राष्ट्रीय मतदार दिन उत्साहात संपन्न
* 26 जानेवारीपासून मतदान टोल फ्रि क्रमांक 1950 सुरु होणार
* व्हीपॅड मशीनमुळे आपले मतदान कोणाला झाले, हे स्वतःला कळणार
* अधिकारी, दिव्यांग व नवमतदारानी ऐकला निवडणूक आयुक्तांच्या संदेश
चंद्रपूर, दि.25 जानेवारी – देशात व राज्यात या वर्षात निवडणुका होत असून या निवडणुकीत मतदानापासून कुणीही वंचित राहू नये व अधिकाधिक मतदान व्हावे यासाठी विद्यार्थ्यांनी व नागरिकांनी जिल्हा प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ.कुणाल खेमनार यांनी आज जिल्हा निवडणूक कार्यालयाच्या वतीने बचत साफल्य भवन येथे आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात केले.
चंद्रपूर जिल्हाधिकारी कार्यालयात आज राष्ट्रीय मतदान दिन उत्साहात संपन्न झाला. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र पापळकर, जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ.महेश्वर रेड्डी, अप्पर जिल्हाधिकारी सचिन कलंत्रे, निवासी उपजिल्हाधिकारी तथा उपजिल्हा निवडणूक अधिकारी घनश्याम भुगावकर, उपविभागीय अधिकारी मनोहर गव्हाळ, तहसिलदार संतोष खांडरे आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी जिल्हाधिकारी डॉ.कुणाल खेमनार म्हणाले, अनेक चांगल्या उपक्रमाची सुरुवात मुलांपासून होत असते. त्यामुळे या कार्यक्रमात मोठया संख्येने विद्यार्थी नवमतदार उपस्थित आहेत. त्यांनी आपल्या आजूबाजूच्या नवमतदारांनी नाव नोंदणी केली नसेल त्यांना नाव नोंदणीसाठी प्रोत्साहीत करावे, असे त्यांनी सांगितले. तसेच सोशल मिडीया व विविध ऑनलाईन माध्यमाव्दारे आपले नाव मतदार यादीत आहे अथवा नाही याबाबतची खात्री करता येते. त्यामुळे या नव्या सुविधांचा वापर तरुण पिढीने करावा व इतरांना देखील याबाबत अवगत करावे, असे आवाहन त्यांनी केले.
यावेळी मुख्य निवडणूक आयुक्त यांचा संदेश उपस्थितांना ऐकविण्यात आला या संदेशाचा दाखला देत नवमतदारांनी चुकीचे मतदान न करता वैध व नैतिक मतदान करावे. वैध मतदान करणे अतिशय गरजेचे असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. जिल्ह्यातील सर्व प्रमुख अधिकारी या कार्यक्रमाला उपस्थित होते. निवडणुकीची कामे आपण सर्वजण अग्रक्रमाने करत असतो. विशेषतः मला या ठिकाणी या प्रक्रियेत सहभागी झालेल्या दिव्यांग बांधवांचे अभिनंदन केले पाहिजे असे त्यांनी सांगितले. ते सुध्दा या प्रक्रियेत हिरहिरीने सहभागी होत आहे.
या निवडणुकीमध्ये ईव्हीएम सोबतच व्हीपॅड मशीन वापरली जात आहे.व्हीपॅडमुळे आपले मत आपण कोणाला देतो आहे हे माहिती पडणार आहे. त्यामुळे ही प्रक्रिया 100% पारदर्शी असल्याचेही त्यांनी सांगितले
तसेच जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र पापळकर यांनी मतदानाचा हक्क बजावणे आपले पहिले कर्तव्य असल्याचे सांगितले. लोकशाही सदृढ करण्यासाठी व्यापक व सर्व समावेशक मतदान होणे आवश्यक असल्याचे प्रतिपादनही त्यांनी केले.
यावेळी प्रातिनिधीक स्वरुपात नवमतदार स्मृती विश्वास खाडे, शैलेस सुधाकर पांडव, दिव्यांग पंकज राजेश्वर शर्मा या नवमतदारांना निवडणूक ओळखपत्र मान्यवरांच्या हस्ते वाटप करण्यात आले. या राष्ट्रीय मतदार दिनाच्या निमित्त घेण्यात आलेल्या स्पर्धेतील मुलांना बक्षिस वितरीत करण्यात आले. प्रास्ताविक उपजिल्हा निवडणूक अधिकारी घनश्याम भुगावकर यांनी तर संचालन नायब तहसिलदार कांचन जगताप यांनी केले. आभार प्रदर्शन तहसिलदार संतोष खांडरे यांनी केले. यावेळी जिल्हाधिकारी डॉ.कुणाल खेमनार यांनीउपस्थितांना मतदार दिवसाची शपथ दिली. यावेळी युवक युवती व अधिकारी मोठया संख्येने उपस्थित होते.
मतदानाच्या जनजागृतीसाठी घेण्यात आलेल्या विविध स्पर्धांच्या विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. त्यामध्ये निबंध स्पर्धेत प्रथम वैष्णवी प्रदीप कौरासे, व्दितीय कोमल सुनिल कटकमवार, तृतीय साहील हरिश्चंद्र वाढई, चित्रकला स्पर्धेत- प्रथम क्रमांक मोरेश्वर प्रमोद ताटकोंडावार, व्दितीय प्रथमेश यशवंत निकोडे, तृत्तीय क्षितीज शिरीश बनकर, वक्तृत्व स्पर्धेत प्रथम क्रमांक करण ज्ञानेश्वर पोले, व्दितीय असतमुनी उत्तम गायकवाड, तृत्तीय प्रशांत नामदेव मुंगरे यांचा समावेश आहे.
तसेच मुलांच्या दौड स्पर्धेत प्रथम क्रमांक शिवाजी नंदकिशोर गोस्वामी, व्दितीय सुरज विनोद पांडे, तृतीय प्रणिल दिवाकर लांडे यांना देण्यात आला. तर मुलींच्या दौड स्पर्धेत प्रथम क्रमांक खुशी अनिल सातपैसे, व्दितीय जैनब खान व तृतीय समृध्दी मनोज आदे यांनी पटकाविला.
No comments:
Post a Comment