोकचळवळीचे स्वरूप दिल्यास या अभियानाची फलनिष्पत्ती दखलपात्र ठरेल, असे प्रतिपादन केन्द्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांनी केले आहे.
जिल्हा रस्ता सुरक्षा समिती चंद्रपूर द्वारा पोलीस मुख्यालयाच्या ड्रील शेड येथे आयोजित 30 वा रस्ता सुरक्षा अभियान-2019 च्या उद्घाटनप्रसंगी ना.अहीर बोलत होते. ते म्हणाले की, वाहतुक व्यवस्था सुरळीत व्हावी, अपघातांचे प्रमाण कमी व्हावे, प्रदुषणावर आळा बसावा, अनियंत्रित वाहन चालविणा-यांवर प्रतिबंध बसावा याकरिता केंद्र व राज्य शासनाने अनेक कडक नियम अंमलात आणले आहे. वाहतुक नियमांचा भंग करणा-यांविरूध्द मोठया प्रमाणात दंडात्मक कार्यवाहीची तरतूद करण्यात आली आहे. केंद्रीय परिवहन मंत्री नितीनजी गडकरी तसेच राज्य शासन रस्ते अपघातांची संख्या कमी करण्यासाठी प्रभावी उपाययोजनांवर कटाक्षाने अंमल करण्याबाबत आग्रही आहे. त्यामुळे अपघातांचे आकडे कमी झाले असले तरी सामाजिकदृष्टया अपघाताचे हे गांभीर्य चिंतेत भर घालणारे असल्याने अधिकारी, कर्मचारी, विविध क्षेत्रातील जबाबदार नागरिकांनी पुढाकार घ्यावा तसेच शाळा, महाविद्यालयीन स्तरावर सुरळीत वाहतुकीसंदर्भात तसेच अपघातांच्या पार्श्वमीवर जागृती व्हावी यावर भर देत ना. अहीर यांनी जनजागृतीसाठी पथनाटय हे प्रभावी माध्यम ठरू शकते असे सांगितले.
रस्ता सुरक्षा हे संबंधित विभागाचे कर्तव्य असले तरी सामाजिक पातळीवर लोकांची याबाबतीत जबाबदारी अनिवार्य ठरते असे सांगत पालकांनी आपल्या पाल्यांच्या हातात वाहने सोपवितांना त्यांचे वय, वाहतुक नियकांचे ज्ञान व वाहन विषयक त्याची मानसिकता आकलन याबाबत गांभीर्याने विचार करूनच पाल्यांच्या हातात वाहने सोपवावी असे आवाहन केले.
यावेळी ना. हंसराज अहीर यांच्या उपस्थितीत पथसंचालनाद्वारे मानवंदना दिली. पथनाटयाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी वाढत्या अपघातांवर नियंत्रण घालण्यासाठी जनजागृती केली. यावेळी निघालेल्या रॅलीस हिरवी झेंडी दाखवून त्यांनी रॅली रवाना केली. या कार्यक्रमास चंद्रपूर महानगराच्या महापौर अंजलीताई घोटेकर, जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विश्वंभर शिंदे, सहा. प्रादेशिक परिवहन अधिकारी शांताराम फासे, वाहतुक नियंत्रण शाखा चंद्रपूरचे पोलीस निरीक्षक जयवंत चव्हाण यांचेसह वाहतुक, पोलीस, कर्मचारी आदींची उपस्थिती होती.
चंद्रपूर महानगरातील 12 शाळांचे विद्यार्थी या रॅलीत सहभागी झाले होते. कार्यक्रमास शहरातील नागरिक, स्वयंसेवी संघटनांचे प्रतिनिधी, शिक्षक, पालकांची बहुसंख्येने उपस्थिती होती. 000
No comments:
Post a Comment