पोंभुर्णा येथील डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी वाचनालयाचे लोकार्पण
सभागृहाच्या नूतणीकरणाचे लोकार्पण व रस्त्याचे भूमिपूजन
चंद्रपूर दि.28 जानेवारी : जिल्हयामध्ये झालेल्या गारपीटग्रस्त भागाचे पंचनामे करून शेतकऱ्यांना तातडीने नुकसानभरपाई देण्यात येईल, अशी घोषणा राज्याचे वित्त, नियोजन व वने मंत्री तथा पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी पोंभुर्णा येथे केली. प्रजासत्ताक दिनाच्या शुभपर्वावर पोंभुर्णा येथील डॉ.श्यामाप्रसाद मुखर्जी वाचनालयाचे लोकार्पण, सभागृहाच्या नूतनीकरणाचे लोकार्पण तसेच 2 कोटी किमतीच्या सिमेंट रस्त्याचे भूमिपूजन कार्यक्रमात ते बोलत होते.
25 जानेवारी रोजी जिल्ह्यामध्ये झालेल्या अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानाबाबत जिल्हाधिकारी कार्यालयाला निर्देश दिल्याचे यावेळी त्यांनी सांगितले. पोंभुर्णा व परिसरातील मोठ्या संख्येने नागरिक या कार्यक्रमांना उपस्थित होते.
या कार्यक्रमाच्या व्यासपीठावर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष देवराव भोंगळे, बल्लारपूरचे नगराध्यक्ष हरिष शर्मा, मूलच्या नगराध्यक्ष रत्नमाला भोयर, पोंभूर्णाच्या नगराध्यक्ष श्वेता वनकर, सभापती अलका आत्राम, गजानन गोरंटीवार, विनोद देशमुख,रजिया कुरेशी, याशिवाय ग्रंथ चळवळीचे अभ्यासक अनिल बोरगमवार हे देखील उपस्थित होते.
यावेळी बोलताना बल्लारपूर मतदारसंघ हा शंभर टक्के गॅसयुक्त, आरोयुक्त आदी सर्व अंगणवाड्या आयएसओ मानांकन धारक व्हाव्यात, अशी अपेक्षा त्यांनी यावेळी व्यक्त केली.
पोंभुर्णा येथील युवकांना स्पर्धा परीक्षांचे मार्गदर्शन नियमित मिळावेत. तसेच चंद्रपूर जिल्ह्याचा सरकारी नोकरीतील टक्का वाढवताना पोंभूर्णा सारख्या तालुक्यातील युवकांची देखील यामध्ये वर्णी लागावी. यासाठी श्यामाप्रसाद वाचनालयाची सुरुवात आपण या ठिकाणी करत असल्याचे त्यांनी सांगितले. या वाचनालयांमध्ये नियमित वाचनाच्या पुस्तकांसोबतच स्पर्धापरीक्षांना उपयुक्त असणारे पुस्तक उपलब्ध करून द्यायचे, निर्देश त्यांनी यावेळी दिले. सोबतच कॉलेजच्या प्रत्येक वर्षाची पुस्तकेदेखील याठिकाणी उपलब्ध असावीत. ज्यामुळे गरीब व सुविधा नसलेल्या कुटुंबातील मुलांना आपले स्नातक, स्नातकोत्तर शिक्षण या वाचनालयांमध्ये अभ्यास करून करता यावे. यासाठी सर्व सुविधा उपलब्ध करण्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
यावेळी बोलताना त्यांनी पोंभूर्णा तालुक्यांमध्ये गेल्या चार वर्षांमध्ये झालेल्या विविध विकासकामांबाबतची माहिती दिली. पोंभुर्णा एमआयडीसीला लवकरच सुरुवात होत असून या ठिकाणी पर्यावरण पूरक उद्योगाला निमंत्रित करण्यात येत आहे. टाटा ट्रस्टच्या मदतीने उन्नत शेती या कार्यक्रमाअंतर्गत समूह शेतीचे काम होणार असल्याचे त्यांनी सांगितले. नुकतेच या ठिकाणी स्वीट क्रांतीला सुरुवात झाली असून पोंभूर्णा पंचायत समितीच्या सभापती अलका आत्राम यांच्या नेतृत्वात मध निर्मितीबाबत महिला बचत गटांना स्वयंपूर्ण करण्याची मोहीम राबविण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले. या शिवाय कापडी पिशव्या तयार करणे, अगरबत्ती क्लस्टर निर्माण करणे, टूथपिक उद्योगाला चालना देणे,चांदा ते बांदा योजनेअंतर्गत बंधारे निर्माण करणे आदी विविध उपक्रम हाती घेतले असून या ठिकाणच्या पायाभूत सुविधा उभारण्यासाठी पूर्ण शक्तीनिशी काम सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.
हा मतदारसंघ 100% गॅस युक्त व्हावा, प्रत्येक घरामध्ये गॅस वापरला जावा. प्रत्येक गावांमध्ये शुद्ध पेयजलासाठी आरो मशीन लागावी आणि गावातील प्रत्येक अंगणवाडी आयएसओ मानांकन प्राप्त असावी अशी आपली इच्छा असल्याचे त्यांनी सांगितले. यासाठी सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी प्रयत्न करावेत, असे आवाहनही त्यांनी केले.
त्यांनी स्वच्छ भारत अभियानामध्ये आपल्या मतदारसंघातील मूल, पोंभूर्णा व बल्लारपूर या तीनही नगरपरिषदांचा अंतर्भाव असल्याबद्दल समाधान व्यक्त केले. या तीनही नगर परिषद व नगरपालिकाच्या नगराध्यक्ष व मुख्याधिकारी यांनी अतिशय उत्तम काम केले असून भविष्यात देखील हे काम उत्तम होत राहावे व स्वच्छ भारत अभियानात हे तीनही शहर पुढे कायम असावे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
No comments:
Post a Comment