* मिशन सेवामध्ये मुलींनी सहभागी होण्याचे आवाहन
* मुलींसाठी जिल्हयात प्रायोगिक स्तरावर अभ्यासिका उघडणार
* एफईएस गर्ल्स कॉलेजच्या गुणवान विद्यार्थीनींचा सत्कार
चंद्रपूर, दि.11 जानेवारी - कुशाग्र बुद्धिमत्ता, सहनशीलता, एकाग्रता ही नैसर्गिक देणगी मुलींना मिळाली आहे. त्यामुळे गुणवत्ता क्षेत्रात मुलींची आघाडी आहे. आपल्या उपजत गुणांना वाव देत मुलींनी संशोधन आणि नावीन्यपूर्ण प्रयोगामध्ये स्वतःला झोकून दयावे. मुलींच्या या गुणवत्तेचा उपयोग समाजाच्या भल्याकरिता करण्यासाठी शैक्षणिक संस्थांनी पुढे यावे, असे आवाहन राज्याचे वित्त, नियोजन व वने मंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आज येथे केले. 73 वर्षाची वैभवी परंपरा असलेल्या 'एफईएस' गर्ल्स कॉलेजच्या स्नेह संमेलनाचे उद्घाटक म्हणून ते बोलत होते.
सर्व क्षेत्रात मुलींच्या गुणवत्तेचा आज दबदबा निर्माण झाला आहे. त्यामुळे समाजाचे नेतृत्व करण्यासाठी आता मुलींनी सर्व स्तरात पुढे यावे. चंद्रपूर मध्ये सुरू करण्यात आलेल्या मिशन सेवा या अभियानात हिरीरीने सहभागी व्हावे. जिल्हयातील मुलींचा स्पर्धा परीक्षांमधील सहभाग वाढण्यासाठी प्रायोगिक तत्वावर अभ्यासिकाची निर्मिती केली, जाईल अशी महत्वपूर्ण घोषणाही त्यांनी यावेळी केली.
या कार्यक्रमाच्या व्यासपीठावर फिमेल एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष ॲड. विजयराव मोगरे, संस्थेचे सचिव ॲॅड. पुरुषोत्तम सातपुते, प्राचार्य डॉ. सरोज झंझाळ, सुमनताई उमाटे, प्रभाकर बनकर, देवानंद खोब्रागडे, राहुल बनकर, इको -प्रो चे बंडू धोत्रे आदींची उपस्थिती होती.
ज्या काळात महिला शिक्षणाची सुरुवात झाली. ज्यावेळी महिला शिक्षणाची सुरुवात करणे गरजेचे होते. अशा काळात या शैक्षणिक संस्थेची निर्मिती झाली. त्यामुळे या शैक्षणिक संस्थेचा महिला विकासामधील वाटा महत्त्वाचा आहे, अशा शब्दात त्यांनी या शैक्षणिक संस्थेचा गौरव केला.
यावेळी त्यांनी जिल्ह्यांमध्ये सुरू असलेल्या विविध योजनांची माहिती देताना मिशन शौर्यच्या माध्यमातून 5 आदिवासी मुलांनी एव्हरेस्ट सर करून चंद्रपूरचे नाव आंतरराष्ट्रीय स्तरावर नेऊन ठेवले. हा प्रयोग यशस्वी झाल्यानंतर चंद्रपूर जिल्ह्यातील मुलांचा सरकारी नोकरीमध्ये टक्का वाढावा यासाठी मिशन सेवाला पण सुरुवात केली आहे. 16 तारखेला चांदा क्लब ग्राउंडवर याचा शुभारंभाचा मोठा कार्यक्रम होत आहे. मिशन सेवेच्या माध्यमातून सर्व स्तरातील स्पर्धा परीक्षांमध्ये चंद्रपूर जिल्ह्यातील मुला- मुलींची पण वर्णी लागावी, अशी आपली इच्छा आहे. भविष्यामध्ये देशात अनेक ठिकाणी जिल्हाधिकारी, जिल्हा पोलिस अधीक्षक पदावर चंद्रपूरचे अधिकारी बहुसंख्येने असावेत, अशी आपली मनस्वी इच्छा आहे. यासाठी मुलांना अभ्यासकांची सुविधा जिल्ह्यांमध्ये अनेक ठिकाणी निर्माण केली आहे. मुलींसाठी स्वतंत्र अभ्यासिका निर्माण करण्याबाबत आपण जिल्हाधिकारी महोदयांना निर्देश देणार असल्याचे त्यांनी यावेळी टाळ्यांच्या कडकडाटात सांगितले.
यावेळी त्यांनी मिशन शक्तीमध्ये देखील अनेक मुलींनी चंद्रपूरचे नाव मोठे करण्यासाठी पुढे यावे,असे आवाहन केले. ऑलिंपिकच्या इतिहासामध्ये भारताला आत्तापर्यंत केवळ 28 पदक मिळाले आहेत. मात्र 2024 मध्ये होणाऱ्या ऑलम्पिकमध्ये चंद्रपूरच्या मुलांनी पदक भारतासाठी मिळवावे,अशी आपली इच्छा आहे. त्यासाठी बल्लारपूर येथे जागतिक दर्जाचे क्रीडा संकुल उभारले जात आहे. जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी देखील क्रीडा संकुल उभारले जात असून जिल्हा क्रीडा स्टेडियमसह ज्युबली हायस्कूलच्या मागे 25 कोटी रुपयांचे शहीद बाबुराव शेडमाके क्रीडा संकुल निर्माण होत आहे. या पायाभूत सुविधांच्या माध्यमातून जिल्ह्यातून क्रीडा क्षेत्रामध्ये क्रांती घडावी, असा आपला प्रयत्न आहे. उद्या या कॉलेजच्या एखाद्या विद्यार्थिनीने ऑलम्पिकमध्ये देशाचे प्रतिनिधित्व करावे, अशी इच्छा असल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. यावेळी विद्यार्थ्यांशी संवाद साधताना त्यांनी प्रत्येक दिवसाचे चोवीस तास असतात. त्या 24 तासाचे योग्य नियोजन करून अपेक्षित ध्येय पूर्ण करा. त्यासाठी झपाटलेपणाने ध्येयाच्या मागे लागा. कारण एकदा मनाची तयारी केल्यानंतर यश फार दूर नसते. त्यामुळे मनात हजार वेळा यशाचा विचार करा, यश तुम्हाला निश्चितच मिळेल, असा यशाचा मूलमंत्र देखील सांगितला.
यावेळी मेघा डुकरे, रूषाली दुबे, रूपाली कटकमवार, सीमा कोवे, रिमा कुशवाह, पायल ब्रम्हया, स्वाती संतपुरीवार, पुष्पा बावणे, सोनी सेगम या विविध क्षेत्रात प्रावीण्य मिळवणाऱ्या विद्यार्थीनीचा पालकमंत्री महोदयाकडून सत्कार करण्यात आला.
No comments:
Post a Comment