सनमुक्तीसाठी लोकचळवळ निर्माण व्हावी :
ना.बडोले यांनी दिला महाराष्ट्र व्यसनमुक्त करण्याचा संदेश
* 1 टक्का अबकारी कर व्यसनमुक्तीसाठी खर्च करणार
* चंद्रपूरमधील दारूबंदी ही जनतेसाठी डायरेक्ट कॅश ट्रॉन्सफर योजना
* चंद्रपूरमध्ये 7 व्या व्यसनमुक्ती साहित्य संमेलनाचे थाटात उद्घाटन
* चंद्रपूरमध्ये 7 व्या व्यसनमुक्ती साहित्य संमेलनाचे थाटात उद्घाटन
* लक्षवेधी दिंडीने चंद्रपूर महानगराचे लक्ष वेधले
* शाळा व महाविद्यालयाच्या हजारो विद्यार्थ्यांचा सहभाग
* व्यसनाधीनता सोडविण्यासाठी पूरक ठरणाऱ्या स्टॉलवर गर्दी
* राष्ट्रपिता महात्मा गांधी व्यसनमुक्ती सेवा पुरस्कार प्रदान
* शाळा व महाविद्यालयाच्या हजारो विद्यार्थ्यांचा सहभाग
* व्यसनाधीनता सोडविण्यासाठी पूरक ठरणाऱ्या स्टॉलवर गर्दी
* राष्ट्रपिता महात्मा गांधी व्यसनमुक्ती सेवा पुरस्कार प्रदान
चंद्रपूर, दि. 2 फेबुवारी : व्यसनमुक्त समाज निर्माण करण्यासाठी तरुणांनी, विद्यार्थ्यांनी सामाजिक दायित्व म्हणून आपला वेळ द्यावा, असे आवाहन राज्याचे वित्त, नियोजन व वनेमंत्री तथा चंद्रपूरचे पालकमंत्री ना.सुधीर मुनगंटीवार यांनी आज येथे केले. राज्यस्तरीय व्यसनमुक्ती साहित्य संमेलनाचे उद्घाटक म्हणून ते बोलत होते.
सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग यांच्या माध्यमातून दरवर्षी घेण्यात येणाऱ्या राज्यस्तरीय व्यसनमुक्ती साहित्य संमेलनाला चंद्रपूरमध्ये शनिवारी थाटात शुभारंभ झाला. संमेलनाचे वैशिष्ट्य म्हणजे व्यसनमुक्तीसाठी लढा उभारणारे ज्येष्ठ समाजसेवक पद्मश्री डॉ. अभय बंग हे या संमेलनाचे अध्यक्ष आहेत.
आज सकाळी स्थानिक ज्युबिली हायस्कूल या ठिकाणावरून निघालेल्या व्यसनमुक्ती दिंडीला संमेलनाध्यक्ष डॉ.अभय बंग यांनी शुभेच्छा दिल्या. व्यसनमुक्त समाज हे या कार्यक्रमाचे अंतिम ध्येय असल्याचे त्यांनी यावेळी आपल्या संदेशात स्पष्ट केले.
यावेळी सामाजिक न्याय मंत्री राजकुमार बडोले, आमदार नानाभाऊ शामकुळे, महापौर अंजलीताई घोटेकर आदींची प्रामुख्याने उपस्थिती होती. शहराच्या मुख्य रस्त्यांवर ही लक्षवेधी व्यसनमुक्ती दिंडी आकर्षणाचे केंद्र झाली. चंद्रपूरातील अनेक महाविद्यालयातील हजारो विद्यार्थी यामध्ये सहभागी झाले होते.
बारा वाजता मुख्य कार्यक्रमाला सुरुवात झाली. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री राजकुमार बडोले होते. कार्यक्रमाचे उद्घाटन केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर यांनी केले. व्यासपीठावर राज्याचे वित्त, नियोजन व वने मंत्री तथा पालकमंत्री चंद्रपूर ना. सुधीर मुनगंटीवार संमेलनाचे अध्यक्ष ज्येष्ठ समाजसेवक पद्मश्री डॉ.अभय बंग, सामाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळे, आमदार नानाभाऊ शामकुळे, जिल्हा परिषद अध्यक्ष देवराव भोंगळे, महापौर अंजलीताई घोटेकर, सुप्रसिद्ध अभिनेत्री अनिता दाते-केळकर, समाज कल्याण आयुक्त मिलींद शंभरकर, जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमनार, जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ.महेश्वर रेड्डी, मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र पापळकर, समाज कल्याण सभापती ब्रिजभुषण पाझारे, समाज कल्याण सहायक आयुक्त प्रसाद कुळकर्णी आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी बोलताना पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी चांदा क्लब मैदानावर व्यसनमुक्तीचा संदेश विद्यार्थ्यांमार्फत महाराष्ट्रव्यापी व्हावा, असे आवाहन केले. निर्व्यसनी माणसाकडे उत्तम आरोग्य, उत्तम दिशा असते. त्यामुळे विद्यार्थ्यांनी या कामांमध्ये पुढाकार घ्यावा. आपला वेळ द्यावा. व्यसनमुक्त समाज निर्माण करण्यासाठी पुढे यावे, असे आवाहन त्यांनी यावेळी उपस्थित तरुणांना केले.
