राज्यातील सर्व पत्रकारांची व त्यांच्या कुटुंबाच्या आरोग्यासाठी
कॅशलेस योजना राबवणार
चंद्रपूर, दि.6 जानेवारी- जगातल्या सर्व देशांमध्ये भारताची लोकशाही हे जागतिक वैभव बनले आहे. त्यामुळे लोकशाही व्यवस्थेतील चारही स्तंभ मजबूत असणे आवश्यक आहे. त्यासाठी लोकशाही व्यवस्थेला बळकट करण्याचे दायित्व, जबाबदारी व कर्तव्य समजून पत्रकारांनी पत्रकारिता करावी, असे आवाहन राज्याचे वित्त, नियोजन व वने मंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आज येथे केले. चंद्रपूर जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या पत्रकार दिन समारंभात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते.
चंद्रपूर येथील जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या रेल्वे स्थानकाजवळच्या सभागृहामध्ये आयोजित या कार्यक्रमांमध्ये त्यांनी राज्य शासनाने पत्रकारांसाठी सुरू केलेल्या विविध योजनांची माहिती दिली. सोबतच राज्य शासन पत्रकारांच्या संदर्भातील कोणतीही अडचण सोडविण्यात तत्पर असून महाराष्ट्रातील सर्व पत्रकारांना व त्यांच्या कुटुंबांना देखील कॅशलेस पद्धतीने आरोग्य सेवा देण्याबाबत विचार करीत असल्याचे स्पष्ट केले. यावेळी पत्रकारांच्या काही समस्यांबाबत माहिती व जनसंपर्क विभागाच्या वरिष्ठांसोबत चर्चा घडवून आणू, असे आश्वासनही त्यांनी दिले.
जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या या कार्यक्रमाला महाराष्ट्र टाइम्सचे संपादक श्रीपाद अपराजित, माजी अध्यक्ष सत्यनारायण तिवारी, परिषद प्रतिनिधी बबन बांगडे, मुरली मनोहर व्यास उपस्थित होते. यावेळी विविध क्षेत्रात काम करणाऱ्या पत्रकार व मान्यवरांचा सत्कार देखील मुनगंटीवार यांच्या हस्ते करण्यात आला.
यावेळी उपस्थित पत्रकारांना संबोधित करताना ते म्हणाले, लोकशाही व्यवस्थेमध्ये आता इव्हीएमच्या माध्यमातून राज्यकर्ते जन्माला येतात आणि भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या घटनेप्रमाणे काम करतात. संपूर्ण जगाला याचे आश्चर्य आहे. मात्र सामान्यातल्या सामान्याच्या हाती आलेली ही लोकशाही व्यवस्था बळकट करण्यासाठी सशक्त माध्यम म्हणून पत्रकारितेकडे आदराने बघितले जाते. अनेकांच्या बलिदानानंतर देशाला ही लोकशाही व्यवस्था प्राप्त झाली आहे. त्यामुळे चौथा स्तंभ म्हणून जबाबदारी घेण्याची, दायित्व निभवण्याची व कर्तव्य पार पाडण्याची तयारी ठेवावीच लागेल.
चंद्रपूर जिल्ह्यातील विविध उपक्रमाबाबत या वेळेस त्यांनी माहिती दिली. जिल्ह्यामध्ये वेगवेगळ्या क्षेत्रातील कोहिनूर असून आपल्या पत्रकारितेच्या माध्यमातून त्याला झळाळी द्या. जनतेपर्यंत माहिती पोहोचवा, असे आवाहन केले. यावेळी त्यांनी चंद्रपूर जिल्ह्यात भारतातले 9 वे कॅन्सर हॉस्पिटल, पोंभूर्णा जवळ उभे राहत असलेले तीन हजार पोलिसांचे प्रशिक्षण केंद्र, भारतातील सर्वात आधुनिक सैनिकी शाळा ,बल्लारपूर व चंद्रपूर या रेल्वे स्थानकांना बदललेले रूप, याशिवाय मिशन शौर्य, मशीन सेवा, मिशन शक्ती या माध्यमातून चंद्रपूर जिल्ह्याला राष्ट्रीय स्तरावर मिळत असलेली ओळख याबाबतही पत्रकारांनी लक्ष वेधावे, असे आवाहन केले.
यावेळी राज्य शासनातर्फे पत्रकारांना देण्यात येणाऱ्या विविध योजनांबाबत त्यांनी उल्लेख केला. सुमारे 17 वर्षानंतर जाहिरात धोरणाबाबत सर्वसमावेशक सुधारित नियमावली आणि सुमारे दहा वर्षानंतर जाहिरात दरांमध्ये भरीव वाढ करण्यास आली. पत्रकारांच्या पेन्शन स्कीमसाठी भरीव आर्थिक अर्थसंकल्पीय तरतूद करण्यात आली. याशिवाय पत्रकारांच्या कोणत्या मागण्या असल्यास पत्रकारांचा मित्र म्हणून मागण्या पूर्ण केल्या जातील, असेही त्यांनी स्पष्ट केले. जिल्ह्यातील सर्व पत्रकार संघाच्या इमारती पूर्ण केल्या जातील. तर काही कामे प्रगतीपथावर असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. 26 जानेवारीला श्रमिक पत्रकार संघाच्या इमारतीचे भूमीपूजन करणार असल्याचेही त्यांनी यावेळी जाहीर केले.
