नवेगाव भुज व घोसरी फाटा येथील 32 कोटीच्या विकास कामांचे भूमीपूजन
चंद्रपूर, दि.7 जानेवारी – बल्लारपूर, मुल मतदारसंघातील प्रत्येक गाव आरो युक्त व्हावे, प्रत्येक घराघरांमध्ये गॅस जोडणी मिळावी. शेतीला सिंचनाच्या सोयी उपलब्ध व्हाव्यात तसेच प्रत्येक शेतकऱ्याला जोडधंदा मिळावा यासाठी आपले प्रयत्न सुरू आहेत. बदललेल्या मुल, पोंभूर्णा आणि बल्लारपूर शहराच्या प्रतिमेप्रमाणे प्रत्येक गावांमध्ये बदल घडून यावा यासाठी आपण कटिबद्ध असल्याचे प्रतिपादन, राज्याचे वित्त, नियोजन व वने मंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आज येथे केले.
चंद्रपूर जिल्ह्यातील मूल तालुक्यामध्ये नवरगाव येथे विविध विकासकामांच्या भूमिपूजनासाठी एकत्रित आलेल्या नागरिकांना संबोधित करताना ते बोलत होते. रस्ते पूल व अन्य 32 कोटीच्या विकास कामांचे भूमिपूजन आज त्यांच्याहस्ते करण्यात आले. या भूमिपूजन कार्यक्रमाला जिल्हा परिषदेचे अध्यक्ष देवराव भोंगळे, बल्लारपूरचे नगराध्यक्ष हरिष शर्मा, जिल्हा परिषद सदस्य पृथ्वी अवथाळे, शितलताई बांबोळे, चंदू मारगोनवार, प्रशांत बांबडे, नंदू रनदिवे, सुमित आरेकर, अमोल चुदरी, प्रभाकर भोयर, अभियंता मनोज जयस्वाल, श्री.वसुले आदींची उपस्थिती होती.
आजच्या 32 कोटी रुपयांच्या भूमिपूजनाचा कामामध्ये केळ्झर ते सिंताळा, भेसगाव, दुगाळा, बेंबाळ या रस्त्याची दुरूस्ती, या रस्त्यावरील दोन लहान पुलांचे बांधकाम करणे, तसेच जिल्हा सीमा ते जनगाव देवाडा ते येनबोडी रस्त्याचे सुधारणा करण्याच्या कामाचा सहभाग आहे.
यावेळी बोलताना सुधीर मुनगंटीवार यांनी मतदारसंघातील प्रत्येक गाव आरोयुक्त, प्रत्येक अंगणवाडी आयएसओ, प्रत्येक कुटुंबाला गॅस जोडणी, सोबतच सिंचनाच्या उत्तम सोयी, हाताला रोजगार मिळेल अशा जोडधंद्याची निर्मिती करण्याचा आपला संकल्प असून पाणंद रस्ते, मामा तलाव यांनाही पुनर्जीवित करण्याचे आपले प्रयत्न असल्याचे त्यांनी सांगितले.
या वेळी त्यांनी या विभागासाठी 75 लाख रुपयांच्या अतिरिक्त विकास कामाची घोषणा देखील केली. मतदार संघातील ज्या कुटुंबांना केशरी शिधापत्रिका नाही अशा लोकांना देखील यापुढे एक अर्ज भरून दोन रुपये व तीन रुपये किलो दराने अन्नधान्य मिळण्याची व्यवस्था केली असल्याचे त्यांनी सांगितले. मुल, पोंभूर्णा व बल्लारपूर हे शहर दृष्टिपथात पडताच बदल सर्वांना दिसायला लागला आहे.असाच बदल प्रत्येक गावागावांमध्ये दिसेल त्यासाठी आपला प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी शेवटी स्पष्ट केले.
000
No comments:
Post a Comment