चंद्रपूर ही पराक्रमी वाघाची भूमी असून ही भूमी लढवय्याचा जिवंत इतिहास आहे. या ठिकाणच्या केलेल्या दारूबंदीचा उल्लेख करून त्यांनी सर्व क्षेत्रात आदर्श निर्माण करणारी नवी पिढी निर्माण करणारी ही भूमी व्यसनाधीन होता कामा नये ,यासाठी कोणत्याही परिणामाची तमा न बाळगता हा निर्णय घेतल्याचे सांगितले. सोबतच राज्यातल्या 36 जिल्ह्यांपैकी केवळ चंद्रपूर येथे राज्यस्तरीय व्यसनमुक्ती साहित्य संमेलन घेतल्याबद्दल चंद्रपूरच्या जनतेच्यावतीने त्यांनी सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले यांचे आभार देखील मानले. यावेळी त्यांनी दारु उत्पादक शुल्क विभागाला मिळणा-या करातून 1 टक्का कर व्यसनमुक्ती कार्यक्रमासाठी देण्याचे मान्य केल्याचे सांगितले.
महात्मा गांधी यांनी 1923 मध्ये भारत व्यसनमुक्त करण्याला सर्वोच्च प्राधान्य दिले जाईल, असे सांगितले होते. महात्मा गांधींची ही 150 वी जयंती असून गांधीजींच्या स्वप्नातला भारत देश साकारण्यासाठी व्यसनमुक्तीच्या कामांमध्ये मोठ्या संख्येने पुढे येण्याचे आवाहनही त्यांनी यावेळी युवकांना केले. ते म्हणाले, व्यसन करण्यासाठी पैशांची गरज असते, मात्र व्यसन सोडण्यासाठी एका पैशाची सुद्धा गरज नाही. भारत ही प्राचीन संस्कृती असलेला देश आहे. अनेक संस्कृती आल्या आणि लयाला गेल्या. मात्र भारतीय संस्कृती अद्यापही टिकून आहे. या सुसंस्कृत देशांमध्ये व्यसनाधीन मुलाने आईचा खून करणे अशा बातम्या ऐकायला येऊ नये, असे आवाहनही उपस्थित तरुणाईला त्यांनी केले.
यावेळी त्यांनी चंद्रपूर जिल्ह्यामध्ये दारुबंदीचा घेतलेल्या निर्णयानंतर मोठ्या प्रमाणात गुन्हेगारीमध्ये कपात झाल्याचे दिसून येत असल्याचे स्पष्ट केले. सामाजिक सौहार्द वाढल्याचेही या काळात सिद्ध झाल्याचे त्यांनी पोलिसांकडून आलेल्या आकडेवारीसह स्पष्ट केले.
यावेळी बोलताना केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर यांनी चंद्रपूरमध्ये दारूबंदीच्या माध्यमातून पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी व्यसनमुक्तीचा मोठा प्रयत्न केला आहे. त्या पार्श्वभूमीवर हे संमेलन होत असल्याबद्दल त्यांनी सामाजिक न्याय विभागाचे कौतुक केले. व्यसनमुक्त समाज हे संतानी पाहिलेले स्वप्न आहे. महाराष्ट्रमध्ये गावागावांमध्ये ही चळवळ उभी राहिली आहे. हा समाज व्यसनमुक्त नसला तर त्याचे दुष्परिणाम काय होऊ शकतात हे पंजाब मधील व्यसनाच्या विळख्याने सिद्ध केले. त्यामुळे देशासाठी व स्वतःसाठी व्यसनमुक्त जीवन असावे, असे आवाहन त्यांनी उपस्थितांना केले.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले यांनी साधु, संत मंडळींनी आपल्या संस्कृतीमध्ये व्यसनमुक्तीचे बीज पेरले आहे. भारत हा तरुणांचा देश असून सध्या सर्वाधिक तरुण वयाची लोकसंख्या भारतात आहे. त्यामुळेही युवाशक्ती व्यसनमुक्त असावी. व्यसनमुक्तीचा संदेश जागतिक व्हावा यासाठी आम्हाला प्रयत्न करायचे असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी अबकारी कराचा एक टक्का प्रबोधनासाठी देण्याबाबत वित्तमंत्री ना.मुनगंटीवार यांनी घेतलेल्या पुढाकारासाठी आभार व्यक्त केले. राज्य शासनाने नव्या पिढीला व्यसनाधिनतेतून दूर काढण्यासाठी अनेक निर्णय घेतले असल्याचे यावेळी त्यांनी स्पष्ट केले.