तत्पूर्वी या कार्यक्रमाचे अन्य प्रमुख पाहुणे महाराष्ट्र टाइम्सचे संपादक श्रीपाद अपराजित यांनी देखील यावेळी उपस्थित पत्रकारांशी संवाद साधला. पत्रकारिता ही एक शक्ती असून तिचा सदुपयोग समाजाच्या सर्वांगीण उत्थानासाठी करण्यात यावा, असे आवाहन त्यांनी केले. विदर्भातील पत्रकारांच्या लेखणीला प्रचंड धार असून शेतकऱ्यांच्या आत्महत्या व त्यांच्या समस्या बाबत सातत्यपूर्ण लिखाणामुळे दोन वेळा सरकारला शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी जाहीर करावी लागली. समस्यांची योग्य मांडणी केल्यास पत्रकारांच्या लेखणी पुढे अनेक निर्णय बदलले जातात. माजी राष्ट्रपती महोदयांनी विदेशाचा दौरा देखील देशातील दुष्काळ पडल्याच्या बातम्या प्रकाशित झाल्यावर रद्द केला होता. अवतीभवती घडणाऱ्या परिस्थितीचे योग्य विश्लेषण करणे आवश्यक असल्याचेही त्यांनी सांगितले. यवतमाळ जिल्ह्यातील वाघिणीला ठार मारण्याच्या घटनेबाबत, वन्यजीव व मानव यांच्यातील संघर्षाची जाणीव नसलेल्या लोकांनी कशा पद्धतीने मांडणी केली याचे उदाहरण ताजे असल्याचे त्यांनी सांगितले. मात्र पत्रकारांनाही अशावेळी आपल्या लेखणीतून सत्य मांडावे, अशी अपेक्षा असते, असेही त्यांनी सांगितले.
कार्यक्रमाचे अध्यक्षीय भाषण करताना करताना जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष बंडूभाऊ लडके यांनी पत्रकारांच्या संरक्षण कायद्याची अंमलबजावणी व्हावी, पत्रकार पेन्शन योजना लवकर लागू व्हावी, ज्येष्ठ पत्रकारांना देखील निवृत्ती वेतन मिळावे व दरवाढीबाबत कोणावरही अन्याय होऊ नये, अशा चार मागण्याची चर्चा केली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक विनोदसिंह ठाकुर यांनी केले. कार्यक्रमाचे संचालन मोरेश्वर राखुंडे व दीपक देशपांडे यांनी केले तर आभार प्रदर्शन सुनील तिवारी यांनी केले.
पुरस्काराचे मानकरी
जिल्हा मराठी पत्रकार संघातर्फे यावेळेस देण्यात आलेले पुरस्कार व त्याचे मानकरी पुढीलप्रमाणे- बाळशास्त्री जांभेकर स्मृती पुरस्कार ज्येष्ठ पत्रकार यशवंतराव दाचेवार, लोकमान्य टिळक स्मृती पुरस्कार मुख्य अभियंता सीटीपीएस जयवंतराव बोबडे, सामाजिक कृतज्ञता पुरस्कार अवार्ड संस्था नागभिड, स्वर्गीय श्री चंपतराव लडके स्मृती सेवाव्रती पुरस्कार श्री ज्ञानदेव जुनघरे, स्वर्गीय रामवती जयराज ठाकूर स्मृती पुरस्कार छायाचित्रकार श्री गोलू बाराहाते, स्वर्गीय लीलाताई बांगडे स्मृर्ती गौरव पुरस्कार डॉ. आशिष व्यास, स्वर्गीय श्रीनिवास तिवारी स्मृती शोध वार्ता पुरस्कार श्री. फारुक शेख स्वर्गीय श्रीमती चांगुनाताई मुनगंटीवार स्मृती पर्यावरण पत्रकारिता पुरस्कार श्री.बाबा बेग, स्वर्गीय शांतारामजी पोटदुखे स्मृती शैक्षणिक संस्था विकास वार्ता पुरस्कार आशिष गजभिये, स्वर्गीय समताताई नालमवार स्मृती जिल्हा विकास वार्ता पुरस्कार श्री.प्रमोद राऊत. याशिवाय जिल्हा माहिती कार्यालयातील अधिक्षक श्री. रामराव दोडके यांचा देखील पत्रकार संघाच्या वतीने यावेळी विशेष सत्कार करण्यात आला. |
No comments:
Post a Comment