यावेळी राज्यमंत्री दिलीप कांबळे यांनी देखील संबोधित केले. तरुणांनी व्यसनापासून दूर रहावे यासाठी मोठ्या प्रमाणात सामाजिक न्याय विभाग काम करीत असल्याचे त्यांनी सांगितले.आपल्या देशाचे भविष्य तरुण पिढी आहे. ही पिढी सुदृढ व निर्व्यसनी असावी यासाठी आमचा प्रयत्न असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
या संमेलनाचे अध्यक्ष ज्येष्ठ समाजसेवक पद्मश्री डॉ.अभय बंग यांनी यावेळी चंद्रपूर, गडचिरोली व वर्धा या तीन जिल्ह्यांमध्ये दारूबंदी केल्यानंतर झालेल्या सामाजिक परिवर्तनाची आकडेवारीसह माहिती दिली. दारू व तंबाखू हे नवे कॉलरा-प्लेग असल्याचे त्यांनी सांगितले. गुजरात राज्याने गेल्या सत्तर वर्षांमध्ये दारूबंदी केल्यानंतरही विकासामध्ये आगेकूच कायम ठेवली आहे. त्यामुळे दारूबंदीमुळे विकासावर परिणाम होतो हे चुकीचे असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. यावेळी चंद्रपूर जिल्हा दारूबंदी झाल्यानंतरच्या परिणामाचे त्यांनी पावर पॉइंट प्रेझेंटेशन केले. यामध्ये चंद्रपूर मध्ये दारूबंदी झाल्यामुळे वार्षिक जवळपास 87 कोटी रुपये सरळ सरळ लोकांच्या खिशात वाचले. त्यामुळे चंद्रपूरसाठी दारूबंदी म्हणजे लोकांच्या खिशात डायरेक्ट कॅश ट्रान्सफर योजना आहे. यावेळी गडचिरोली जिल्ह्यात सुरू असलेल्या मुक्तीपथ प्रयोगाबाबत ही त्यांनी माहिती दिली.
सिने अभिनेत्री अनिता दाते केळकर यांनी देखील यावेळी उपस्थितांना संबोधित केले. कार्यक्रमाचे संचालन रेणुका देशकर यांनी केले तर आभार प्रदर्शन सिद्धार्थ गायकवाड यांनी केले.
पुरस्कार
सन 2017-18 मध्ये पुरस्कार प्राप्त व्यक्तींचे नावे – मुंबई येथील रश्मी पुराणिक, भीमराव शिवराव मगरे, श्रावणी सतीश मदभावे- सिंधूदुर्ग, बाजीराव काशिनाथ दीक्षित, अनंतराव सीताराम दरवसे, केशव धोंडीबा चौधरी, शाहीर हेमंतराजे पुरुषोत्तम मावळे –पुणे, किशोर काळोखे-सातारा, सर्जेराव कृष्णा कचरे, सचिन ज्ञानदेव खांडेकर, राजेंद्र बाबुराव पाटील सांगली, समीर सुधाकर देशपांडे, दिग्विजय एकनाथाराव देशमुख कोल्हापूर, सुधीर नारायण वसाने जळगाव, निवृत्ती काशिनाथ देशमुख अहमदनगर, पुष्पावती मधुकर पाटील नाशिक, लक्ष्मण मेहर नागपूर, संध्या प्रतिक राऊत व अनिल वामन डोंगरे चंद्रपूर, दयाराम कवळू पंधरे, जयंत मदनलाल शुक्ला व राहुल विनायकराव जोशी गोंदिया, नंदकिशोर दिवाकर काथवटे व ठुमेश्वर पुडलिक मने गडचिरोली, डमदेव पांडुरंग कहालकर भंडारा, डॉ.धनजय विठ्ठल हंगे, स्वप्नील विलास चंदने व निरंजन मुरलीधर भाकरे औरंगाबाद, शाहीर नानाभाऊ उत्तमराव परिहार जालना, खान अब्दुल रशीद रहमान व तत्वशील बाबुराव कांबळे बीड, अजिनाथ दशरथ शेरकर लातूर, मारोती तुकाराम पवार नांदेड, जयकृष्ण अजाबराव खडसे व शिवजमंगल हिरामण चव्हाण अमरावती, प्रेमलता प्रकाश सोनोने बुलडाणा व सुचिता पाटेकर यवतमाळ यांचा समावेश आहे.
तर सन 2017-18 मध्ये पुरस्कार देण्यात आलेल्या संस्थांचे नाव- गोकुळदास तेजपाल रुग्णालय मुंबई, भूमिका फाउंडेशन रायगड, विनायकराव जोशी काका सेवा संस्था सावळज जि.सांगली, सायली बहुउद्देशीय शिक्षण संस्था नागपूर, ग्रामीण विकास संस्था पाडळी जि.औरंगाबाद, गुरुदेव सेवा आश्रम उत्तमसरा नागपूर, राष्ट्रसंत तुकोडोजी महाराज बहुउद्देशीय संस्था सुंदरखेद बुलडाणा, गोविंदराव मुनघाटे कला व विज्ञान महाविद्यालय कुरखेडा जि.गडचिरोली, लोकविकास सामाजिक संस्था नाशिक व राजयोग शिक्षण व शोध प्रतिष्ठान देगलूर जि.नांदेड यांना देण्यात आले आहे.
No comments:
Post a Comment